आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय?

२६ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : १४ मिनिटं


आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास.

माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे. सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितलं जातंय. मी काहीही चुकीचं बोललो नाही. त्यामुळे घाबरणार नाही.’

१४ डिसेंबर २०१९ला दिल्लीतल्या रामलीला मैदानात भारत बचाव रॅलीत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले आणि त्यावर वादविवाद सुरू झाले.

आणि वादाची ठिणगी पडली

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला. पण प्रत्यक्षात ‘रेप इन इंडिया’ झालाय, असा उल्लेख केला. त्याला उत्तर प्रदेशाच्या उन्नावमधील बलात्कार पीडितेला जाळून मारणं, हैद्राबादमधील सामूहिक बलात्कार-खून प्रकरण, देशभर उसळलेला असंतोष यांचा संदर्भ होता.

‘राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ हा शब्दप्रयोग करून देशातल्या महिलांचा अवमान केलाय. म्हणून त्यांनी देशाची माफी मागावी,’ अशी मागणी संसदेत भाजपच्या खासदारांनी केली. त्यावर राहुल गांधी आक्रमकपणे म्हणाले, ‘मी सत्य तेच बोललो. काँग्रेसवाले बब्बरशेर आहेत. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. देशासाठी जीव द्यायला तयार आहोत. कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही. माफी मागणार नाही. मी राहुल गांधी आहे; राहुल सावरकर नाही!’ त्यानंतर वाद भडकला.

हेही वाचा : सावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात

‘सावरकरांनी नाही, नेहरूंनी माफी मागितली’

या वादात विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी उडी घेतली. ते चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, ‘राहुल गांधींचं नाव राहुल सावरकर नाही, ही चांगली गोष्ट आहे. अन्यथा आम्हा सर्व सावरकरांना तोंड काळं करून फिरावं लागलं असतं. सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, हे जगाला माहीत आहे. सावरकरांनी अटी मान्य केल्या. पण ब्रिटिश राजनिष्ठेची शपथ घेतली नाही. ती पंडित नेहरूंनी घेतली होती.’

त्याविषयी खुलासा करताना रणजीत सावरकर सांगतात, ‘१९४६मधे जवाहरलाल नेहरूंनी व्हॉइसरॉय कौन्सिलमधे मंत्रीपद मिळवण्यासाठी ब्रिटिश किंग जॉर्ज सहावे यांची आणि त्यांच्या उत्तराधिकारी यांच्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घेतली होती. त्याची अधिकृत नोंद आहे. ही निष्ठा नेहरूंनी इतकी निभवली की, भारत स्वतंत्र झाल्यावर १९५० सालापर्यंत नेहरू हे किंग जॉर्ज यांना भारताचा सम्राट मानत होते.

‘देशाविषयीचा प्रत्येक निर्णय त्यांच्या परवानगीने घेत होते. पहिले गव्हर्नर जनरल  राजाजी गोपालाचारी यांच्या नेमणुकीची परवानगीही नेहरूंनी किंग जॉर्ज यांच्याकडून घेतली होती. अशी गुलामी प्रवृत्ती असलेल्या पंडित नेहरूंच्या पणतूकडून सावरकरांचा अपमान होणं, हे नैसर्गिकच आहे. कारण त्यांच्या रक्तातच ती शिकवण आहे. आता तर पूर्वीची काँग्रेसही राहिली नाही. ती आज एका गुलाम वंशाची काँग्रेस झालीय.’

सावरकरांच्या अपमानाची ही काही पहिली वेळ नाही. याबाबत रणजीत सावरकर पुढे म्हणतात, ‘सावरकरांसारख्या देशभक्ताच्या अंत्ययात्रेला तोफगाडा मागितला, तेव्हा तत्कालीन काँग्रेसवाल्यांनी नकार दिला. पण नेहरूंची मैत्रीण असलेल्या माऊंटबॅटन यांच्या अंत्यविधीसाठी न मागताच भारताची आयएनएस त्रिशूळ ही युद्धनौका तिथे पाठवली होती. काँग्रेसवाले देश स्वतःची जहागीर असल्याप्रमाणे वागत आलेत. हे निषेधार्ह आहे. लोकांनी आधीच काँग्रेस पक्षाला त्याची जागा दाखवून दिलीय. तशीच भविष्यातही दाखवतील.’

हेही वाचा : सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?

‘रणजीत सावरकर एवढं का चिडले?’

राहुल गांधी यांनी सावरकर यांचं फक्त नाव घेतलं. ‘वीर किंवा वि. दा. सावरकर’ म्हणत टीकाटिप्पणी केली नव्हती. तरी ती टोपी पणतू रणजीत सावरकर यांच्यासह सावरकरांना वापरणाऱ्यांना फिट बसली. याविषयी ज्येष्ठ लेखक आणि सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. विवेक कोरडे आश्चर्य व्यक्त करून चित्रलेखाशी बोलतात, ‘सावरकरांचे नातू रणजीत सावरकर एवढं का चिडले? राहुल गांधी यांनी तर सावरकरांवर काहीच मत व्यक्त केलं नव्हतं. पण ते चिडतात, याचा अर्थ काही तरी खोलवर पाणी मुरतंय.’ 

‘मी माफी मागणार नाही, एवढंच राहुल गांधी म्हणाले. म्हणजे माफी या शब्दाबद्दल काहीतरी गौडबंगाल आहे. म्हणून या वादाच्या निमित्ताने सावरकरांना नीट समजून घेतलं पाहिजे. सावरकरांच्या आयुष्याचे दोन भाग आहेत. १८५७ चं स्वातंत्र्य समर लिहिणारे सावरकर, हिंदू-मुस्लिम एकीचा पुरस्कार करणारे देशभक्त सावरकर वेगळे होते आणि अंदमानच्या तुरुंगातून माफी मागून सुटलेले नंतर हिंदू-मुस्लिम बेकी माजवणारे, इंग्रजधार्जिणे सावरकर वेगळे होते. हे वेगळेपण समजून घेतलं की, खरे सावरकर कोण, हे कळायला मदत होते.’

हेही वाचा : या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

वेगळे सावरकर सांगणारे तीन पुस्तकं

राहुल गांधींनी माफी मागणार नाही, यासंदर्भात सावरकरांचा उल्लेख केल्याने सावरकरप्रेमी खवळले. त्यानंतर माफी आणि सावरकर या विषयावर चर्चा सुरू झाली. अंदमानच्या तुरुंगातून सावरकर ब्रिटिशांची माफी मागून सुटले, असं म्हटलं जातं. ते कितपत खरं आहे?

सावरकरांच्या संदर्भात तीन पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 
एकः माफीवीर सावरकर, लेखक - श्रीकांत शेट्ये. 
दोनः अकथित सावरकर, लेखक - मदन पाटील.
तीनः वीर सावरकर, लेखक - धनंजय कीर.

या तिन्ही पुस्तकांतून सावरकरांबद्दल विविध माहिती पुढे आलीय. श्रीकांत शेट्ये यांनी आपल्या ‘माफीवीर सावरकर’ या पुस्तकात सावरकरांचे माफीनामे प्रसिद्ध केलेत. ते असे आहेत -

‘इंग्रज सरकारचा जन्मभर पुरस्कर्ता राहीन’

‘मी घराबाहेर पडून बिघडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरुंगातून सुटका करावी. मी १९११मधेही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली, तर इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन.’

‘जोपर्यंत आम्ही (नागरिकच) तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसं लाभेल? कारण ते आणि आम्ही एकच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या  सरकारचा जयजयकार करील.’

माफीनाम्यात एका ठिकाणी सावरकर म्हणतात, ‘एकदा मी स्वतःच सरकारच्या बाजूने झालो की, मला गुरुस्थानी मानून रक्तरंजीत क्रांतीचं स्वप्न बघणारे भारतातील आणि परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील.’

माफीनाम्यात असाही मजकूर आहे,

‘माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल, त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त सरकारचा फायदा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारूपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार, तर कुठे जाणार?’

या माफीनाम्यांच्या आधारे ऑगस्ट २०१६मधे द वीक या इंग्रजी साप्ताहिकात कवरस्टोरी  लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले म्हणतात, ‘सावरकरांनी सुमारे २५ वर्षं तुरुंगात काढल्याची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात ते नऊ वर्षं दहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी  स्वतः सात माफीपत्रं लिहिली. त्यांच्या पत्नीने त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रं लिहिली,’ निरंजन टकले यांनी या रिपोर्टमधे २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास करून सावरकरांबाबतची नवी माहिती पुढे आणली.

सावरकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावं लागेल. हिंदू महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केलं पाहिजे.’

हेही वाचा : सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

सुटकेनंतर सावरकरांनी पलटी मारली?

डॉ. विवेक कोरडे यांनी ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’ हे पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी सावरकर कसं बदलत गेले, याचा आढावा घेऊन विश्लेषण केलंय. १८५७ च्या युद्धाला ‘स्वातंत्र्य समर’ म्हणणारे सावरकर त्यात क्रांती युद्ध पाहतात.

सावरकर म्हणतात, ‘क्रांतीच्या इतिहास लेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबद्ध दिसणाऱ्यास प्रसंगांना किंवा तिच्या अद्भुततेला पाहून तिथंच स्तिमित होऊन न बसता तिच्या उगमाकडे शोध घेत गेलं पाहिजे. इतकंच नाही, तर त्या शोधात भलत्याच आणि आकस्मिक निघालेल्या फाटमारा सोडून अगदी मूलतत्त्वापर्यंत शोध लावला पाहिजे. मग त्या तत्त्वाची दुर्बीण घेऊन त्या क्रांतीच्या विस्तीर्ण प्रदेशाचं निरीक्षण केलं पाहिजे.’ (संदर्भ- १८५७ चे स्वातंत्र्य समर, वि.दा. सावरकर, पृष्ठ -३)

डॉ. विवेक कोरडे सांगतात, ‘१८५७ च्या क्रांतीचं मूळ कारण काडतुसं नव्हती, असं सावरकर लिहितात. १८५७ ची क्रांती ही मुख्यतः काडतुसांवरून प्रदीप्त झाली होती, तर तिला नानासाहेब पेशवे, दिल्लीचा बादशहा, झाशीची राणी किंवा रोहिलखंडचे खान बहादूर खान हे का मिळाले? यांना इंग्रजांच्या लष्करात नोकरी धरायची नव्हती किंवा घरी बसले तरी ही काडतुसे तोडली पाहिजेत, असा हुकूमही कुणी यांच्यावर बजावला नव्हता, असं सावरकर लिहीत होते. सावरकरांना १८५७ चं बंड हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक वाटत होतं. भारतीय तरुणांनी या क्रांती युद्धातून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढावं असं वाटत होतं. हे सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर मात्र बरोबर उलट्या विचाराचे का बनले?’

‘भ्रमनिरासातून सावरकर इंग्रजधार्जिणे बनले’

या प्रश्नाचं उत्तर अकथित सावरकर या पुस्तकाचे लेखक पुण्यातील मदन पाटील देतात. चित्रलेखाशी बोलताना ते म्हणाले, ‘१९२० नंतर काँग्रेस पक्ष महात्मा गांधी यांच्या भोवती फिरू लागला. तोपर्यंत काँग्रेसवर टिळकांचा प्रभाव होता. टिळकांसोबत बहुतांशी उच्चवर्णीय हे सरकारी नोकर होते. गांधी काँग्रेसचे नेते झाले आणि टाटा, बिर्लापासून ते सामान्य गरिबापर्यंत सर्व देशवासीय काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र जमू लागले.’ 

‘शेतकरी, महिला, आदिवासी, दलित अशा सर्व स्तरांतून लोक स्वातंत्र्य चळवळीत आले. या लोकांची मागणी स्वातंत्ऱ्याची होती. लोकशाहीची होती. समतेची होती. इंग्रज गेले तर या बहुजन लोकांच्या हाती काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेची सूत्रं जातील, हे स्पष्ट व्हायला लागलं तेव्हा सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा अस्वस्थ झाली. त्यांनी काँग्रेस,  गांधी आणि बहुजन समाजाच्या मागण्यांना, स्वप्नांना विरोध सुरू केला. ब्रिटिश गेले की पेशवाई येईल या विचारात असलेल्या सावरकरांचा भ्रमनिरास झाला. तसे ते बदलत गेले. त्यातून ते इंग्रजधार्जिणे बनत गेले.’

अकथित सावरकर या पुस्तकात मदन पाटील यांनी सावरकरांचे माफीनामे पुराव्यांसह, तारीखवारानुसार तर दिले आहेतच. पण अंदमानच्या तुरुंगात सावरकरांचा छळ झाला, असं चित्र त्यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात रंगवलं ते अतिरंजित असल्याचंही त्यांनी पुराव्यांसह स्पष्ट केलंय.

हेही वाचा : नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

कलेक्टरच्या दुप्पट पगार सावरकरांना?

याबद्दल मदन पाटील सांगतात, ‘माझी जन्मठेप या पुस्तकात सावरकर यांनी जे छळाचं वर्णन केलंय, ते कितपत खरं मानायचं? त्या काळी सावरकरांबरोबर जे राजकैदी होते, त्यांना अशा प्रकारचे अनुभव आले नाहीत. फक्त सावरकरांनाच कसा छळ अनुभवायला मिळाला?? याबाबत वस्तुस्थिती अशी की, सावरकरांना फक्त महिनाभर कोलू ओढायची शिक्षा दिली गेली. अशी शिक्षा सर्वांना दिली जात असे. त्यानंतर सावरकर मुकादम म्हणून काम करत. त्या बदल्यात त्यांना नोकरासारखा पगार मिळे.’ 

‘माफी मागून सुटल्यानंतर इंग्रज सरकारने सावरकरांना दरमहा ६० रुपये पेन्शन सुरू केली. त्यावेळी कलेक्टरचा पगार ३० रुपये होता. म्हणजे कलेक्टरच्या दुप्पट पगार सावरकरांना मिळत असे. इंग्रजांना सहकार्य करण्याच्या बोलीवर हे पैसे मिळत, असं का नाही समजायचं? महात्मा गांधींनीही ब्रिटिशांविरोधात लढून तुरुंगवास भोगला. पण कधीही माफी मागितली नाही. इंग्रज सरकारची एक पैदेखील घेऊन गांधी इंग्रजांचे मिंधे झाले नाहीत.’

मदन पाटील यांचं अकथित सावरकर हे पुस्तक गुजराती भाषेत अनुवादित झालंय. त्यात त्यांनी माझी जन्मठेप या सावरकरांच्या चरित्रात मांडलेलं चित्र खोटं आहे, असं पुराव्यासह मांडलंय. गुजराती भाषेत हे पुस्तक अकथ्य सावरकर या नावाने गाजत आहे. अशोक परमार या गुजराती लेखकाने त्याचा अनुवाद केलाय. हा लेखक म्हणजे २००२च्या गुजरात दंगलीत तलवार हातात घेतलेला एक दंगेखोर पोस्टर बॉय होय.

अशोक परमारचा हा फोटो जगभर गाजला होता. अशोक परमारचा तो फोटो टाइम मॅगझीनने छापला होता. अशोक परमार चर्मकार म्हणजेच मोची समाजातले आहेत. दंग्यात आपला वापर झाला, हे त्याला स्वानुभवातून कळलं. त्याला गुजरातमधे रेशनकार्डही मिळत नव्हतं. दंग्यामुळे त्याचं नाव मात्र जगभर झळकलं. उपेक्षा वाट्याला आलेले अशोक परमार आता महात्मा गांधींच्या वाटेने जीवन जगत आहेत.

सावरकरांना वीर हे विशेषण कुणी लावलं?

विनायक दामोदर सावरकरांना १९२० मधे वीर हे विशेषण ‘भाला’कार भोपटकर यांनी प्रथम चिटकवलं. नंतर ते रूढ झालं. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार असताना २००३मधे संसदेच्या सेंट्रल हॉलमधे सावरकरांचं तैलचित्र लावण्यात आलं. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर ते लावण्यात आलं. त्यावेळी काँग्रेससह इतर विरोधकांनी या समारंभावर बहिष्कार घातला होता.

भारतीय संसदेच्या इतिहासात विरोधकांनी बहिष्कार घातला, असा हा एकमेव समारंभ आहे. हा विरोध केवळ राजकीय स्वरूपाचा नव्हता, तर स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणाऱ्या. इंग्रजांना मदत करणाऱ्याप सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यावेळी घेण्यात आली होती. २००३ नंतर सावरकरांचे माफीनामे जसं प्रकाशात आले, तशीच त्यांची त्रिखंडात गाजलेली उडीही वादात सापडली.

सावरकरांच्या समुद्रउडीचा साक्षीदार कोण?

सावरकरांच्या समुद्रातील जहाजातून मारलेल्या उडीविषयी लेखक मदन पाटील सांगतात, ‘मुळातच सावरकरांच्या चेल्यांनी त्यांचं लार्जर दॅन लाइफ असं वर्णन करून त्यांना मोठं बनवलं. सावरकरांची जहाजातली उडी ही प्रत्यक्षात खूप किरकोळ होती. ते १०-१२ फूटही पोहले का, याचा कुणीही साक्षीदार नाही. त्यांना लगेच पकडलं गेलं. पण त्याचा गाजावाजा खूप करून ती एवढीशी उडी त्रिखंडात गाजल्याच्या बाता मारल्या गेल्या. यातून सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरांत पोचली.’

‘इंग्रजांना चुकवणाऱ्याल ४ क्रांतिवीरांच्या उड्या अजूनही लोकांना माहीत नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना धावत्या रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात उडी मारली होती. वसंतदादा पाटील यांनी इंग्रजांचा गोळीबार चुकवत दुथडी भरून वाहणाऱ्या  कृष्णेच्या पात्रात ४० फुटांवरून उडी मारली होती. यावेळी वसंतदादांचे दोन साथीदार शहीद झाले होते. सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारली होती. धुळ्याच्या शिवाजीराव पाटील यांनी धुळे जेलच्या ३० फूट भिंतीवरून उडी मारली. शिवाजीराव पाटील हे ख्यातनाम अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होत.’

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सावरकर यांच्या संबंधाविषयी नवं संशोधन, माहिती पुढे येतेय. त्याविषयी मदन पाटील सांगतात, ‘सावरकर यांनी नेताजींना मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली, असं सावरकरभक्त सांगतात. पण आझाद हिंद सेनेसमोरचं नेताजींचं भाषण आहे. ते आझाद हिंद, रायटिंग्ज ऍण्ड स्पीचेल (१९४१-१९४३) या पुस्तकात छापलंय. त्यात नेताजी सावरकरांबद्दल म्हणतात, ‘मिस्टर जिना आणि मिस्टर सावरकर यांना मी आवाहन करतो की, त्यांनी ब्रिटिशांबरोबर असणारी तडजोडीची नीती भूमिका सोडून द्यावी. कारण ब्रिटिश आज आहेत, पण उद्या नसतील. ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्यास प्रत्येक व्यक्तीचा, संघटनेचा, समूहाचा उद्या स्वतंत्र भारतात गौरव होईल. ब्रिटिशधार्जिणी भूमिका घेणाऱ्यांटना मात्र उद्याच्या भारतात स्थान नसेल.’

हेही वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

शिवाजी महाराज, सावरकर आणि सद्गुण विकृती

छत्रपती शिवराय यांच्याबद्दल सावरकरांनी सहा सोनेरी पाने या पुस्तकात टीका केलीय. छत्रपती शिवरायांच्या मनात महिलांविषयी किती आदर होता, हे सांगण्यासाठी इतिहासकार कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा आवर्जून उल्लेख करतात. मात्र सावरकर या शिवरायांच्या कृतीला ‘सद्गुण विकृती’ असं संबोधतात.

सावरकर शिवरायांबद्दल सहा सोनेरी पानेमधे लिहितात, ‘शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रविघातक आणि कुपात्री योजलेल्या प्रकारांमधे सहस्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणं इथं दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवऱ्याहकडे पाठवले. पोर्तुगीजांचा पाडाव झालेल्या शत्रूस्त्रीसही चिमाजी अप्पाने वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडे परत पाठवले.’

सावरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पा यांच्याबद्दलच्या भूमिकेबद्दल डॉ. विवेक कोरडे म्हणतात, ‘सावरकर हे पुरुषसत्ताक मनोवृत्तीचे होते. त्यांना शिवराय आणि चिमाजी अप्पांचं स्त्री दाक्षिण्य पटणारं नाही. ही त्यांना विकृती वाटणारच. कारण शत्रूंचा सूड घेण्यासाठी त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार करावेत, या मताचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी तसं लिहून ठेवलंय. सावरकरांची स्त्रियांविषयीची मतं निषेधार्ह आहेत.’

‘छत्रपतींनी युद्धात काही नियम घालून दिले होते. शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करायचे नाहीत. दुसऱ्याद धर्माचा आदर करायचा. म्हणूनच आजही त्यांच्याकडे जगातील एक आदर्श राजा म्हणून पाहिलं जातं. चिमाजी आप्पांनी शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून स्त्री दाक्षिण्य दाखवलं. पण या दोघांची मानवी, महान कृती सावरकरांना विकृती वाटते. सावरकरांना मानणाऱ्यां नी हे समजून घेतलं पाहिजे.’

अंदमानात शिक्षा भोगणारे ११४ मराठी क्रांतीवीर

सावरकरांचा मरणोत्तर भारतरत्न किताबाने गौरव करावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले सावरकर हे काही एकटे नाही; इतर ११४ कैद्यांची माहिती पुढे आलीय. काळ्या पाण्याच्या शिक्षेचे कैदी याविषयी लेखक बबन फाले यांनी पुस्तक लिहिलंय. फाले हे मूळचे नागपूरचे आहेत.

फाले २९ वर्षं अंदमान आणि निकोबार इथे शिक्षण खात्यात नोकरीला होते. त्या काळात त्यांनी संशोधन करून ‘क्रांतीधाम’ हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यात ११४ राजकीय कैद्यांची माहिती दिलीय. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले हे ११४ क्रांतीवीर महाराष्ट्रातले आहेत. अंदमानच्या तुरुंगातच ते शेवटपर्यंत राहिले. तिथेच त्यांचा अंत झाला.
जेलबाहेर आल्यावर सावरकर काय करत होते?

अंदमानातल्या कैद्यांविषयी विदर्भातले तरुण अभ्यासक आणि लेखक तुषार उमाळे यांनी अभ्यास केलाय. चित्रलेखाशी बोलताना तुषार उमाळे सांगतात, ‘अंदमानात जवळपास ९०० राजकैद्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या होत्या. त्यातले ११४ जण महाराष्ट्रातले होते. सावरकर हे काही एकटे नव्हते. पण या ९०० जणांपैकी फक्त सावरकरांनी माफी मागितली. ब्रिटिशांना मदत करण्याच्या अटीवर ते बाहेर आले. बाकी एकाही कैद्याने माफी न मागता अंदमानच्या सेल्युलर जेलमधे खितपत मरणं पत्करलं.’

‘१९३७ ते १९४७ या काळात सावरकर जेलमुक्त होते. या काळात त्यांनी कोणतं क्रांतीकार्य केलं? १९४२ मधे इंग्रजांना सारा देश भारत छोडो म्हणत होता. त्यानंतरची ४ वर्षं इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी संग्राम करत होता. तेव्हा सावरकर इंग्रजी सैन्यात भरती व्हा असं सांगत होते. आझाद हिंद फौज इंग्रजांशी लढत होती. आझादीचं स्वप्न बघत होती. तेव्हा सावरकर आणि हिंदू महासभावाले इंग्रजांचे हेर म्हणून काम करत होते.’

‘स्वकीयांशी गद्दारी आणि ब्रिटिशांना मदत, ही सावरकरांची नीती होती. म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांना माथेफिरू म्हटलं होतं. जिना आणि सावरकर हे दोघं स्वातंत्ऱ्याचं शत्रू होते. जसं जिना भारतरत्न असू शकत नाही, तसं सावरकरही भारतरत्न  ठरू शकत नाही. जेधे-जवळकर अशांना देशाचे दुश्मन म्हणत असत.’

‘हे सावरकरांना माहीत आहे काय?’

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सावरकरांचं मत प्रतिकूल होतं. डॉ. बाबासाहेबांनी येवला इथे १९३५ मधे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर सावरकरांनी ही मतं मांडली. ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद’ हा लेख सावरकरांनी लिहिला होता. ज्या बुद्धांच्या अहिंसेवर प्रतिकूल मत सावरकरांनी मांडलं. त्याला २४ मे १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत उत्तर दिलं.

बाबासाहेब म्हणाले होते, ‘बुद्ध धम्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचंय, हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे काय? बौद्ध धर्मप्रचारक राजे वाईट होते, असं त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात ७५ टक्के ब्राह्मण होते. हे सावरकरांना माहीत आहे काय? सारीपुत्र मोग्गलायानसारखे पंडित ब्राह्मण होते.

‘सावरकरांना मला विचारायचंय, पेशवे कोण होते? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसं हिसकावून घेतलं? काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले. मी म्हणतो, सावरकर आपल्या पोटातील नरक ओकलेत! कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे. आतापर्यंत बुद्ध धम्माची हिंसक मार्गाने आणि अमानुष अत्याचाराच्या जोरावर लाट परतवून लावली. आता बुद्ध धम्माची लाट येईल!’

लढण्याच्या प्रेरणा आणि हेतू निरनिराळे

सावरकर आणि त्यांच्या भूमिका या विषयाला अनेक बाजूंनी समजून घ्यावं लागेल. भावनेच्या आहारी जाऊन ते कळणार नाही. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सर्वजण लढत होते. पण लढण्याच्या प्रेरणा आणि हेतू निरनिराळे होते. महंमद अली जीना आणि त्यांचे साथीदार मुस्लिम राष्ट्रासाठी लढले. सावरकर आणि त्यांचे सहकारी हिंदू राष्ट्र आणण्यासाठी लढले. गांधी, नेहरू, पटेल हे सर्वसमावेशक लोकशाही राष्ट्रासाठी लढले.

आजचा भारत हा गांधी, नेहरू, पटेल यांनी घडवला असल्याने ते भारतरत्न ठरलेत. उद्याचा भारत कुणाच्या विचारांनी चालणार? हा सध्याच्या वादात कळीचा मुद्दा आहे. उद्याचा भारत हिंदू राष्ट्र असेल की सर्वांचं राष्ट्र? या प्रश्नाच्या उत्तरासाठी राहुल गांधींनी ‘माफी’ निमित्ताने सावरकर यांचा उल्लेख केला. त्यातून निर्माण झालेला वाद हा खऱ्या इतिहासाची उजळणी करणारा ठरलाय.

हेही वाचा : 

पाकिस्तानचा `टांग उपर` डे

महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!

खरंच पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणं म्हणजे देशद्रोह आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबद्दल अमेरिकन मीडियाचं म्हणणं काय?

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

(लेखक हे मुक्त पत्रकार असून साप्ताहिक चित्रलेखामधे आलेल्या लेखाचा हा संपादित भाग. आभारः साप्ताहिक चित्रलेखा. .)