१८ वर्षांपूर्वी सोडून दिलेला मसूद बनलाय दहशतवादी भस्मासूर

१६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जम्मू काश्मीरमधे सीआरपीएफच्या ताफ्यावरल्या हल्ल्याने जैश ए मोहम्मद ही पाकिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा चर्चेत आलीय. या हल्ल्यातल्या सुसाईड बॉम्बरनेही आपण जैशचा सदस्य असल्याचं सांगितलंय. त्यामुळे भारतासाठी जैशचा खात्मा करणं महत्त्वाचं झालंय. पण यामधे आपला शेजारी चीनचा आडकाठी ठरतोय.

पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने प्रत्यक्षात तिथली आसपासची गावं हादरली. मात्र हादऱ्याचे कंप जगभरात पसरलेत. अमेरिका, रशिया, जर्मनी अशा सगळ्याच देशांनी भारताच्या या दुःखात आपणही सामील असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मदवर बंदी आणण्यासाठी पाठिंबाही दिला. पण आपला शेजारी चीन मात्र याउलट भूमिका घेतोय.

हेकेखोर चीनचा अडथळा

चीनने पुलवामा हल्ल्यानंतरही जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकायला पुन्हा एकदा विरोध केलाय. गेल्या वर्षाच्या सुरवातीलाच पंजाबमधल्या हवाई दलाच्या पठाणकोट केंद्रावर भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारताने मसूद अझहरचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. 
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सगळ्याच १४ सदस्यांनी अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास मंजुरी दिलीय. पण चीनने यात अडथळा आणलाय. सुरक्षा परिषदेच्या कोणत्याही स्थायी सदस्याने अशा मागणीबाबत आपल्या वेटो पॉवरचा वापर केल्यास हा प्रस्ताव मंजूर होत नाही. आणि चीन सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे.

यासंबंधी चीनने गेल्या वर्षी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं, ‘यूएनच्या या यादीत कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेचं नाव यासंबंधीच्या शर्ती पूर्ण केल्यावर सामील केलं जातं. एखाद्याचं नाव या यादीत सामील करताना या अटींचं पालन होतंय किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी सुरक्षा परिषदेच्या सगळ्याचं सदस्यांची आहे.’ 

एखादी व्यक्ती, संघटनेचं आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या यादीत नाव आल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाते तसंच त्याच्या हालचालींवरही निर्बंध येतात. अझहरचं नाव या यादीत आल्यास पाकिस्तान तसंच इतर देशांतल्या अझहरच्या संपत्तीवर जप्ती येईल. त्यासोबतच त्याच्या हालचालींवरही नियंत्रण येतं. असं केल्याने अझहरची आर्थिक नाकेबंदी होईल. त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की आपले दोन शेजारी सोबत आहेत. भारत एकटा आहे.

जैश ए मोहम्मदचा हात

पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदचा सुसाईड बॉम्बर आदिल अहमद दरचा एक वीडियो सध्या सोशल मीडियावर बराच फिरतोय. त्यात तो म्हणतोय की हा विडीयो तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा मी स्वर्गात असेन. ज्यासाठी मी जैशमधे सामील झालो ते काम करण्याची संधी मला मिळाली. काश्मीरच्या जनतेसाठी हा अखेरचा संदेश.

या वीडियोने पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचं स्पष्ट समोर आलंय. आदिल गेल्याचवर्षी जैश ए मोहम्मदमधे जॉईन झाला. काही दिवसांतच ते संघटनेत वरच्या पदावर गेला. गुंडीबागचा वकास कमांडो, आदिल अहमद गड्डी टकरानेवाला म्हणून त्याला ओळखलं जायचं.

आदिल मूळचा काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातला असून गुंडीबाग हे त्याचं गाव आहे. लाकडाच्या वखारीत तो काम करायचा. तो गेल्या वर्षीच्या मार्चपासून घरातून गायब झाला. त्याच दिवशी त्याचा मित्र समीर अहमदही गायब झाल्याची नोंद त्याच्या कुटुंबाने पोलिस दप्तरी केलीय. आदिलने काश्मीर युनिवर्सिटीतून जिओलॉजीत एमए केलंय.

कोण हा मसूद अझहर?

आता पन्नाशी पार केलेला मौलाना मसूद अझहर तरुणपणापासूनच दहशतवादी कारवायांमधे सामिल आहे. त्यामुळेच त्याला पंचवीसेक वर्षांपूर्वीच १९९४ मधेच श्रीनगरमधून अटक करण्यात आलं होतं. पण कंदहार विमान अपहरण प्रकरणात २००० मधे त्याला सोडून देण्यात आलं. त्यावेळी आतासारखंच भाजपचं सरकार होतं.  अटलबिहारी वाजपेयी सरकारने मसूदसोबतच आणखी दोन दहशतवाद्यांची सुटका केली होती.

तोच मसूद आता पाकिस्तानच्या भात्यातली तलवार बनून भारतात रक्तपात घडवतोय. तुरुंगातून सुटल्यावरच फेब्रुवारी २००० मधे मसूदने जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना सुरू केली. यानंतर वर्षभरात २००१ आपल्या संसदेवर आत्मघातकी हल्ला केला होता. या प्रकरणात त्याला पाकिस्तानने अटकही केली. पण कुठलाही पुरावा नसल्याच्या कारणावरून तिथल्या कोर्टाने त्याला सोडून द्यायला लावलं.

आयएसआयच्या गुड बुक्समधे

जैश ए मोहम्मदचं नाव पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुड बुक्समधे आहे. दोन वर्षांपासून पाकिस्तान जैशचा एखाद्या तलवारीसारखा वापर करतोय. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपल्या गळ्यातलं ताईत असलेल्या लष्कर ए तैय्यबाला आयएसआयने एखाद्या खड्यासारखं बाजूला सारलंय. लष्करची मातृसंस्था असलेल्या जमात उद दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने राजकारणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आयएसआयने जैशवर कृपा करायला सुरवात केली.

भारत सरकारने अटक करण्याआधी अझहर १९९० मधे जगभर फिरून काश्मीरमधल्या कथित जिहादसाठी पैसे गोळा करायचा. पश्चिम आशिया, आफ्रिका आणि इंग्लंडमधे तो जायचा. त्याची फॅमिलीही दहशतावादी कारवायांमधे रंगलीय. गेल्या वर्षभरातच त्याने आपल्या काही पुतण्यांना नवी भरती करण्यासाठी नेमलंय. काश्मीरमधल्या जिहादसाठी भरतीसोबतच ट्रेनिंग, संघटन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलंय.

दोन वर्षांपूर्वीच मसूदचा पुतण्या ताल्हा रशीद भारतीय जवानांसोबतच्या एन्काऊंटरमधे मारला गेला होता. मसूदचा भाऊ मौलाना अब्दूल रौफ असगर हा जैशचा डेप्युटी चीफ आहे. एनआयएने २०१८ मधेच त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय. २०१६ मधे नागरोटा इथल्या लष्करी तळावरच्या हल्ल्याप्रकरणी हे आरोपपत्र आहे.

अमेरिकेलाही हवाय मसूद

मसूद अझहर गेल्या पाच वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. २०१४ मधे २६ जानेवारीला त्याने एका रॅलीला संबोधित केलं होतं. पाकव्याप्त काश्मिरची राजधानी असलेल्या मुजफ्फराबाद इथल्या रॅलीला त्याच्या जिहादी समर्थकांची उपस्थिती होती. यानंतर तो फोनवरूनच आपली भाषण देतोय. या रॅलीत त्याने एक मेसेज दिला होता. तो म्हणजे, ‘इथे ३१३ फियादीन आहेत. आणि मी जेव्हा फोन करेन तेव्हा ही संख्या तीन हजारावर गेलेली असेल.’ 

मोहम्मद अफजल गुरु याच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आयोजित या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. गुरु हा २००१ मधे झालेल्या संसदेवरील हल्ल्यातला मुख्य आरोपी असून त्याला भारत सरकारने कोर्टाच्या निकालानुसार फासावर लटकवलंय. पाकिस्तानने २००२ मधे म्हणजे स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी जैशवर बंदी घातलीय. पण जैशच्या पाकमधल्या कारवायांमधे कुठलाच फरक पडला नाही. एवढंच नाही तर जैशचा ‘जर्ब ए मोमीन’ नावाचा न्यूजपेपर कुठल्याही अडथळ्याविना सुरू आहे. 

दोन वर्षांपूर्वी उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तळावर जैशने हल्ला केला होता. यात १९ जवान शहीद झाले होते. २००१ मधे जैशने जम्मू काश्मीर विधानभवनावर हल्ला केला होता. यात ३८ जण मृत्यूमुखी पडले होत. २००२ मधे जैशने अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या केली होती. या हत्येनंतर मसूद अमेरिकेलाही हवाय. पण यात चीनचा मोठा अडसर ठरतोय. चीनने गेल्यावर्षीच जैशला ब्लॅकलिस्ट करणार नसल्याचा स्टॅँड घेतला. 

बुऱ्हान वाणीच्या मृत्यूनंतर बदलली परिस्थितीत

परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक ब्रम्हा चेलानी यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय, ‘चीनने वेळोवेळी अशीच भूमिका घेतलीय आणि त्यातून अझहरला विनाअट सूट मिळतेय. आणि त्याविरोधात भारताला काहीच करता येत नाही. चीनच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचं आणि त्यासोबत मसूदचं प्रोटेक्शन होतंय. अशी भूमिका घेतल्याने चीनचं काही जात नाही आणि भारताला या विषयावर काही बोलता येत नाही.’

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी द हिंदूच्या पत्रकाराला दिलेल्या माहितीनुसार बुऱ्हान वाणीच्या मृत्यूनंतर जैशने काश्मीर खोऱ्यात असंतोष निर्माण झाला. त्याचा फायदा उचलण्यासाठी जैशने पुन्हा एकदा आपली भरती सुरू केलीय. दक्षिण काश्मीरच्या भागात २०१७ मधे झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून जैशने इथल्या तरुणाईमधे आपली पाळंमुळं रुजवायला सुरवात केली. आणि भारताच्या सुरक्षेपुढचं हे सगळ्यात मोठं आव्हान ठरतंय.