सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला

०३ मार्च २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का?

सरकारी बसपेक्षा खासगी गाडी किंवा बसने जाणं आपल्याला जास्त सोयीस्कर आणि स्टेटसवालं वाटतं. सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या सगळ्याच सेवांवर आपण सतत टीका करत असतो. खासकरून सरकारी हॉस्पिटलबद्दलचं आपलं मत फारच वाईट असतं.

खासगी हॉस्पिटलचा खर्च जास्त असला तरीही बचत वगैरे करून साठवलेले पैसे वापरून आपण तिथेच जातो. त्यातही आपल्याला भरपूर पगार असेल तर आपण सरकारी हॉस्पिटलचं नावसुद्धा काढत नाही. पण झारखंडमधल्या डेप्युटी कमिशनर म्हणजेच आपल्याकडच्या जिल्हाधिकारी पदावरच्या किरण पासी यांनी आपल्या बाळंतपणासाठी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलची निवड केली. त्यांचा फोटो आणि बातमी सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय.

आरोग्य सेवा सुधारण्यावर भर

किरण पासी या २०१३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या गोड्डा जिल्ह्याच्या ४८ व्या डेप्युटी कमिशनर म्हणून काम पाहतात. पश्चिम बंगालच्या कृष्णा नगरमधे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॉलेजमधे असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं. २००४ मधे प्रोविजनल सिविल सर्विस म्हणजेच पीसीएसची परिक्षा पास केल्यानंतर त्यांना नोकरी लागली. नोकरी करता करता त्यांनी आयएएसची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी परिक्षा पास केली.

एकदम कडक शिस्त असणारी ऑफिसर म्हणून किरण ओळखल्या जातात. गोड्डा जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा सुधारण्याचं श्रेय त्यांना जातं. डीसी म्हणून निवड झाल्यापासूनच जिल्ह्यातल्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोड्डातल्या सरकारी हॉस्पिटलला सप्टेंबर २०१९ मधे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कायाकल्प पुरस्कार मिळाला होता.

एवढं करून त्या थांबल्या नाहीत. तर स्वतःच्या बाळांतपणासाठी त्यांनी सरकारी हॉस्पिटलच निवडलं. एखाद्या खासगी हॉस्पिटलमधे जाऊन बाळंतपण करणं त्यांना सहज परवडणारं होतं. शिवाय, सरकारी अधिकारी असल्यानं काही ज्यादा सुविधाही मिळाल्या असत्या. पण त्या सगळ्याला नकार देत सरकारी हॉस्पिटलमधल्या यंत्रणेवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी आपलं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी त्यांची सिझेरीयन डिलीवरी झाली आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला.

हेही वाचा : आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

सरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढेल

सिझेरीयननंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं या हॉस्पिटलमधले सिविल सर्जन एस.पी. मिश्रा यांनी द लल्लनटॉपशी बोलताना सांगितलं. ‘किरण यांनी सरकारी हॉस्पिटलची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे लोकांचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वास वाढेल,’ असंही ते म्हणाले. 

गोड्डाच्या शेजारी असलेल्या देवघर जिल्हाच्या डीसी नॅन्सी सहाय यांनीही या सरकारी हॉस्पिटलला भेट देऊन किरण यांची विचारपूस केल्याचं लल्लनटॉपच्या बातमीत सांगण्यात आलंय. ‘किरणच्या या कृतीमुळे सरकारी हॉस्पिटलबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन पसरेल. सरकारी हॉस्पिटलमधे जायची लोकांना भीती वाटते. पण यामुळे ही परिस्थिती बदलेल. सरकारी हॉस्पिटलही चांगल्या सुविधा पुरवतील,’ असं सहाय म्हणाल्या.

तर झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनीही ट्विट करून या घटनेची दखल घेतलीय. ‘ही फक्त बातमी नाही तर झारखंडमधली आरोग्य सेवा सुधारली असल्याचा पुरावाच आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार जनतेची सेवा करण्यात तत्पर आहे. सोनिया गांधींचं स्वस्थ झारखंडचं स्वप्न आम्ही साकार करू.’ असं ते या ट्विटमधे म्हणालेत.

हेही वाचा : एका वायरसने जग कसं हादरवलं?

तरच सरकारी सेवांचा दर्जा वाढू शकतो

सरकारी हॉस्पिटलमधे कमी खर्चात चांगले उपचार मिळतात. पण तिथल्या डॉक्टर आणि यंत्रणेवर आपला विश्वास नसतो. सरकारी हॉस्पिटल फक्त गरीब लोकांसाठी असतात असाही आपला गैरसमज असतो. त्यामुळे खरोखरच गरीब लोकांशिवाय सरकारी हॉस्पिटलकडे कुणी फारसं फिरकत नाही. सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा ढासाळते. पण सगळ्याच नागरिकांनी सरकारी हॉस्पिटलला प्राधान्य दिलं तर ही यंत्रणा आणि हॉस्पिटलमधल्या सेवांचा दर्जा वाढू शकतो.

झारखंड राज्य आदिवासीबहुल म्हणून ओळखलं जातं. किरण पासी कमिशनर असलेल्या गोड्डा जिल्ह्याचा  बहुतांश भागही जंगलानं व्यापलेला आहे. खाण्यांमधे काम करून मजूरी मिळवणं हा इथल्या लोकांचा मुख्य रोजगार आहे. मोठं प्रायवेट हॉस्पिटल त्यांना परवडतही नाहीत. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमधूनच त्यांना दर्जेदार सेवा मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच किरण पासी यांनी उचललेलं हे पाऊल खूप महत्त्वाचं ठरतं.

याआधीही अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या बायकोचं किंवा मुलीचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करून किरण पासी यांच्याप्रमाणेच एक आदर्श घालून दिलाय. ओडिसातल्या मलकानगिरी जिल्ह्याचे कलेक्टर मनिष अगरवाल आणि कर्नाटकातल्या बलेरी जिल्ह्याचे आयएएस ऑफिसर एस. एस. नकुल यांनीही आपल्या बायकोच्या बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलच निवडलं होतं. याच्या या निर्णयाचं मीडियाकडून कौतुकही करण्यात आलं होतं. उत्तरकाशीचे सब डिविजनल मॅजिस्ट्रेट अनुराग आर्य यांनीही आपल्या बायकोच्या पहिल्या बाळंतपणासाठी सरकारी हॉस्पिटलमधे जाऊन समाजा समोर उदाहरणच घालून दिल्याची एक बातमीही पंजाब केसरी या हिंदी पेपरच्या यू ट्युब चॅनेलवर दाखवली गेलीय. 

तेलंगणातल्या मुलुगू जिल्ह्याचे कलेक्टर अकुनुरी मुरली यांनीही २०१७ मधे आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी मुलुगू सरकारी हॉस्पिटलची निवड केली होती. पण स्वतःचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमधे करून घेणाऱ्या किरण पासी या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्यात.

हेही वाचा : 

दिल्ली दंगलीतल्या या हिरोंनी ना जात पाहिला ना धर्म

सरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार?

भाजपला हरवणारे हेमंत सोरेन हे झारखंडचे उद्धव ठाकरे!

दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल