सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?

२९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?

सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ५६ वा स्मृतीदिन झाला. सध्या विधानसभेत विरोधकांची भूमिका निभावणारा भारतीय जनता पक्ष सावरकरांना आदर्श मानतो, हे तर जगजाहीरच आहे. सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजपकडून विधानसभेत सावरकर गौरव प्रस्ताव मांडण्यात आला. पण नियमात न बसल्यानं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही.

प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे भाजपने शिवसेना आणि इतर सत्ताधारी पक्षांवर टीका केली. काँग्रेसचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिदोरी या मासिकातला एक लेख विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. काँग्रेसबरोबर गेलेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झालीय, असा आरोपही करण्यात आला. त्यावेळी ‘आधी भाजपने केंद्रात सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव अमलात करावा. त्यानंतर आम्हीच तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडू’ असं प्रत्युत्तर शिवसेनेनं दिलं.

२०१४ ची निवडणूक लढवतानाच सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करू असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. गेली पाच वर्ष भाजपचे नेते नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होते. पण त्यांनी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती.

हेही वाचा : आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

नावाचा समावेश चुकून राहिला

आता या प्रकरणातून एका नवीन वादाला तोंड फुटलंय. भाजप सत्तेत असताना भारतरत्न तर दूरच पण राज्य सरकारकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचं `लोकसत्ता` या पेपरच्या एका बातमीत छापून आलंय.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस सामान्य प्रशासन खात्याचे मंत्रीही होते. तेच खातं राष्ट्रपुरुषांची यादी जाहीर करतं. या यादीत असलेल्या राष्ट्रपुरुषांचे फोटो मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांच्या केबिनमधे आणि सगळ्या शासकीय, निमशासकीय ऑफिसमधे लावले जातात. सरकारी ऑफिसात तर या राष्ट्रपुरूषांचे फोटो लावणं बंधनकारकच आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, राष्ट्रपुरूषांच्या नावांची यादी राज्य सरकारकडून ११ सप्टेंबर २०१७ ला जाहीर करण्यात आली. महात्मा गांधींपासून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत सगळ्याच मोठ्या माणसांचा यात समावेश होता. पण वीर सावरकरांचं नाव या यादीत घालण्यात आलं नाही. या आधीच्याही यादीत सावरकरांचं नाव घातलं गेलेलं नव्हतं.
 
या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकर यांचं नाव असायलाच पाहिजे, असं ते म्हणाले. पण यादीत त्यांचं नाव नाही हे निदर्शनास आणून दिल्यानंतर चुकून राहिलं असेल तर ती चूक या सरकारने ताबडतोब दुरुस्त करावी असं ते म्हणाले, असंही लोकसत्ताच्या बातमीत सांगितलंय.

यादीत कोणाकोणाची नावं आहेत?

राष्ट्रपुरुषांच्या यादीत महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, दादाभाई नौरोजी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, महात्मा जोतिबा फुले, डॉ. झाकिर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद, व्ही.व्ही. गिरी, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, के.आर. नारायणन, अटलबिहारी वाजपेयी, राजर्षी शाहू महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. मनमोहन सिंग, प्रतिभा पाटील,  प्रणब मुखर्जी, नरेंद्र मोदी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, रामनाथ कोविंद इत्यादी नावांचा समावेश आहे.

यात सावरकरांचं नावं अजिबात दिसत नाही. त्यामुळे सावरकरांच्या गौरव प्रस्तावाबद्द्ल इतके आक्रमक होणारे फडणवीस त्यांच्या अधिकारात असलेल्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत सावरकरांचं नाव घालायचं कसं काय विसरतात, अशी टीका त्यांच्यावर होतेय.

खरंतर, फक्त सावरकरच नाहीत तर अनेक राष्ट्रपुरूषांचं नाव यादीत घालायला फडणवीस ‘विसरले’ आहेत. ३० नोव्हेंबर २०१४ ला सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रपुरूषांच्या यादीत एकाही मुस्लिम नेत्याचं नाव नसल्यानं फेब्रुवारी २०१६ मधे या यादीविरूद्ध एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा : सावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात

भारताकडे एकही मुस्लिम नेता नाही?

फ्री प्रेस जर्नलच्या एका बातमीनुसार ३० नोव्हेंबर २०१४ ला एक सरकारी परिपत्रक काढण्यात आलं होतं. यात राष्ट्रपुरूषांच्या नावानं जाहीर केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आराखडा त्यात दिला होता. साधारण २६ दिवस वेगवेगळे कार्यक्रम होते. पण यात एकाही मुस्लिम नेत्याचं नाव नसल्यानं तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे आणि राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष अमीर हुसाई यांच्याविरोधात ज्येष्ठ पत्रकार सरफराज आरझू यांनी एक याचिका दाखल केली होती.

मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर अब्दुल कलाम, यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक आणि ख्वाजा गरीब नवाझ, मौलाना शौकत अली, खान अब्दुल गफार खान, अशफाकउल्ला खान यांच्यासारख्या मुस्लीम धर्मीय नेत्यांकडे सरकारने मुद्दाम दुर्लक्ष केलं आहे असं या याचिकेत म्हणण्यात आलं होतं.

‘मुस्लिम समुदायातून एकाही महान नेत्याचा शोध सरकारला घेता आला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. भारतीय मुस्लिमांनीही आपल्या मातृभूमीची आणि मानवतेची सेवा केली आहे हे लहान मुलांना आणि देशातल्या सगळ्यांनाच कळावं हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचंय. पण फक्त काही भरकटलेल्या मुस्लिमांचीच उदाहरणं लोकांपुढे आणून इस्लामोफोबिया निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेत.’ असं या याचिकेत मांडण्यात आलंय.

सावरकरांचा वापर करून घेतला जातोय का?

लोकसत्ताने दिलेल्या बातमीमुळे कालपासून या सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा चर्चा चालू झालीय. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी ट्विट करून म्हटलंय, ‘पुन्हा एकदा सावरकर आणि संघाचे संबंध चर्चिले गेले पाहिजेत. सावरकर तमाम हिंदूंचे नेते होते हा संघांचा कांगावा त्यांच्या मृत्यूनंतरचा आहे. आधी संघ धुरीणांनी हिंदू महासभेची युथ विंग म्हणून काम करणं टाळून सावरकरांना मानसिक क्लेश पोचवले होते.’ 

यालाच जोडून एशियन एज या वेबपोर्टलवर निलंजन मुखोपाध्याय या वरिष्ठ पत्रकाराने लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ देता येतो. मुखोपाध्याय लिहितात की सावरकरांच्या कामाचे तीन भाग करता येतात. सावरकर सेल्युलर जेलमधे होते तो १९११ पर्यंतचा भाग पहिला. या काळात सावरकरांनी क्रांतिकारी राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. लंडनमधे अनेक चळवळीत भाग घेतला. त्यामुळेच त्यांना ‘वीर’ असं म्हटलं जाऊ लागलं.

दुसरा भाग १९११ ते १९३७ या काळात सावरकर जेलमधे होते तो. या काळात त्यांना शारिरीक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. या २६ वर्षांत सावरकरांनी केलेलं लिखाण हे आक्रमक हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारं आहे. सावरकरांच्या जीवनातला तिसरा भाग म्हणजे १९३७ नंतरचा जेलमधून सुटल्यानंतरचा काळ. या काळात सावरकरांनी हिंदूमहासभेचं काम हाती घेतलं होतं. ते या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतं, असं मुखोपाध्याय यांचं म्हणणंय.
  
सावरकर जिवंत असताना त्यांना साथ न देणाऱ्यासंघवाल्यांना आता सावरकरांविषयी आत्मीयता वाटू लागते आणि त्यांना भारतरत्न द्यायची मागणी ते करतात. पण राष्ट्रपुरुषांच्या यादीत त्यांचा समावेश करून घ्यायला ते विसरतात. हे पाहता भाजप सावरकरांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतंय का, असा प्रश्न निर्माण झालाय.

हेही वाचा : 

महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?

पोह्या, तुझा बहुरंगी इतिहास भाजपवाल्यांना कोण सांगणार?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय काय झालं

दंगलीतून वाचण्यासाठी मला गळ्यातली रूद्राक्षाची माळ दाखवावी लागली!