मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’

१७ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


राजकारण हे आरोप, प्रत्यारोपावर चालत असतं. पण बदलत्या राजकारणात हे चित्र अधिकच भडक झालंय. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून योग्य आणि अयोग्य असे दोन गट पडतायत. अशातच आंदोलनजीवी हा शब्द वापरून नरेंद्र मोदींनी पद्धतशीरपणे गुगली टाकलीय. त्यांनी चाणाक्षपणे टाकलेल्या या गुगलीवर आपल्या सगळ्यांची मात्र विकेट गेलीय.

२०१४ नंतरच्या राजकारणात 'आत्मनिर्भर' झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणाची खरी नस समजलीय. म्हणूनच ते नेहमी वागण्या, बोलण्यातून संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याभोवती गुंतवून ठेवतात. कोणतं अस्त्र कधी काढायचं यात मोदी, शहा पारंगत आहेत. म्हणूनच 'गुपकार गॅंग', 'पाकिस्तानी', 'देशद्रोही', 'टुकडे-टुकडे गॅंग', 'शहरी नक्षल' असे शब्द चर्चेत येतात.

या सगळ्याचा प्रत्यय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहायला मिळाला. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देतानाच शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरही भाष्य केलं. या भाषणात त्यांनी 'आंदोलनजीवी' हा शब्दप्रयोग दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने केला. 'आंदोलनजीवी' जमातीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आणि वादाची ठिणगी पडली.

हेही वाचा: आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

इंग्रजांनी गांधींना काय म्हणायचं?

संपूर्ण देशभरातून या शब्दप्रयोगाचा निषेध होऊ लागला. पुढे काही तासात मोदींचं समर्थन करणारा एक गट पुढे सरसावला. मीडियाला नवीन विषय मिळाला. मग काय आंदोलनकर्त्यांचं समर्थन करणारे आणि सरकारचा अजेंडा पुढे रेटणारे तावातावाने बोलू लागले. भाजपचे प्रवक्ते तो शब्दप्रयोग बाजूला ठेऊन इतर दाखले देण्यात गुंतले. मग इथंही 'राष्ट्रवाद', 'देशभक्ती', 'देशद्रोही' असे बरेचं मुद्दे सांगितले गेले.

काही माध्यमांवर तर तो शब्द सोडून पुढचं भाषण ऐकलं का? असं विचारून खडसावलं गेलं. आदरणीय मोदी साहेब यांनी मी पंजाबचं अन्न खाल्लंय, शीख गुरुंच्या परंपरा आम्ही मानतो, त्यांच्यासाठी ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, त्यामुळे देशाचं कधीही भलं होणार नाही, असं म्हटलंय. सोबत 'आंदोलनकर्त्यांची समजूत घालून आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. शिव्या माझ्या खात्यात टाका पण सुधारणा होऊ द्या,' असंही मोदी म्हणतायत, असं अनेक प्रवक्ते जोरजोरात सांगू लागले.

मोदींच्या शब्दप्रयोगाचा समाचार संपूर्ण देशभरातून घेतला गेला. राहूल गांधी यांनी मोदींसाठी 'क्रोनोजीवी' हा शब्द वापरून 'मोदीने किसान का मजाक उडाया हैं' असा राग व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनीही तिखट शब्दात निषेध व्यक्त केला. इंग्रजांनी महात्मा गांधींना 'आंदोलनजीवी'चं म्हणायचं का? मग सावरकरांना काय म्हणणार? असा रोखठोक प्रश्न शिवसेनेनं सामनातून विचारला.

हेही वाचा: निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?

जिकडं खोबरं तिकडं चांगभलं?

देशातल्या विविध पक्षाच्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया तिखटपणे नोंदवल्या. पुढे तर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा २०११ चा काँग्रेसला बोललेला वीडियो मोदींच्या विरूद्ध प्रतिक्रिया असल्याचं दाखवत संपूर्ण देशात वायरल झाला. पुन्हा इथंही सोशल मीडिया कामाला लागला. 'होय मी आहे आंदोलनजीवी' असा हॅशटॅग विविध भाषेतून देशभर गाजला.

फेसबुकवर या शब्दाचा निषेध नोंदवणाऱ्या पोस्टचा पाऊस पडला. मात्र इथंही मोदीभक्तांनी विरोधाचा अवकाळी पाऊस जन्माला घातला. मोदीप्रेमानं न्हाऊन निघालेल्या न्यूज चॅनेलनी त्या शब्दाचं समर्थन करणारे काही 'ऑडियो विज्युअल' वापरून स्पेशल रिपोर्ट दाखवले. देशभर अनुकूल आणि प्रतिकूल बोलणारा वर्ग तयार झाला. काही माध्यमांनी तर 'जिकडं खोबरं तिकडं चांगभलं' अशीचं भूमिका घेतली.

संपादकांनी समतोलपण जोपासला. काहींनी थेट आंदोलनकर्त्यांची बाजू घेण्याचं टाळलं. तर काहींनी 'आंदोलनजीवी'चे लेख छापून आणले. काहींनी महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालकृष्ण आडवाणी, जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे, मेधा पाटकर, साने गुरूजी, बाबा आढाव, भाई वैदय, बाबा आमटे अशा अनेकांची उदाहरणं दिली.

मूळ मुद्दा पडला बाजूला

'आंदोलनजीवी'ची नेमकी व्याख्या काय? यावरही बरीचं चर्चा झाली. मोदी यांनी वापरलेला शब्द अनेक वर्ष चळवळीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांच्या जिव्हारी लागला. निस्वार्थी आंदोलन करणारे घायाळ झाले. त्यांनी आपला राग, संताप, चीड वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केला. पण या सगळ्यात मोदींच्या त्या शब्दाला अवाजवी महत्व देण्यात आलं.

काहींनी फेसबुक लाईव केलं. तर काही ठिकाणी 'आंदोलनजीवी' या बॅनरखाली कार्यक्रम घेतले गेले. नको त्या घटनेला किंवा मुद्याला महत्त्व दिलं की मूळ विषयाला बगल मिळते, हे आपण अनेकदा अनुभवलंय. आणि आजच्या सरकारला यातच जास्त इंटरेस्ट आहे असंही आता वाटू लागलंय. त्यामुळेचं मूळ मुद्दा बाजूला पाडण्यात मोदी यशस्वी झाल्याचं दिसतंय.

हेही वाचा: सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

शब्द आत्ताच का वापरला?

कोणत्याही आंदोलन किंवा आंदोलकांविषयी आदर आणि आपुलकी असायला हवी. खरं म्हणजे आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आंदोलन करणं गैर नाही. संविधानाने लोकशाहीची चौकट बळकट करण्यासाठी काही मार्ग दिलेत. त्यातलाच एक मार्ग हा आंदोलन आहे. अन्याय, अत्याचारविरुद्ध आवाज आंदोलनानेच बळकट होत असतो.

आपल्या देशात केवळ सामाजिक नाही तर राजकीय पातळीवरसुद्धा आंदोलनं होत असतात. पण 'आपला तो बाब्या अन् लोकाचं ते कार्ट' ही वृत्ती वाढत असल्याचं हे द्योतक आहे. नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या शब्दांचा कोणत्याही भारतीयाने निषेध केलाच पाहिजे. मात्र त्यांनी हा शब्द आताच का वापरला? याचंही चिंतन करावं लागेल.

एकीकडे दिल्लीतलं शेतकरी आंदोलन उग्र रूप घेतंय. आणि संपूर्ण देशातून आंदोलनाला समर्थन मिळतंय हे पाहूनच त्यांनी मूळ मुद्दा किंवा लक्ष हटवण्यासाठी शब्दाचा प्रयोग तर केला नसेल ना? त्यामुळेच त्यांनी आपली 'मन की बात' मांडण्यासाठी राज्यसभेचा वापर केलाय का? त्यांनी टायमिंग साधलंय का? त्या शब्दप्रयोगामुळे त्यांचा हेतू साध्य झालाय का? त्यावर खरंचं इतकं व्यक्त होण्याची गरज आहे का?

आपल्याभोवतीच गुंतवली चर्चा

असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आलेत. याचा शांतपणे विचार सर्वच लोकशाही आंदोलनकर्त्यांनी करायला हवा. प्रसिद्धीचा झगमगाट आणि आपण काहीतरी वेगळं करतोय असं दाखवणं ही मोदींची गरज बनलीय. त्यामुळेचं ते नेहमी काही ना काही खटपट करून वलय मिळवण्यात यशस्वी होत असतात.

मागे एकदा चिटपाखरूही नसलेल्या बोगद्यात त्यांनी हात उंचावून आनंद व्यक्त केला होता. प्रवासातही गाडीतल्या दिव्याचा प्रकाश स्वतःवर घेतल्याचा फोटोही देशभर वायरल झाला होता. अगदी परवाच काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या डोळ्यात अश्रू आले. ते प्रचंड भावूक झाले. इथंही त्यांना पाहिजे तेचं झालं.

संपूर्ण देशातल्या मीडियाचं आणि नेत्यांचं लक्ष वेधण्यात ते यशस्वी झाले. मग 'शेतकऱ्यांसाठी का अश्रू आले नाहीत?' असा सूर निर्माण करून त्यांनी 'शेतकरी आंदोलना'ची चर्चा काही दिवस तरी आपल्याचं भोवती गुंतवून ठेवली.

हेही वाचा: शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?

म्हणून आंदोलनजीवी शब्द आला

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला सगळ्या स्तरातून मिळणारा पाठींबा वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी आंदोलनाचं समर्थन करतायत. आंदोलनाचा तिढा न्यायालयाकडूनही सुटत नाही. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जातेय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनाचं समर्थन होतंय.

अनेक प्रकारच्या युक्त्या वापरूनही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. 'परकीय शक्तींचा हात', 'खलिस्तानी', 'नक्षलवादी' असं सगळं करूनही उपयोग होत नाही. अशावेळी काय करायचं? हा प्रश्न बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पडला असेल त्यामुळेच त्यांनी 'आंदोलनजीवी' हा शब्द जन्माला घातलाय.

मोदींची गुगली, बाकीच्यांची विकेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा बोललेत असं नाही. या अगोदरही त्यांनी असे बरेच शब्दप्रयोग केलेत. प्रत्येक वेळी विरोधी पक्ष आणि आपण सगळेच त्यांनी टाकलेल्या डावात अडखळतो. तसंच आताही झालंय का? याचाही विचार करावा लागेल.

राजकारण हे आरोप-प्रत्यारोपावर अवलंबून असतं. पण बदलत्या राजकारणात हे चित्र अधिकच भडक झालंय. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून योग्य आणि अयोग्य असे दोन गट पडतायत. मात्र सध्याच्या राजकारणात सगळं वलय आपल्याचं भोवती फिरतं ठेवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीचं यशस्वी होतायत. असचं सध्या तरी दिसत आहे.

त्यामुळेच मोदी यांनी चाणाक्षपणे टाकलेल्या गुगलीवर आपल्या सगळ्यांची विकेट गेलीय. हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे. म्हणूनचं मोदीच्या शब्दप्रयोगाला फारचं मनावर घेऊन देशातले 'आंदोलनजीवी' फसले आहेत, असं म्हणता येणार नाही का?

हेही वाचा: 

नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

(लेखक साहित्याचे अभ्यासक आहेत)