पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?
आज दुपारी वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३३ मिनिटं भाषण दिलं. यात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सर्जिकल स्ट्राईक, हिंदू दहशतवाद या मुद्यांवर ते बोलले. भाजप सरकारने केलेल्या विकासकामांवरही एखाददोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोलले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांवर टीका करण्यासाठी जवळपास साडेपाच मिनिटं दिली. याच शरद पवारांना मोदी राजकीय गुरू म्हणत होते. मोदींनी विदर्भभूमीतून गुरुंवरच टीकास्त्र डागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
शरद पवारांचा शरदराव आणि पवारसाब असा उल्लेख करत मोदी म्हणाले ते असं,
पवार साहेब देशातल्या सगळ्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. कुठलंही काम करताना मनात आलं आणि केलं असं त्यांच्याबाबतीत होत नाही. पंतप्रधान व्हावं, असं त्यांनाही वाटायचं. पण त्यांनी अचानक मी राज्यसभेतच खूश असून निवडून लढवणार नसल्याचं सांगितलं. त्यांना हवा कुठंय हे चांगलं कळलंय.
पवार कुटुंबात गृहकलह सुरू झालाय. पार्टी आता पवारांच्या हातून जातेय. पुतण्या पार्टीवर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच एनसीपीला तिकीटवाटपातही अडचणी येताहेत. पवार कुटुंबही कुठल्या सीटवरून लढावं आणि कुठं नको यावर डोकं लढवताहेत. महाराष्ट्रातली एनसीपी-काँग्रेस आघाडी कुंभकर्णासारखी आहे. पैसे खाऊन ते सहा सहा महिने ते झोपत असतात.
अजित पवारांकडे शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी करत होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसोबत कशा भाषेचा वापर केला? मी ती भाषा मंचावरून बोलू शकत नाही. मावळचे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी लढत होते, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश पवार कुटुंबानेच दिला होता.
स्वतः शेतकरी कुटुंबातले असतानाही शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्यांना विसरले. त्यांच्या काळातच शेतकऱ्यांनी खूप मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. पण पवार साहेबांना याची कुठलीच चिंता नव्हती. आता लोकांनीच पवार साहेबांना बोल्ड केलंय. त्यांच्या खोट्या आश्वासनांची पोलखोल केलीय. स्वतःच्या पुतण्याच्या हातूनच ते हिटविकेट झालेत. एवढंच नाही तर पवारांचं ध्यान स्वतःच्या वंशवादाच्या राजकारणाकडे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विदर्भात मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस असताना मोदींनी पवारांना टार्गेट केलंय. जे भाषण पश्चिम महाराष्ट्रात जाऊन द्यायला पाहिजे ते विदर्भात दिलंय, असं कुणालाही वाटू शकतं. एकतर राष्ट्रवादीचा वर्ध्यात उमेदवार नाही. वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे कधीकाळी पवारांचे उजवा हात होते. पण आता तेही भाजपमधेच आहेत. राष्ट्रवादी पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांतर फक्त भंडारा गोंदियाचीच जागा लढवतेय.
हेही वाचाः महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे
विदर्भात पवारांची पूर्वीसारखी ताकदही उरलेली नाही. पोटनिवडणुकीत निवडून आलेला खासदार आणि यवतमाळ जिल्ह्यातला अवघा एक आमदार इतकीच विदर्भात ताकद असलेल्या पवारांवर मोदींनी इतकी टीका करावी, हे वरवर पाहता विसंगतच ठरतंय.
मोदी जिथे जातात तिथल्या लोकांशी स्वतःला कनेक्ट करतात. तिथल्या समस्यांवर लोकांना नवनवी आश्वासन देतात. यासाठीच त्यांच्या सभा फेमस आहेत. पण वर्ध्याची सभा लोकल मुद्द्यांपासून भरकटली, असं निरीक्षण वर्ध्यातले ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांनी नोंदवलं. राम मंदिराचा मुद्दा बाजूला सोडत त्याला जोडणाऱ्या हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर मोदींनी भर दिला. हिंदू दहशतवाद हे काँग्रेसचं पाप असल्याचा आरोपही केला. तसंच विदर्भाशी तसा कुठला राजकीय प्रभाव नसलेल्या पवारांवर टीका केलीय.
`उन्हाचा पारा ४२ च्यावर असल्यामुळे भर दुपारी झालेल्या मोदींच्या सभेला गेल्या लोकसभा निवडणुकीसारखी गर्दी नव्हती. ५० ते ५५ हजार लोकांची क्षमता असलेल्या या मैदानावर ३० ते ३५ हजाराच्या घरात लोकांची गर्दी होती, असं धोपटे यांनी सांगितलं.
पवारांविषयी बोलताना धोपटे म्हणाले, `राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची संख्या मोठी नसली तरी विदर्भात पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे, हे विसरता येणार नाही. त्यामुळे मोदींना वर्ध्यातल्या सभेतून महाराष्ट्राला संदेश दिलाय. पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा अर्थ भाजपला उत्तम वातावरण आहे, हा मेसेज मोदींना या सभेतून महाराष्ट्रभर पोचवायचा आहे.`
हेही वाचाः लोकसभेच्या रिंगणात कोण, किती पाण्यात हे सांगणारे कालचे निकाल
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर हे मूळ वर्ध्याचेच आहेत. मोदींच्या भाषणाविषयी ते म्हणाले, ‘गांधीच्या भूमीत येऊन मोदी यांनी विकास, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर बोलण्यापेक्षा शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर तोंडसुख घेतलं. पवारांवर शाब्दिक हल्ला करणं हे तसं नैसर्गिक होतं. एकतर मैत्री कायम ठेऊनही पवारांनी मोदींवर पहिल्यांदाच तिखट शब्दांत हल्ला चढवलाय. पवारांनाही बदलत्या समीकरणात पंतप्रधानपदाची आस लागली असावी. वयाच्या पंच्याहत्तरीत पवारांचे चाललेले हे प्रयत्न आणि राज ठाकरे यांना पवारांनी दिलेलं बौद्धिक या पार्श्वभूमीवर मोदींच्या या टीकेकडे बघायला हवं.’
`देशाचे पंतप्रधान या नात्याने मोदींनी महाष्ट्राच्या पहिल्याच प्रचार सभेत सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्यांना स्पर्श करणं गरजेचं होतं. शेतकरी, बेरोजगारी आणि नानाविध प्रश्नांच्या विळख्यात सापडलेल्या विदर्भाच्या या ग्रामीण भागाची मोदींनी निराशाच केलीय असंच म्हणावं लागेल.`
वर्धा मतदारसंघात मोदी यांच्या सभेने गेल्यावेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघेंचा दारूण पराभव केला होता. पण यावेळी मोदींच्या सभेने तशी जादू साधेलच असं काही ठामपणे सांगता येत नाही. तरीही वातावरण विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या बाजूने असल्याचं मानलं जातं. त्याचं कारण मतदारसंघातलं कुणबी विरुद्ध तेली असं जातींचं ध्रुवीकरणही. ही तेली समाजातल्या तडस यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
हेही वाचाः इलेक्शनची गेल्यावेळसारखी हवा यंदा कुठाय?
पण वरवर जातीय ध्रुवीकरण झालेलं दिसत नसली तरी आजच्या सभेने हेच केल्याचं बोललं जातंय. तेली समाजातून असलेल्या मोदींनी थेट पवारांवर टीका करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तर आव्हान दिलं नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. तसं वर्धा मतदारसंघात तडस यांच्या विरोधातल्या काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या आहेत.
दुसरीकडे गेल्या आठवड्यात झालेल्या वर्धा जिल्ह्यातल्या २९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल भाजपसाठी चिंतेचा विषय ठरलेत. यात काँग्रेसने अनपेक्षितपणे भाजपच्या बरोबरीने ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी खासदार आदर्श ग्राम असलेल्या तरोडा ग्रामपंचायतीतही काँग्रेसने मुसंडी मारली. तरोडा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांचं गाव आहे. त्यासोबतच हिंगणघाट तालुक्यातल्या नेतृत्वहीन काँग्रेसने भाजपच्या सत्तेला हादरा देत यश मिळवलंय. आमदार समीर कुणावार यांच्या दत्तक गावाची ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतलीय.
वर्धा मतदारसंघापुरतं बोलायचं झाल्यास मोदींच्या सभेचा करिश्मा कुठवर चालणार हे गेल्यावेळसारखं यंदा काही स्पष्ट दिसत नाही. तसचं ११ एप्रिलला मतदानातच मोदी करिश्मा आणि पवारांवरच्या टीकेमागची राजकीय गणितं यांचा निकाल लावेल.
हेही वाचाः