संविधानासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त का ठरला?

२६ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


भारताला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. जवळपास अडीच वर्षाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण हे संविधान लागू होण्यास २६ जानेवारी १९५० हा दिवस उजाडावा लागला. संविधान भारतीय लोकांना अर्पण करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यात आली. यामागची आपल्या वारशाची ही कहाणी.

दरवर्षी आपण २६ जानेवारीला मोठ्या जल्लोषात, उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ आपण हा दिवस सेलिब्रेट करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालच्या मसुदा समितीने संविधान तयार केलं. हे संविधान दोन वर्ष ११ महिने १७ दिवसांनी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ ला पूर्ण झालं. पण संविधान लागू झालं ते २६ जानेवारी १९५० ला.

संविधान लागू होण्यापूर्वी आपल्याकडे १९३५ चा भारत सरकारचा कायदा लागू होता.  स्वातंत्र्यानंतर २ वर्ष ५ महिने ११ दिवस म्हणजेच २६ जानेवारीला संविधानाने या कायद्याची जागा घेतली. पण संविधान लागू करण्यासाठी २६ जानेवारी १९५० हा दिवस निवडण्यामागे आपला मोठा वारसा आहे. या दिवसाचा मोठा इतिहास आहे.

हेही वाचाः संविधान म्हणजे काय रे भाऊ!

पत्रकार प्रमोद चुंचूवार ठिकठिकामी संविधानाविषयी व्याख्यान देतात. ते आपल्या व्याख्यानाची सुरवात प्रश्‍नोत्तराने करतात. ती प्रश्‍नोत्तरं अशी होतात,

प्रश्‍नः २६ नोव्हेंबरला आपण संविधान दिन का साजरा करतो?

उत्तरः २६  नोव्हेंबर या दिवशी संविधान सभेने संविधानाला मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार केला.

प्रश्‍नः २६  जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो?

उत्तरः कारण २६ जानेवारी १९५० पासून संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरवात झाली.

प्रश्‍नः २६  नोव्हेंबरलाच संविधान स्वीकारलं होतं. मग २६ जानेवारीपर्यंत दोन महिने वाट का पाहिली असेल?

उत्तरः प्रिटिंगला वेळ लागला असेल.

काही प्रोसिजर राहिली असेल.

चुकीचं आहे. वर्षाच्या शेवटी एखादी गोष्ट तयार असेल, तर शक्यतो सोयीसाठी जानेवारीपासून सुरवात केली जाते. पण त्याऐवजी २६ जानेवारीच का ठरवली असेल?

हेही वाचाः सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

सगळे निरुत्तर झाल्यावर प्रमोद चुंचूवार उत्तर देऊन व्याख्यानाला सुरवात करतात,

ती अशी ३१ डिसेंबर १९२९ या दिवशी रावी नदीच्या काठावर काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला. त्यानुसार नवा तिरंगा भारताचा ध्वज म्हणून गांधीजींच्या हस्ते फडकवण्यात आला. त्यांनी आवाहन केलं की, जानेवारी महिन्याच्या चौथ्या रविवारी देशभर प्रत्येक गावागावात तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करा!

देशभर तो संदेश पोचण्यासाठी तितका वेळ हवा होता म्हणून २५ दिवसांचा अवधी राखून ठेवण्यात आला होता. चौथ्या रविवारी २६ जानेवारी होती. म्हणूनच १९३० ते १९४७ सालापर्यंत आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन २६ जानेवारी हाच होता. तेव्हा अनेक गावात तयार केलेले झेंडा चौक आजही आहेत. तिथे तिरंगा फडवण्यात येत असे. त्यासाठी लाखो देशभक्तांनी लाठ्या झेलल्या आणि प्रसंगी प्राणही गमावले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा २६ जानेवारी या दिवसाशी असणारा ऋणानुबंध टिकवण्यासाठी याच दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळावं, अशी गांधी-नेहरूंसह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची इच्छा होती. पण जिना आणि इंग्रजांच्या घाईमुळे १५ ऑगस्ट ही तारीख नाइलाजाने मान्य करावी लागली. तरीही २६ जानेवारी या दिवसाचं महत्त्व कायम राहावं म्हणून त्या दिवसापर्यंत संविधानानुसार कारभार चालवण्याचा मुहूर्त लांबवण्यात आला आणि २६ जानेवारी हा स्वातंत्र्याआधीचा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी प्रजासत्ताक दिन बनला.

हेही वाचाः सातवीच्या पुस्तकातलं संविधान वाचलंय?