पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

०८ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.

भारतरत्न सचिन तेंडूलकरने जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने एक विधान केलं की पुरुषांनीसुद्धा रडायला हरकत नाही. परिस्थिती तशी असेल तर पुरुषसुद्धा रडतात. त्यांचं रडणं ही कमजोरी मानू नये. सचिनने स्वनुभावावरून जाणलंय की रडल्यानंतर उलट मन खंबीर बनतं. जिद्द वाढते.

तेव्हा सचिन आनंदाने रडला

सचिन टेनिस एल्बोच्या त्रासाने हैराण होता तेव्हा त्याला क्रिकेट सोडावं लागलं होतं. या कल्पनेनेच तो रडायला लागला. पण शांत झाल्यावर खंबीर बनला आणि मग त्याने या दुखण्यावर मात करत आपली कारकीर्द प्रदीर्घ करून दाखवली. भारताला वर्ल्डकप जिंकून द्यायचं त्याचं स्वप्न होतं. ते शेवटी पूर्ण झालं तेव्हाही तो आनंदाने रडला होता.

आनंदाश्रू म्हणजे काय याचा अनुभव भारतीय क्रिकेटपटूंनी २ एप्रिल २००११ ला घेतला आणि संपूर्ण जगाला दिलासुद्धा! वर्ल्डकपमधली फायनल मॅच जिंकल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडूलकर, युवराजसिंग सगळेच आपले अश्रू आवरताना दिसले. त्यांना झालेला आनंद अश्रुंद्वारा मोकळा झाला आणि हे दृश्य पाहणारे असंख्य भारतीयसुद्धा भारावून गेले. आपण विश्वविजेते झाल्याचा तो क्षण होता.

मोठी माणसं सहसा रडत नाहीत. लहान मुलं रडतात. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हट्ट करून रडतात. अमुक एक काही मिळालं नाही की रडतात. मोठी माणसं मात्र दु:ख पचवण्याचा प्रयत्न करत असतात. दु:खातही चेहरा गंभीर ठेवण्याचा आटापिटा करत असतात. काही कर्मयोगी तर ओठांवरचे हसूही मावळू देत नाहीत. निष्ठूर म्हणून त्यांची संभावना करता येत नाही. पण निष्ठूर आणि कर्मयोगी यात नक्कीच फरक आहे. दुसऱ्याचं दु:ख पाहून जो हसतो तो क्रूर, निष्ठुर. स्वत:च्या दु:खात जो हसतो तो कर्मयोगी म्हणावा लागेल.

आनंदाच्या उन्मादाचा ट्रेंड

खेळात असे बरेच हरण्या जिंकण्याचे क्षण येत असतात. तेव्हा भावनांना आवर घालणं सर्वांनाच जमतं असं नाही. एखादा खेळाडू आऊट केल्यावर सहज उड्या मारून हल्ली बळी घेतल्यावर आनंदाचा उन्माद व्यक्त केला जातो. चांगला फटका मारल्यावर समोरचा बॅट्समन लगेच पुढे येऊन फटका मारणाऱ्याचं कौतुक करतो. त्याच्याही ओठांवर स्मित झळकत.

एखाद्याने अर्धशतक, शतक केलं की, लगेचच बॅट उंचावली जाते. खास विक्रम केला की, आभाळाकडे पाहिलं जातं. खेळपट्टीचं चुंबन घेतलं जातं. तसाच अंपायरचा निर्णय चुकीचा वाटला तर बॉलर, फील्डर आदळआपट करतात. अर्वाच्च भाषेत बोलतात. हा सगळा भावनांचा उद्रेक असतो. खेळ आणि भावना एकमेकांना पूरक आहेत. भावनाशील असतात ते चांगले खेळतात. त्यांच्यात काहीतरी चांगलं करून दाखवायची भावना असते. म्हणूनच ते चांगलं खेळायचा प्रयत्न करत असतात.

वर्ल्डकप जिंकताना संपूर्ण भारतीय संघ भावनाशील झाला होता. टीमचा प्रशिक्षक गॅरी कर्स्टन भारतीय नव्हता. तरी त्यालाही आनंदाश्रू आवरता आले नव्हते. केलेल्या मेहेनतीचं चीज झाल्याचं ते समाधान होतं. सचिनला २२ वर्षं जो क्षण हुलकावणी देत होता तो पकडल्यानं झालेला आनंद होता. युवराजला त्याचं गतवैभव परत आल्याचं वाटून देणारा तो क्षण होता. धोनीला छोट्या गावातून पुढे येत विश्वविजयी होण्याचा हर्ष झाला होता. प्रत्येक खेळाडूला अभिमान आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टींचा अनुभव देणारा क्षण सापडल्याने आनंदाश्रू दाटून आले होते.

हेही वाचाः जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

फुटबॉलपटू मॅराडोनाचे अश्रू

जेव्हा कुणी जवळचं जातं, त्याचा मृत्यू होतो तेव्हा येणारे अश्रू हे दु:खाश्रू असतात. मोठी माणसं तेव्हा रडतात. हे सारेच समजून घेतात. पण एरवी मोठ्या माणसांना जणू रडण्याचा अधिकार दिला जात नाही. असं रडणारा रड्या, कमकुवत, दुबळा समजला जातो. कुणी कितीही म्हटलं तरी अश्रू हे जेव्हा बाहेर यायचे तेव्हा येण्यावाचून राहत नाहीत. फारच थोड्यांना त्यावर नियंत्रण ठेवणं जमतं.

या दृष्टीनं कितीतरी उदाहरणं देता येतील. वारंवार वादात सापडणारे ज्येष्ठ फुटबॉलपटू मॅराडोनाला पोलिसांनी घरात कोकेन सापडलं म्हणून पकडलं तेव्हा त्याला रडू आलं. त्याचा कावराबावरा चेहरा बरंच काही सांगून गेला. त्या क्षणाचे फोटो जगभर प्रसिद्ध झाले आणि एका मोठ्या माणसाचं अध:पतन सर्वांनी पाहिलं.

कपिल देवलाही रोखता आले नाहीत अश्रू

१९८३ चा वर्ल्डकप भारताला मिळवून देणारा कपिल देव निखंज हा एक हट्टा कट्टा मर्द खेळाडू म्हणून ओळखला जातो. अगदी जीव तोडून खेळणारा. कणखर, खंबीर वगैरे. पण मॅच फिक्सिंगच्या दुनियेशी क्रिकेटपटूचे संबंध उघड झाले तेव्हा मनोज प्रभाकरने कपिल देवलासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात ढकललं होतं. त्याने कपिल देववर तसले आरोप केले. 

यावर कपिलला टीवीवर प्रतिक्रिया द्यायला जावं लागलं. तेव्हा कपिलच्या डोळ्यातही पाणी होतं. अशा तऱ्हेचा संशय आपल्याबाबत घेतला जाईल अशी त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. त्याचं स्वत्व, त्याचा स्वाभिमान याला जणू धक्का बसला होता. आणि त्याचे डोळे पाणावले होते. हे अश्रू तो रोखू शकला नव्हता.

दिलीप वेंगसरकर हा त्याच्या जिगरबाज बॅटिंगबद्दल प्रसिद्ध. परिस्थिती कशीही असो, वेंगसरकर त्यातून मार्ग काढणार. त्याच्या या स्वभावामुळे त्याला त्याचे सहकारी कर्नल म्हणायचे. पण रणजी स्पर्धेच्या फायनलमधे मुंबईकडून हरयाणाविरुद्ध खेळताना या कर्नलला पराभव टाळता आला नाही. काही रन कमी पडले आणि मुंबईची हार झाली. तेव्हा दिलीप वेंगसरकरही मैदानावरच रडला होता. एवढंच नाही तर त्या रात्री त्याला झोपही लागली नव्हती म्हणे.

हेही वाचाः महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखातच लगावली

पहिल्या आयपीएल स्पर्धेनं वेगवेगळ्या कारणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी एक वेगळीच घटना घडली. टीम इंडियात एकत्र खेळणारे हरभजन सिंग आणि श्रीशांत प्रतिस्पर्धी म्हणून खेळत होते. दोघांमधे काहीतरी बोलाचाली झाली आणि हरभजनने सरळ श्रीशांतच्या श्रीमुखातच भडकवली.

काही क्षण श्रीशांत हतबद्ध झाला. त्याला अशा प्रकारची प्रतिक्रिया हरभजनकडून अपेक्षित नव्हती. नेहमी प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचणारा, चिडवणारा, आपल्या भावनांचे अतिरेकाने प्रदर्शन करणारा श्रीशांत दुसऱ्या क्षणाला रडायला लागला. त्याची समजूत काढताना इतर खेळाडूंची धावपळ झाली.

१९९६ च्या वर्ल्डकप स्पर्धेत कोलकत्त्याचे प्रेक्षक मैदानावर आल्याने श्रीलंकेविरुद्धची लढत सोडावी लागली. तेव्हा विनोद कांबळीही रडला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू खडूस म्हणून ओळखले जातात. त्यांना दुसऱ्यांना रडवायला आवडतं, असा त्यांचा लौकिक. पण त्यांच्यात किम ह्यूज म्हणून एक भावनाप्रधान होता. तो कॅप्टन झाला असताना प्रमुख खेळाडू पार्कर सर्कलया गेल्याने दुबळ्या झालेल्या टीमला वारंवार पराभवाचे धक्के बसत होते. हे सहन न होऊन त्याने पत्रकारांना बोलावलं आणि त्यांच्यापुढे आपण नेतृत्व सोडल्याचं जाहीर करताना तो धाय मोकलून रडला.

भावनांचं माफक प्रदर्शन

मोठी माणसं अशी केव्हा केव्हा मनापासून रडतात, भावनांचं प्रदर्शन माफकरित्या झालेलं चांगलं असतं. म्हणूनच जॉन माकॅन्रोसारखे टेनिसपटू टेनिस कोर्टवर त्रागा करायचे. त्यामुळे त्यांना नावं ठेवली जायची. मात्र स्वीडनचा बिजोर्न बोर्ग हा एकमेव असा टेनिसपटू ज्याचा चेहरा नेहमी शांत आणि स्थितप्रज्ञासारखा असायचा. मॅच बोर्ग हरतोय की जिंकतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून कधीच कळायचं नाही.

मॅच जिंकल्यावर मात्र तो गुडघ्यात खाली बसून हाताच्या दोन्ही मुठी तोंडाजवळ नेऊन देवाचे आभार मानताना दिसायचा. त्याने कधीच पराभव पाहिला नाही. तरी तो स्थितप्रज्ञासारखा राहायचा. विम्बल्डनच्या फायनल मॅचमधे जॉन मकॅन्टोने त्याला हरवलं तेव्हा त्याने निवृत्ती पत्करली. असा खेळाडू विरळाच.

दु:खाश्रू कुणालाही टळलेले नाहीत. भगवान शंकराच्या दु:खाश्रुंचेच तर रुद्राक्ष बनलेत. आनंदाश्रू मात्र क्वचितच अनुभवायला मिळतात.

हेही वाचाः 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट