कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

२८ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आपल्या या कोरोनाला एकूण सहा भाऊ आहेत. त्यातले दोन भाऊ म्हणजे सार्स आणि मर्स हे वायरस. कोरोनासारखाच या दोन्ही वायरसनी काही वर्षांपूर्वीच जगात धुमाकूळ घातला होता. पण तेव्हा आत्तासारखी देश, जग लॉकडाऊन वगैरे करण्याची वेळ आली नव्हती. या सगळ्या कुटुंबातलं कोरोना हे सगळ्यात वात्रट पोर आहे. एवढा वात्रटपणा याच्यात आला कुठून?

अमेरिकेत गेल्यावर्षी साध्या फ्लूमुळे ३७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. फ्लूमुळे दरवर्षी सरासरी २७ हजार ते ७० हजार लोकांचा मृत्यू होतो. पण आजपर्यंत या फ्लूमुळे कधी देशाची कवाडं बंद करावी लागली नाहीत. लोकांचं जगणं आणि अर्थव्यवस्था सगळं व्यवस्थित चालू राहिलं. आत्ता या क्षणाला कोरोना वायरस संसर्गानं कोविड-१९ आजार झालेले ५४६ पेशंट सापडलेत. २२ जणांचा मृत्यू झालाय. याबद्दल विचार करा. हे सगळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ९ मार्च २०२० ला ट्विट करून त्यांनी आपलं हे म्हणणं मांडलंय.

अमेरिकेतला फ्लू आणि कोरोना यांची तुलना ट्रम्प यांनी केलीय. फ्लूमुळे कोरोनापेक्षा दहापट जास्त लोकांचा मृत्यू होतो, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ही तुलना करून कोरोना किती मामुली आजार आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न ट्रम्प करत होते. त्यांचा हाच दृष्टीकोन अमेरिकेला आता भोवतोय. आजरोजी २८ मार्चला अमेरिकेतल्या जवळपास ८५ हजार लोकांना कोरोना वायरसची लागण झालीय. आणि हजाराहून अधिक लोकांचा जीव गेलाय.

आजही अनेकांना कोरोना हा साध्या फ्लूसारखाच आजार आहे असं वाटतं. पण खरंतर, कोरोना हा फ्लू नाही. तो फ्लूपेक्षा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. नोवेल कोरोना वायरस फ्लू किंवा इन्फुएन्झा या आजारापेक्षा कमी वेगाने पसरतो. पण साध्या फ्लूपेक्षा त्याची लागण सहजपणे होते आणि त्याचे परिणामही गंभीर होतात. त्यामुळे कोरोना वायरसच्या संसर्गानं होणारा कोविड-१९ हा आजार जास्त गंभीर असल्याचं डब्लूएचओचे महासंचालक टेड्रॉस अधानोम यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा : कोरोनाविरुद्धची लढाई भारताला सहा महिने लढावी लागेलः डॉ. जयप्रकाश

कोरोनाची सहा भावंड कोणती?

हा कोरोना म्हणजे प्राण्यांकडून माणसांत येणारा एक वायरस असतो हे तर आता आपल्या सगळ्यांनाच माहीत झालंय. असे १०० पेक्षा जास्त कोरोना वायरस जगात वावरतात. हे सगळे कुठल्या ना कुठल्या प्राण्यातून माणसाकडे आलेले असतात. पण त्यातल्या सगळ्याच कोरोना वायरसमुळे माणसाला आजार होत नाहीत.

सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, माणसाला आजारी पाडू शकणाऱ्या या कोरोना वायरसची ओळख पहिल्यांदा १९६० च्या दशकात झाली होती. डिसेंबर २०१९ च्या आधी माणसाला आजारी पाडू शकतील असे सहा कोरोना वायरस जगात होते. त्यातले 229E आणि NL63 हे दोन अल्फा कोरोना वायरस म्हणून ओळखले जातात. तर OC43 आणि HKU1 हे बीटा कोरोना वायरस म्हणून ओळखले जातात.

या चार वायरसमुळे साधारण सर्दी, खोकला वगैरे आजार होतात. हे साधे आजार लगेच बरे होतात. कधी कधी तर दवाखान्यात न जाता आपण हे आजार अंगावर काढतो. त्यावर आपली रोगप्रतिकारकशक्ती यशस्वी हल्ला करते आणि वायरसला हाणून पाडते. पण कोरोना कुटुंबातले उरलेले दोन सदस्य म्हणजे सार्स आणि मर्स हे काही या साध्या अल्फा आणि बीटासारखे नाहीत. ते जास्त धोकादायक आणि जीवघेणे आजार आहेत.

आयत्या बिळावर नागोबा

नवीन तयार झालेला कोरोना वायरस हा सुद्धा या सार्स आणि मर्सच्या वृत्तीचा आहे. २००३ मधे मांजरापासून ट्रान्सफर झालेल्या सार्स आजारानं चीनसोबत अनेक देशांत धुमाकूळ घातला होता. २०१२ मधे उंटापासून आलेल्या मर्स वायरसनं विशेषत: मध्य पूर्वेतल्या देशांमधे उलथापालथ केली होती. आणि आता या कोरोना कुटुंबातला हा नवा वायरस असाच वांडपणा करतोय. नव्यानं आढळलेल्या कोरोना वायरसला शास्त्रीय भाषेत सिवियर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनावायरस 2 म्हणजे SARS-CoV-2 असं नाव देण्यात आलंय. गेल्या ११ फेब्रुवारीला हा नामकरण सोहळा झाला.

खरंतर या वांडपणाचं क्रेडिट कोरोना वायरसच्या रचनेला जातं. ‘द अटलांटिक’ या अमेरिकन वेबसाईटवर एका स्टोरी आलीय. यानुसार, या वायरसचा आकार एखाद्या स्पाईकी बॉल सारखा म्हणजे काटेरी बॉलसारखा असतो. हे काटे आपल्या पेशींवर असणाऱ्या ACE2 नावाच्या एका प्रोटिनला चिकटून बसतात. सार्स किंवा मर्सपेक्षा कोरोना वायरसची पकड जास्त घट्ट असल्याचंही या बातमीत सांगण्यात आलंय. त्यामुळेच या वायरसचं इन्फेक्शन सहजपणे होतं, असं एन्जेला रसमुसेन या कोलंबिया युनिवर्सिटीच्या संशोधक यांचं म्हणणं या बातमीत सांगितलंय.

शिवाय, माणसाच्या पेशींवर चिकटून बसताना या वायरसच्या काट्याचे दोन भाग होतात. असे दोन भाग झाले की मग वायरस जोमाने काम करू शकतो. दोन भाग करून वायरस हळूहळू पेशीतच शिरतो. त्या पेशीतलं अन्न वापरून आपली पिल्लावळ बनवतो आणि त्यातून आणखी नवे वायरस तयार होतात. थोडक्यात, नव्यानं सापडलेला कोरोना हा आयत्या बिळावरचा नागोबा आहे. सार्स वायरसच्या या काट्यांचं विभाजन इतक्या सहजपणे होत नसे. कोरोना वायरसला मात्र काट्यांचे दोन भाग करणं अगदी सोपं जातं.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

कोरोना लै हुशार!

आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला करणारे अनेक वायरस एकतर फक्त श्वसनसंस्थेच्या वरच्या भागावर म्हणजे नाक, घसा इत्यादी अवयवांना इन्फेक्ट करतात, नाहीतर खालच्या भागावर म्हणजे फुफ्फुसं, त्याखालचा पडदा अशा अवयवांना त्रास देतात. श्वसनसंस्थेच्या वरच्या भागावर फार पटकन इन्फेक्शन धरतं. पण त्याचा परिणाम फारच सौम्य असतो. खालच्या भागापर्यंत फार कमी वेळा इन्फेक्शन पोचतं. पण एकदा असं इन्फेक्शन झालं की त्याचे परिणाम खूप गंभीर होतात.

हा नवीन कोरोना वायरस श्वसनसंस्थेच्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही भागांवर इन्फेक्शन पसरवू शकतो. संपूर्ण शरीरात असणाऱ्या फ्युरिन नावाच्या एका टिश्यूचा वापर कोरोना वायरस करतो. त्यामुळे असं करणं त्याला शक्य होतं. अनेकदा श्वसनसंस्थेच्या खालच्या भागापर्यंत पोचण्याआधीच या वायरसचं संक्रमण दुसऱ्याला होतं. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य कळायच्या आतच लागण झालेल्या माणसाकडून दुसऱ्या अनेकांना लागण होऊन जाते.

प्राण्यापासून आला असला तरी हा वायरस माणसांसाठी प्राण्यांपेक्षा जास्त धोकादायक सिद्ध झालाय. सार्स आणि मर्सप्रमाणे हा वायरस नेमका कोणत्या प्राण्यातून आला ते सांगता येत नाही. पण याचा आरएनए हा वटवाघूळाच्या आरएनएशी ९६ टक्के जुळतो. त्यामुळे हा वटवाघूळातून माणसात आला असावा किंवा वटवाघूळातून त्याची लागण इतर प्राण्याला झाली असावी आणि नंतर तिथून तो माणसात आला असावा, असा अंदाज संशोधकांनी वर्तवलाय.

मुख्य म्हणजे, सार्स हा वायरस माणसाच्या शरीरात आला तेव्हा ACE2 या पेशींना शोधून, या पेशींच्या आकाराचा, त्यांच्या वागण्याचा अंदाज वगैरे घ्यायला त्याला खूप वेळ द्यावा लागत असे. पण कोरोना वायरस मात्र जन्मतःच आईच्या पोटातून हे सगळं शिकून आल्यासारखा वागतो. ACE2 म्हणजे नेमकं कुठलं प्रोटीन, ते कोणत्या पेशीवर असेल, ते कसं मिळवायचं वगैरे सगळं तो एका दिवसात माहीत करून घेतो. त्यामुळेच कोरोना फॅमिलीतलं हे शेंडेफळ इतका वात्रटपणा करू शकतं.

कोरोनामुळे शरीरात येतं वादळ

घरातल्या लहान पोरानं मस्ती केली की शेवटी पालक चिडतात आणि पोराला खूप मारतात. त्यानं घरातलं वातावरण अजून बिघडतं. हो ना? नेमकं हेच कोरोनामुळे आपल्या शरीरात होतं. कोरोना मस्ती करायला लागला की आपली रोगप्रतिकारकशक्ती त्यावर हल्ला करते. त्यामुळेच आपल्याला ताप येतो, सर्दी होते. पण तरी या कोरोनानं ऐकलं नाही तर आपल्या रोगप्रतिकारकशक्तीचाही स्वतःवरचा ताबा सुटतो.

मग आपलीच रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीरात इतकी उलथापालथ करू लागते की कोरोनापेक्षा तिचाच धोका वाढतो. कोरोनावर हल्ला करण्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या उघडतात आणि पांढऱ्या पेशींना इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी जायला वाट करून देतात. या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक असतात. त्या कोरोनाशी युद्ध करून लढतात. पण त्यांना वाट करून देण्याच्या नादात रक्त वाहिन्यांतून जास्तीची गळती सुरू झाली की आपली फुफ्फुसं एकदम फुगून जातात आणि डॅमेज होतात. या सगळ्याला सायटोकाईन स्ट्रॉम म्हणतात. स्ट्रॉम म्हणजे वादळ.

शरीरात वादळ सुरू झालं म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती रागानं पार वेडीपिशी झालेली असते. मग ती कुणावरही हल्ला करू लागते. कोरोनाला सोडून दुसऱ्याच्या कशाच्या तरी मागे लागू शकते. त्यामुळे कोरोनाला मस्ती करायला एकदम रानच मोकळं होतं. आणि रोगप्रतिकारकशक्ती एकदा वेडीपिशी झाली की फुफ्फुसासोबत इतर अवयवही डॅमेज करू लागते. हृदय, किडनी असे अवयव आधीच कुठल्याशा आजारानं त्रस्त असतील तर ते लवकर डॅमेज होतात. त्यामुळेच मधुमेह किंवा रक्तदाब असणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असतो, असं डब्ल्यूएचओकडूनही सांगितलं जातंय.

थोडक्यात, कोरोना कुटुंबातलं शेंडेफळ हे माणसाच्या शरीरातली सारी टेक्नॉलॉजी शिकून आलंय. त्यामुळेच त्याला इतका खोडकरपणा सुचतोय. त्याच्या त्रासापायी आपलं शरीर अजून कंटाळतं आणि सगळं वातावरण खराब करतं. त्याचा वात्रटपणा वाचून त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं, असं वाटू लागतं.

हेही वाचा : 

सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?