कलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य?

२८ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय.

सध्या देशातलं एकूणच वातावरण तापलेलं आहे. हिंदुत्त्ववादी विचारधारेच्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारवर विरोधक वेळोवेळी टीकेचा भडिमार करत असतात. एवढंच नाही, तर त्यांची धोरणं आणि योजना पाहून भाजप सरकार देशात हुकूमशाही आणू पाहतंय, असाही आरोप होत असतो. टीका करणाऱ्यांमधे बॉलिवूडचे काही कलाकारही आघाडीवर असतात.

नसीरुद्दीन शाह, अनुराग कश्यप आणि स्वरा भास्कर सारख्या कलाकार मंडळींनी सरकारविरूद्ध उघडउघड भूमिका घेतलीय. यावरून त्यांना अनेकदा टार्गेट केलं जातं. सोशल मीडियावर त्यांना, त्यांच्या कुटुंबाला, मुलाबाळांना ट्रोल केलं जातं. अनुराग कश्यप यांनी तर आपल्याला अनेकदा धमक्यांचे फोन आल्याचाही खुलासा केलाय. स्वरा भास्करवर टीका करताना तर ट्रोलकरी अगदी खालची पातळी गाठतात. भूमिका घेणाऱ्या महिलांना ट्रोलकरी लोकांकडून वेश्येची उमपा देत जगणं हराम करून सोडतात.

हेही वाचा : आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

भूमिका घेतली तर तुम्ही मारले जाणार का?

अनेकदा भूमिका घेणाऱ्या कलाकारांना सुनावलंही जातं. कलाकारांनी राजकीय वादात पडू नये. सिनेमे करावेत, गाणी म्हणावीत,फोटो काढून लोकांचं मनोरंजन करावं. हेच त्यांचं काम आहे. राजकीय भूमिका घेणं, राजकारणाविषयी बोलणं त्यांनी टाळावं असाही युक्तिवाद केला जातो.

या सगळ्यामुळे अनेकदा कलाकारही भूमिका घ्यायला घाबरतात. एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाहदेखील याविषयी बोललेत. २० जानेवारीला ‘द वायर’वर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत शाह यांनी याच विषयावर बोट ठेवलंय. देशात सुरु असलेल्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर आंदोलनांबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी ट्विटरसारख्या सोशल मिडियावर लोकांनी ठाम भूमिका घेणं गरजेचं असल्याचं ते सांगत होते.

शाह यांचा सगळा मुद्दा भारतातले कलाकार भूमिका घेतात की नाही याबद्दल होता. ‘सिनेसृष्टीमतले अनेक तरुण कलाकार आणि दिग्दर्शकांनी या कायद्याविरोधात आवाज उठवलाय. मात्र बड्या नावांनी याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याचं मला आश्चर्य वाटलं नाही. आपल्याकडे गमावण्यासारख्या बरंच काही आहे असं या बड्या लोकांना वाटतं. पण आपण काय गमावणार आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. भूमिका घेतल्याने तुम्हाला कुणी ठार मारणार आहे का?’ असा सवाल शाह यांनी उपस्थित केला.

या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी केंद्र सरकार समर्थक कलाकार अशी ओळख असेलल्या अनुपम खेर यांना जोकर म्हटलं. यावरून शाह आणि खेर यांच्यात खडाजंगी झाली. अनुपम खेर यांनी एक सेल्फी विडिओ काढून शाहांना सुनावलं. भूमिका घेण्यावरून दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप केले.

ट्रम्प गॅंगस्टर राष्ट्राध्यक्ष

काही कलाकार मंडळी भारतात व्यक्तिस्वातंत्र्यवर घाला येतोय, असे आरोप करतात. तसंच तिकडे अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम सत्तेवर आल्यापासून तिथे असेच आरोप होऊ लागलेत. अमेरिकन कलाकारांना आपलं म्हणणं मांडण्याची मोकळीक राहिली नसल्याचे आरोप होतात. ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डी निरो यांनी एका पुरस्कार वितरण सोहळ्यात नुकतंच एक भाषण केलंय. कलाकारांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने अनेक वादग्रस्त योजना राबवल्यात. ट्रम्प यांचा मुस्लिमद्वेष अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमधून जगजाहीर झाला. रॉबर्ट हे तर नेहमीच ट्रम्प यांच्यावर उघड उघड टीका करतात. ऑक्टोबरमधे त्यांचा द आयरीश मॅन हा सिनेमा रिलिज झाला. त्याच्या प्रिमीयरला त्यांनी आज देशाची अधोगती होतीय आणि त्यासाठी ट्रम्प जबाबदार आहेत.’ असे उद्गार काढले होते. ट्रम्प हे स्वतःच्या फायद्यासाठी देशाचं नुकसान करताहेत. ते गॅंगस्टर राष्ट्राध्यक्ष आहेत, असं म्हणायलाही त्यांनी कमी केलं नाही.

हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

कलाकाराचा आवाज मोठा असतो

रॉबर्ट यांना स्क्रिन ऍक्टर्स गिल्ड या संस्थेचा लाईफटाम अचिवमेंट अवॉर्ड म्हणजेच जीवनगौरव पुरस्कार मिळाला. १९ जानेवारीला हा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते प्रत्येक कलाकारानं बघावं असं आहे. 

रॉबर्ट म्हणाले, ‘आज मला कामगार संघटनांसोबत सगळ्यांनी वैर घेतलं होतं त्या दिवसांची आठवण येतेय. युनियन्सचं समर्थन करणारे राजकीय नेते शक्यतो न्याय्य टॅक्स प्रक्रिया, स्थलांतरितांबद्दल दयाळूपणा दाखवणारं पोलिसी सुरक्षित वातावरण, वेगवेगळ्या लोकांना नागरिकत्त्व, प्रजननाचे अधिकार, बंदुक बाळगण्यासंबंधीचं नियंत्रण, प्रत्येकाला योग्य रोजगार आणि सरकारी सोयी या गोष्टींचं समर्थन करतात. आपला इतका विचार करणाऱ्यांचं आपण देणं लागतो. आता आपण त्यांना मत दिलं पाहिजे.’

‘काही लोक म्हणतील की राजकारण वगैरे इथे आणू नका. पण ते दिवस इतके वाईट होते की त्याची आठवण काढावीच लागेल. काही गोष्टी चूक असतात. काही गोष्टी बरोबर असतात. काही गोष्टी कॉमन सेन्सच्या असतात. आणि काही गोष्टींमधे सत्तेचा गैरवापर केलेला असतो. एक नागरिक म्हणून एका अभिनेत्याला, एका खेळाडूला, एका गायकाला किंवा इतर कुणालाही आपलं मत मांडण्याचा जितका अधिकार असेल तितका तर मला आहेच. पण काही गोष्टींमुळे माझा आवाज जास्त मोठा, जास्त महत्त्वाचा होत असेल तर निर्लज्जपणे कुणी सत्तेचा गैरवापर करताना दिसला तर मी हा मोठा आवाज वापरलाच पाहिजे,’ असं रोबर्ट यांनी ठणकावून सांगितलं.

कलाकारांना त्यांच्या परिस्थितीमुळे सामान्य माणसापेक्षा जास्त मोठा आवाज मिळालेला असतो. त्यांच्या मताला, आवाजाला सामान्य माणसापेक्षा जास्त किंमत असते आणि म्हणून कलाकारांनी आवाज उठवला पाहिजे, असं रॉबर्ट यांना वाटतं. त्यांच्या या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला नसता तरच नवल. पण या टाळ्यांबरोबरच जगभरातल्या कलाकारांना जगण्याचं, कलाकार असण्याचं एक तत्त्वज्ञान सांगत रॉबर्ट हे जगातल्या कलाकारांचा आवाज बनलेत. त्यांचा हे भाषण भारताही कलाकारांच्या विश्वात खूप चर्चिलं जातंय. भूमिका न घेणाऱ्या हिंदी सिनेमातल्या बड्या कलाकारांना ट्विटरवरून हे भाषण ऐकण्याचा आग्रह केला जातोय.

हेही वाचा :

दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा