कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

२६ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला देशाला संबोधित करताना भारताला कोरोनामुक्त करण्यासाठीचा सरकारी रोडमॅप सांगितला. घरात बसण्याचं सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनावरच्या उपाय असल्याचं त्यांनी जगभरातले दाखले देत स्पष्ट केलं. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जगभरातले देश वेगवेगळ्या मार्गाचा अवलंबत आहेत. असं असताना आपले पंतप्रधान मात्र घरात बसणं हाच एकमेव मार्ग असल्याचं सांगताहेत. त्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, २६ मार्चपर्यंत कोरोना वायरसच्या संसर्गानं २० हजारांहून अधिक लोकांचा जीव गेलाय. तर ४ लाख ५१ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झालाय.

हेही वाचाः कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे सध्या एकच आशेचा किरण आहे. आणि तोही आपल्याला कोरोनाला काहीअंशी रोखण्यात ज्यांनी यश मिळवलंय त्यांच्या अनुभवातून माहीत झालंय. या देशांतले नागरिक अनेक आठवडे घराबाहेरच पडले नाहीत. सरकारी दिशानिर्देशांचं पालन केलं. आणि त्यामुळेच आता हे देश या जागतिक साथीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं जात आहेत. आता आपल्यापुढंही याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.’

‘चीन, अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी या विकसित देशांमधे कोरोना वायरस पसरायला सुरवात झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि इथं एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. इटली असो किंवा अमेरिका यांची आरोग्य सेवा, त्यांचे हॉस्पिटल, त्यांचं तंत्रज्ञान अख्ख्या जगात नावाजलं जातं. एवढं सगळं असूनही या देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं नाही,’ असं सांगत मोदींनी भारतापुढच्या मर्यादांकडे लक्ष वेधलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं २६ मार्चला सकाळी दहापर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात साडेसहाशेहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालाय. यामधे एकट्या महाराष्ट्रातले १२४ लोक आहेत. तर केरळचे १०१ जण आहेत. १३ जणांचा मृत्यू झालाय.

कोरोनाविरोधात लढायचे पाच मार्ग?

कोरोना साथीविरोधात सारं जग लढतंय. एकमेकांच्या अनुभवापासून धडा घेऊन हे काम सुरू आहे. प्रत्येक देश आपापल्या सोयीनुसार, क्षमतेनुसार कोरोनाविरोधात लढतोय. भारतानंही कोरोनाच्या प्रचाराची साखळी मोडून काढण्याचा मार्ग निवडलाय. पण हे सगळे फॉर्म्युले जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांनुसारच राबवले जात आहेत.

डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाला रोखण्याचा सगळ्यात जालीम इलाज म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि पुन्हा टेस्ट. एका प्रेस कॉन्फरन्समधे बोलताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एढॉनॉम गेब्रेयेसूस म्हणाले, ‘आमचं सगळ्याच देशांना सांगणंय – टेस्ट, टेस्ट, टेस्ट. प्रत्येक देशानं संशयितांचं सॅम्पल तपासलं पाहिजे. कारण डोळे झाकून आपण या जागतिक साथीला तोंड देऊ शकत नाही.’ पण अनेक देशांत गंभीर लक्षण दिसत नाहीत तोपर्यंत कोरोनाची टेस्ट होत नाही. कारण टेस्टसाठीची आवश्यक यंत्रसामुग्रीच उपलब्ध नाहीत.

संशयितांची चाचणी करण्यासोबतच संसर्ग झालेल्या रूग्णांना क्वारंटाईनमधे ठेवलं पाहिजे. असं केल्यानं संबंधितापासून दुसऱ्यांना संसर्गाचा मार्ग बंद होऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि चीननं जगाला हा मार्ग दाखवून दिलाय. 

तिसरा उपाय म्हणजे, वायरसचा प्रसार होऊ नये म्हणून तत्काळ प्रभावी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. चीनशेजारच्या तैवान आणि सिंगापूरनं हेच केलं. 

चौथा उपाय हा सोशल डिस्टन्सिंगचा आहे. वायरसनं एकदा का देशात एंट्री केली की त्याला रोखण्याचा हाच एकमेव इलाज आहे. 

या सगळ्यांसोबतच कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी वेळोवेळी हात धुवायला पाहिजे. तसंच स्वच्छता बाळगली पाहिजे. हा मार्ग सगळेच देश अवलंबत आहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर 

भारतानं सोशल डिस्टन्सिंग का निवडलं?

डब्ल्यूएचओनं २७ फेब्रुवारीला जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार, कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी सरकारकडे पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटक्टिव इक्विपमेंट यांचा पुरेसा साठा असला पाहिजे. पीपीईमधे ग्लोव्स, गाऊन आणि एन९५, वेंटिलेटर, सर्जिकल मास्क यांचा समावेश होते. पण केंद्र सरकारनं १९ मार्चपर्यंत या सगळ्या वस्तूंची भारतातून परदेशात निर्यात सुरू होती, असं द कारवां मॅगझिननं केलेल्या एका स्टोरीत म्हटलंय.

एबीपी न्यूजच्या एका बातमीनुसार, पाटण्यातल्या एनएमसीएच हॉस्पिटलमधल्या ८३ ज्युनिअर डॉक्टर्सनी पुरेशा सोयीसुविधा नसल्यानं आम्हाला क्वारंटाईनमधे टाका अशी मागणी केलीय. दुसरीकडं पुण्याच्या भारती विद्यापीठानं पीपीईचा पुरेसा साठा पुरवण्याची मागणी केलीय. तरीही आपले डॉक्टर्स दिवसरात्र झटत आहेत. त्यासाठीची कृतज्ञता म्हणूनच आपण गेल्या रविवारी २२ मार्चला टाळ्या वाजवल्या.

सरकारकडून मात्र असा कुठलाच तुटवडा नसल्याचा दावा करण्यात येतोय. डब्ल्यूएचओनं आम्हाला अशी काही गाईडलाईन्सच दिली नाही, असं म्हटलं जातंय. सरकार असे दावे करत असलं तरी देशाच्या कानाकोपऱ्यांतून डॉक्टरांचे पीपीईचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. डॉक्टरांच्या तक्रारींचे असे अनेक विडिओ सोशल मीडियावर वायरल झालेत.

भारताची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे?

इंडिया टुडेनं ‘हेल्थ प्रोफाईल २०१९’ या भारत सरकारच्या अहवालाच्या हवाल्यानं एक रिपोर्ट केलाय. या रिपोर्टनुसार, देशात सर्व प्रकारच्या सरकारी हॉस्पिटल्सची संख्या २६००० एवढी आहे. म्हणजेच सव्वाशे कोटीच्या भारतात ४७ हजार लोकांसाठी एक हॉस्पिटल उपलब्ध आहे. ही देशाची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बघायची झाल्यास दीड लाख लोकसंख्येसाठी एक हॉस्पिटल उपलब्ध आहे. दुसरीकडे देशात डॉक्टरांची स्थितीही अशीच आहे. देशात १,१६,७७५ अलोपॅथिक डॉक्टर आहेत. म्हणजे १०,७०० माणसांमागं एक डॉक्टर उपलब्ध आहे.

देशभरातल्या सरकारी दवाखान्यांत २०.५ लाख नर्स आहेत. म्हणजे ६१० माणसांमागं एक नर्स आहे. २५,७७८ सरकारी हॉस्पिटल्समधे ७.१३ लाख खाटं म्हणजेच बेड्स उपलब्ध आहेत. म्हणजेच १० हजार माणसांमागं खूप झालं सहा बेड आहेत. बिहारमधे ९ हजार माणसांमागं एक बेड उपलब्ध आहे. म्हणजेच १,८२६ लोकांसाठी भारतात केवळ एक बेड आहे.

स्क्रोल डॉट इन या वेबसाईटनुसार, २१ मार्चपर्यंत भारतात केवळ १४,८११ लोकांच्या टेस्ट झाल्यात. दोन दिवसाआधी १९ मार्चला भारतानं १२,४२६ जणांच्या टेस्ट केल्या. म्हणजेच दहा लाख लोकांमागं केवळ ९.२ लोकांच्या टेस्ट झाल्या. याउलट कोरोनानं हाहाकार माजवलेल्या इटलीत १८ मार्चपर्यंत १ लाख ६५ हजार ५४१ जणांची टेस्ट करण्यात आली. टेस्टिंगचं हे प्रमाण इटलीत दर दहा लाख लोकांमागं २,७४०.७५ एवढं आहे. दक्षिण कोरियानं तर टेस्टिंगच्या बळावरच कोरोनाला रोखलंय. दर दहा लाख लोकांमागं कोरियात ५,७२९.६ लोकांच्या टेस्ट होताहेत. दररोज २० हजार लोकांच्या मोफत टेस्ट केल्या जाताहेत.

भारत सरकार मात्र आपली यंत्रणा सक्षम असल्याचं सांगतंय. भारत दररोज १० हजार टेस्ट करण्यासाठी सक्षम आहे, असा दावा आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी केला. २४ मार्चला सकाळी १० पर्यंत भारतात २०,८६४ सॅम्पल टेस्ट करण्यात आलेत. आता सरकारनं टेस्टिंग वाढवण्यासाठी खासगी लॅबलाही परवानगी दिलीय. सरकारही नव्या प्रयोगशाळा उभारत आहे.

हेही वाचाः लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

इटली, अमेरिकेची तब्येत कशीय?

आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं तसं अमेरिका, इटली, चीन या देशांची आरोग्य यंत्रणा ताकदवान आहे. द इकॉनॉमिक टाईम्समधे डॉ. सोहम भादुरी यांचा एक लेख आलाय. त्यानुसार, इटलीत दर हजार लोकांमागं ३.२ बेड्स आहेत. हेच प्रमाण अमेरिकेत २.८ तर चीनमधे ४.३ एवढं आहे.

सरकारी यंत्रणा अपुरी पडत असल्यानं आता खासगी हॉस्पिटल्सलाही मदतीला घेतलं जातंय. पण देशातली जवळपास तीन चतुर्थांश खासगी हॉस्पिटल्स ही जवळपास ४० जिल्ह्यांतच एकवटलीत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच चतुर्थांश हॉस्पिटल्समधे खाटांची संख्याही ३० हून कमी आहे, असं भादुरी सांगतात. भादुरी हे द इंडियन प्रॅक्टिशनर या मेडिकल जर्नलचे संपादक आहेत.

आरोग्य यंत्रणा बळकट असणाऱ्या इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका अशा देशांना कोरोनानं हादरवलंय. या देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे रूग्ण आले तर त्यांना एडमिट कुठं करणार, आणि त्यांच्यावर औषधोपचार कसे करणार हा भारतापुढचा कळीचा प्रश्न आहे. या वास्तवाची जाण ठेवूनच पंतप्रधान मोदींनी भारतासाठी सोशल डिस्टन्सिंगचा मार्ग निवडलाय. त्यामुळे सध्यातरी घरी थांबा, सुरक्षित राहा एवढाच मार्ग आहे.

हेही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?