कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

१२ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. आता कॉमेंट्रीच्या नावावर नकोती शेरेबाजी करण्याचे प्रकार वाढतायत. आपल्याला क्रिकेटमधलं अधिक कळतंय असाच कॉमेंट्री करणाऱ्यांचा समज झालाय. त्यानिमित्ताने कॉमेंट्री विश्वाचा घेतलेला हा वेध.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं कॉमेंट्रीटर आणि खेळाडू ह्यांच्यातही ‘लढत’ झाली. विशेष करुन संजय मांजरेकरांच्या कॉमेंट्रीवर नाराजी व्यक्त करताना रविंद्र जाडेजाने हल्ला चढवत त्य़ाची कॉमेंट्री म्हणजे ‘तोंडाची हगवण’ असल्याचा शब्दप्रयोग केला. आधी संजयने जाडेला हा अष्टपैलू नाहीय तर थोडासा फलंदाज, थोडासा गोलंदाज असा तुकड्या तुकड्यांचा आहे. असं मत मांडलं होतं.

ह्याचा समाचार घेताना जाडेजानं संजयची लायकीसुद्धा काढली. आपण अधिक वनडे खेळल्याचं ठणकावत जाडेजानं विरोधातच ट्विट केलं. ह्यावर अनेक जणांनी बरीचशी संजयच्या विरोधातच प्रतिक्रिया दिली.

संजय मांजरेकरांची घातकी ‘खेळी’

गेली कित्येक वर्ष संजय कॉमेंट्री करतोय. त्याची क्रिकेटची जाण वादातीत आहे. तो कसोटीपटू म्हणून यशस्वी ठरला होता. त्याने रणजी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व सुद्धा प्रगल्भपणे केलं होतं. ही सगळी जमेची बाजू असूनही वनडेमधे तो ढेपाळायचा. विशेष करुन धावा करण्यात तो कमी पडायचा. बऱ्याच वेळा तो स्वत: धावबाद व्हायचा नाही तर समोरच्याला करायचा. यामुळे तो वनडेचा खेळाडू नाही असा त्याच्यावर शिक्का बसला.

कसोटी एवढी वनडे खेळायची संधी त्याला मिळाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व असल्यानं तो कॉमेंट्रीटर म्हणून लगेच स्थिरावला. पण नेहमीच कुत्सित आणि खडूस अशी शेरेबाजी करायच्या त्याच्या सवयीमुळे त्याची कॉमेंट्रीटर म्हणून असलेली लोकप्रियता घसरली. त्यानं जाडेजाच नाही तर आतापर्यंत सचिनपासून द्रविड, धोनी कुणा कुणालाही सोडलेलं नाही.

हेही वाचा: अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत 

शेरेबाजी म्हणजे उच्च दर्जाचं समीक्षण नाही

खेळाडू कितीही महान असला तरी त्याच्यात काही दोष असतात. कधी कधी तो बॅडपॅचमधे अडकतो. अशा वेळेस त्याच्या वर्मावर बोट ठेवून मत प्रदर्शित करायची मनमानी सवय संजयला घातक ठरतेय. त्याच्यावर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहलीपासून सगळेच नाराज असल्य़ाची कुजबूज आहे आणि जाडेजाच्या मार्फत संजयचा पाणउतारा केल्य़ाचं मानलं जातंय.

संजयची तऱ्हा इंग्लिश समालोचक, समीक्षकांसारखी आहे. तो त्यांना आदर्श मानतो की काय माहीत नाही. पण लेन हटन, टूमन, बॉयकॉट, वॉघन, बॉथम हे सर्वच जण खडूस शेरेबाजी करणारे राहिलेत. ह्याला ते उच्च दर्जाचे समीक्षण, विश्लेषण मानतात. क्रिकेटचा सर्वांगीण विचार करुन मतप्रदर्शन करायची आपली परंपरा आहे अशी ही मंडळी मानतात. पण खेळाडू मात्र त्यांच्या ह्या खडूसपणावर संतप्त आहेत.

जॉन ब्रियास्टोने सुद्धा जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे. तो म्हणतो, ‘ह्या मंडळींना इंग्लंडचा संघ हरतो कधी आणि आम्ही खेळाडूंच्या उरावर बसतो कधी असं वाटतं.’ ब्रियास्टोचे हे मत ‘अतिशहाण्यांवर’ केलेला हल्लाच आहे.

आताच्या खेळाडूंचा ‘गैर’समज

दुसरी बाजू बघताना मात्र काहींना जरूर असं वाटतं की काय मग कॉमेंट्रीटर, विश्लेषक ह्यांनी खेळाडूंची फक्त स्तुतीच करायची? त्यांचे दोष, त्यांच्या उणीवा दाखवायच्या नाहीत. त्या दाखवल्या नाहीत तर खेळाडूंचा खेळ सुधारणार कसा? अर्थात ह्या अशा विश्लेषणाचा अभ्यास खेळाडू कितपत करतात? हा प्रश्नच आहे. पूर्वी बहुतेक नवोदीत खेळाडू एखादा माजी खेळाडू समोर आला तरी आदराने झुकायचे.

इतकंच नाही तर मार्गदर्शन घ्यायची इच्छा व्यक्त करायचे. त्यांचे अनुभव जाणून घ्यायला बघायचे. आताचे खेळाडू सामने अधिक खेळत असल्याने त्यांना माजी खेळाडूंपेक्षा आपल्याला अधिक समजतं असं वाटायला लागलंय. पण केवळ सामने अधिक खेळल्यानं कुणी अधिक ज्ञानी होतो असं नाही.

हेही वाचा: बलविंदर संधूची ती न विसरता येणारी विकेट

हर्ष भोगले, कॉमेंट्री आणि शहाणपण

ह्याचबरोबर काही माजी खेळाडू आपणहून वहावत जातात. आपल्या मर्यादेत न राहता नसती उठाठेव करतात. अनाहूत सल्ले द्यायला जातात. किंवा उगीच आपल्याला अधिक क्रिकेट कळतं अशी शान झाडायला जातात. हेही चूकीचं आहे. संजय मांजरेकर ह्या दृष्टीने उदाहरण बनू पाहतोय. मध्यंतरी हर्ष भोगलेवरही अमिताभ बच्चन, कपिल देव ह्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हर्ष भोगले हा एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला कॉमेंट्रीकार. त्याचं क्रिकेटचं ज्ञान, ओघवतं इंग्रजी, चांगला आवाज ह्यामुळे तो बीबीसीलासुद्धा भावला. काही माजी कसोटीपटूंना तो नको असतानाही त्यांच्या बरोबरीनं बसून तो कॉमेंट्री करायला लागला. त्यानं काहीसं फिरकी घेणारे अडचणीचे प्रश्न विचारायचे किंवा मतं द्यायची असे प्रकार सुरु केल्यानं त्याच्याशी करार करायचं एका चॅनेलनं थांबवलं होतं. हर्ष भोगले ह्या अनुभवाने आता शहाणा झालाय. तो आता संयमित कॉमेंट्री करतो.

हेही वाचा: टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

कॉमेंट्रीच्या नावावर कॉमेडी

फार पूर्वी कॉमेंट्री केवळ रेडिओवरुन ऐकायला मिळायची. मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती कॉमेंट्रीटर श्रोत्यांपर्यंत पोचवायचा. बॉबी तल्यारखान हा कॉमेंट्रीटर दिवसभर एकट्याने कॉमेंट्री करायचा असा इतिहास आहे. टीवी आल्यावर प्रेक्षकांना मैदानावरची घटना डोळ्यांनी दिसायला लागली. मग कॉमेंट्रीटरचं काम काय तर त्यानं जरा अधिक विशेष असं काही सांगून कॉमेंट्री करावी असं अपेक्षिलं जाऊ लागलं. हळूहळू ह्यासाठी माजी खेळाडूच योग्य ठरु लागले. त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरु लागला.

मुख्य म्हणजे भारतात तरी क्रिकेटमधे भरपूर पैसा आल्यानं एक दोन कसोटी खेळलेले सुद्धा कॉमेंट्रीसाठी धडपडू लागले. काही जण तर प्रसिद्धीसाठीही प्रयत्न करु लागले. एकदा अजित वाडेकरांनी सांगितलं होत. ‘नुसतं टिवीवर झळकण्यासाठी आपण हिंदीवाल्यांसारखी कॉमेडी करायला जात नाही. मला तशी गरजच नाही. मी जे नाव कमावलंय ते मला धुळीला मिळवायचं नाहीयं.’ हे खरंय.

काही माजी खेळाडू नाममात्र मानधनावर कॉमेंट्री करायचे. अतुल वासन, अशोक मल्होत्रा, दीपक चोप्रा अशी माणसं जी आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीही करु शकली नाही ती कॉमेंट्रीटर बनून मोठ मोठी भाष्य करु लागली. ही हास्यास्पद गोष्ट होती.

हेही वाचा: लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

कॉमेंट्रीटरनी संयम बाळगायला हवा

अर्थात खेळाडूंवर खरमरीत टिकाही केली जाऊ नये आणि नाहक त्यांना हरभरऱ्याच्या झाडावर चढवू नये अशी कॉमेंट्री असावी. आधी उल्लेख केलेल्या बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती. काय झालं होतं. मुंबईला ब्रेबॉन स्टेडिअमवर अब्बास अली बेगने सुंदर फलंदाजी केली. तो दिसायलाही सुंदर होता. मैदानावर धावत जाऊन एका तरुणीनं त्य़ाचं चक्क चुंबन घेतलं.

त्यावर तल्यारखान ह्यांनी टिप्पणी केली होती. ‘तेव्हा त्या झोपलेल्या असायच्या’, हा टोला मर्चंट ह्यांच्या संथ संयमी फलंदाजीला हाणलेला होता. मर्चंट हे जगातल्या तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक होते. बेग खेळत असताना ते जरी निवृत्त झाले होते तरी त्यांनी तल्यारखान ह्यांना ‘तुम्ही किती सामने खेळलात?’ असा प्रश्न केला नव्हता. तेव्हा निरोगी टिका, शेरा खेळाडूंनी सुद्धा खिलाडुपणे घ्यायला हवा आणि आपलं कॉमेंट्री कित्येक लोकांपर्यंत जातेय ह्याचं भान ठेऊन टीवीवर आणि सोशल मीडियावर कुणाबद्दलही संयमित मत मांडावं. नाहीतर शब्दांचा चोथा होतो.

हेही वाचा: 

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन 

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का? 

झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला 

निकोल टेस्ला: मानसिक आजारावर मात करून बनले जग बदलणारे शास्त्रज्ञ