सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही.
शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणसाला फक्त अन्नाची गरज होती. रानावनात भटकायचं. कंद-मुळं शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असायचा. शेतीचा शोध लागला. अन्नाची गरज मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. शेतीच्या शोधामुळे मानव जातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसं वसाहती करु लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवणघेवाण सुरु झाली. या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आलं.
अन्नाची गरज मिटल्या नंतरच भाषा, साहित्य, कला विकासाला चालना मिळाली. सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात.
साहित्यिकांनी मात्र शेतकर्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट राबणं त्याचा धर्म आहे आणि त्याने पिकवलेलं फुकट खाणं आमचा अधिकार आहे, अशी समजूत करून घेतली. साहित्यिकांनी शेतकर्यांशी नाळ जोडण्याऐवजी शेतकर्यांना लुटणाऱ्या राजा-राजवाड्यात वावरणं पसंत केलं. राजे आणि त्यांच्या दरबार्यांना रिझवण्यासाठी आपली सगळी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलताही कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिलं की लक्षात येतं.
हेही वाचा: निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
साहित्यात शेतकर्यांचं जे चित्रण आलंय, ते ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल. १) कृषी जीवनाचं उदात्तीकरण करणारं २) शेतकर्यांचं विदुषकीकरण करणारं ३) शेतकर्यांना खलनायक म्हणून रेखाटणारं.
कृषी जीवन ही आदर्श संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ जीवनशैली आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्ग वर्णनं केली. जोंधळ्याला लटकलेलं चांदणं दिसणं काय किंवा हिरवं सपान पाहणं काय सारखंच. शेतकऱ्यांचं दु:ख या वर्गाला उमगलं नाही.
या वर्गातल्या साहित्यिकांनी केलेलं चित्रण कैद्याने तुरुंगाचं बहारदार वर्णन करावं, तसं हास्यास्पद झालंय. एखादा कैदी म्हणाला की, 'पहा त्या उंच भिंती, मनोरे आकाशाला भिडणारे, बलदंड गज, साखळदंड गजालाही वाकवता न येणारे. घोर अंधार, खोलीतला एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.'
इच्छा नसताना शेती करावी लागणं म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिघ्छेने शेती करतात. विलाज नाही म्हणून करतात. आदर्श जीवन शैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करत राहिलो. स्वामीनाथन समितीने ४० टक्के लोक नाईलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील. असा निष्कर्ष काढला आहे. कृषी जीवनाचं उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्यांना शेतीत नादवून ठेवण्याचं पाप केलंय.
कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, हे पाहता येत नाही. शेती हा एक व्यवसाय आहे, असं मानलं तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेलं उदात्तीकरण हे एक कारण मानावं लागेल.
सवर्णांनी शेतकऱ्याला शूद्र मानलं. चातुवर्णात शेतकर्यांचं स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. मातीशी ज्यांचा संबंध येतो. ते सगळे शूद्र. या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड'मधे या बाबत स्पष्टीकरण केलं आहे. शेतकऱ्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. अनेक कादंबर्यांमधे शेतकरी हे एक विनोदी पात्र बनवलं आहे. हे सर्व साहित्य शेतकर्यांना शूद्र मानणाऱ्यांनी लिहिलंय.
हिंदू सवर्णांनी शेतकरी विदूषक रंगवला तसं डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगवला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो आणि तिथं दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णनं डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केलीत. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्यांनी शेतकर्यांचं चित्र रंगवताना भडकपणे त्याला खलनायक रंगवलं. जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई असे काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकऱ्यांचं वास्तव चित्र अभावानेच रेखाटलं गेलंय.
हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?
सर्वसाधारणपणे शेतकाऱ्यांबद्दल मनात आकस ठेवूनच लिखाण झालेलं दिसतं. याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, पुस्तकं कोण वाचतो? कोण विकत घेतो? या प्रश्नांची उत्तरं विचारात घ्यावी लागतील. वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्तात हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, दाळी किंवा भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला दुप्पट पगारी वाढवून हव्यात, मात्र शेतकऱ्याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही.
हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तकं वाचतो. तोच विकत घेतो. त्याला न आवडणाऱ्या पुस्तकांना तो हात लावत नाही. पुस्तकं विकली जाणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असंच लेखन छापलं जातं. म्हणून लेखकही तशीच पुस्तकं लिहितात.
वाचकांच्या पसंतीला उतरलेलं पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. नाव लौकिक होतो. पैसाही मिळतो. शेतकर्यांबद्दल शहरी वाचकवर्गाच्या मनात एक अढी आहे. शेतकऱ्याला नायक करून लेखन केलं तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकाचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदूषक म्हणूनच चित्रित केला जाईल.
ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालेलं आहे, ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या आणि पुढे नोकरी करत असलेल्या लोकांनी लिहिलेलं साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक, शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकऱ्या करत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविषयी सहानुभूतीने लिहिलेलं हे साहित्य आहे. आज ते शेतकरी नाहीत. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडलं, व्यावसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेला प्राध्यापक यात जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो. जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतरजातीय विवाह केला तर काही पिढ्यानंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणाऱ्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात.
आदिवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचं गाणं तयार झालं नाही. साने गुरुजींचं ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे ७०-७५ वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं गाणं गावं लागायचं. असं का? शेतकऱ्यांच्या चळवळीचं गाणं का तयार होऊ शकलं नाही?
हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट
विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडलं, त्यांनीही सुंदर लेखन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा' आवाहनाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडलं. १९६० नंतर त्यांच्या लिखाणाला धार चढली. आत्मचरित्रं, नाटकं, कविता, कादंबर्या या सर्व क्षेत्रात दलित साहित्याने आपलं वेगळेपण ठसवलं. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केलं.
या सर्व उदाहरणावरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य तयार करतात. त्यांच्यातल्या प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते आणि ते लिखाण करु लागतात. शेतकऱ्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात. गावात जन्मायचं, गावात जगायचं, गावातच मरायचं असा त्यांचा जीवनक्रम असतो.
लेखनासाठी ‘परकाया प्रवेशाची’ क्षमता महत्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश' करु शकतात. शेतकर्यांना जमीन, गुरे अशा कामामुळे स्थलांतर करता आलं नाही म्हणून शेतकरी आंदोलनात शेतकर्यांनी लिहिलेलं साहित्य तयार होऊ शकलं नाही.
कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय कोष आहेत. या कोषातून बाहेर पडणाऱ्यांना सर्जनाचं वातावरण मिळतं. कोषांतर करणारे समूह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रीय दिसतात. शेतकऱ्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकर्यांचं साहित्य निर्माण झालेलं नाही, असं म्हणता येईल.
प्रगत देशांकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूप कमी आहेत. काही देशांत तर शेती करावी म्हणून प्रोत्साहन दिलं जातं. आपल्या देशात शेतीवर जगणाऱ्यांची संख्या एकेकाळी ९० टक्के होती. अलीकडे स्थलांतराचं प्रमाण वाढलं असलं तरी अजूनही ६०-७० टक्के लोक शेतीवर जगतात.
९०च्या नंतर स्थलांतराला वेग आला आहे. शेतकरी शहराकडे धाव घेत आहेत. शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रात जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. ७५ टक्के लोक शेतीच्या बाहेर पडणार आहेत. त्या काळात खेड्यांचं चित्र पार पालटून गेलेलं असेल. ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे.
९०च्या नंतर नवं तंत्रज्ञान आलं. या तंत्रज्ञानाने सारं जग बदलून टाकलं. एकदम नवी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे.
या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील ते सांगता येणार नाही, पण ते आजच्या सारखे असणार नाही. हे निश्चित. हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा तेवढा होताना दिसत नाही. काही ताकदीचे लेखक समोर येत आहेत. ९०च्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवं लिहिण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ही आशादायक आणि दिलासादायक गोष्ट आहे.
हेही वाचा:
जगभरातल्या तरुणांना दोस्ती शिकवणारी फ्रेंड्स पंचविशीत
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी
भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!
(लेखक हे किसानपुत्र आंदोलनाचे नेते आहेत)