पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?

०३ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.

पाऊस जोरात पडला, की पाणी उताराने धावणं, जास्त पाऊस आला की नदीपात्रं, ओढे दुथडी भरून वाहणं आणि पूर येणं, आणि पाऊस कमी झाला किंवा थांबला की पूर ओसरणं, या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत. निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपाने पाऊस लहरी होणं स्वाभाविक आहे. आज त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. मात्र पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर न ओसरणं अनैसर्गिक आहे आणि त्याची चर्चा व्हायला हवी.

हेही वाचा: वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

यावेळच्या पुराची तीव्रता अधिक

कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनी १९८९ ला पूर अनुभवला होता. त्यानंतर २००५ ला मोठा पूर आला. २०१९ चा पूर सर्वात भयंकर, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. पुराचा अभ्यास करणार्‍या वानखेडे समितीच्या अहवालावर अजूनही चर्चा सुरू आहे. अशातच यंदाही हे तीन जिल्हे पुन्हा पुराच्या तडाख्यात सापडले. यावेळच्या पुराची तीव्रता जास्त आहे.

पंचगंगा नदीवरच्या राजाराम बंधार्‍याची पाणीपातळी ५६ फुटांच्या वर गेली तर सांगलीला ती ७० फुटांपेक्षा जास्त होती. त्यातच पूर ओसरण्याचा वेग हा खूप कमी असल्याने होणारं नुकसान वाढलं. राधानगरी धरणाचे अधिकारी रोहित बांदिवडेकर आणि विवेक सुतार यांनी टीका सहन करत दूरद‍ृष्टी दाखवली नसती तर आणखी मोठी हानी झाली असती.

यावर्षी २० जुलैपासून सुरू झालेला पाऊस वाढत गेला आणि पुराच्या पाण्याने २२ तारखेला कोल्हापूरला वेढलं. २४ जुलैला शहर परिसर आणि धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला तरीही पुराचं पाणी पूर्वीसारखं कमी झालं नाही आणि हीच चिंतेची गोष्ट आहे.

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूरप्रवण भागात झालेली बांधकामं, खणिकर्म इत्यादी अनेक घटक यामागे आहेत.

राष्ट्रीय महामार्गांची रचना बदललीय

राष्ट्रीय महामार्गाची आजची रचना पूर उतरण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. महामार्ग नदीला छेदून नेताना पूरस्थितीचा अंदाज घेऊन पुलाचं बांधकाम होणं गरजेचं असतं. सांगलीजवळ कृष्णा आणि पंचगंगेला ओलांडणारे रस्ते बांधताना नियमित पाऊस लक्षात घेतला आहे. कारण प्रत्यक्ष पूल नियमित पात्रावरच आहे. त्यामुळे पुराचं पाणी पात्राबाहेर पडलं की पूर्वीसारखे शेतातून वाहून जात नाही.

कारण पात्राबाहेर पडलेल्या पाण्याला भराव अडवतो. हे पात्राबाहेरचं पाणी अडीच किलोमीटरपर्यंत पसरतं. पुढे जाण्यासाठी पाण्याला नदीपात्राशिवाय पर्यायी मार्ग नसल्यानं ते तुंबतं. हमरस्ता क्र. ४ धरणाची भिंत आणि नदीपात्रावरचा पूल सांडवा बनतो. त्यामुळे २०१९ आणि २०२१ च्या पुरात कोल्हापूरची अवस्था धरणात बुडालेलं शहर अशी झाली.

२००५ च्या पुरावेळी असणार्‍या रस्त्याच्या उंचीपेक्षा आजच्या रस्त्याची उंची १५ ते २० फूट जास्त आहे. त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर पडलं की तुंबून राहतं. नदीपात्रातून पाणी जातंच. पण रस्त्यावरून चार फूट पाणी वाहत होतं. हाच रस्ता उंचावरून बांधताना पुराच्या पाण्यासाठी मार्ग ठेवले असते तर पूर लवकर ओसरला असता. लवकरच हायवे सहापदरी होणार आहे. त्यावेळी पाण्याला मार्ग ठेवण्याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे.

हेही वाचा: पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

बदललेली पीक पद्धत

नदीपात्राच्या अगदी शेजारी उसासारखी पिकं घेणंही पूर ओसरायला अडथळा बनतं. नदीपात्राच्या शेजारी जास्त उंच न वाढणारी आणि पाण्याला अडथळा न करणारी पिकं घेणं आवश्यक आहे. पूर्वी ‘एक काडी अडवते गाडी’ अशी म्हण वापरायचे. पाण्याबद्दल आजही ती लागू आहे. पाण्याच्या मार्गात अडथळा न करणारी पिकं घेण्यासाठी शेतकर्‍यांची मानसिक तयारी करावी लागेल.

काही सुज्ञ शेतकरी नदी पात्राशेजारच्या शेतात उसाच्या पिकाऐवजी गवताची शेती करतात. कोल्हापूरच्या २००५ च्या पुराचा अभ्यास केल्यानंतर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी पुरासाठी शेतातली पीकपद्धतीही कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. पूररेषेच्या आत अनेक बांधकामं झालेली आहेत. यावर वारंवार चर्चा होते. मात्र ती न काढता रोज नवीन अडथळ्यांची भर पडते.

खाणकामामुळे पात्रात येणारी माती

गौण खनिज, मुरूम, खडी, बॉक्साईटसाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांत कायम खोदाई सुरू असते. खोदाई झाल्यानंतर तिथल्या मातीवर योग्य पद्धतीने वृक्ष लागवड आणि हरित आच्छादन तातडीने तयार करणं गरजेचं असतं. पण ते होत नाही. माती सुटी आणि उघडी राहते. पर्यायाने पावसाच्या पाण्याबरोबर नदीत येते. नदीपात्रात माती साठत राहते. त्यामुळे नदीपात्र पसरट होते.

पाण्याचा मार्ग उथळ होतो. नदीपात्रात ‘वाळूपेक्षा माती जास्त’ अशी परिस्थिती निर्माण होते. मातीमुळे पाणी भूगर्भात पाझरण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे खाणीतून नदी पात्रात येणारी माती थांबवली पाहिजे. त्यासाठी असणार्‍या शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी.

हेही वाचा: पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

वृक्षतोड आणि वणवे

कोल्हापूर आणि सातार्‍याच्या पश्‍चिमेला मोठ्या डोंगररांगा आहेत. त्यावर असणार्‍या वृक्षराजीमुळे पाणी जमिनीत मुरायचं. आज या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. तसंच जंगलात लागणार्‍या आगीमुळे झाडांचं आणि वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

झाडांची मुळं पाणी जमिनीत नेतात, माती पकडून ठेवतात. ती नष्ट झाल्याने पडणारं सर्व पाणी वाहतं. झाडं आणि वनस्पती कमी झाल्याने पावसाचं पाणी न मुरता वाहू लागतं. पाणी वाहताना मातीही घेऊन जाते.

मातीचा थर संपला की छोटे दगडगोटेही जोराच्या पावसात वाहू लागतात. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होऊन माती आणि दगडधोंडे पाण्याबरोबर नदीपात्रात येतात. नदीपात्राची खोली कमी होते आणि पाणी अडून राहातं.

मोठ्या धरणांचं नियोजन

कोल्हापूर, सातारा, सांगलीचा पूरप्रवण भाग हा पाण्यासाठी सुखी मानला जातो. वाढत्या बोअरवेलचं प्रमाण पाहता, आजचं हे वैभव पुढे टिकणार का? हा प्रश्‍न आहे. मात्र या भागातल्या डोंगररांगातून येणारे जिवंत प्रवाह आणि झर्‍यांमुळे नद्या वाहतात आणि म्हणून हा भाग संपन्‍न आहे.

या भागात कोयना, राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली असे मोठे प्रकल्प आहेत. धरण भरलं की, त्यातून विसर्ग सुरू होतो. विसर्गावेळी पाऊस जोरात पडत असेल, तर पुराचे पाणी ओसरायला उशीर होतो. राधानगरी धरणाच्या अधिकार्‍यांनी यावर्षी दूरद‍ृष्टीपणा दाखवला. शासकीय निर्देशांचं काटेकोर पालन करत पावसाळ्यापूर्वी राधानगरी धरण रिकामं केलं.

त्यामुळे पाऊस जोरात पडूनही राधानगरी धरणाचा विसर्ग सुरू नव्हता. यामुळे कोल्हापूरच्या पुराची तीव्रता कमी झाली. जनभावनेपेक्षा कर्तव्यकठोरपणा दाखवणंही पूर ओसरण्यासाठी महत्त्वाचं असतं. पुरापेक्षा पाणी जमिनीत जास्त मुरावं यासाठी पाणलोट क्षेत्रात आणि इतरत्रही छोटे साठे निर्माण करावे लागतील.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

महामार्गामुळे अडणारं पाणी

कृष्णा आणि पंचगंगेचा संगम होतो तिथं या दोन नद्यांची पात्रं जवळजवळ काटकोनात एकत्र येतात. दोन्ही नद्यांचं पाणी सुलभपणे एकत्र येण्यासाठी नदीपात्रं लघुकोनात एकत्र यायला हवीत. त्यातही कृष्णेचं पात्र मोठं आणि पाण्याचा वेग जास्त आहे.

कराडपासून कृष्णेचं पात्र विचारात घेतलं तर प्रतिकिलोमीटर ०.२९ मीटरचा उतार मिळतो. तर कोल्हापूरपासूनचं पंचगंगेचं पात्र घेतलं तर हाच उतार निम्म्यापेक्षा कमी म्हणजे केवळ ०.१२ मीटर एवढा आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाण्याचा वेग पंचगंगेच्या पाण्यापेक्षा जास्त राहतो. ते पंचगंगेच्या पाण्याला अडवतं.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या पूर्वेला असणारा प्रदेश हा पूर्णत: सखल, सपाट आहे. या महामार्गामुळे अडलेलं पाणी नदीपात्रातून बाहेर आल्यानंतर पुन्हा पात्राबाहेर पसरतं. नैसर्गिक उतार कमी असल्याने पुन्हा पाण्याचा वेग कमी होतो. त्यातच उसाची शेती, बांधकामं आणि इतर अडथळे असल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत नाही. संगम होताना दोन नदीपात्रं लघुकोनात मिळावीत यासाठी अभ्यास होणंही गरजेचं आहे.

पावसाचा लहरीपणा

अलमट्टी धरणाचा परिणाम काहीच नाही, असं नाही. मात्र याची चर्चा केली जाते तेवढा मोठा नाही. अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असताना पूर आला तर सांगली, कोल्हापूर भागातला पूर ओसरायला आणखी उशीर होऊ शकतो. जितका उतार जास्त, तितके पाणी वेगाने जाते आणि चढावरचा पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे अलमट्टी धरणाचा पुराचं पाणी ओसरण्यावर काहीच परिणाम होत नाही, असं म्हणता येत नाही.

मात्र तेच एक कारण नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवं. अनेक वर्षांच्या पर्जन्यप्रमाणाच्या अभ्यासकांच्या मते अतिवृष्टीचा काळ, मध्यम वृष्टीचा काळ, अवर्षण काळ असे आवर्ती टप्पे दिसतात. सध्या जास्त पर्जन्याचा काळ सुरू असल्याचं मागच्या काही वर्षांतल्या पर्जन्यमानावरून दिसतं. मात्र हे पावसाचं पडणं लहरी आहे. त्यामुळे पुढचा काही काळ असाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहण्याची शक्यता दिसते.

पाऊस पडला की पाणी वाहू लागणार, ते उतारानेच धावणार. त्यामधे अडथळा आणला तर पाणी पर्यायी मार्ग शोधणार. तो मार्गही अडवत गेलो तर ते आणखी मार्ग शोधणार आणि शेवटी आपल्या दाराशी येणार. त्या पाण्याचा त्रास नको असेल, कमी व्हावा असं वाटत असेल, तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देणं माणसाच्या हिताचं आहे. त्यामधे किमान मानवनिर्मित अडथळे दूर करून पूर लवकर कसा ओसरेल, हे पाहायला हवं. नाहीतर भविष्यात पुराची भीषणता आणखी तीव्र होईल.

हेही वाचा: 

हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट