अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय.
शाळा, कॉलेजात काही पोरं, पोरी खूपच हुशार असतात. कायम पुढं जाणारी. अभ्यासात, स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणारी. कायम अव्वल येणारी. दुसरीकडे काही उनाड पोरंही असतात. वर्गात मागच्या बाकावर बसणारी. टवाळक्या करणारी पोरं म्हणून त्यांना कायम नावं ठेवली जातात. लोकांची टर उडवण्यात त्यांना रस असतो. तर काही सरळ साधी असतात. त्यांना जास्त गोतावळा आवडत नाही. आजूबाजूच्या गोतावळ्यापासून लांब राहत 'शांतीत क्रांती' या हिशोबानं ही पोरं वावरत असतात.
बिजनेसमन आणि व्यवसायानं इंजिनियर असलेल्या अॅलन मस्क यांचं नाव या तिसऱ्या कॅटेगरीत मोडतं. लहानपणी त्यांनी बरीच उलथापालथ पाहिलीय. एकटेपणा अनुभवलाय. त्यांच्याकडच्या भन्नाट कल्पनांनी त्यांना जगातली श्रीमंत व्यक्तीही बनवलंय.
मस्क यांची टेस्ला ही कंपनी आता भारतात ऑफिस थाटतेय. ८ जानेवारीला अधिकृत नोंदणीही झालीय. बंगळूर इथं अलिशान ऑफिसही थाटलं जाईल. पण ती उभी करण्यासाठी मस्क यांनी गाळलेल्या घामाची गोष्ट आपल्याला माहीत नसेल. असं होऊ नये म्हणूनच मस्क यांच्याबद्दल माहीत करून घ्यायला हवं.
हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी
अॅलन मस्क यांचा जन्म २८ जून १९७१ मधे दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया इथं झाला. आज त्यांच्याकडे तीन देशांचं नागरिकत्व आहे. दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि अमेरिका. त्यांची आई माये मस्क या मॉडेल होत्या. तर वडील इरॉल मस्क इलेक्ट्रिकल इंजिनियर, पायलटही होते. आपल्या तीन भावंडांमधे अॅलन सगळ्यात लहान होते.
अॅलन यांचं लहानपणी स्वतःचं असं जग होतं. त्याच जगात वावरणं त्यांना आवडायचं. त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार नव्हता. स्वतःमधेच ते गुंतलेले असायचे. त्यामुळे आईवडीलही त्यांना एकलकोंडा म्हणायचे. १९८० मधे त्यांच्या आईवडलांनी घटस्फोट घेतला. अॅलन यांनी वडलांसोबत रहायचा निर्णय घेतला. पण हा अनुभव त्यांच्यासाठी कटू होता. ज्या वयात आपलेपणा, वडील म्हणून आधाराची गरज होती त्या वयात वडलांच्या विचित्र वागण्याचा मनस्ताप त्यांना झाला.
दुसरीकडे शाळेतही त्यांना या मनस्तापाचा सामना करावा लागला. इतर मुलं त्यांना त्रास द्यायची. टिंगलटवाळी करायची. चिडवायची. त्या पोरांचा मारही ते खायचे. अशात इतक्या लहान वयात त्यांना आधार मिळाला तो पुस्तकांचा. वयाच्या १० व्या वर्षी त्यांना कम्युटरमधे गोडी निर्माण झाली. त्यातूनच १२ व्या वर्षी त्यांनी ब्लास्टर नावाचा एक कम्युटर गेमही बनवला. या काळात कम्प्युटर आणि पुस्तकांची सोबत झाली.
१९९५ मधे अॅलन पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतल्या बड्या कंपन्यांचं महत्वाचं केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीत पोचले. स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या फिजिक्स विभागात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचं मन काही फार रमलं नाही. शेवटी आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या भावासोबत त्यांनी स्टार्टअप सुरू केला.
जीप २ असं त्या स्टार्टअपचं नाव होतं. अॅलन यांचं वय त्यावेळी जेमतेम २४ वर्ष होतं. त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार वाढवत कंपनीही वाढवली. १९९९ मधे दोन्ही भावंडांनी ही कंपनी ३० लाख अमेरिकी डॉलरला कम्युटर बनवणाऱ्या कॉम्पॅकला विकून टाकली. त्यानंतर अॅलन यांनी एक्स डॉट कॉम नावाची एक ऑनलाइन फायनान्स कंपनी बनवली. आज ती पेपॉक नावानं ओळखली जाते. २००२ मधे त्यांनी ही कंपनी विकली.
हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ
तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडून हे जग संपेल. लोकांची आयुष्य उध्वस्त होतील अशी भीती अॅलन मस्क यांना सतावते. सोबतीला आण्विक युद्ध, ज्वालामुखीसारख्या समस्याही आहेत. भविष्यात माणसाला दुसऱ्या ग्रहावर वस्ती करायची गरज भासू शकते असं मस्कना वाटतंय. त्यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी नावाची कंपनी हा या प्रयोगाचा महत्वाचा भाग.
२००२ मधे स्थापन झालेली ही कंपनी पुढे स्पेसएक्स नावानं ओळखली जाऊ लागली. अंतराळातला प्रवास अधिक सुखकर, सोपा आणि कमी खर्चिक बनवणं अॅलन यांना महत्वाचं वाटतंय. मंगळावर माणसांची वस्ती बनवणं हा त्यांचा मुख्य उद्देश. पण मानवी वस्ती केवळ एका ग्रहापुरती राहू नये, असंही त्यांना वाटतंय.
२००६ मधे त्यांनी कंपनीनं पहिलं रॉकेट लॉन्च केलं. पण त्यांना यश आलं नाही. २००७ आणि २००८ लाही त्यांचा प्रयत्न फसला. आता त्यांच्याकडे केवळ एखादं रॉकेट आकाशात पोचेल इतकाच पैसा शिल्लक होता. २८ सप्टेंबर २००८ ला फॅल्कन १ रॉकेट अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. स्पेसएक्सची अनेक रॉकेट काम झाल्यावर पुन्हा वापरली जाणं त्यांचं सगळ्यात मोठं यश होतं. २०२० मधे 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधे' माणसाला पोचवणारी स्पेसएक्स ही पहिली खाजगी कंपनी ठरली.
मानवी अस्तित्वाचा झगडा अनेक काळ चाललाय. तो थांबून त्यातून काहीतरी सकारात्मक घडावं हा अॅलन मस्क यांचा प्रयत्न आहे. त्यांनी उभ्या केलेल्या कंपन्याचाही उद्देश तोच आहे. सध्या हवामान बदल, एकाच ग्रहावर माणसाचं अवलंबून राहणं अशी अनेक आव्हानं असल्याचं मस्क यांना वाटतं. टेस्ला मोटर्स, सोलर सिटी आणि द बोरिंग कंपन्यांची उत्पादनं पर्यावरणपूरक असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
त्याचाच एक भाग म्हणून २००६ मधे सोलर सिटी नावाची सौर ऊर्जेवर काम करणारी कंपनी मस्क यांच्या जवळच्या मित्रानं काढली. मस्क यांनीच तसा सल्ला दिला. २०१३ मधे ती अमेरिकेतली सोलर पॅनल लावणारी ती सगळ्यात मोठी कंपनी ठरली. २०१६ मधे टेस्ला कंपनीनं ती विकत घेतली.
हेही वाचा: ELSS फंड्सला करबचतीचा सर्वोत्तम पर्याय असं का म्हणतात?
२००३ मधेच इलेक्ट्रॉनिक कार बनवणारी टेस्ला मोटर्स नावाची कंपनी सुरू झालेली. सर्बियन अमेरिकन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनियर निकोल टेस्ला यांच्या नावावरून कंपनीला हे नाव देण्यात आलं. खरंतर मस्क यांची ही कंपनी नव्हती. तर अमेरिकन इंजिनियर मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टरपेनिंग यांनी त्याची स्थापन केली होती. पण २००४ ला मस्क यांनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. २००६ ला कंपनीकडून रोडस्टर नावाची पहिली कार बनवण्यात आली. त्यात मस्क यांची भूमिका महत्त्वाची होती.
२००७ ला कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मस्क यांनी आपला पैसा यात ओतला. कंपनी पुन्हा उभी राहिली. २००८ मधे कार्यकारी अधिकारी म्हणून टेस्ला मोटर्सची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. जगभरातल्या ऊर्जेचं संकट दूर करणं हा मस्क यांच्या या कंपनीचा उद्देश आहे.
जीवाश्म इंधन एकनाएक दिवस संपेल याची जाणीव मस्क यांना आहे. त्यामुळे त्याला एक पर्यावरण पूरक ऊर्जेचा काही पर्याय देता येईल का या विचारानं त्यांनी टेस्लाची इलेक्ट्रिक कार बनवली.
हेही वाचा: चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान
८ जानेवारीला भारतात टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायवेट लिमिटेड या नावानं कंपनीचं रजिस्ट्रेशन झालंय. ऑक्टोबर २०२० मधे ट्विट करून मस्क यांनी आधीच याची कल्पना दिली होती. कंपनी आता इथं इलेक्ट्रिक गाड्या तयारही करेल आणि व्यवसायही.
टेस्लाचं भारतातलं पहिलं ऑफिस बंगळुरू इथं असेल. मोदींनीही याआधीच तेलावर अवलंबून राहणं आणि वाढतं प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला भारतातली गाड्यांची विक्री करून सुरवात करेल असं म्हटलं.
त्यामुळे मस्क यांनी अचूक टायमिंग साधलंय असंच म्हणावं लागेल. पण टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक करतेय खरी पण ते करताना कंपनीनं नेदरलँडच्या मार्गे येणं पसंत केलंय. त्याचं कारणही तसंच आहे. नेदरलँडमधे टॅक्स रेट कमी आहे. टेस्ला मोटर्स, नेदरलँड ही त्याची पार्टनर आहे. शिवाय अमेरिकेच्या कंपन्यांचं पहिलं प्राधान्य नेदरलँडला असतं. भारतात टॅक्स ऍग्रीमेंटमधे बदल झाल्यामुळे आता थेट परकीय गुंतवणूक आली तर त्याला भांडवली नफ्याच्या करारातून सूट मिळत नाही.
भारत आणि नेदरलँडमधल्या आधीच्या ऍग्रिमेंटमुळे टेस्लासाठी ते फायद्याचं ठरेल. ऍग्रिमेंटनुसार कोणतीही डच म्हणजेच नेदरलँडमधली कंपनी भारतातले शेअर्स कुठल्याही बिगर भारतीय कंपनीला विकत असेल तर त्याला टॅक्समधून सूट मिळते. त्यामुळे टेस्लानं नेदरलँडच्या मार्गानं भारतात येणं पसंत केलंय. टेस्ला २०१९ मधे इलेक्ट्रिक बॅटऱ्यांवर पॅसेंजर गाड्या बनवणारी जगातली मोठी कंपनी ठरलीय. भारतात कंपनीचं मॉडेल ३ लवकरच लॉंच केलं जाईल. मार्चमधे या गाड्यांची डिलीवरी सुरूही होईल.
अॅलन मस्क कल्पक विचारांचे आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या आयडिया आहेत तशाच भन्नाट योजनाही. अमेरिकेत कोरोना साथीमुळे उद्योग धंद्यांना फटका बसत असताना मस्क यांच्या उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांना आपली टेस्लाची फॅक्टरी बंद करावी लागली पण दोन महिन्यात ती चालूही झाली. त्यांच्या इच्छाशक्तीला दाद द्यावी लागेल. अनेक खाच खळगे पाहत त्यांनी आपला व्यवसाय उभा केलाय. अनेक आव्हानं स्वीकारली. त्यातून सहीसलामत बाहेर पडले.
आपले जगावेगळे उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं राबवले. त्यात आलेलं अपयशही पचवलं. फॉर्ब्सनं जगातल्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केलीय. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना मागे टाकत अॅलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला नंबर पटकावलाय. ७ जानेवारीला टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. आज मस्क यांच्याकडे १८५ बिलियन डॉलर पेक्षा अधिक संपत्ती आहे. भारतीय आकडेवारीत बोलायचं तर जवळपास साडे तेरा लाख कोटी!
हेही वाचा:
ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!
पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?