मुंबई महाराष्ट्राशी जोडली जावी, यासाठी मुंबईतल्या मराठी माणसाने तरुण रक्तांचे बळी दिलेत. वर्षानुवर्षं बलिदान दिलंय. शिव्या खाल्ल्यात. शांतपणे अपमान सहन केलेत. म्हणून आम्ही मुंबईचे मराठी लोक आजही अभिमानाने म्हणतो की मुंबई आमचीच. मुंबई सगळ्यांची आहे, हे आम्हालाही माहिती आहे, तरीही आम्ही असं म्हणतोच. त्याला कारण असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या या प्रेरणादायी आणि वेदनादायी आठवणी.
२१ नोव्हेंबर १९५५. जुन्या मुंबई इलाख्याच्या विधानसभेत मुंबई शहराला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने घेतला होता. आपल्या शहराची ओळखच पुसून टाकण्याच्या या प्रयत्नामुळे मुंबईचा मराठी माणूस पेटून उठला. सगळ्या युनियननी बंदचं आवाहन केलं. विधानसभेवर मोर्चा काढण्याचं ठरवलं.
रिगल सिनेमासमोर आता महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय आहे तिथे तेव्हा विधानसभा असायची. त्या सकाळी मुंबईतले सगळे रस्ते जणू फोर्टच्या दिशेने जात होते. पोलिस त्या मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. बाबूराव जगताप, भगीरथ झा, विनायक भावे असे समाजवादी नेते मोर्चाचं नेतृत्व करत होते. लाठ्या, अश्रुधूर यांचा मारा सुरू झाला. पण लोक मागे हटत नव्हते. पोलिसांनी गोळ्या मारायला सुरवात केली. पण लोक मागे हटले नाहीत.
त्यात गिरगावातल्या फणसवाडीत राहणारा सीताराम पवार होता. मॅट्रिकमधे शिकणारा १९ वर्षांचा मुलगा. घरात सांगून निघाला होता, विधानभवनावर झेंडा गाडूनच परत येईन. पण तो परतला नाही. तो एकटा नव्हता. मोरारजी देसाई सरकारच्या पोलिसांच्या गोळ्य़ांनी पंधरा तरुण शहीद झाले. त्यांचं हौतात्म्य वाया गेलं नाही. कारण विधानसभेत मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव संमतच झाला नाही.
हेही वाचाः मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
पण इतकं सगळं होऊनही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू थांबले नाहीत. दोनच महिन्यांनी १६ जानेवारी १९५६ ला रात्री साडेआठ वाजता अख्ख्या मुंबईचे कान रेडियोशी चिकटले होते. नेहरूंनी मुंबईला महाराष्ट्र राज्यात सामिल करण्यास ठाम नकार दिला. मुंबईला केंद्रशासित बनवण्याची घोषणा झाली. आणि मुंबईत एकच जाळ पेटला.
लोक रस्त्यावर उतरले. एक ट्राम आणि दोन बस जाळण्यात आल्या. पोलिसांनी या आक्रोशाला निर्दयपणे संपवण्यास सुरवात केली. अंधाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. आजूबाजूला न बघता पोलिसांच्या गाड्या गोळ्या मारत धावत होत्या.
रात्री साडेदहाची वेळ होती, बंडू गोखले गिरगावातल्या मुगभाटजवळ नाईट स्कूलवरून घरी परतत होता. तो मॅट्रिकच्या परीक्षेची तयारी करत होता. दोन भावांची जबाबदारी होती त्याच्यावर. पोलिसांनी झाडलेली एक गोळी त्याच्या छातीत गेली. त्याने रात्री दीड वाजता हॉस्पिटलमधे जीव सोडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सिम्प्लेक्स मिलचा कामगार निवृत्ती मोरे पोलिसांच्या गोळ्यांला बळी ठरला. त्याचं नवीनच लग्न झालं होतं. दुसरीकडे बेळगावही पेटलं होतंच. मारुती बेन्नाळकरांनी पोलिसांच्या बंदुकीसमोर छाती रोखून सांगितलं, हिंमत असेल तर गोळी चालवा. गोळी त्यांच्या छातीतून आरपार गेली. पण ती मराठी छाती झुकली नाही. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं २४ वर्षं आणि त्यांच्या अनाथ मुलीचं वय होतं अवघं तीन महिने.
हेही वाचाः शाहिरांनी फक्त गायला नाही तर घडवलायही महाराष्ट्राच इतिहास
अशा एकेक घटना कानावर पडत होत्या. मग शांत राहणं शक्यच नव्हतं. पूर्ण मुंबई पेटून उठली. कृष्णा कॉटेजच्या चारशे महिलांनी आपल्या छोट्या बाळांना सोबत घेऊन 'आम्हाला मारा मोर्चा' काढला. त्यांची मागणी होती गोळीबार रोखला जावा. त्यांचा मोर्चा बघून पोलिसही थांबले. पण सरकारचे आदेश थांबवले नाहीत. गोळ्या बरसतच राहिल्या. सलग तीन वर्ष. त्या गोळ्यांनी १०६ जणांचे बळी घेतले होते.
दिल्लीत आता काही ब्रिटिशांचं सरकार नव्हतं. मुंबईतही ब्रिटिश राज नव्हतं. तरीही आपल्या देशबांधवांना चिरडल गेलं. विधानसभेतले विरोधी पक्षाचे तेव्हाचे एकमेव सदस्य बीसी कांबळे यांनी यावर प्रश्न विचारले होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल्ड क्लास फेडरेशन या पक्षाचे आमदार होते. विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे ते एकटेच विरोधकांचा किल्ला लढवत होते. त्यांनी मुंबईत झालेल्या गोळीबाराचं वर्णन असं केलंय.
‘मुंबईत मोरारजी सरकारने एकूण ४६१ वेळा गोळीबार केला. सरकारी आकड्यांच्या नुसार ८० जणांचा मृत्यू झाला आणि ३८१ गंभीर जखमी झाले. १६ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत एकूण ५४४ गोळ्या झाडण्यात आल्या. म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटांत एक गोळी मारण्यात येत होती. गोळ्यांनी जखमी झालेल्यांचं वर्णन अंगावर काटा उभं करणारं आहे. २४ जणांच्या डोक्यावर गोळी लागली. १६ जणांच्या छातीतून गोळी आरपार गेली. दोघांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर गोळीने नेम धरला. १७ जणांची आतडी बाहेर आली. दोघांच्या ढुंगणावर गोळी लागली. ३२ जणांनी गोळी लागल्यावर त्याच ठिकाणी प्राण सोडले. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या हुतात्म्यांची संख्या ८ आहे. मरणाऱ्यांमधे ३ महिन्यांचंही एक बाळ आहे.'
हेही वाचाः मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?
बॅरिस्टर जयकरांनी महात्मा गांधी, मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांच्याबरोबर जालियांवाला बाग हत्याकांडासाठी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीवर काम केलं होतं. त्यांनी लिहून ठेवलंय, 'आज मला आपल्याच सरकारचे अत्याचार पाहून जालियांवाला हात्याकांडाची आठवण येतेय. दोन्ही ठिकाणी गोळ्या चालवण्याचं एकच कारण सांगण्यात आलं, सरकार पाडण्याचा षडयंत्र. आता स्वराज्यातही इंग्रजी राज्याची पुनरावृत्ती होत असेल, तर यापेक्षा मोठं दुसरं दुर्भाग्य कोणतं असेल?’
केवळ मराठी भाषिकांचं वेगळं राज्य हवं, अशी मागणी करतात म्हणून महाराष्ट्राला देशविरोधी ठरवण्यात येत होतं. मराठी माणूस गुंड आहे. आक्रमक आहे. तो मुंबईचं कॉस्मोपॉलिटन रूप टिकवू शकणार नाही. असे आरोप करण्यात आले. मुंबईचा इतिहास पुरावे देऊनही मान्य करण्यात येत नव्हता. ना पंतप्रधान नेहरू ऐकत होते ना महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नेतृत्व. इतकं हौतात्म्य देऊनही मराठी माणसांनाच शिव्या ऐकाव्या लागत होत्या.
हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन
सरकारने १०६ हुतात्म्यांना गुंड ठरवलं. चौकशीची पुन्हा पुन्हा मागणी होऊनही चौकशी झाली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची सुवर्ण जयंती झाली. तरीही आजपर्यंतही त्याचे रेकॉर्ड लपवले गेले. १०६ हुतात्म्यांची नावंही सहजपणे समोर आली नाहीत. त्यासाठी संघर्ष झाला. त्यांचं स्मारक बनवण्यासाठीही आंदोलनं झाली. मुंबईचं नाव मुंबईच राहावं यासाठीही मराठी माणसाने रक्त आटवलं. मद्रासपासून कलकत्त्यापर्यंत सगळ्यांची नावं बदलली पण शिव्या खाल्ल्या फक्त मराठी माणसानेच.
मुंबई महाराष्ट्राला जोडण्याच्या मागणीत काय चुकीचं होतं? इतर सगळ्यांना आपापली राज्यं मिळाली होती, मग मराठी माणसानेच का शांत राहायला हवं होतं? डॉ. बाबासाहब आंबेडकर, विनोबा भावे, सी. डी. देशमुख, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी अशा देश गाजवणाऱ्या सगळ्यांनीच मुंबई महाराष्ट्रासोबत असण्याला पाठिंबा दिला होता. मराठी भाषिक तेव्हा तर मुंबईतला सर्वात मोठा समूह होताच. तसाच तो आजही आहे. या शहराच्या सर्व भौगोलिक सीमा महाराष्ट्राशी जोडलेल्या आहेत. या शहराचं पाणी, वीज, भाजी, रस्ते सगळं महाराष्ट्रातूनच येतं. तरीही पंतप्रधान नेहरूंपासून मुंबईतल्या काँग्रेसच्या नेतृत्वापर्यंत सगळे मुंबईला महाराष्ट्राचं मानायला तयार नव्हते. त्याला विरोध करून महाराष्ट्राल्या आघाडीच्या नेतृत्वाने दिल्लीश्वरांची नाराजी कायम झेललीय.
हेही वाचाः पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा
मुंबई मिळवण्यासाठी महाराष्ट्राने आपलं रक्त वाहिलं आहेच. पण त्यापेक्षाही मोठा त्याग शांतपणे केलाय. तोंड बंद करून अनेक दशकं बुक्क्यांचा मार खाल्लाय. स्वतःवर प्रादेशिकतेचा शिक्का मारून घेतलाय. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे फक्त भाषेचं आंदोलन नाही, तर शोषणाच्या विरोधातलं आंदोलन मानून मोठमोठे नेते त्यात उतरले होते. त्यात क्रांतिसिंह नाना पाटील, गाडगेबाबा, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, भाई माधवराव बागल, अण्णाभाऊ साठे, एसएम जोशी, अमरशेख, वा रा कोठारी, आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे असे डोंगराएवढे मोठे नेते होते. तरीही त्या आंदोलनाची व्यापकता कुणी समजूनच घेतली नाही.
त्यामुळे जेव्हा कुणी म्हणतं की मुंबई सगळ्या देशाची आहे. तेव्हा ते चुकीचं नसतंच. पण मराठी माणूस तेव्हा ओरडतो, मुंबई आमचीच. कारण ती मिळवण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व गमावलंय. त्यालाही माहीत आहे की मुंबई सगळ्यांचीच आहे. पण असं म्हणणाऱ्या मोठमोठ्या लोकांचं कपट त्याने जवळून अनुभवलंय. मुंबई सगळ्यांचीच म्हणणाऱ्यांने केलेले घाव अजून पूर्ण भरलेले नाहीत.
त्यामुळे कुणी मुंबईवर आपला हक्क सांगायला येतो, तेव्हा मुंबईचा मराठी माणूस खेकसतो, 'मुंबई आमचीच'. कारण तेव्हा त्याच्या जखमा पुन्हा ताज्या होतात. यामागे प्रत्येक वेळेस परप्रांतीयांचा द्वेषच नसतो. पण ते कुणीही समजून घ्यायला तयार नसतं. त्यासाठीच्या शिव्या खायला मुंबईचा मराठी माणूस नेहमीच तयार असतो. त्या मुंबईसाठी शिव्या खाल्ल्यात. आजही खातोय. उद्याही खाईल. आणि प्रत्येक शिवी खाताना जोरात ओरडेल, 'मुंबई आमचीच'.
हेही वाचाः
वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत
महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट
युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास
महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख
१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे