एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

१६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. जपानमधली एका महिला उपचार घेऊन बरी झाल्यावर तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली. ही दुर्मिळ गोष्ट आहे, असं म्हणून संशोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता दक्षिण कोरिया आणि चीनमधेही असे शेकडो पेशंट सापडलेत. त्यामुळे एकदा बरं झाल्यावरही कोरोनाची लागण परत होऊ शकते का या प्रश्नानं जगभरातले संशोधक पुन्हा एकदा आपलं डोकं खाजवतायत.

कोरोनाच्या विरोधात आपण रात्रीचा दिवस करून लढतोय. गेल्या २१ दिवसांपासून आपण सगळे लॉकडाऊन झालोत. आणि पुढचे आणखी दोन आठवडे आपण घरातच राहणार आहोत. कोरोनाची लागण झालेल्या पेशंटला बरं करण्यासाठीही आपण शक्य ते सगळे प्रयत्न करतोय. आधुनिक उपचारपद्धती, तपासणीचे किट, दर्जेदार ट्रीटमेंट, २४ तास धावपळ करणारे डॉक्टर, नर्स असं सगळं काही करून या पेशंटला बरं करण्याचा प्रयत्न आहे.

डॉक्टरांच्या आणि नर्सच्या या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत देशभरातून १०२५ जणांना बरं करण्यात आपण यश मिळवलंय. अशाच प्रयत्नातून आपण उरलेल्या सगळ्या पेशंटला कोरोनाच्या विखळ्यातून बाहेरही काढू शकू. पण एकदा बरं होऊन घरी गेलेल्या पेशंटला पुन्हा कोरोनाची लागण झाली तर?

याच प्रकारचं चित्र सध्या वुहान आणि दक्षिण कोरियातंही दिसतंय. कोरोनाची लागण झालेल्या अनेक पेशंटना हॉस्पिटलमधे उपचार देऊन, कोरोनामुक्त घोषित करून घरी परत पाठवलं होतं. पण आता याच पेशंटची कोरोना टेस्ट केली असता पुन्हा पॉझिटिव आलीय. त्यामुळे एकदा बरं झाल्यावर कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो का असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडलाय.

हेही वाचा : बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

दुसऱ्यांदा लागण झालेली जपानी महिला

खरंतर, जपानमधल्या एका बाईवर उपचार करून तिला कोरोनामुक्त घोषित करण्यात आल्यानंतर तिला परत एकदा कोरोनाचा संसर्ग झाला. यासंबंधीची बातमी महिभरापूर्वी फोर्ब्स या वेबसाईटवर आली होती. जपानमधे टूर गाईड म्हणून काम करणाऱ्या या महिलेला जानेवारी महिन्यात पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर हॉस्पिटलमधे उपचार घेऊन ती त्यातून बरी झाली. पण नंतर तिची कोरोना टेस्ट केली असता तिला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं. त्यानंतर संशोधकांनी हा दुर्मिळ प्रकार असून असं सरसकट कुणालाही होणार नाही अशा प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.

तेव्हा जगासमोर जपानमधल्या या टूर गाईडचं एकच उदाहरण समोर होतं. पण आता एक दोन नाही तर कोरोनातून बरं झालेल्या काही टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होतेय. चीनच्या ज्या शहरातून या नवीन कोरोना वायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वुहानमधल्या कोरोनाची लागण होऊन बरं झालेल्या १० टक्के पेशंटना पुन्हा कोरना झाल्याची बातमी नुकतीच साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलीय.

शिवाय दक्षिण कोरियातंही असे पेशंट सापडल्याची बातमी रॉयटर्सनं दिलीय. दक्षिण कोरियामधल्या जवळपास ११६ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

चीनने प्रयत्न करून आपल्या देशातली कोरोनाबाधितांची संख्या कमी केली होती. इतकंच नाही, तर गेल्या कित्येक दिवसांपासून चीनमधे कोरोनाचा एकही नवा पेशंटही सापडला नव्हता. दुसरीकडे कोरोना आटोक्यात ठेवण्यात यश मिळवणाऱ्या दक्षिण कोरियाचंही सगळीकडे कौतुक होत होतं. कोरोनाला हरवलं असं म्हणणाऱ्या या दोन्ही देशांसमोर पुन्हा एकदा नवं आव्हान उभं राहिलाय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

ही तर दुर्मिळ गोष्ट?

जपानमधल्या प्रकरणानंतरच शास्त्रज्ञांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. इंग्लंडमधल्या लिड्स युनिवर्सिटीत वायरॉलॉजी एक्सपर्ट म्हणजेच साथरोगतज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्रोफेसर मार्क हॅरिस यांनी याबाबतीत 'द गार्डियन' या वेबसाईटला प्रतिक्रिया दिली होती. ‘कोरोनाची पुन्हा लागण होणं ही खरंतर दुर्मिळ गोष्ट आहे. पण प्राण्यांकडून आलेले असे वायरस माणसावर परत परत हल्ला करतात हे या आधीही दिसून आलंय,’ असं ते म्हणाले होते.

‘द गार्डियन’च्या याच बातमी सर पॅट्रिक वॅलेन्स या इंग्लंडमधल्या सरकारी वैज्ञानिक सल्लागाराची आणि इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष बॉरिस जॉनसन यांचे वैद्यकीय सल्लागार प्रोफेसर क्रिस विटी यांचीही प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. एखाद्याला एकदा लागण झाली तर त्या वायरसविरोधात लढण्यासाठी त्याची प्रतिकार शक्ती तयार होते आणि मग तसा आजार पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असते, असं या दोघांचंही म्हणणं होतं.

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेल्या जपानी महिलेविषयी वॅलेन्स यांना विचारलं असता, काही लोकांना असे सांसर्गिक आजार परत होऊ शकतात. पण याची शक्यता फार दुर्मिळ असते, असं त्यांनी सांगितलं. कोरोना वायरसची लागण झालेल्या प्रत्येकालाच पुन्हा त्याची लागण होऊ शकते असं ठामपणे सांगण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा : प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

प्रतिकारशक्ती वाढली तर वायरस परत हल्ला करेल?

खरंतर, एखाद्याला कोरोनाची लागण होते म्हणजे कोरोना वायरस त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करून फुफ्फुसातल्या पेशींवर हल्ला करतो. त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच पांढऱ्या पेशी या कोरोना वायरसशी युद्ध सुरू करतात. हे युद्ध पांढऱ्या पेशी जिंकतात म्हणजे शरीरातले सगळे वायरस नष्ट करतात तेव्हा माणूस कोरोनामुक्त झाला, असं म्हटलं जातं.

हे युद्ध करताना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला या वायरसची ओळख पटते. म्हणजे हा वायरस कोण, कसा, त्याच्याशी लढण्यासाठी आणि त्याला हरवण्यासाठी काय करायचं असतं याची युक्ती आपली प्रतिकारकशक्ती साठवून ठेवते. शिवाय, प्रतिकारकशक्ती एकूण एक सगळे वायरस मारत नाहीत. तर थोडे वायरस साठवून ठेवले जातात. त्याला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. या अँटीबॉडीमुळे पुन्हा कधी तो वायरस शरीरात आला तर त्याला ओळखणं आणि त्याच्याशी लढणं सोपं जातं.

शरीराचं हे विज्ञान आणि तज्ञांची मतं लक्षात घेता, एकदा कोरोनातून बरं झाल्यावर पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकणार नाही, असं म्हणता येईल. पण साऊथ कोरिया आणि चीनमधली उदाहरणं काळजात धडकी भरवणारी आहेत. या सगळ्यामुळे आपली टेस्ट करण्याची पद्धत चुकतेय का? कोरोना कधी बरा होतंच नाही का? का खरोखरच, एकदा बरं झाल्यावरही पुन्हा एकदा कोरोनाची लागण होऊ शकते, असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांना पडलेत.

पुन्हा हॉस्पिटलमधे भरती करणार

चॅनेल न्यूज एशिया या वेबपोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, बरे झालेले पेशंट पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव निघण्याचं कारण काय असावं, याचा दक्षिण कोरियातले सगळे संशोधक, डॉक्टर आणि अधिकारी शोध घेतायत. कोरिया सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या संस्थेचे संचालक जिओंग इन केओंग यांनी वर्तवलेला अंदाजही या बातमीत सांगण्यात आलाय. एकदा बरं झाल्यावरही पुन्हा टेस्ट पॉझिटिव येते याचा अर्थ वायरसची पुन्हा लागण झालीय असा नसून शरीरात आधीच असलेले वायरस पुन्हा ऍक्टिव होतायत असा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

तर कोरोनाची लागण झालेल्या पेशंटचं शरीर या नव्या कोरोना वायरसच्या अँटिबॉडी साठवून ठेवतंय का याचा शोध चीनमधले घेतला जातोय, असं फॉक्स २९ न्यूजवरच्या एका बातमीत सांगण्यात आलंय. अशा अँटिबॉडी शरीरानं साठवून ठेवल्या असतील तर त्यापासून त्या पेशंटला आणि त्याच्या आसपासच्या लोकांना काही धोका तर नाही ना याचाही शोध घेतला जातोय.

सध्या या पेशंटना पुन्हा एकदा क्वारंटाईन करून विलगीकरण कक्षात ठेवलं जातंय. संशोधन पूर्ण होईल तेव्हा गरज पडली तर त्यांना हॉस्पिटलमधे पुन्हा एकदा भरती करून त्यांच्यावर परत उपचार चालू केले जातील.

हेही वाचा : 

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट