आजही सैराटची गाणी याड का लावतात?

२९ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.

'लंगड्या, तुजं मला काय बी ऐकायला यत न्हाय' म्हणणाऱ्या परशाला आर्ची आली आर्ची हे शब्द मात्र बरोबर ऐकायला येतात. तेव्हा कसलाही विचार न करता बोटीच्या एका टोकावरून स्वत:ला तो समुद्रात झोकून देतो. जणू ये इश्क नही आसान बस इतना समझ लिजिये या ओळींचीच याद यावी.

पक्ष्यांचं आभाळाकडं झेप घेणं असो, बॅकग्राऊंडला वाद्यांचं उत्कंठा वाढवणारं संगीत असो की आर्चीच्या एका झलकसाठी व्याकुळ झालेल्या परशाचं अथांग सागरातून वाट काढत किनाऱ्याकडं झेपावणं असो. इच्छितस्थळी पोचण्याची उत्सुकता नेमकी कुणाला लागलीय त्याचा अंदाज लावणं कठीणच.

मंग्याच्या हिरीवरनं समद्या पोरास्नी आर्चीनं तानून लावलं अशी आर्चीची तक्रार करणाऱ्या मित्राकडून परशाला एवढंच कळलं की आर्ची मंग्याच्या विहिरीकडे आहे. मग काय, चेहरे पे मुस्कान और दिल में लाखो तुफान घेऊन पाखरांच्या वेगाने, ओलेत्या अंगाने, अनवाणी पायाने परशा पळतच सुटतो.

एकीकडे समुद्रातून बाहेर आलेला परशा तर त्याचवेळी दुसरीकडे हात वर करून पूर्ण कपड्यातल्या आर्चीने उंच पायऱ्यांवरून विहिरीत मारलेली उडी! आर्चीच्या त्या उडीने नदीत, विहिरीत असलेली हिरोईन मादकच दिसते, असते या आपल्या पूर्वापार संस्काराच्या पार चिंधड्या उडवल्या राव.

हेही वाचा: टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

समुद्र पार करून आलेला परशा आता आर्ची पहायला मिळणार या एका आशेपायी घरी येऊन डोक्यावर चक्क पाणी ओतून घेतो! आणि याड लागलं गं याड लागलं गं, रंगलं तुझ्यात याड लागलं गंची धून सुरू होते. तीच्यासाठी परशाचं सजणं त्याच्या लहान बहिणीच्या नजरेतूनही सुटत नाही. पण चाखलंया वारं ग्वाड लागलं गं म्हणत विहिरीकडं निघालेल्या परशाला शर्ट घालायला तरी घरात कुठं वेळ आहे.

धावत्या मालगाडीच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या उकळ्या फुटल्यासारखं स्लो मोशनमधे एकट्यानेच परशाला बेधुंद नाचताना पाहून जाणवतं की प्रेमात आकंठ बुडालेल्याचं नाचणंही किती लोभसवाणं असतं! तेवढ्यात कुठूनतरी एक फूलपाखरू परशाच्या आजूबाजूला भिरभिरत येतं. तेच फूलपाखरू उसाच्या नी केळीच्या शेतातून परशा येणार असल्याची वर्दी देत निघूनही जातं.

हे असं प्रेमात असलेल्याचं फूलपाखरू झालेलं पाहणं म्हणजे दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचा अत्युच्च आविष्कारच म्हणायला हवा मग भलेही ते फूलपाखरू एडिट केलेलं का असेना! शेतात एकट्यानेच बेधुंद नाचणारा परशा माणसांमधे आल्यावर मात्र लोकांच्या नजरा चुकवत, मनातली चलबिचल लपवत चालत राहतो. पण नीट न्याहाळून पाहिली तर त्याची ही दोन्ही रूपं रविराज कटिंग सलूनच्या तडा गेलेल्या काचेतूनही दिसतात. आणि काचेसारखं निर्विकार चेहऱ्याने पाहत असलेलं रविराज नामक जगही!

'सांगवना, बोलवना, मन झुरतया दुरून'  च्या तालावर पुन्हा उसाच्या तुऱ्यांमधून पाखरांसंगं उडत जाणारा परशा, त्याचं ते गोंधळलेलं मन लाजं-काजंला बाजूला सारून पाकीट, घड्याळ मित्राकडं भिरकावून देतं आणि ओढ लागली, मनात कालवाया लागलं म्हणत विहिरीकडं धाव घेतं. तेव्हा हरभरा खायच्या तयारीत असलेला मित्रही बघतच राहतो.

हेही वाचा: अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

आणि परशा एकदाची विहिरीच्या कड्यावरून मस्तमौला उडी मारतो. जिच्यासाठी एवढा आटापिटा केला तिला एकटक पाहतच पाण्यात पडतो. समुद्रात हात पाय लांब करून पट्टीचा सूर मारणारा परशा विहिरीत मात्र गुडघ्यात पाय मुडपून, हात पसरून उडी मारतो हे विशेष!

बघितलंच न्हाय म्हणत त्याचं ते लडिवाळ खोटं खोटं बोलणं, बरा डोळं झाकून हिरीत पडलास म्हणत तिचं बेदरकार उत्तर, आता बघितलंस ना म्हटल्यावर त्याचं ते मनातल्या मनात गुदगुल्या झालेलं मान डोलावणं आणि त्यावरही कडी करत तिने त्याला फटकारणं! बासरीच्या आर्त स्वरांच्या पार्श्वभूमीवर त्या दोघांमधे प्रत्यक्ष झालेला पहिला संवाद आणि एकमेकांचे श्वासही ऐकता येतील एवढ्या जवळून झालेली प्रत्यक्ष नजरभेट!

खरंतर पोरींचा रस्ता अडवून धरायची आपली दीर्घ परंपरा पण इथे आर्चीचं परशाला वाट मोकळी करून देणं लक्षात राहतं. आणखी एक, परशा पायऱ्यांकडे येताना पायऱ्यांजवळ आर्चीच्या चार मैत्रिणी दिसतात. पण पुढच्याच सीनमधे परशा पायऱ्या चढताना मात्र तिघीच असल्याचं दिसतं, हे मात्र खटकतं जरूर! असो.

जग जिंकलेल्या अलेक्झांडरचं हसू घेवून परशा तिथून बाहेर पडतो तर अचानक या कोसळलेल्या वीजेने आर्चीही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खुळ्यासारखी पाहतच राहते आणि चमचमत्या पाण्याच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच खुलून दिसतो! कॅमेरेवालेदादा, मानलं तुम्हाला! काय म्हणली रं आर्ची? हे मित्रांनी विचारताच 'बाहेर हो म्हणली' हे परशा इतक्या सहज सुंदरतेने बोलून जातो की तिचं हुसकावून लावणंसुध्दा त्याला किती हवंहवंसं वाटतं, याची साक्ष पटावी.

बाहेर हो म्हणली हे तीन शब्द म्हणजे या गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणातला मास्टर पीसच! म्हटलं तर नुसतं विहिरीतून बाहेर हो किंवा ज्याच्यात उडी मारू पाहतोस त्यातूनही बाहेर हो हा गर्भित अर्थही दडलाय असं जाणवतं!

हेही वाचा: वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग

तिच्या नजरभेटीत चिंब भिजूनही आतला जाळ काही केल्या सुलगना. देखणं हे, दुखणं गं कॅरमबोर्डचा पाळणा करून एकलंच हाय साथीला म्हणत त्यावर कपडे सुकवतयं. एकलेपणाच्या वातीला पाजळून मनाच्या काजळीला कधी उजळवून टाकतंय तर कधी चांदणीलाच आवतान धाडतंय.

तिचं सपान आता जागवाय लागलं हे जसं कळलं नाही तसं तिच्याच विचारांच्या थव्यांनी आभाळ पांघराया लागलं हे ही कळलं नाही. मग माशांचं जाळं घेऊन पहाटे पहाटे घराकडे धाव घ्यावी लागली. आणि सकाळी पाहतो तर काय. बंदुकीच्या आकाराची चावी लावून, तलवारीच्या पात्यावर नंबरप्लेट असलेली, गडद निळ्या रंगातला ड्रेस ल्यालेली, गॉगल लावून ऐटीत बसलेल्या रूबाबदार आर्चीची बुलेटवरची एन्ट्री! कडक शिस्तीच्या एनसीसी कॅडरला मान वळवायला लावणारी, गावातल्या टग्या नजरेंनाही क्षणभर अवाक् करणारी, निस्तेज डोळ्यातल्या एखादीलाही अभिमान वाटायला लावणारी अशी ती एण्ट्री कुणाला याड नाही लावणार?

याड लागलं हे गाणं म्हणजे गायक, गीतकार, संगीतकार, कलाकार, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि एडिटर यांच्या मेहनतीचं, कलागुणांचं अनोखं प्रदर्शनच आहे! आवर्जून उल्लेख करावा ते म्हणजे ६६ वाद्यवृंदकांनी मिळून वाजवलेली ट्रंपेट, सेक्साफोन, ब्रास, व्हायोलीन, क्लेरीनेट, बासरी, वीणा इ. वाद्यं आणि त्यातून तयार झालेलं हे सिंफनी ऑर्केस्ट्राबेस मेलडियस सॉंग!

आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवला की मराठी सिनेमा ग्लोबल झाला असं म्हणायचं की यूट्यूबवरच्या या गाण्याचं रेकॉर्डिंग पाहिल्यावर तो खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला असं म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण एकदा तरी या गाण्याचं यूट्यूबवरचं रेकॉर्डिंग अवश्य पहा. याड लागलं या गाण्याची पडद्यामागची अतोनात धडपड नी पडद्यावरची आल्हाददायक धडधड पाहिली की एकच वाक्य मनात येत राहतं याड लागावं तर ते अस्सं!

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

(आनंद भंडारे यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार )