मनोहर भिडेंवर टीका करणारी गॅंग आय सपोर्ट इंदुरीकर असं का म्हणतेय?

१८ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सम विषम फॉर्म्युल्यावर भरपूर टीका होतेय. एक गोष्ट चुकीची बोलले म्हणून इंदुरीकर महाराजांना पूर्णपणे नाकारणं बरोबर नाही तसंच ते प्रबोधन करतात म्हणून त्यांना सतत डोक्यावर घेणंही योग्य नाही. त्यांच्यावर टीका झालीच पाहिजे. विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला म्हणून भिडेंवर टीका करणारे अनेक जण तर इंदुरीकरांच्या या वक्तव्याचं समर्थन करताना दिसतायत.

इंदुरीकरांनी सांगितलेल्या सम विषम फॉर्म्युलावर स्त्रीवादी कार्यकर्त्यांपासून ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीपर्यंत सगळेच टीका करतायत. सम तारखेला स्त्री संग केला तर मुलगा आणि विषम तारखेला केला तर मुलगी असं इंदुरीकर महाराज एका कीर्तनात बोलले होते.

त्यांचा हा विडिओ भरपूर वायरल झाला. त्यावरून इंदुरीकर समर्थक आणि इंदुरीकर विरोधक असे दोन गटही पडलेत. ट्विटरवर आय सपोर्ट इंदुरीकर असा ट्रेंडही एक दिवस चालला. याविषयी वज्रधारी साप्ताहिकाचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांचा एक लेख सध्या खूप वायरल होतोय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश.

भिडेंवर टीका आणि इंदुरीकरांचं समर्थन

सध्या कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांच्यातल्या वादाचा तमाशा महाराष्ट्रात जोरदार रंगलाय. दोन्ही बाजूने बतावण्या सुरू आहेत. इंदुरीकर महाराजांनी पुराणाचे संदर्भ देत अवैज्ञानिक भाष्य केलं आणि या वादाला तोंड फुटलं.

‘सम तिथीला स्त्री संभोग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संभोग केला तर मुलगी होते.’ असं ते कीर्तनात म्हणाले आणि वादाच्या उलट्या सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनीही असंच एक विधान केलं होतं. तेव्हाही प्रचंड वादंग माजलं होतं. ‘विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला की मुलगा होतो’ असं भिडे म्हणाले होते. यावरून भिडेंवर अनेकांनी टीकेची झोडही उठवली होती.

भिडेंचा विशिष्ट प्रकारचा आंबा आणि इंदुरीकर म्हणतात तसा सम तारखेला संभोग केला की मुलगा होतो ही दोन्ही विधानं एकाच अवैज्ञानिक पठडीतली आहेत. त्याचा प्रकार आणि त्यामागची प्रवृत्तीही एकच. पण दोन्ही विधानांबाबत केला गेलेला न्याय मात्र एक सारखा होत नाही. भिडेंवर तुटून पडलेले अनेकजण इंदुरीकर महाराजांसाठी मात्र पुढे येतायत. ‘आय सपोर्ट इंदुरीकर महाराज’ असं म्हणून इंदुरीकरांच्या बतावणीचं समर्थन केलं जातंय.

हेही वाचा : वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं

तुकाराम, शिवरायांच्या राज्यात स्त्रीच चारित्र्यहनन

इंदुरीकरांच्या अटकेची मागणी केली म्हणून हे लोक तृप्ती देसाई यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करताना दिसताहेत. तृप्ती देसाई उथळ आहेत. वाद ओढवून घेतात, नसत्या वादात पडतात असं यांचं म्हणणं आहे. काही अंशी हे खरं असलं तरी तृप्ती देसाई यांनी केलेला आक्षेप चुकीचा ठरवता येणार नाही.

तृप्ती देसाई इंदुरीकरांच्या अटकेची मागणी करताहेत. म्हणून इंदुरीकरांचं समर्थन करत तृप्ती देसाईंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत मजल मारणं योग्य नाही. इंदुरीकरांनी तमाशाकडे जाणारा वर्ग कीर्तनाकडे वळवला असं म्हणत त्यांचं समर्थन करणारी गँग तृप्ती देसाईंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतेय.

प्रबोधनाच्या किर्तनाची पंरपरा महाराष्ट्रात रूजवणाऱ्या आणि चालवणाऱ्या तुकोबारायांनी, ‘परावया नार आम्हा रखूमाई समान‘ असं सांगितलं. तेच त्यांनी आचरणातून व्यक्त केलं. तोच कित्ता स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर जपला. त्याच महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीचं असं जाहीर चारित्र्यहनन केलं जात असेल तर ते योग्य नाही. मग यातून इंदुरीकरांनी कीर्तन ऐकणारी हीच पिढी घडवली का? असा प्रश्न पडला तर नवल वाटणार नाही.

तुकोबारांयाचा वारसा किंवा छत्रपती शिवरायांचा वारसा नक्कीच या थराला जाणार नाही. इंदुरीकर कीर्तन करताना स्वत:च महिलांना ‘अय डंगरे’ वगैरे भाषा वापरत असतील तर त्यांचे समर्थक काय करणार? सभ्यतेची परिभाषा हीच असेल तर काय बोलायचं?

इंदुरीकरांवर टीका नेमकी कशासाठी?

खरंतर इंदुरीकरांच्या वक्तव्यावर इतका वाद माजवण्याची गरज नव्हती. पण तो जाणीवपूर्वक माजवला जातोय, अशी शंका येते. याचं कारण असं की, इंदुरीकरांनी सम विषम तारखेचं विधान केलं त्याच काळात वक्ते महाराज नामक एका महाराजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर विकृत टीका केली. वक्ते महाराजांनी केलेली टीका झाकली जावी, त्यावर जास्त चर्चा होऊ नये म्हणून इंदुरीकरांना खलनायक ठरवलं जातय, अशी शंका घ्यायला वाव आहे.

वक्ते महाराजांची मनुस्मृतीची गुळणी चर्चेत यायला सुरवात झाल्या झाल्या इंदुरीकर चर्चेत आले. बघता बघता त्याचाच तमाशा सुरू झाला. या सगळ्या गोंधळात त्या वक्ते महाराजाची विकृती दडपून गेली. वक्ते महाराजाने केलेली ओकारी अधिक गंभीर होती. पण ती या तमाशामुळे बाजूला पडली. कदाचित इंदुरीकरांच्या वक्तव्याचा तमाशा रंगवणऱ्या लोकांना हेच अभिप्रेत असावं, अशी शंका येते.

वादंग माजवणाऱ्यांना न्यायाशी देणं-घेणं नसतं किंवा त्यांना न्याय करायचाच नसतो. प्रसंग कुठलाही असो न्यायाची भूमिका नेहमी तीच असली पाहिजे. त्यात आपला परका असा दुजाभाव असता कामा नये. पण सध्या असा दुजाभाव काही लोक जाणीवपूर्वक करताना दिसतात. त्यामागे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं कारस्थान आहे. या कारस्थानाला इतर लोक बळी पडतात. त्यांचेही जातीय अहंकार पुष्ट होतात. मग असे लोक विवेक मातीत घालून गुळण्या टाकत राहतात, विकृत पिचकाऱ्या मारतात. त्यातून सामाजिक सलोखा बिघडतो.

हेही वाचा : संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

महाराष्ट्राच्या विवेकाला जातीचा सोरायसिस

भिडेंवर टीका करणाऱ्या लोकांना इंदुरीकरांचं समर्थन करताना पाहून आश्चर्य वाटतं. तृप्ती देसाईंचा हेतू भलेही प्रामाणिक नसेल पण त्यांच्यावर टीका करण्याची पध्दत योग्य नाही. घाण ती घाणच असते. इतरांची आहे म्हणून थुंकायचं आणि आपली आहे म्हणून चघळायची असं होत नाही. घाणीला घाण म्हटलंच पाहिजे. मग ती कुणाचीही असो! इंदुरीकरांची भूमिका चुकीची आहे तर तिला निखळपणे चूक म्हणायचं सामर्थ्य पाहिजे. त्याबाबत जातीय, धार्मिक किंवा राजकीय अजेंडे ठेवून भूमिका घेणं किंवा विरोध करणं योग्य नाही.

सध्या महाराष्ट्रात खूप जातीय चिरफाळ्या झाल्यात. प्रत्येक गोष्टीकडे जातीय चष्म्यातून पाहिलं जातंय. वादग्रस्त व्यक्ती कोण? कुठल्या जातीचा? कुठल्या धर्माचा? या वरून भूमिका घेतल्या जातायत. समर्थनाची भूमिका घ्यायची की विरोधातली घ्यायची हे ठरवलं जातंय. सध्या महाराष्ट्राच्या विवेकाला जातीचा सोरायसिस जडलाय. हा जातीचा सोरायसिस भयंकर आणि धोकादायक आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रकृतीला आणि प्रवृत्तीला हे पचणारं नाही.

इंदुरीकर महाराज खूप चांगलं प्रबोधन करतात. त्यांचं त्या क्षेत्रात प्रभुत्व आहे. त्यांनी प्रचंड मोठा वर्ग कीर्तनाकडे खेचला ही वस्थूस्थिती आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून कीर्तनाची परंपरा जोमात आहे. आजही लोक कीर्तनाला गर्दी करतात. पण इतरांपेक्षा इंदुरीकरांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होते. त्यांनी अनेक चांगले विषय कीर्तनातून मांडले. चांगलं प्रबोधन केलंय. अनेक सामाजिक विषयावर इंदुरीकर ताकदीने भिडलेत. राजकारण्यांची किंवा संप्रदायातल्या तथाकथीत ठेकेदारांची पर्वा न करता त्यांनी जोमाने प्रबोधन केलंय.

संप्रदायातले अनेकजण नाकं मुरडतात, इंदुरीकरांना तमासगिर म्हणतात. पण तरीही इंदुरीकर हटले नाहीत. जोरदारपणे प्रबोधन करत आले. हे त्यांचं योगदान आहेच. ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यांनी एक चूक केली म्हणून त्यांना सरसकट नालायक ठरवणं योग्य नाही तसेच त्यांनी खूप चांगलं प्रबोधन केलं म्हणून त्यांच्या अवैज्ञानिक भूमिकेला अंधपणाने पाठबळ देणंही योग्य नाही. 

सामाजिक प्रदूषण महाराष्ट्राच्या आरोग्याला घातक

योग्य आहे ते विवेकाने स्वीकारलं पाहिजे. योग्य नाही ते नाकारलं पाहिजे. पण ही विवेक बुद्धीच सध्या भ्रष्ट झालेली दिसते. प्रत्येक गोष्टीकडे जात धर्माच्या चष्म्यांनी पाहणाऱ्या टोळक्यांनी महाराष्ट्राचं समाजमन दुषित केलंय. हे मनामनाला झालेले सामाजिक प्रदूषण महाराष्ट्राच्या आरोग्याला घातक आहे. इंदुरीकर महाराज शरद पवारांना देव म्हणाले म्हणून कुणाला पोटशुळ उठत असेल आणि ते ओकाऱ्या करत असतील तर ते ही विकृतीचं लक्षण आहे.

इंदुरीकर कीर्तनकार असले तरी त्यांनी कुणाला देव मानावं? कुणाचं समर्थन करावं किंवा कोणती राजकीय भूमिका घ्यावी? हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आणि हक्क आहे. तो कुणाला आवडो अथवा न आवडो. इतरांच्या आवडी निवडीशी त्याचा काय संबंध!

इंदुरीकर पवारांना देव मानतात किंवा म्हणतात म्हणून कुणी त्यांच्यावर टीका करत असतील तर तो मुर्खपणा आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणूकीदरम्यान इंदुरीकर महाराज देवेंद्र फडणवीसांसोबत एका कार्यक्रमात दिसल्यावरही अशीच चर्चा सुरू झाली होती. पण त्या चर्चेचा धुरळा लवकर खाली बसला इतकंच!

हेही वाचा : 

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

(लेखक वज्रधारी या साप्ताहिकाचे संपादक आहेत.)