फाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण

०५ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


निर्भया प्रकरणात आज दिल्ली कोर्टानं चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट काढलंय. यानुसार २० मार्चला सकाळी साडेपाचला आरोपींना फासावर चढवण्यात येईल. पण आधीच्या तीन वेळाही भल्या सकाळीच फासावर चढवण्याचं वॉरंट निघालं होतं. आरोपीला सुर्योदयापूर्वीच फाशी द्यावी असा जेलचा नियम असतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या नियमामागचं कारण खूप रोचक आहे.

दिल्लीतल्या २०१२ च्या निर्भया बलात्कार प्रकरणाल्या चारही दोषींना अखेर डिसेंबर २०१९ ला फाशी सुनावण्यात आली. पण दोन महिने झाले काही ना काही खुरापती काढून आरोपींचे वकील ही फाशी थांबवण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ५ मार्चला पुन्हा एकदा निर्भया केसमधल्या आरोपींच्या विरोधात दिल्लीतल्या एका कोर्टानं नवं डेथ वॉरंट काढण्यात आलंय. या वॉरंटनुसार २० मार्च २०२० ला सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाईल.

फाशीबाबतीत कैद्यालाही सांगितलं जातं

भारतीय कायद्यानुसार अपवादात्मक म्हणजेच दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमधेच फाशीची शिक्षा दिली जाते. फाशीपेक्षा मोठी शिक्षाही या गुन्हासाठी कमीच पडेल इतका क्रुर हा गुन्हा आहे, असं कोर्टाला वाटलं तरच त्यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते. फाशीची शिक्षा सुनावल्यावर कोर्टाकडून डेथ वॉरंट जारी केलं जातं. त्यात फाशीची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. यात जेलरपासून ते फाशी देणाऱ्या जल्लादपर्यंत विशेष प्रक्रिया असते.

मृत्यूचं वॉरंट काढल्यानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे, असं त्या कैद्याला सांगितलं जातं. कैद्याला फाशी देताना जेलर, शिपाई ते जल्लादापर्यंत सगळ्यांना नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं. त्याशिवाय फाशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. फाशी देण्यापूर्वी कैद्याच्या कुटुंबीयांना १५ दिवस आधी याबद्दलची माहिती दिली जाते. कुटुंबाला कैद्याशी शेवटची भेट घेण्याची संधीही दिली जाते.

डेथ वॉरंट निघाल्यानंतर जेलमधे कैद्याची तपासणी करून त्याला अन्य कैद्यांपासून तुरूंगातील वेगळ्या खोलीमधे ठेवलं जातं. कैद्याच्या डेथ वॉरंटची माहिती कारागृह अधीक्षकाकडून प्रशासनाला दिली जाते. एखाद्या तुरुंगात कैद्याला फाशी देण्याची व्यवस्था नसेल तर त्याला अन्य तुरूंगात हलवलं जातं.

हेही वाचा : निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?

चारवेळा काढलं डेथ वॉरंट

निर्भया केसमधे कोर्टाकडून निघालेलं हे चौथं डेथ वॉरंट आहे. याआधी तीन वेळा कोर्टाने डेथ वॉरंट काढलं. पण ऐनवेळी काहीतरी कारण काढून आरोपींच्या वकिलांनी फाशी थांबवली.

पहिलं डेथ वॉरंट डिसेंबरमधे काढण्यात आलं होतं. या वॉरंटनुसार २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल, असं सांगितलं होतं. पण त्यातल्या एका आरोपीनं राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. नियमानुसार फाशी देताना आरोपीनं कुठलीही दया याचिका दाखल केलेली नसावी अशी अट आहे. त्यामुळे २२ जानेवारी ही फाशीची तारीख टाळून पुढे ढकलण्यात आली.

त्यानंतर १ फेब्रुवारी २०२० ला निर्भया आरोपींना फाशी दिली जाईल असं वॉरंट काढण्यात आलं. सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार होती. पण आरोपींचे सगळे रेकॉर्ड्स क्लिअर होत नाहीत तोपर्यंत फाशी देता येणार नाही म्हणून ही तारीखही टाळण्यात आली. त्यानंतर ३ मार्च २०२० ला सकाळी.

आता पुन्हा एकदा निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना फाशी द्यायचं डेथ वॉरंट न्यायालयाने काढलंय. निर्भयातल्या आरोपींची फाशी रोखण्यासाठी आता आपण काहीही करू शकत नाही हे आरोपी पक्षानंही मान्य केलंय. त्यामुळे आता नवीन निघालेल्या डेथ वॉरंटनुसार २२ मार्चला सकाळी ५:३० वाजता निर्भया प्रकरणातल्या चारही आरोपींना फाशी होईल हे जवळजवळ नक्की झालंय. या चारही डेथ वॉरंटचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. आरोपींना फाशी देण्याचा दिवस वेगवेगळा असला तरी वेळ मात्र सकाळचीच आहे.

फाशी देण्याची वेळ सकाळची का?  

कोणत्याही प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी सकाळचीच वेळ निश्चित केली जाते. शक्यतो सुर्यास्ताच्या आत त्यांना फाशी दिली जाते. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. सकाळी बाकीचे कैदी झोपलेले असतात. फाशीमुळे इतर कोणत्याही कैद्याला मानसिक त्रास होऊ नये म्हणून सकाळीच फाशी दिली जाते, असं आपण वेळोवेळी ऐकलंय, वाचलंय. जागरण या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या एका माहितीनुसार, सकाळी किंवा पहाटेच्या वेळी फाशी का दिली जाते याची सामाजिक, नैतिक आणि प्रशासकीय अशी तीन कारणं सांगितली जातात.

पहिलं कारण म्हणजे ज्याने खूप वाईट काम केलंय त्यालाच फाशीची शिक्षा दिली जाते. त्यांच्या वाईट कामाचा परिणाम समाजावर होऊ नये यासाठी पहाटे नवा दिवस उजाडायच्या आत फाशी दिली जाते. शिवाय, ज्या कैद्याला फाशी द्यायचीय, त्याला संपूर्ण दिवस थांबण्याची गरज पडत नाही. संपूर्ण दिवस फाशीचा विचार करून त्या कैद्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यासोबत इतर कैद्यांच्या आणि समाजाच्याही मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे फाशी सकाळी देण्यामागचं नैतिक कारण मानलं जातं.

आरोपीला फाशी देण्याआधी आणि दिल्यानंतरही अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. फाशीच्या आधी आणि नंतर मेडीकल टेस्ट करावी लागते. न्यायालयात फाशी झाल्याचा पुरावा पाठवावा लागतो. अनेक ठिकाणी या सगळ्याची नोंद करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेनंतर आरोपीचा देह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला जातो. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करता याव्यात आणि जेल प्रशासनाला अडथळा येऊ नये म्हणूनही फाशी सकाळी दिली जाते.

हेही वाचा : १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

कैद्याच्या कानात जल्लाद काय सांगतो?

फाशी देण्यापूर्वी कैद्याला आंघोळ घातली जाते. तसंच नवीन कपडेही दिले जातात. त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. फाशीच्या दिवशी सकाळी अधीक्षकांच्या देखरेखीखाली कैद्याला फाशीच्या बंद खोलीत आणलं जातं. यावेळी जल्लादा व्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात. फाशी देण्यापूर्वी मी कैद्याची ओळख करुन घेतली असून त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे, असं तुरुंग अधीक्षक दंडाधिकाऱ्याला सांगतात.

कैद्याला फाशी देण्यावेळी त्याच्यासोबत जल्लाद असतो. फाशीचा दोर लावण्यापूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात म्हणतो- 'हिंदूचा राम राम आणि मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कामापुढे हतबल आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो.' त्यानंतर जल्लाद दोरखंड सोडून देतो.

हेही वाचा : 

आता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी!

सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल

न्यायव्यवस्थेसोबतच आपला समाजही दिवसेंदिवस सुस्त होत चाललाय