गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

१० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.

२००५ चा महापूर मी अनुभवलाय. त्यावेळी नुकताच पत्रकारितेत आलो होतो. आठवडाभराच्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पण त्यावेळी नदीजवळच्या सखलभागात पाणी जमा झालं. शिरोळ तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसला. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. २००५च्या महापुरावेळी एका म्हशीचा झाडावर लटकलेल्या मृतदेहाचा फोटो फारच गाजला होता.

१४ वर्षांनी पुन्हा वनवास

बरोबर १४ वर्षांनंतर आज पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलाय. पण यावेळी त्याची तीव्रता गेल्यावेळेपेक्षा अनेकपटीने जास्त आहे. २००५ मधे पूरपातळी ५० फूट इतकी होती. ती यंदा ५५ फूटांवर गेलीय. तब्बल पाच फुटाने जास्त. यावरून त्याची तीव्रता लक्षात येईल.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. १ ऑगस्टपर्यंत पूर येईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. कारण जिल्ह्यात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पाऊस म्हणजे सामान्य गोष्ट असते. त्यादिवशी राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले होते आणि त्यातून पाण्याचा विसर्ग ही सुरू होता.

कोल्हापुरात पंचगंगा नदीनं ४६ फूट ही आपली इशारा पातळी गाठली होती. तसं पाहिलं तर दरवर्षी पंचगंगा दोन तीन वेळा या पातळीवर येवून परत माघारी फिरते. यावेळी मात्र नदीचा मूड काही वेगळाच होता. दोन ऑगस्टला जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला. पावसाचा जोर वाढतच होता. राधानगरी, गगनबावडा या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. काही ठिकाणी २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आणि कोल्हापूरकरांची झोप उडाली

तीन ऑगस्टच्या सकाळी पाणी कोल्हापूर शहरात घुसलं आणि प्रशासनासह कोल्हापूरकरांची झोप उडाली. विनस कॉर्नरवर पाणी आल्यानंतर काही उत्साही तरूणांनी पाण्यासोबत जल्लोष साजरा केला. पण दुसरीकडे परिस्थिती गंभीर बनत होती. कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. हा विसर्ग सुरवातीला पन्नास हजार क्युसेस एवढा होता. तो दिवसेंदिवस वाढत होता.

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून १ ऑगस्टला दीड लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुसरीकडे पाण्याची आवकपण तेवढीच होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यासाठी मुख्य सचिवांकडे विनंती केली होती. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत होता. सहा तारखेपर्यंत जवळपास सरासरीच्या पाचपट जास्त पाऊस झाल्यामुळे नदीनाले ओसंडून वाहत होते.

बघताबघता कोल्हापूर आणि परिसरातील गावांना पुरांचा वेढा पडला. त्यानंतर तो दिवसेंदिवस घट्टच होत गेला. सोमवारी काळम्मावाडी धरणातून ११ हजार,राधानगरी धरणातून १० हजार, वारणा धरणातून २० हजार तर कोयना धरणातून जवळपास एक लाख क्युसेसने विसर्ग सुरू होता. त्यामुळे सांगली, शिरोळ तालुक्यातील गावे पटापट पाण्याखाली जावू लागली.

हेही वाचा: विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?

पुणे-बंगळुरू हायवे पाण्याखाली

मंगळवारी सहा ऑगस्टपासून महापुराची स्थिती गंभीर बनली. कोल्हापूर शहरातील नदीकाठी आणि सखलभागात पुराचे पाणी बारा फुटांपर्यंत गेले. विनस कॉर्नरवर तर राजाराम महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाला पाणी लागले. पूररेषेतील अनेक अपार्टमेंटमधे पाणी घुसले. सोमवारी मध्यरात्री पुणे बंगळूरू हायवेवर पाणी आलं आणि कोल्हापूर शहराचा मुख्य संपर्क तुटला.

हायवेवर सात फुटांपेक्षा जास्त पाणी होतं. शहराचं प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेलचा परिसर तर पाण्यात गायब झाला. आता मात्र शहरवासीयांचा धीर सुटला आणि जो तो सुरक्षित स्थळी जावू लागला. प्रशासनाने आंबेवाडी, चिखली, वारणा नदी काठावरील निलेवाडी, खोची, भेंडवडे इथल्या लोकांना हलवण्यासाठी काम सुरू केलं. पण यंत्रणा अपूरी पडली.

राज्य सरकार गाफील

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने आपल्या उपलब्ध सोयीसुविधांनुसार बचाव काम सुरू केलं. पण राज्य सरकारच्या पातळीवर मात्र पाणी लोकांच्या नाकातोंडात जाईपर्यंत परिस्थिती सामसूम होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यासंदर्भात एक तारखेला सचिवांशी संपर्क केला होता तर विसर्ग वाढायला आठ दिवस का लागले, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही.

महापूर एवढा गंभीर असताना अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर आपत्ती निवारणाचं काम सुरू होतं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरफच्या फक्त दोन तुकड्या, नौदलाचे २२ जवान लष्कराच्या दोन तुकड्या एवढंच मनुष्यबळ तैनात करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी पथकं फक्त आंबेवाडी, चिखली परिसरात गुंतून राहिली. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी आपत्तकालीन यंत्रणा हतबल ठरलीय.

जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलाय. ९१ बंधारे पाण्याखाली असून अनेक पूरग्रस्तांना मदत मिळेनाशी झालीय. सरकार कितीही दावा करत असली तरी आपत्तकालीन यंत्रणा सपशेल फेल गेलीय. वीज पूरवठा खंडित झालाय. पेट्रोल डिझेल, दूध, भाजीपाला, औषधी यांचा तुटवडा आहे. फक्त कोल्हापूरकरांच्या मोठ्या मनामुळे अनेकांना अन्नपाणी मिळतंय.

हेही वाचा: बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग

पूररेषेची ऐसीतेसी

कोल्हापूर जिल्हा पावसाच्या बाबतीत समृद्ध म्हणून ओळखला जातो. पंचगंगा नदीला दरवर्षी पूर हे ठरलेलं असतं. पण यंदा त्याची तीव्रता वाढली. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे विक्रमी पाऊस आणि दुसरं सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पूररेषेत झालेली बेसुमार आलिशान बांधकामं.

न्यू पॅलेसपासून खानविलकर पंपापर्यंतचा पट्टा, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहत, बावड्यातील शेती, शिरोली पुलाजवळील शेती ही पूर आल्यावर नदीचं पाणी पसरण्याची ठिकाणं आहे. मात्र गेल्या पाच, सहा वर्षांत याठिकाणी आलिशान कॉलनी, अपार्टमेंट उभी राहिलीत भराव टाकून नदीच्या मार्गात अडथळे आणले गेलेत.

इथे ही बांधकाम वाढवणारे लोक म्हणजे कोल्हापुरातील वजनदार माणसं, नेते आहेत. आणि हे कुणापासून लपून राहिलेलं नाही. पण त्यांना अडवणार कोण? या व्यक्ती कितीही मोठ्या असल्या तरी निसर्गासमोर कस्पटासमान. नदीने आपली जागा व्यापली आणि शहरातील सखल भागात पाण्याची पातळी विक्रमी स्तरावर पोचली.

आणखी काही दिवस संघर्ष

पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणीपातळी झपाट्याने कमी होत नाही, असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. आता जिल्ह्यातील इतर भागात पूरपरिस्थिती गंभीर बनलीय. प्रशासनाने मोठ्या संख्येने बचाव पथकं तैनात केली तर लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात येईल. पाणी कमी झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल.

कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर्वेकडील लोक हे जिंदादिल लोक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अस्मानी संकटाने खचून जाणार नाहीत. ते लढणार. पुन्हा नव्या दमाने उभी राहणार. आपली  कोल्हापूरी ऐट कायम राखणार. कारण हे कोल्हापूर आहे. पुरेपूर कोल्हापूर. इथे हा महापूर आम्हाला काय रोखू शकतो.

हेही वाचा: 

नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

नरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग

सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!