भारताला तब्बल आठ वर्षानंतर मिळालेल्या व्हाईट वॉशची ६ कारणं

०२ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.

आज सकाळी सकाळीच टीम इंडियाच्या चाहत्यांना नाराज करणारी बातमी आली. टीम इंडियावर व्हाईट वॉशची नामुष्की ओढवली. गेल्याच महिन्यात भारतावर पहिल्यांदा व्हाईट वॉशची नामुष्की ओढवली होती. पण ती वनडे सिरिजमधली होती. पण टेस्टमधला व्हाईट वॉश भारताच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण भारताला तब्बल आठ वर्षांनी व्हाईट वॉश मिळालाय. त्यातच जवळपास १७ महिने कुणी हरवू शकलं नाही त्या टीम इंडियाला न्यूझीलंडने मात दिलीय.

पण आता दीड वर्षानंतर टीम इंडियाला पहिल्यांदाच टेस्ट सिरिजमधे मानहानीकारक पराभवाला तोंड द्यावं लागलंय. २०१८ मधे इंग्लडमधे झालेल्या सिरिजमधे भारताचा ४-१ च्या फरकाने पराभव झाला होता.

हेही वाचा : दिल्ली दंगलीतल्या या हिरोंनी ना जात पाहिला ना धर्म

१. बॅटिंगमधे खाल्ला मार

भारताने न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट १० विकेट्सनी गमावली. दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाला १० विकेट्सनी पराभवाचं तोंड बघावं लागलं असतं. पण उमेश यादव आणि नुकताच पुन्हा फॉर्ममधे आलेल्या जसप्रीत बुमराहमुळे मानहानीकारक पराभव टळला. दोन्ही टेस्टवर नजर टाकली तर बॅटिंगमधे भारताने गटांगळ्या खाल्याचं दिसतं.

टीम इंडियाला दोन टेस्टमधल्या चार डावांमधे फक्त एकदाच २०० चा टप्पा पार करता आलाय. त्यामुळे भारताच्या या दारुण पराभवला बॅट्समनच जबाबदार आहेत. कॅप्टन विराट कोहलीचंही तेच मत आहे. विराटने सिरिज संपल्यावर बॅटिंगमधे खराब खेळी झाल्याने आम्ही चांगली कामगिरी करणाऱ्या आमच्या बॉलर्सची काहीच मदत करु शकलो नाही, असा निराशेचा सूर लावला होता. पण टीम इंडियाच्या पराभवाला फक्त बॅटिंगच कारणीभूत ठरली. पराभवासाठी इतरही पुरक गोष्टी कारणीभूत आहेत.

हेही वाचा : टी२० महिला क्रिकेट वर्ल्डकपमधे भारताची सारी भिस्त या पाच जणींवर

२. विल्यमसन ठरला टॉस का बॉस

न्यूझीलंडमधील वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्चवरील खेळपट्ट्या बॅट्समनफ्रेंडली आहेत. खेळपट्ट्या हिरव्यागार ठेवण्यात आल्या होत्या. त्या इतक्या हिरव्या गार होत्या की त्यावरचं गवत पाचही दिवस हिरवं कसं राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. चमन गोटा खेपट्ट्यांवर खेळण्याचे बाळकडू मिळालेल्या टीम इंडियाची हिरव्यागार खेळपट्टीवर चांगलीच भंबेरी उडाली.

त्यातच विराटला न्यूझीलंडचं नाणं वश करता आलं नाही. टॉसचं दान दोन्हीवेळा केन विल्यमसनच्याच म्हणजेच न्यूझीलंडच्या पदरात पडलं. विराटने मॅचनंतर टॉसचा मुद्दा 'आम्ही कारणं देणार नाही' असं सांगत 'व्यावसायिक' पद्धतीने उडवून लावला. तरी त्यालाही माहीत आहे की टॉस जिंकण्याचं महत्त्व काय आहे. कारण हिरव्या खेळपट्टीवर बॅट्समन हा दुबळा पैलवान म्हणून गणला जातो. त्यातच हिरव्या पिचची सवय नसलेली फलंदाजांची फौज भल्या सकाळी खेळायला पाठवली तर त्यांची भंबेरी उडणारच की. भारताच्या बाबतीतही तेच झालं.

टीम इंडियाची बॉलिंग आणि न्यूझीलंडची बॅटिंग तुल्यबळच होती. टेस्ट सिरिजच्या युद्धात या दोन्ही पलटनींची भूमिका आपापल्या टीमच्या जय पराजयात महत्वाची होती. त्यामुळे टॉस जिंकेल ती टीम आपल्या बॉलर्सच्या पलटनीला युद्धातली मोक्याची जागा म्हणजे 'अप्पर' हँड मिळवून देणार होता. त्यात विल्यमसन दोन्हीवेळा टॉस का बॉस झाला. त्यामुळे किवींच्या तोफखान्याने बुरुजावरील वरची आणि मोक्याची जागा मिळाली. त्यामुळे भारताची संपूर्ण बॅटिंगच त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आली. आता ज्यांना डोंगरमाथ्याची जागा मिळते ते पायथ्यावर असलेल्यांचा लिलया धुव्वा उडवणारच की.

३. अनुभवहीन ओपनर जोडी

रोहित शर्मा टी - २० मालिकेवेळीच दुखापतग्रस्त झाल्याने त्याने थेट मायदेशच गाठला. त्याची उणीव न्यूझीलंड दौऱ्याचा निकाल आल्यावर जाणवली. त्यातच शिखर धवनही दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे भारताची बॅटिंगलाईन कमकुवत झाली. कारण दोन्ही अनुभवी सलामीवीर दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडसारख्या खडतर दौऱ्यात भारताची सर्व मदार अनअनुभवी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्या खांद्यावर येऊन पडली.

न्यूझीलंडमधे नवा बॉलवर फटकेबाजी करणाऱ्या टीमचंच टेस्ट मॅचवर वर्चस्व तयार होतं. पण भारताकडे असलेल्या दोन्ही सलामीवीरांना हातभर स्विंग होणारी बॉलिंग आणि विशेषतः हिरव्यागार खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभवच नव्हता. त्यामुळेच पहिल्या टेस्टमधे पृथ्वी शॉने भारतात खेळत असल्यासारखं आक्रमक फटकेबाजी सुरू केली.

पण त्याच्या ध्यानात आलं नाही की भारतीय उपखंडात वाढलेली आपली फलंदाजी नव्या बॉलवर हिरवळीत उघडी पडू शकते. परिस्थिती अनुकुल होत नाही तोपर्यंत तरी सावधगिरी बाळगत बॅटिंग करावी या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यासारख्या अनुभवी बॅट्समनलाही भल्यासकाळच्या फ्रेश विकेटवर, फ्रेश बॉलिंगचा सामना करावा लागला.

पहिल्या टेस्टमधे मयांक अग्रवालने बऱ्यापैकी बॅटिंग करत किवींच्या वेगवान माऱ्याचा चांगल्याप्रकारे सामना केला. पण दुसऱ्या टेस्टमधे त्याच्या बॅटिंगमधलं सदोष तंत्र उघडं पडलं. त्याला डावखुऱ्या बॉलर्सचा सामना करणं अडचणीचं ठरतं हे पहिल्या टेस्टच्या पहिल्याच डावात बोल्टने दाखवून दिलं. दुसऱ्या कसोटीतही त्याला बोल्टनेच दोनवेळा आत येणाऱ्या चेंडूवर पायचीत केलं. आणि डावखुऱ्या फास्ट बॉलर्सचा आत येणारा बॉल हा मयांकचा वीक पॉईंट असल्याचं जगजाहीर झालं. कधी पृथ्वी तर कधी मयांक नवीन बॉल जुना करुन देण्यात अपयशी ठरल्याने आपल्या मधल्या फळीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.

हेही वाचा : नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

४. ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची कमतरता

भारताने दोन्ही मॅचमधे दोन वेगवेगळे ऑलराऊंडर बॉलर्स खेळवले. पहिल्या टेस्टमधे फॉर्ममधे असलेल्या जडेजाऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली. त्याने विकेट काढल्या पण, त्याला बॅटिंगमधे चमक दाखवता आला नाही. त्यामुळे भारताला प्रत्येक डावात जवळपास ५० ते ६० रन कमी पडले. याचमुळे रवींद्र जडेजाला दुसऱ्या टेस्टमधे संधी मिळाली. त्यालाही पुढाकार घेत शेपटाकडील बॅट्समनला रन काढण्यात अपयश आलं.

बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर हिरव्या खेळपट्टीवर फिरकीपटूकडून विकेटची अपेक्षा करणं सयुक्तिक नाही. तसंच या दोघांनी विकेट काढल्या नाहीत असं नाही. जडेजाने मोक्याच्या वेळी दोन मोठ्या विकेट काढल्या. तर पहिल्या मॅचमधे अश्विननेही तीन विकेट काढल्या. परंतु बॅटिंगमधे जो एक्स फॅक्टर हार्दिक पांड्याकडे आहे तो फॅक्टर अश्विन आणि जडेजामधे दिसला नाही. पांड्याने आक्रमक फटकेबाजी करुन सहज ६० ते ७० धावांची भर घातली असती. 

हार्दिक फिट असता तर तोच बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळला असता. त्यामुळे जलदगती गोलंदाजांना किवींचं शेपूट गुंडाळण्यात जे अपयश आलं ते आलं नसतं. न्यूझीलंडने पहिल्या टेस्टमधे ७ बाद २२५ वरुन ३४८ चा टप्पा गाठला. याचबरोबर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात ७ बाद १५३ वरुन २३५ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक असता तर त्याची हिरव्या खेळपट्टीमुळे मुख्य जलदगती गोलंदाजांना शेपूट गुंडाळायला नक्की मदत झाली असती.

५. कोहलीचं 'विराट' अपयश 

विराट कोहली या सिरिजमधे कॅप्टन आणि बॅट्समन अशा दोन्ही रोलमधे अपयशी ठरलाय. बॅटिंगमधे तर त्याला एकाही डावात २० हून जास्त रन्स काढता आले नाहीत. पहिल्या दोन्ही डावात तो नेहमीप्रमाणे विकेट बाहेरचा चेंडू चेस करण्याच्या नादात आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या मॅचमधे त्याने प्रयत्नपूर्वक ही चूक सुधारत बाहेर जाणारे बॉल सोडून देण्याची स्ट्रॅटेजी अवलंबली. त्यामुळे विराट दुसऱ्या टेस्टमधे मोठ्या धावसंख्या उभारणार असं वाटत होतं.

पण किवीच्या बॉलर्सनी चलाखी करत विराटला अचानक आत येणारा बॉल टाकून त्याची परीक्षा पाहिली. या परीक्षेत विराट दोन्ही वेळा सपशेल नापास झाला. त्याच्या अपयशी खेळीचा टीमलाही मोठा फटका बसला. त्याने प्रत्येक मॅचमधे शतक झळकवावं असं कुणाचंच म्हणणं नाही. पण पाच टी२०, तीन वनडे आणि दोन कसोटी मॅचमधे त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक येणं हे टीमच्या दृष्टीने हिताचं नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत तर नाहीच नाही. 

विराटच्या कॅप्टनसीबद्दल बऱ्याच दिवसांपासून कोणीही काहीही बोललं नव्हतं. कारण भारत त्यावेळी मायदेशात होता. मायदेशात भारताला विशेष तंत्र वापरण्याची गरज लागत नाही. न्यूझीलंडमधे लागते. विराटने या सिरिजमधे कॅप्टन म्हणून मैदानावर फार चुका केल्या नाहीत. पण, जेमीसनला बाद कसं करायचं याचं कोडं त्याला फार उशिरा उमगलं.

हिरव्या खेळपट्टीवर विराटसारख्या उंचपुऱ्या बॅट्समनला बाऊन्सर टाकण्याचं धाडस फारसं कुणी केलं नाही. पण अखेर दुसऱ्या मॅचमधे त्याच्यावर हा प्रयोग यशस्वी ठरला. हा बाऊन्सरचा प्रयोग आधीच झाला असता तर कदाचित त्याचा फायदा टीम इंडियाला झाला असता. या टॅक्टिस कर्णधार म्हणून विराटच्या चटकन लक्षात यायला हव्यात.

हेही वाचा : लेडी सेहवाग शेफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

६. टीमची निवड चुकली

दुसरी गोष्ट म्हणजे संघनिवडीत केलेल्या गंभीर चुका. टी - २० आणि एकदिवसीय मालिकेत केएल राहुलने चांगली बॅटिंग केली होती. पण, आश्चर्यकारकरित्या त्याचा रोहित आणि शिखरच्या अनुपस्थितीतही विचार झाला नाही. किंबहुना विराटने त्याचा आग्रह का धरला नाही हा प्रश्न आहे. त्याचबरोबर टीमधे वृद्धिमान साहा आणि ऋषभ पंत हे दोन विकेट किपर असतील तर त्यातला सिनअर कोण? वृद्धिमान सहाच ना. मग ज्याचा खराब फॉर्ममुळे आधीच आत्मविश्वास डळमळीत झालाय त्या पंतला डायरेक्ट वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर किवींच्या तोफखान्यासमोर उभं करणं यात कोणता शहाणपणा आहे?

बरं न्यूझीलंडमधे ३५० ते ४०० धावा होणार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे जो तळातील बॅट्समनला हाताशी धरून त्यांच्याकडून उपयुक्त भागिदाऱ्या करत टीमसाठी बहुमूल्य ६० - ७० धावांची योगदान देऊ शकेल, तसा करण्याचा अनुभव असेल तर त्याला संधी देणं योग्य ठरलं असतं. त्यामुळे टीम इंडियामधे पंतऐवजी वृद्धिमान सहाला संधी द्यायला हवी होती.

हेही वाचा : 

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर

सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?