महाशिवरात्री कशासाठी साजरी केली जाते?

२१ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


शिवभक्तांचा महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. खरंतर शिवरात्री दर महिन्याला येते पण फक्त माघ महिन्यातल्या शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. या दिवशी भाविक उपवास करतात, जागरण करतात. या सणाची थोडक्यात माहिती देणारा मराठी विश्वकोशाच्या वेबसाईटवर आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या नोंदीचा हा संपादित भाग.

महाशिवरात्र म्हणजे शिवभक्तांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र असं एक व्रत. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र येतेच. प्रत्येक महिन्यातली वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजे शिवरात्री. पण माघ महिन्यातली वद्य चतुर्दशीच्या रात्रीला महाशिवरात्र असं म्हणतात. या रात्री शंकराची पूजा केली तर सगळ्या प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते, शिवाशी तादात्म्य होतं किंवा मोक्ष मिळतो अशी शिवभक्तांची श्रद्धा असते.

चतुर्दशी दोन दिवसांत विभागली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येते रात्र महाशिवरात्र मानली जाते. म्हणजेच काय तर शिवरात्रीच्या काळाचा निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे. पूर्णिमान्त मास मानणाऱ्या लोकांच्या दृष्टीने महाशिवरात्र फाल्गुन महिन्यात येते. शिवरात्रीच्या कालनिश्चयाच्या बाबतीत इतरही बरेच मतभेद आहेत.

हेही वाचा : बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत

या तीन गोष्टी महत्त्वाच्या!

नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असतात. त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दर येणारी रात्र म्हणजे नित्यशिवरात्र. शुद्ध चतुर्दशीची रात्र म्हणजे पक्षशिवरात्र. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग्याने आपल्या सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते.

महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं याचं तपशीलवार विवेचन वेगवेगळ्या ग्रंथांत आढळतं.  महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त सकाळीच जेवण करावं. महाशिवरात्रीचं व्रत सकाळीच सुरू करावं. नंतर आंघोळ, शिवपूजा वगैरे करून व्रत पूर्ण करावं, असं सांगितलं जातं. उपवास, पूजा आणि जागरण या व्रतातल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

रात्रभर जागरण करून शिवाची पूजा करायची असते. रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामधे वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करावी लागते. या पूजेला यामपूजा असं म्हटलं जातं. पूजा करताना शिवाला आवडणारी बेलाची आणि आंब्याची पानं वाहिली जातात.

हेही वाचा : गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?

कोणत्याही वर्णाच्या लोकांना करता येतं व्रत

एक वर्ष व्रत केल्यावर पुढच्या वर्षी करायचं नाही असं मात्र करता येत नाही. काही वर्षं व्रत केल्यानंतर मग या व्रताचं उद्यापन म्हणजे विसर्जन करता येतं. तोपर्यंत दरवर्षी हे व्रत करावंच लागतं.

कोणत्याही वर्णांच्या आणि जातींच्या लोकांना हे व्रत करण्याचा अधिकार आहे. ठरवून व्रत केलं नाही किंवा महाशिवरात्रीच्या रात्री उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. हे एका कथेमधून सांगितलं जातं. महाशिवरात्रीला नकळत उपवास घडल्यामुळे एका हरणाचा आणि शिकाऱ्याचा उद्धार झाला आणि त्यांना आकाशातल्या मृग आणि व्याध या नक्षत्रांचं रूप प्राप्त झालं, अशी एक गोष्ट प्रचलित आहे.

महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वर, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ. असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतला संहार आणि पुनर्निर्मिती यांचं चक्र सूचित होतं, असं काही अभ्यासकांना वाटतं.

हेही वाचा : 

पाकिस्तानातही घुमतो ‘बम बम भोले’चा गजर!

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा