आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?

२३ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक मोठी नेतेमंडळी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना, भाजप युतीमधे गेली. त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी कुणाच्या जीवावर निवडणूक लढणार असा सवाल विचारला जातोय. अशा गोंधळाच्या परिस्थितीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठीचा संघटनात्मक बांधणीचा दौरा सुरू केला.

राष्ट्रवादीचा स्थानिक पातळीवरचा चेहरा म्हणून ओळखली जाणारी नेतेमंडळीच सोबत नसताना पवारांच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो, हा प्रश्न घेऊनच हा दौरा सुरू झाला. आणि काल रविवारी साताऱ्यात या दौऱ्याचा समारोप झाला. प्रश्न घेऊन सुरू झालेला हा दौरा सहा दिवसांनी नव्या प्रश्नाने संपला. तो प्रश्न म्हणजे, आजोबाच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे एवढी क्रेझ का? विरोधकाच्या भूमिकेत असतानाही नाडलेले लोक पवारांच्या भोवती का जमलेत?

कुठं कुठं गेले पवार?

१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी पवारांचा हा दौरा सुरू झाला. अनेक वर्ष सत्तेच्या लाभार्थी नेत्यांसोबतच विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातूनच पवारांनी आपला दौरा सुरू केला. सोलापूरहून पवार भाजपमधे गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उस्मानाबादला गेले. तिथे त्यांनी जिल्ह्याच्या गौरवपूर्ण इतिहासाच्या स्मृती जागवल्या. पुढे ते बीडला रवाना झाले.

बीडला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी लातूरला गेले. तिथून नांदेडला मुक्काम केला. परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर मार्गे साताऱ्यात या दौऱ्याचा समारोप झाला. या सगळ्या ठिकाणी पवारांच्या सभा झाल्या. या सभांना जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती होती. या दौऱ्यात पवारांनी रस्त्यात ठिकठिकाणी सत्कार स्वीकारत जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत नव्या कार्यकर्त्यांसाठी मोर्चेबांधणी केली.

हेही वाचाः महाराष्ट्रात दिवाळीआधीच फुटणार विधानसभा निकालाचे फटाके

पवारांनी हे जमवलं कसं?

गेल्या महिनाभरात राष्ट्रवादीतल्या अनेक सरदारांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्यांचा रंग बदलला. पवारांच्या सहा दिवसांच्या या दौऱ्यातही टोप्यांनी खूप लक्ष वेधलं. सभास्थळी जमलेले लोक ‘मी साहेबांसोबत’ असा मजकूर लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. ८० वर्षांच्या पवारांचा नव्या पिढीशी कनेक्ट नाही, अशी टीका केली जायची. पण आताच्या दौऱ्यात पवारांभोवती तरुणांचाच गराडा आहे. यामागची कारणमीमांसा करणारी एक लेख सध्या खूप वायरल झालाय. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा हा लेख आहे.

ते लिहितात, ‘काही महिन्यांपूर्वीपर्यंत असं चित्र होतं की पवारांचा नव्या पिढीशी कनेक्ट नाही. परंतु परवाची सोलापूरची मिरवणूक आणि मराठवाड्यातली ताजी गर्दी पाहिल्यावर लक्षात येतं की पवार पुन्हा नव्या पिढीचे हिरो बनताहेत. सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो असंतोष खदखदतोय तो संघटित करण्यात पवारांना यश येतंय.’

‘सत्ताधाऱ्यांविरोधात, प्रस्थापितांविरोधात चीड असलेले अनेक घटक आहेत. सरकारच्या धोरणांनी त्रासले आहेत, गांजले आहेत. त्यांचा असंतोष संघटित करून सरकारला आवाज देण्यासाठी महाराष्ट्रात आज एकच नेता आहे, तो म्हणजे शरद पवार. एवढे सगळे लोक सोडून गेले तरी हिंमत न सोडता ते लढताहेत त्यामुळे नव्या पिढीला हा लढणारा म्हातारा जाम आवडू लागलाय,’ असं चोरमारे लिहितात.

पण हे तरुण आहे तरी कोण?

राजकीय कार्यक्रमांना कशी गर्दी जमते, हे आपल्या सगळ्यांना नीट माहीत आहे. निवडणुकीच्या काळात तर गर्दी जमवण्याचा बिझनेसच तयार होतो. मग पवारांच्या सभांना जमणारे हे तरुण कुठून आलेत, असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.

तरुणांच्या गर्दीविषयी टीवी९ मराठीचे औरंगाबाद प्रतिनिधी दत्ता कानवटे सांगतात, ‘मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांमधे तरुणांच्या बेकारीचा प्रश्न खूप गंभीर झालाय. सरकारी नोकरभरती जवळपास ठप्प झालीय. त्यामुळे गावागावांत, शहराशहरांत बेकार तरुणांचे तांडे तयार झालेत. एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या तरुणांमधे सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. यात भर म्हणून आरक्षण मिळालं, पण सरकारी नोकरीच मिळत नसल्याने मराठा तरुणांमधेही सरकारविरोधी नाराजी दिसते.’

‘सरकारवर नाराज असलेल्या तरुणांना आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कुठला मंचच मिळाला नाही. हेच तरुण आता शरद पवारांच्या सभांमधे मोठ्या संख्येने दिसताहेत. आजोबाच्या वयाचा माणूस आपली समस्या सोडवेल, आपलं ऐकून घेईल, या भावनेतून शरद पवारांच्या सभांना बेरोजगार तरुण गर्दी करतोय. २०-२२ वर्षांचे हे तरुण आहेत.’

हेही वाचाः पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ

शेतकरी मोर्चातही तरुणांचीच गर्दी

औरंगाबादला दोनेक दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. त्या मोर्चालाही चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चातल्या गर्दीविषयी कानवटे सांगतात, ‘शेट्टी यांच्या मोर्चात शेतकरी कमी आणि बेरोजगार तरुण अधिक असं चित्र बघायला मिळालं. सरकारवरच्या रागाला वाट करून देण्यासाठी ही तरुणाई या सभांना गर्दी करतेय.’

दुसरीकडे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या भाषणांबद्दलही तरुणांमधे खूप आकर्षण आहे. त्यामुळेही हे तरुण मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या सभेकडे आकृष्ट होताहेत, असं कानवटेंना वाटतं.

‘पवारांसोबत सेल्फी घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल्याचं दिसलं. एरवी कुठल्या राजकीय कार्यक्रमासाठी लोक आणले जातात. पवारांच्या या कार्यक्रमासाठीही लोक आणले गेले असतील, पण यातली लोकांची उत्स्फुर्तता नजरेत भरण्याजोगी होती,’ असं एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सांगतात. एबीपीच्या एका कार्यक्रमात कुलकर्णी यांनी पवारांच्या मराठवाडा दौऱ्याचं विश्लेषण केलंय.

तरुणांना अपिल करणारी भाषा

तरुणांची गर्दी जमण्यामागे पवारशैलीतल्या भाषणांचाही वाटा असल्याचं राहुल कुलकर्णींना वाटतं. ते सांगतात, 'पवारांच्या भाषणांची भाषा ही तरुणांना अपिल करणारी आहे. सगळे नेते आम्ही विकासासाठी पक्ष सोडतोय, असं सांगताहेत. मग एवढी वर्ष सत्तेच्या वेगवेगळ्या पदांवर होते, तेव्हा काय केलं, असं सवाल पवार करता. हात उचलून हावभाव करत ते हा प्रश्न विचारतात. पवारांच्या या शैलीला तरुणांमधून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला.'

सभांमधून शरद पवार तरुणांना भावणाऱ्या विषयांना आपल्या भाषणातून हात घालतात. मग विषय बेरोजगारीचा असो की शिक्षणाच्या बाजारीकरणाचा. कुलकर्णी पुढे सांगतात, ‘शिवाजी महाराजांचा विषयही ते काढतात. शिवाजी महाराज हा आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे. गडकिल्ले हे आपलं वैभव आहे. आता हे सरकार इथेच छमछम सुरू करणार आहे. आर आर आबांनी बंद केलेली छमछम आता सरकार थेट किल्ल्यांवर सुरू करणार आहे. तरुणाईला आपण कुठला आदर्श शिकवणार, कुठले संस्कार देणार, असा सवाल पवार करतात.’

हेही वाचाः मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित

सातारमधे कुणाची कॉलर टाईट?

मराठा समाजाच्या तरुणांमधे मोठं आकर्षण असलेले उदयनराजे भोसले यांनी भाजपची सत्ता आल्यावर १०० दिवसांतच राष्ट्रवादीला रामराम ठोकला. सातारच्या तरुणाईमधे उदयनराजेंची प्रचंड क्रेझ आहे. त्यांचं कॉलर टाईट भाषण कुठल्याही ठोस कंटेटशिवायही तरुणाई डोक्यावर घेते. पवारांनी आपल्या दौऱ्याची सांगता सभा साताऱ्यातच ठेवली. पवारांच्या या दौऱ्याचं सातारच्या तरुणाईने प्रचंड मोठी मोटार सायकल रॅली काढून स्वागत केलं.

साताऱ्यात पवारांच्या दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल झी २४ तासचे दीपक भातुसे म्हणाले, ‘उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाबद्दलही या तरुणाईने सोशल मीडियावर आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. तरुणाईच्या प्रतिक्रिया बघितल्या तर तरुणाईला उदयनराजेंचा भाजपप्रवेश आवडलेला दिसत नाही. तरुणाईतून उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाला प्रचंड विरोध होतोय. त्यामुळे पवारांच्या साताऱ्यातल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असावा.’

ते म्हणाले, ‘सातारच्या लोकांमधे पवारांबद्दल सहानुभुतीची, आपुलकीची भावना आहे. कालच्या रॅलीला प्रतिसाद मिळण्यामागेही हीच भावना आपल्याला दिसते. सातारा हा राष्ट्रवादीचा गड आहे. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीच्या शिवाय दुसऱ्यांच्या तिकिटावर उभे राहिले तर त्यांचा पराभव झालाय. यावेळी ते पुन्हा दुसऱ्यांच्या तिकिटावर उभं राहिले तर राष्ट्रवादीतला गट त्यांच्यासोबत जाईल की नाही याबद्दल सध्या संभ्रमाची स्थिती आहे. त्यांच्या जवळच्या लोकांनाही भाजपप्रवेशाचा निर्णय आवडलेला नाही.’

‘लोकसभेच्या मतदानावेळी मी सातारा मतदारसंघातच होतो. आजूबाजूच्या गावांमधे फिरताना एक गोष्ट दिसली. लोकांनी राष्ट्रवादीमुळे उदयनराजेंना मतदान केलं. उदयनराजे वेगळं उभं राहिले असते तर लोक तेव्हाच विरोधात गेले असते. कारण गेल्या दहा वर्षांच्या खासदारकीत उदयनराजे लोकांमधे गेले, कामं केलीत असं दिसत नाही. याबद्दल लोकांमधे तीव्र नाराजी आहे. राष्ट्रवादीतूनच उदयनराजेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता होता. तरीही पवारांनी उदयनराजेंना तिकीट दिलं,’ असं भातुसे सांगतात.

मतांमधे कन्वर्ट होणार का?

लोकसभा निवडणुकीतही ७८ वर्षांच्या पवारांना तब्बल ७८ सभा घेतल्या. त्याचं कौतुकही झालं. या सभांना मिळणारा प्रतिसाद निकालात काही दिसला नाही. राष्ट्रवादीला केवळ पाच जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे पवारांभोवती गर्दी करणारी तरुणाई मतदानात कुणाला साथ देणार हा कळीचा प्रश्न आहे.

याविषयी भातुसे सांगतात, ‘ग्राऊंडवर आपल्याला सरकारविरोधी नाराजी दिसते. लोकसभेवेळीही ग्राऊंडवर प्रचंड नाराजी दिसली. पण निकालात ते दिसलं नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला पुन्हा स्वीकारायला लोक, विशेषतः तरुण तयार आहेत का, हाच मूळ प्रश्न आहे. साताऱ्यात पवारांना तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण हा तरुण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करेल का, हा प्रश्न सध्यातरी तसाच आहे.’

राहुल कुलकर्णी यांच्या मते, ‘शरद पवार ज्या उमेदवारांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, ते उमेदवार कोण हे अजून स्पष्ट नाही. तसंच त्या उमेदवारांकडे संघटनात्मक ताकद किती आणि या नव्या चेहऱ्यांना लोक स्वीकारतील का, हाही प्रश्न आहे. पण या दौऱ्याने राष्ट्रवादीच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना चार्ज केलंय, हे मात्र नक्की.’

हेही वाचाः 

शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय

पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार

पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका दिवसाने काय सांगितलं?

सरकारच्या हस्तक्षेपामुळे एलआयसीची विश्वासार्हता धोक्यात आलीय?