मी संमेलनाला गेलो नाही, कारण

१२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत.

आज १२ जानेवारीला मी सकाळी यवतमाळला पोचलो असतो. आमचे संजयभाऊ पवार 30 किलोमीटर लांब धामणगाव रेल्वे स्टेशनावर घ्यायला येणार होते. आयोजक असणारा आमचा मित्र निखिल परोपटेही येणार होता.

दुपारपासून साहित्य संमेलनाचा भाग असणाऱ्या दोन कार्यशाळांत बोलणार होतो. पहिली कार्यशाळा ११ ते १ होती. डिजिटल साहित्यः एक नवमाध्यम संधी आणि आव्हानं असा विषय होता. त्यात मी एक वक्ता होतो. दुसरी ३ ते ५ होती. त्यात माझा रोल अध्यक्षवजा होता. दोन्ही कार्यशाळांत मी माझे थोडेफार अनुभव शेअर केले असते. त्याला हजेरी लावणाऱ्यांना त्यातून काही मिळालं असतं की नाही, माहीत नाही. पण मला मजा आली असती.

कार्यशाळा हा साहित्य संमेलनातला एक वेगळा प्रयोग आहे. त्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतलीय. महामंडळाशी भांडून त्याचं आयोजन केलंय. नोंदणीही चांगली झाली. अशा ठिकाणी मला मिळालेलं निमंत्रण हा माझ्यासारख्या छोट्या पत्रकारासाठी फारच मोठा सन्मान होता. आपल्या क्षेत्रातल्या नव्या मित्रांना भेटणं. लिहिणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना भेटणं. पुस्तकं बघणं, विकत घेणं. हा साराच आनंदाचा भाग असता.

पण तसं झालं नाही. मी आज यवतमाळात नाही. मी काही संमेलनावर बहिष्कार टाकलेला नाही. ती मी विचारपूर्वक केलेली कृतीही नाही. पण नयनतारा सहगल प्रकरणात आयोजकांनी आणि महामंडळाने जी माती खाल्ली, तिला तोड नाही. इथे लिहिणाऱ्याचा योजनाबद्ध पद्धतीने जाणीवपूर्वक अपमान झालाय. त्यामुळे मी दुखावलोय. आतून दुखावलोय. मला तो माझा अपमान वाटतोय. मला तिथे जावंसंच वाटलं नाही. मी गेलेलो नाही.

मी संमेलनात जाऊन आपला निषेध व्यक्त करावा, असाही पर्याय होताच. पण अपमान करणाऱ्यांच्या मदतीने झालेला पाहुणचार झोडायचा आणि वरून निषेध करायचा, हे कसं करायचं? माझा तो निषेध बोलबच्चन ठरला असता. त्यापेक्षा मला मिळणारा सन्मान आणि आनंद नाकारून मी माझ्या विवेकाला साक्षी ठेवून केलेला निषेध माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कदाचित तो मला पुढेही हवीहवीशी वाटणारी प्रलोभनं नाकारण्याची ताकद देत राहील. कदाचित नाहीही देणार.

शप्पथ सांगतो, हे सारं घडत होतं, तेव्हा नरेंद्र कवी आठवत होता. ज्ञानेश्वर माऊलींचा काळातला कवी. त्याची गोष्ट काल अरुणा ढेरेंनीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितली. राजा रामदेवरायाने त्याच्या रुक्मिणीस्वयंवर काव्यावर कवी म्हणून स्वतःचं नाव टाकण्याच्या बदल्यात सोनंनाणं देण्याची ऑफर दिली. ती त्याने नाकारली. सांगितलं, ना राजेहोः माझिया कवीकुळास बोलु लागैल. आमच्यासारखं फेसबूकवर लाईक्स मिळाव्यात म्हणून त्याने हे केलं नव्हतं. त्याला इतिहासात अमरही व्हायचं नव्हतं. महानुभवांनी स्मृतिस्थळ नावाच्या ग्रंथात नोंदवून ठेवलं, म्हणून आपल्याला ते कळलं तरी. नाहीतर मराठीचा अभिमानी नरेंद्र इतर शेकडो कवींसारखा इतिहासाच्या अंधारात गुडूप झाला असता.

राजा रामदेवरायाच्या राजवटीला सुवर्णकाळ वगैरेही म्हटलं जातं. पण मी जितकं वाचलंय, तितका तो मला नालायकच वाटत आला. सिंहासनाचा स्वाभाविक वारस असणाऱ्या चुलतभावाचे डोळे काढून, ठार मारून राजा झालेला. शेजारच्या स्थानिक राजांशी वैर घेणारा. हेमाडपंतासारख्या कारस्थानी आणि जातवादी मंत्र्याच्या हातचं बाहुलं बनून जनतेला लुबाडणारा.

त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात त्याची सत्ता वाऱ्यासारखी उडून जाणं स्वाभाविक होतं. त्यानंतर हाच नालायक रामदेवराय खिलजीचा इमानी चाकर बनला. त्याला खुश करायला पोटच्या पोरीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. दोन्ही मुलगे खिलजीशी लढत असताना हा हात बांधून सेवेत लीन होता. शेजारच्या स्थानिक राजांवर हल्ले करण्यात खिलजीला मदत करत होता.

अशा नालायक राजाला आपण रुक्मिणीस्वयंवराचा कर्ता म्हणून ओळखत नाही, हे किती चांगलंय. कवीकुळाला त्याच्याइतका दुसरा बट्टा नव्हता. पण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत याच रामदेवरायाचा उल्लेख एकदाच तरीही सन्मानाने केलाय. अर्थात त्याची कारणं असतीलच. धर्माच्या दुकानदारांशी संघर्ष करणाऱ्या माऊलींना एकाच वेळेस अनेक आघाड्यांवरचा लढा नको असेल. हे समजून घेण्यासारखं आहे. ती सोय असावी. काळाची गरज असावी. तो तेव्हाचा निर्णय होता. माऊली करतील, ते योग्यच असणार.

आपलं काम ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालण्याचं आहे, असं माझ्यासारख्याला वाटतं. पण यवतमाळच्या संमेलनाला नकार देताना मी माऊलींची माफी मागितली. माऊली, इस बार माफ कर दो. यावेळेस मी तुमच्या नाही, नरेंद्र कवीच्या वाटेवरून जाणार. लिहिणाऱ्याचा अपमान करणाऱ्या सत्तेला तोंडदेखला का होईना, पण नमस्कार नकोच. माऊली, मला खात्री आहे, मी तुमच्या वाटेवरून बाजुला झालो, याचा तुम्हाला जास्त आनंद झाला असेल.

मला यवतमाळचीही माफी मागायचीय. यवतमाळच्या मित्रांची माफी मागायचीय. कार्यशाळांचा समन्वयक असणाऱ्या निखिल परोपटेचीही माफी मागायचीय. त्यानेच मला बोलावलं होतं. प्रेमाने आणि सन्मानाने बोलावलं होतं. शेवटच्या दिवसापर्यंत तो माझं मन वळवत होता. सॉरी मित्रा, आलो नाही. माझ्यामुळे तुला त्रास झाला.

आता आलो नाही, तरी मी लवकरच यवतमाळला येणार आहे. सगळ्यांना भेटणार आहे. आलो नाही, त्यासाठी रमाकांत कोलते सरांचीही माफी मागणार आहे. पाय पकडून माफी मागणार आहे. त्यांची अडचण मी समजू शकतो. तुम्हीही माझी अडचण समजून घ्या. माझं मन मारून मला संमेलनाला येताच आलं नसतं.

संमेलन यशस्वी होणार, याची खात्री होतीच. त्यामुळे मी यवतमाळचं संमेलन मिस करतोय. पण त्याचा मला आनंदही आहे.

(लेखक कोलाज डॉट इनचे संपादक आहेत.)

 

हेही वाचाः

वाचाः संमेलनाध्यक्षांच्या भाषणापेक्षाही महत्त्वाचं लक्ष्मीकांत देशमुखांचं भाषण

संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा

मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच

लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?