जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट.
समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांनी १८ व्या शतकाच्या मध्यात पुण्यात मुलींसाठी भारतातली पहिली शाळा काढली. आणि मुलींच्या शिक्षणाची दारं खुली केली. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे १ जानेवारी १८४८. अनेक संकटांशी लढत या शाळेचं सारथ्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. त्या आपल्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका. शाळेचं ठिकाण म्हणजे बुधवार पेठेतला भिडे वाडा. दगडूशेठ गणपती मंदिरा समोरच्या या शानदार वाड्याचं रूपांतर आता भग्न, मोडलेल्या वाड्यात झालंय. वाड्याचे फक्त अवशेष उरलेत.
सुमारे पावणे दोनशे वर्ष मागे जाऊन विचार केला तर फुले दांपत्यांनी मुलींसाठी शाळा काढणं ही भारतातलीच नाही तर जगातली ऐतिहासिक, क्रांतीकारी घटना म्हणावी लागेल. पहिल्या शाळेची अर्थात भिडे वाड्याची आज अत्यंत भीषण दुरावस्था झालीय. काळाच्या ओघात हा वाडा नष्ट होईल अशी भीती वाड्याला भेट देण्याऱ्या कुणाच्याही मनात सहज उद्भवते.
जिथं सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं, तो भिडे वाडा शेवटच्या घटका मोजतोय. शिवाजी रस्त्याला असलेल्या बाजीराव रोड मंडईच्या जवळच अगदी मुख्य रस्त्यावर हा वाडा उभा आहे. वाड्याच्या अगदी समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं भव्य मंदिर डौलात उभं आहे.
वाड्याच्या तळ मजल्यावर पाच - सात व्यापाऱ्यांची दुकानं आहेत. त्या दुकानांवरुन वर नजर फिरवली की वाड्याचं भग्न रूप नजरेस पडतं. दोन दुकानांच्यामधून पहिल्या मजल्यावर जायला मोडकळीस आलेला लाकडी जिना आहे. तिथं राडारोडा, कचरा, कसल्या तरी रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. तिथून कसंबसं वर आत गेलं की, ते दृश्य पाहून कोणत्याही सामान्य माणसाचं मस्तक ठणकल्या शिवाय राहत नाही. विचार करणारा माणूस हादरून जातो.
वाड्याच्या आतल्या भिंती पूर्णपणे पडलेल्या आहेत. लाकडी छत मोडून पडलंय. छताला असलेले लाकडी आडवे खांब निखळून पडलेत. वर असलेले पत्रेही फाटलेलाय. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणंही खूपच अवघड होतं. कधी हा वाडा आपल्या अंगावर पडेल आणि त्या वास्तूत आपण गाडले जाऊ, असं इथं येणाऱ्यांना वाटत राहतं. पावसाने भिजून भिंती खचून गेल्यात. विटा, मातीचा खच साचलाय. खरंतर आता तिथं फक्त वाड्याचे अवशेष शिल्लक राहिलेत. एका ऐतिहासिक, सामाजिक वास्तूचा हा शेवट आहे.
हेही वाचा: निर्भया प्रकरणः चारही आरोपींविरुद्ध कोर्टाने काढलेलं डेथ वॉरंट काय आहे?
वाड्यासमोरच्या रस्त्याला नेहमीच वर्दळ असते. सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत रस्ता गर्दीने फुललेला असतो. शिवाय वाड्याच्या जिन्याला कसलंही दार नाही. वर जाण्यासाठी कसलीच आडकाठी नाही. त्यामुळे 'आओ जाओ, घर तुम्हारा' अशी अवस्था भिडे वाड्याची झालीय. प्रत्येक खोलीत सर्वत्र राडारोडा, कचरा पडलेला असतो. सगळीकडे फाटलेले कपडे टाकलेले दिसतात.
टाकाऊ वस्तूंचे, कचऱ्याचे ढीग साचलेत. दुसरं म्हणजे हा वाडा तळीरामांसाठी अड्डा झालाय, याची पक्की खात्री पटते. कारण रिकाम्या दारूच्या बाटल्याही खोलीभर खुरलेल्या दिसतात. त्यातल्या काही बाटल्या तर फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री दारू ढोसणाऱ्यांची इथं मोठी सोय झालेली दिसते.
१ जानेवारी, महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती अशा दिवशी नेत्यांना, कार्यकर्त्यांना भिडे वाड्याची आठवण होते. त्यानंतर मात्र कोणाचंही इकडे लक्ष नसतं. गेल्या अनेक वर्षांपासून भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक व्हावा, यासाठी मोर्चे काढले जातायत. घोषणा दिल्या जातायत. राजकीय नेते राजकारण करतात आणि आपली पोळी भाजून घेतात. त्यानंतर मात्र ३६४ दिवस वाडा अडगळीत पडलेला असतो. कोणाचंही लक्ष जात नाही. आपण निवांत असतो.
जुलै २०१८ मधे नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री आणि पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी भिडे वाडा लवकरच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं जाईल. त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासणार नाही. जमीन अधिग्रहण केली जाईल, असं विधानसभेत सांगितलं होतं. पण दीड वर्षं झालं तरीही राष्ट्रीय स्मारकाला मुहूर्त लागलेला नाही. कोणतंही सरकार आलं तरी फक्त घोषणाच होतात. कागदारवरच खेळ चालतो. बाकी प्रत्यक्षात मात्र ठेंगाच मिळतो. कारण अशा अनेक घोषणा हवेत विरलेल्या आहेत.
वाड्याची ही पडकी अवस्था पाहून झाल्यावर पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन वाड्यासमोरून जाणाऱ्या कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना हा वाडा कुणाचा ते याबद्दल काही माहिती आहे का किंवा हा वाडा आहे तो कशाशी संबंधित आहे, कोणाचा आहे? असं विचारलं. जवळपास ४० ५० मुलामुलींना हा प्रश्न विचारला असेल. त्यातल्या जवळपास ८० टक्के मुली होत्या. त्यापैकी फक्त तीन यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा भिडे वाडा आहे आणि त्याचा इतिहासही माहीत होता. तर दोन विद्यार्थ्यांना इथं कुठं तरी भिडे वाडा आहे, पण नेमकं कुठं ते माहित नव्हतं.
आश्चर्य म्हणजे जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना इथं भिडे वाडा असल्याचंच माहीत नव्हतं. यातले ७० टक्के विद्यार्थी पुण्यातले होते. असं का होतं? ज्यांच्या शिक्षणासाठी दोनशे वर्षांपूर्वी इथं खटोटोप चालू होता त्या वास्तूविषयी एवढं अज्ञान का? याचं कारण इथं स्मारक नाही, कसलीच सोय नाही. नीटनेटकं बांधकाम नाही. वाड्याचं रिनोवेशन केलेलं नाही. काही जतनही केलेलं नाही. त्यासंदर्भात बोर्डही लावलेले नाहीत. असं एकंदरीत इथलं वास्तव आहे. खरंतर हे फारच दुःखद म्हणावं लागेल.
भिडे वाडा आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर समोरासमोरच. फक्त आडव्या रस्त्याचं अंतर. एकीकडे भव्य असं सुंदर मंदिर. हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने रोज येतात. रांगा लावून दर्शन घेतात. श्रींच्या चरणी मनोभावे संपत्ती अर्पण करतात. खरंतर हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. पण दुसरीकडे समस्त महिलांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या सावित्रीबाई फुलेंचं प्रतीक असलेला ऐतिहासिक वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
वाडा कधी नष्ट होईल याबद्दल काहीच शाश्वती नाहीये. त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. कोणाला माहीतही नाही. त्याचं जतन करण्याचा तर प्रश्न उरतोच कुठे? म्हणजे एकाच ठिकाणी दोन टोकांची दरी जिवंत असलेली दिसते. म्हणजे हा सर्वांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग नाही का? असा प्रश्न उभा राहतो. पण आपण मात्र जगासोबत पळत राहतो.
हेही वाचा: अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?
सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं खास भिडे वाडा आणि फुले वाडा पाहण्यासाठी मुंबईवरून पाच जण आले होते. ते जिन्याने वर जाण्यासाठी घाबरत होते. त्यांना विचारल्यावर ते म्हणतात, 'आम्हाला वाटलं स्मारक असेल, पण इथं काहीच नाही. आतमधे गेलो तर पडायची भीती वाटतेय. त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाहून आणि फोटो काढून आलो आहोत.'
याूाूत बोलतना पुण्यातल्या कॉलेजची तरुणी संध्या सोनवणे म्हणते, 'सनातनी समाजात शिक्षणाची दारं मुलींसाठी ज्या ठिकाणी सावित्रीमाई आणि जोतीराव फुले यांनी उघडी केली, अशा भिडे वाड्याची आज दयनीय अवस्था पाहून खरंतर दुःख होतं. महिला शिक्षणाची सुरवात जिथुन झाली त्याची साक्ष असणाऱ्या वाड्याची ही दुरावस्था होणं खऱ्या अर्थाने लज्जास्पदच. हा वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा, यासाठी तरुणांना चळवळ उभी करावी लागतेय. परंतु तरीही याची दखल घेतली जात नाहीये. देशभरातून ही क्रांतिभूमी पाहण्यासाठी लोक येतात, परंतु त्यांना या वाड्याची अवस्था पाहिल्यावर निराश व्हावं लागतं. त्यामुळे या वाड्याचं लवकरात लवकर संवर्धन होऊन राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावं अशी आम्हा तरुणांची मागणी आहे.'
भिडे वाडा पाहण्यासाठी खराडीवरून नेहमी येणारी विशाखा खरात म्हणाली, 'वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं. वाड्याचं जतन व्हावं. पुढच्या पिढीला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. इथली परिस्थिती बघून वाईट वाटतं. समोर मंदिरात गर्दी आहे. पण इथं कोणी यायला तयार नाही, हे बघून तर खूपच वाईट वाटलं.'
भिडे वाडा पाहण्यासाठी आलेला मूळ माळशिरसचा पुण्यात एमपीएससी करणारा सोमनाथ मारुती राऊत म्हणाला, 'अनके माणसं इथं लघुशंकेला जातात. दारूच्या बाटल्या, खराब वस्तू, फाटलेले कपडे, बारदाना टाकलेला मी स्वतः पाहिलंय. वाड्याची पूर्णतः पडझड झालीय. जुन्या टीवी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू लोक इथं टाकतात. इथले व्यापारी सगळा कचरा इथं टाकतात. कारण दुसरं कोण येणार? इथं वाडा आहे, हे कित्येकांना माहीतच नाही. त्यामुळे त्याचं अस्तित्व जाणवत नाही. म्हणून भिडे वाडा वाचवला पाहिजे. त्याचं जतन केलं पाहिजे.'
पुण्यात एमपीएससी करणारा माळशिरसचा राजेंद्र धर्मराज फुले म्हणतो, 'मुलींच्या शिक्षणासाठी देशातली पहिली शाळा स्थापन झाली. ते ठिकाण स्मारक बनावं, यासाठी संघर्ष करावा लागतोय, हे खेदजनक आहे. कोणतंही सरकार असलं तरी ते मतांसाठी राजकारण करतात. शाळा काढून १७२ वर्षे झाली तरी इथं काहीच होतं नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैवचं. आमच्या पिढीला आमच्या वडलांनी ही जागा दाखवली. पण आमच्या पुढील पिढ्यांना आम्ही काय इतिहास दाखवणार आहोत? याकडे लक्ष देऊन नागरिकांनी जनचळवळ उभी करायला हवी. खरंतर इथले व्यापारी म्हणतात, दुकानांवर आमचा ताबा आहे. पण भिडे वाड्याचा ताबा महाराष्ट्र शासनाकडे आहे. त्यामुळं कोर्टात केस चालूय. हा वाडा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने काहीच होत नाही. पण शासनाने खंबीरपणे उभं राहिलं तर हा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही.
नागरिक म्हणून आपण प्रत्येक वर्षी इकडे येतो. श्रद्धांजली अर्पण करतो. हळहळ व्यक्त करतो आणि जातो. आपलं काम तेवढ्यावरच मर्यादीत राहतं. फारफार तर सोशल मीडियावर लिहितो. पण वर्षभर आपलं अशा संवेदनशील आणि राष्ट्रीय ठेवा असलेल्या ऐतिहासिक, सामाजिक महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष नसतं. सावित्रीबाई फुले यांचं काम समस्त भारतीय महिलांसाठी नाही तर सर्वांसाठीच दीपस्तंभासारखं भव्यदिव्य आणि अनमोल आहे. म्हणून सर्वांनी मिळून अशा वास्तूंचं जतन केलं पाहिजे.
अनेक वेळा इकडे येऊन कोणी गैरवर्तन करणार नाही, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तरच अशा देशातल्या कित्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशांचं जतन होऊ शकेल. नाहीतर हा ऐतिहासिक ठेवा चित्रांमधून किंवा फोटोमधूनच पुढच्या पिढीला दाखवावा लागेल. असं झालं तर पुढच्या कित्येक पिढ्या आपल्याला माफ करणार नाही.
हेही वाचा:
फुले दांपत्याचं काम फक्त महिला शिक्षणापुरतंच आहे?
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
नव्या वर्षात घराची सजावट करण्याआधी कलर ऑफ द इअर माहीत हवा
एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?
दिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार