कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची जबाबदारी मोदींची असं लॅन्सेट का म्हणतंय?

१३ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय.

कोरोना वायरसच्या या संकट काळात एकीकडे भारतात पेशंटची संख्या वाढतेय तर दुसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू होतायत. लस, वॅक्सिन, ऑक्सिजन सिलेंडर, औषधं अशा प्रत्येक आघाडीवर सरकारं सपशेल अपयशी ठरलीत. मृतदेह जाळण्यासाठी स्मशानात जागा शिल्लक नाहीय. हॉस्पिटलमधे बेड शिल्लक नसल्यामुळे एका पेशंटनं थेट घरातून बेड नेल्याची बातमी सोशल मीडियातून वायरल होतेय.

भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढत होती. तिकडे लक्ष देण्याऐवजी देशाचे आरोग्यमंत्री नरेंद्र मोदींच्या निवडणूक सभांचं ट्विट करताना दिसले. आपण योग्य पद्धतीने मदत पोचवत असल्याचं सगळ्यांना सांगत राहिले. पण लस, ऑक्सिजनसाठी राज्य सरकारं भांडत राहिली. दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा म्हणून सर्वोच्च न्यायालयानं  थेट केंद्र सरकारला फटकारलं.

भारतातल्या या परिस्थितीबद्दल जगभरात चिंता व्यक्त केली जातेय. वॉशिंग्टन पोस्ट, टाईम, द ऑस्ट्रेलियन अशा प्रतिष्ठित माध्यमांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढलेत. लॅन्सेटसारख्या जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिननं सध्याच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचं म्हटलंय. सध्याच्या ढिसाळ कारभारामुळे १ ऑगस्टपर्यंत भारतात १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशाराही दिलाय.

हेही वाचा: कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

लॅन्सेटला गांभीर्याने घ्यायचं कारण

द लॅन्सेट जगातलं सगळ्यात जुनं आणि प्रतिष्ठित आरोग्यविषयक मॅगझिन आहे. ब्रिटिश सर्जन असलेल्या डॉ. थॉमस वॅकली यांनी १८२३ मधे त्याची सुरवात केली. लॅन्सेटचा पहिला अंक ५ ऑक्टोबर १८२३ मधे प्रसिद्ध झाला. लॅन्सेटमधे वेगवेगळे रिसर्च, आरोग्याशी संबंधित विषय, संपादकीय, आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या समीक्षा प्रकाशित केल्या जातात.

लॅन्सेट जगातल्या सर्वोत्तम वैज्ञानिकांकडून वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहून घेत असतं. अभ्यासपूर्ण लेख, रिसर्च लॅन्सेटनं प्रसिद्ध केलेत. त्यामुळे इथं लेख छापून येणं फार प्रतिष्ठेचं मानलं जातं. आरोग्य क्षेत्रातले बदल आणि त्यातल्या सुधारणा या माध्यमातून सगळीकडे पोचाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे फार गांभीर्याने पाहिलं जातं.

मागची दोन शतकं इतरही वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य दिलं जातंय. बालक आणि पौगंडावस्थेतलं आरोग्य, डिजिटल आरोग्य, जागतिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, एचआयवी, साथीचे रोग अशा अनेक विषयांवरही लॅन्सेटची नियतकालिकं निघतात. २००७ ला लॅन्सेटची 'द लॅन्सेट स्टुडंट' नावाची वेबसाईटही आली.

लॅन्सेट मुख्यतः आरोग्यविषयक मॅगझिन असलं तरी त्याने अनेक राजकीय विषयांवर ठाम भूमिका घेतलीय. आरोग्य आणि राजकारण बाजूला करता येत नाही. दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नांदत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. जम्मू काश्मीररमधलं कलम ३७० हटवल्यावर वाद निर्माण झाला होता. यावर लॅन्सेटमधे संपादकीय आलं होतं. काश्मिरी लोकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊन तिथं तणाव वाढेल असं म्हटल्यामुळे लॅन्सेटच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला होता.

दुसऱ्या लाटेची जबाबदारी मोदींची

आरोग्य क्षेत्रातली अनेक तज्ञ मंडळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देत होती. पण कोरोना वायरस आता पळून गेला आणि आपण त्यावर मात केलीय या आविर्भावात मोदी सरकार राहिलं. लॅन्सेटने ८ मेला छापलेल्या संपादकीयमधून मोदी सरकारच्या याच हलगर्जीपणावर ताशेरे ओढलेत.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यापेक्षा सोशल मीडियातून टीका करणारी पोस्ट, ट्विट हटवण्यात जास्त रस होता. त्यामुळे कठीण काळातही टीका आणि चर्चा दडपण्याचा हा प्रयत्न माफीच्या लायक नाहीय. दुसरी लाट आल्यावर ज्या काही चुका झाल्यात त्याची जबाबदारी मोदींची आहे.' असं लॅन्सेटने म्हटलंय.

तर भारतातले मोठमोठे कार्यक्रम सुपरस्प्रेडर ठरू शकतील असा इशारा आधीच देण्यात आला होता. तरीही कुंभमेळ्यासारखा धार्मिक कार्यक्रम, निवडणूक रॅली घेण्यात आल्या. कोरोनाचे सगळे नियम आणि प्रोटोकॉल धाब्यावर बसवण्यात आल्याचं म्हणत सरकारला धारेवर धरलंय.

हेही वाचा: भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

भारतातल्या आरोग्यव्यवस्थेवर टीका

या नियतकालिकाने भारताच्या आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. ते करताना 'हॉस्पिटलमधे पेशंटना ऑक्सिजन मिळत नाही. त्यांचा जीव जातोय. मेडिकल टीम थकल्यात. त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतोय. या व्यवस्थेमुळे त्रस्त झालेले लोक सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, वेंटिलेटर आणि औषधांसाठी मदत मागत आहेत.' असं म्हटलंय.

मोदी सरकारच्या लसीकरणाची मोहीम पूर्णपणे कोलमडून पडल्याचं लॅन्सेट म्हणतंय. महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटाचं लसीकरण तूर्तास पुढे ढकलण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कालच जाहीर केलंय. लसींचा तुटवडा हेच त्यामागचं खरं कारण आहे. मुळात १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या लसीकरणाचा निर्णय घेताना मोदी सरकारनं राज्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळेच पुरवठा कमी झाल्याचं लॅन्सेटचं म्हणणं आहे.

कोरोना वायरस गेलाच या समजात सत्ताधारी होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सर्वेनं २१ टक्के लोकांमधेच अँटिबॉडिज तयार झाल्याचं म्हटलं होतं. पण भारतात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याचा भ्रम तयार करत राहिले. तसंच केरळ आणि ओडीसासारखी राज्य दुसऱ्या लाटेत पूर्णपणे तयार होती. शिवाय स्वतः ऑक्सिजनचं उत्पादन घेऊन इतर राज्यांच्या मदतीसाठी धावून आली. तर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशसारखी राज्य यात कमी पडल्याचं निरीक्षण लॅन्सेटनं नोंदवलंय.

सूचना मनावर कोण घेतंय?

याआधी अनेक जगप्रसिद्ध माध्यमांनी मोदी सरकारच्या कोरोना काळातल्या व्यवस्थापनावर टीका केलीय. भारतातले आरोग्य क्षेत्रातले अनेक तज्ञही वारंवार काही सूचना करतायत. गोमूत्र प्यायलाने कोरोना पळतो असे अनेक प्रकारचे अवैज्ञानिक दावेही या काळात करण्यात आलेत. यावर कुणी टीका केली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशावेळी कोरोनाशी दोन हात करायचे तर सार्वजनिक आरोग्याशी संदर्भात पावलं उचलताना त्याला वैज्ञानिक आधार हवा हा लॅन्सेटचा सल्ला महत्वाचा वाटतो.

तसंच प्रत्येक १५ दिवसांनी नेमकं काय घडतंय त्याची आकडेवारी सरकारनं देणं, जिनोम सिक्वेन्सिंगचं प्रमाण वाढवणं, देशांतर्गत लॉकडाऊन अशा अनेक गोष्टीही गरजेच्या आहेत. लॅन्सेटच्या मते, लसीकरण करताना दोन मोठी आव्हानं सरकारसमोर आहेत. लसींचा पुरवठा वाढवणं आणि गरीब आणि ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत ते पोचवणारी केंद्र तयार करणं.

६५ टक्के लोकांपर्यंत अजूनही आरोग्यसुविधा पोचलेल्या नाहीत. त्यामुळेचं कोरोनाचा हा वाढता संसर्ग वेळेत रोखायला हवा. देशाच्या कोरोना टास्क फोर्सची एप्रिलपर्यंत एकदाही बैठक झाली नाहीय हा हलगर्जीपणा असाच कायम राहिला तर भारतात १ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे १० लाख मृत्यू होतील असा इशारा लॅन्सेटनं दिलाय. या सगळ्याची जबाबदारी केवळ सरकारची असेल असंही म्हटलंय.

हेही वाचा: 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या स्त्रियाच खऱ्या वीरांगना!

पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो