…म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे!

११ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आदर्श निवडणूक आयुक्त म्हणून प्रसिद्ध असणारे टी एन शेषन यांचं काल रात्री निधन झालं. शेषन यांनी भारतातील निवडणुकांचा चेहरा बदलून टाकला. आजच्या तरूणांसमोर शेषन यांच्यापेक्षा चांगला आदर्श असूच शकत नाही. कामातलं परफेक्शन, नैतिकता आणि कर्तव्यदक्षता हे त्यांचे गुण प्रत्येक तरूणानं घेतले पाहिजेत.

आचारसंहिता नाही. कोणताही पक्ष हवा तसा, हवा तितका प्रचार करतोय. हव्या त्या पद्धती वापरतोय. निवडणुकीच्या आधी कुणी दारू वाटतंय. तर कुणी वारंवार जातीचा उल्लेख करून मतपेटी भरतंय. निवडणूक चालू असताना कुणी मतपेट्या पळवतंय. तर निकाल लागल्यावर अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही म्हणून हाणामारी चालू झालीय. मतदान कार्ड नाहीच. अनेक खोटी मतं मतपेटीत बिन्धास्त टाकली जातायत. गेल्याच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलेल्या तरूण-तरूणींना हे चित्र कसं वाटतंय?  भयाण आहे ना?

१९९० च्या आधी राज्यात देशांत निवडणूका आल्या की साधारण असंच चित्र दिसायचं. पण हे चित्र बदललं ते तत्कालिन निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यामुळे. १९९० ते १९९६ या काळात ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. निवडणूकीतल्या गैरप्रकारांवर त्यांनी अशाप्रकारे चाप बसवला होता की राजकारणी एकतर ईश्वराला नाहीतर शेषन यांना घाबरतात, असं म्हटलं जायचं.

एक कर्तव्यदक्ष अधिकारी

शेषन हे मुख्यतः आयपीएस अधिकारी होते. राजीव गांधी सरकार असताना सुरक्षा सचिव हे पदही त्यांनी सांभाळलं. शिवाय मदुराईचे जिल्हाधिकारी, चेन्नईचे वाहतुक आयुक्त, भारताचे वन आणि पर्यावरण सचिव, कॅबिनेट सचिव अशी अनेक पदं संभाळली. ही सगळी पदं त्यांनी अत्यंत जबाबदारीनं पार पाडली. काम कोणतंही असो शेषन यांनी नेहमीच पूर्ण कर्तव्यदक्षतेनं ते पार पाडलं. या प्रकारची कर्तव्यदक्षता या देशातल्या एकाही नागरिकाच्या कार्यपद्धतीत दिसणं फार अवघड आहे. 

शेषन यांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगाचं संकलन करून बीबीसी मराठीनं एक लेख प्रसिद्ध केला आहे. यातल्या ६ प्रसंगावरून शेषन यांच्या कामाची पद्धत कशी होती हे समजून घेता येईल.  

१. शेषन यांनी चैन्नईचे वाहतूक आयुक्त म्हणून काम पाहिलं आहे. या कार्यकाळात त्यांना एकानं प्रश्न विचारला. ‘तुम्हाला बस कशी चालवायची हेही माहित नाही. मग तुम्ही ड्रायवरच्या समस्यांवर काय बोलणार?’ असा टोमणा त्यांना मारला. शेषन यांनी हे फार मनावर घेतलं. त्यांनी बस कशी चालवायची याचं प्रशिक्षण घेतलं. इतकंच नाही तर, बस आणि कार सारख्या वाहनांच्या इंजिनची सगळी रीतसर माहिती त्यांनी घेतली. ड्रायवर म्हणून काय सोसावं लागतं, काय अनुभव घ्यावा लागतो हे समजून घेण्यासाठी एकदा त्यांनी स्वतः ८० किलोमीटर बस चालवली होती. आपण ज्या क्षेत्रात अधिकारी म्हणून काम पाहतो त्या क्षेत्रातली छोट्यातली छोटी माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असं त्यांचं मत होतं.

हेही वाचा : तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

२. शेषन यांच्या आधी पेरी शास्त्री हे निवडणूक अधिकारी होते. निवडणूक अधिकारी सरकारी घरात राहतात. पेरी शास्त्री यांनी त्यांच्या घरात वेगवेगळ्या देवतांचे फोटो आणि धार्मिक कॅलेंडर्स लावली होती. शेषन स्वतः प्रचंड धार्मिक होते. पण सेक्यूलर देशाच्या सरकरी घरात देवदेवतांचे फोटो असणं त्यांना योग्य वाटलं नाही. त्यांनी त्या सर्व मूर्त्या आणि कॅलेंडर बाहेर काढायला लावले. धर्म खासगीत कसा ठेवायचा याची चांगली जाण शेषन यांना होती. सेक्यूलर शब्दाचा खरा अर्थ त्यांना उमगला होता आणि नेहमी सेक्यूलरीझमचाच हट्ट त्यांनी धरला. देशानं स्विकारलेली मूल्यं स्वतःची खासगी मतं बाजुला ठेवून कशी राबवायची हे शिकण्यासारखं आहे.

३. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून शेषन यांनी फार महत्वाची कामं केली आहेत. निवडणूक आयुक्ताला संपूर्ण स्वायतत्ता मिळवून देण्याचं पूर्ण श्रेय त्यांना जातं. जोपर्यंत निवडणूक आयोगाला स्वायतत्ता मिळत नाही तोपर्यंत देशात एकही निवडणूक होणार नाही, असं त्यांनी जाहिर करून टाकलं होतं. ते कॅबिनेट सचिव असताना पंतप्रधानांनी त्यांना बोलावलं आणि अमुक अमुक तारखेला निवडणूक होईल असं आयोगाला सांगण्याचा आदेश दिला. तेव्हा 'मी असं सांगणार नाही. सरकार निवडणुकीसाठी तयार आहे एवढंच सांगेन' असं ते थेट पंतप्रधानांना म्हटले. समोर कितीही मोठा अधिकारी असो, जे बरोबर आहे तेच करायचं हे तत्त्व त्यांनी कधीही सोडलं नाही.

४. १९९० मधे शेषन निवडणूक अधिकारी झाले. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवायला ते मागे पुढे पाहत नसत. केंद्रीय सचिव असो वा राज्यातले अधिकारी शेषन यांची टिका करड्या शब्दांचीच असे. त्रिपुरा इथं होणाऱ्या निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नगर विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव धर्मराजन यांची नियुक्ती झाली होती. निवडणुकीच्या कामासाठी त्यांना आगरतळाला जायचं होतं. पण ते डावलून ते एका सरकारी कामासाठी थायलंडला गेले. शेषन यांनी त्यांच्यावर जाहिर टिका केली. ‘धर्मराजन यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना निवडणूकीचं काम ऐच्छिक आहे, ज्याला हवं त्यानं ते करावं असं वाटतं. त्यांच्या विभागाचं काम जास्त महत्वाचं आहे असा त्यांचा गैरसमज त्यांनी लगेचच दूर करावा.’ अशा शब्दांत त्यांनी धर्मराजन यांची शाळा घेतली. वर त्यांच्या गोपनीय अहवालात नकारात्मक शेरा दिला.

हेही वाचा : यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

५. शेषन मदुराईचे जिल्हाधिकारी होते. काश्मीरचे नेते शेख अब्दुल्लाह यांना तमिळमाडूच्या कोडईकॅनॉलमधल्या एका हॉटेलमधे नजरकैदेत ठेवलं होतं. शेख अब्दुल्लाह यांनी पाठवलेलं प्रत्येक पत्र शेषन यांना वाचावं लागे. शेख यांना हे पसंत पडलं नाही. एकदा त्यांनी ‘एस. राधाकृष्णन, राष्ट्रपती, भारत’ या पत्त्यावर पत्र पाठवलं. तेव्हा हे पत्र शेषन वाचणार नाहीत असं त्यांना वाटलं. पण शेषन यांनी शेख त्यांच्या समोरच ते पत्र उघडलं. वरिष्ठतेपेक्षा त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं.

६. राजीव गांधी पंतप्रधान असताना शेषन सुरक्षा सचिव म्हणून काम पहात होते. सुरक्षा सचिव म्हणून त्यांनी बरीच मोठी कामं केली. ते स्वत: सुरक्षा तज्ज्ञ बनले होते. एकदा त्यांनी पंतप्रधानांच्या तोंडातून बिस्किट काढून घेतलं होतं. ज्या पदार्थांची आधी चाचणी झालेली नाही असा कोणताच पदार्थ ते पंतप्रधानांना खाऊ देत नसत.

आजच्या पिढीला दुसरा आदर्श नाही

कोणतंही काम असो पण त्या कामात परफेक्शन आणायचं, कमालीची नैतिकता पाळायची आणि कोणासमोरही न झुकता दिलेलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडायचं ही तीन तत्त्व शेषन नेहमी पाळली. आजच्या तरूण पिढीनं त्यांची ही तत्त्व अगदी डोळे झाकून स्विकारली पाहिजेत.

शेषन यांची कर्तव्यदक्षता आत्मसात करण्याची आज देशातल्या प्रत्येक तरूणाला गरज आहे. देशाचा कारभार चालवण्याकडे शेषन सत्ता किंवा पॉवर म्हणून न बघता एक प्रशासन म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पाहत असत. प्रशासन चालवताना ज्याची गजर असते ते सगळे गुण शेषन यांच्याकडे होते. कोणत्याही क्षेत्रातल्या, कुठल्याही पदावरच्या अधिकाऱ्यानं, कामगारानं शेषन यांचे हे गुण घ्यायलाच हवेत. शेषन यांच्यापेक्षा जास्त चांगला आदर्श आज देशातल्या तरूणांपुढे उपलब्ध नाही.

हेही वाचा : 

तीन वर्ष लोटली, नोटाबंदीचे दूरगामी परिणाम कधी दिसणार?

तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं

शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’