सरकारी अधिकारी का व्हायला हवं?

०४ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ९ मिनिटं


आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण.

खरं तर शिक्षणात काम करणार्‍या माझ्यासारख्या माणसाला या स्पर्धा परीक्षेला बसणार्‍या मुलामुलींना शुभेच्छा देण्यासाठी का बोलावलंय असा प्रश्न मला पडलाय. पण कॉलेजमधे असताना जसं प्रत्येक जण एकतर्फी किंवा दुतर्फी प्रेमात पडलेलाच असतो, तसंच त्या दिवसात एकदा कोणती तरी स्पर्धा परीक्षाही दिलेली असते. स्टाफ सिलेक्शनची अशी एक परीक्षा मीही दिली होती. आपण नेमकं या उत्तरावर का खुणा करतोय हे शेवटपर्यंत समजलं नाही. आपल्याला खूप माहितीय या अहंकाराचा फुगा फोडून मी बाहेर आलो. परत त्या वाटेला गेलो नाही. तेव्हा स्पर्धा परीक्षांकडून प्रेमभंग झालेल्यांचा प्रतिनिधी म्हणून बहुधा मला इथं बोलावलं असावं.

हेही वाचा: सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

अधिकार नसताना प्रबोधनाला मर्यादा

स्पर्धा परीक्षा ज्यांना जमत नाही ते कोल्हयाला द्राक्ष आंबट या थाटात या परीक्षांविषयी नकारार्थी बोलत राहतात. मला आठवतं की, कॉलेजमधे असताना मी माझ्या एका मित्राला पत्र लिहिलं होतं आणि मला नोकरीतल्या अधिकारातल्या पैशाचं आकर्षण नाही असं लिहिलं. ती एक वैराग्याची झिंग असते पण आज शिक्षक झालो त्यात नक्कीच ध्येयवाद असला तरीसुद्धा एक मर्यादाही जाणवते की आपल्यासारखी माणसं लिहू शकतात. अगदी शिक्षणमंत्र्यांना काही सांगू शकतात पण शेजारच्या वर्गातल्या शिक्षकाला काही सांगू शकण्याचे अधिकार आपल्याला नाहीत.

अशावेळी प्रबोधनाच्या या मर्यादाही जाणवतात. किमान अधिकारी होऊन एका जिल्ह्याला तरी दिशा देऊ शकलो असतो असंही मला आज वाटून जातं. आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. जगातल्या खूप मोठ्या प्रश्नांना हात घालण्यापेक्षा समोरच्या दिसणार्‍या प्रश्नांना भिडण्याची आणि ते सोडवण्याची संधी, त्यातून मिळणारं समाधान खूप मोठं आहे.

हातात अधिकार नसताना केलेल्या प्रबोधनाला खूप मर्यादा असतात. अशावेळी एका मर्यादित क्षेत्रात केलेलं अमर्याद काम करण्याची ही संधी मला खूप महत्त्वाची वाटतं. लेखक, कवी, पत्रकार होण्याला जास्त ग्लॅमर असल्यानं ते करियर करावं की, अधिकारी व्हावं असं द्वंद्व मनात अनेकांच्या येईल पण समाजमान्यता लेखक, कवीला जास्त असेल पण म्हणून अधिकारी होण्याला कमी समजण्याचं कारण नाही. एक अधिकारी होऊन काही प्रश्न सोडवण्यातसुद्धा एक निर्मिती असते. समाधान असतं. एखाद्या आयुष्याला आपल्या धोरणातून न्याय देणं एखाद्या कवितेपेक्षा नक्कीच कमी नसतं.

सरकार नावाच्या संस्थेचं काम

अधिकारी वर्गाशी बोलताना मला आणखी एक न्यूनगंड जाणवतो की, त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचं खूप आकर्षण असतं. सामाजिक संस्थांचं सरकारपेक्षा जास्त कौतुक असतं. त्या न्यूनगंडातून ते सामाजिक संस्थांना जास्त झुकतं माप देतात आणि कधीकधी स्वत: राजीनामा देऊन सामाजिक संस्था सुरू करतात. पण अधिकारी होताना एक स्पष्टता आवश्यक आहे म्हणजे न्यूनगंड येणार नाही. शासकीय यंत्रणेविषयी माझं अर्थातच वाईट मत आहे.

मी तर थेट ग्राहकांच्या हातात वाउचर द्यावेत या मताचा पुरस्कार करणारा आहे. तरी हे मोकळेपणानं मान्य केलं पाहिजे की या देशात सरकार नावाच्या सामाजिक संस्थेनं जितकं प्रचंड काम केलं तितकं काम कोणतीच सामाजिक संस्था करू शकली नाही. मी शाळाबाह्य मुलांविषयी अभ्यास करतो पण शाळा, शिक्षक यांच्यावर कितीही टीकात्मक बोलताना माझ्या पुस्तकात, लेखनात मी अनेकदा मांडतो की, शाळांनी जितकी मुलं दाखल केलीत तितकी मुलं कोणतीच एनजीओ दाखल करू शकली नाही.

शाळाबाह्य मुलं दाखल केल्यावर त्याच्यासाठी एक ब्रिज कोर्स असतो. गडचिरोली जिल्ह्यात अशा ३२ शाळांतून २००६ साली ७०० मुलं मी बघितली होती. यवतमाळ जिल्ह्यात तर एक वेठबिगार म्हणून बापाने मालकाकडे ठेवलेला मुलगा शिक्षकांनी सोडवून आणलेला मी या  शाळेत बघितला तेव्हा शहारलो होतो. सरकारी यंत्रणेद्वारे हे खूप शांतपणे होतं पण त्याचं कुठंही कौतुक होत नाही.

हेही वाचा: ब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची?

एनजीओ सरकारला पर्याय नाही

एका एनजीओने जर असा मुलगा सोडवला असता तर केवढा गाजावाजा झाला असता. तीच गोष्ट आरोग्याची आहे. देवीचा रोगी किंवा पोलिओ मोहीम या देशव्यापी मोहिमा केवळ सरकार नावाची एक अजस्र यंत्रणाच घडवू शकली. एनजीओचा रोल केवळ फोटो पुरताच पूरक राहिला पण आपली माध्यमं, आपले मंत्री एनजीओच्या सामाजिक कामाचं जितकं कौतुक करतात तितकं सरकारी यंत्रणेचं कधीही करत नाहीत. त्यातून तरुण वयात अधिकारी होण्यापेक्षा आपण सामाजिक कार्यकर्ते व्हावं असंच वाटायला लागतं.

ही स्पष्टता असेल तर हा भ्रम होणार नाही आणि अधिकारी होण्याकडेच कल राहील. शेवटी जीवनसत्व ही जेवणातूनच मिळाली पाहिजे आणि जर ती मिळाली नाही तर ती औषधातून द्यावी लागतात. त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणा हाच प्रश्न सोडवायचा मुख्य प्रवाह आहे. तो जिथे प्रभावी काम करत नाही त्या स्पेसमधे एनजीओ काम करतात. तेव्हा मुख्य प्रवाहात काम करण्याची जास्त गरज आहे. एनजीओ हा सरकारला पर्याय होऊ शकत नाही आणि आपल्या एनजीओसुद्धा सरकारी यंत्रणा सुधारण्यापेक्षा सरकारला पर्याय बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

कल्पनेकडचं एक जग

एखाद्या जिल्ह्यातलं सरकारी हॉस्पिटल चांगलं चालावं यासाठी दबावगट निर्माण करण्यापेक्षा स्वत:चं हॉस्पिटल काढणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. अधिकारी झाल्यावर सामाजिक बांधिलकी जपता येईल का? हा आजचा विषय आहे. माझी चिंता ही आहे की मागच्या पिढीत जी गरिबांविषयी कणव अनेकात असायची ती आज वेगाने कमी होतेय. मागच्या पिढ्यांपूर्वी अनेकांनी उपाशी राहण्याचा अनुभव घेतला होता. गावातलं सर्वांचं एकूण उत्पन्न जवळपास सारखंच असायचं. त्यामुळे गरीब नसणार्‍यांनाही गरिबांचं भावविश्व माहीत असायचं.

माझ्या पिढीत नागरीकरण खूप वेगानं वाढलं. एकाच गावात भारत आणि इंडिया स्पष्टपणे जाणवायला लागलं. ऐपतीप्रमाणे शाळा ही वेगळ्या झाल्या. त्यापेक्षा ही शहरी भागात तर मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय जीवनशैलीत तर ही गरीबी ही अनुभवणं  दिसायलाही तयार नाही. पुन्हा जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात प्रत्यक्षात गरिबी हटली नसेल पण ती माध्यमातून, मनोरंजनातून नक्कीच हातळली आहे. पूर्वी चित्रपटाचा नायक हा झोपडपट्टीतला असायचा. अमिताभ ते राजकपूर या नाहीरे वर्गाला आपला प्रतिनिधी वाटायचा.

ते सारं आज बावळटपणा या सदरात वाटावं इतक्या वेगानं हे सारं बदललं. मुलांचं भावविश्व एक करायला कॉमन स्कूल करावेत की वाउचर पद्धती आणावी यावर वाद होऊ शकतील पण ते नसण्याचा एक परिणाम होतो की, नवी पिढी भावनिक दृष्ट्या कुपोषित होते. त्यांच्या कल्पनेकडचं एक जग त्यांच्या भावविश्वात येतच नाही. भगवान बुद्धांच्या वडिलांनी जसं कोणतंच दु:ख आपल्या मुलाच्या डोळ्याला पडू नये असा प्रयत्न केला तोच प्रयत्न आज सगळे पालक करतायत.

हेही वाचा: कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?

स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आणि भूमिकाही

हे वंचितांचं जग आपल्या मुलांना माहीत व्हावं असा जाणीवपूर्वक प्रयत्नही ते करत नाहीत. हे मी अशासाठी सांगतोय की, हीच मुलं नंतर सरकारी अधिकारी होतात आणि त्यांच्या विकासाच्या कल्पना त्याच उच्च मध्यमवर्गीय जगातल्या असतात. गुळगुळीत रस्ते बनवणं म्हणजे विकास. शहरातल्या घाणेरड्या झोपड्या हटवा. फेरीवाल्यांना हाकला. रहदारीचा प्रश्न जीवनमरणाचा मानणं हे अजेंडा अधिकारी रेटत राहतात. अनधिकृत झोपडपट्टीतली अगतिकता, आदिवासींचं अतिक्रमण या बेकायदा गोष्टींमागची नैतिकता ते समजू शकत नाहीत.

या अधिकारीवर्गाच्या भावविश्वात ही कणव कशी संक्रमित करता येईल ही मला सर्वात मोठी समस्या वाटते. अधिकारी वर्गाला सामाजिक विषयांवर संवेदनशील कसं बनवायचं ही मोठी समस्या वाटते. बालकामगार हा विषय घेऊन पोलिस अधिकार्‍यांकडे मी जातो तेव्हा ते पारंपरिक पद्धतीने प्रतिवाद करतात. एक अधिकारी म्हणाला की, तुम्ही मुलांना कामावरून काढाल तर ते चोर होतील. त्याचे पालक उपाशी राहतील. हे ते प्रश्नच मुळातून माहीत नसल्याने होतं म्हणून अधिकारी होणार्‍या माझ्या या तरुण मित्रांना मला हे सांगायचंय की, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचण्याइतकं महत्त्वाचं ही मनोभूमिका तयार करणं हेही तितकंच महत्वाचं आहे.

सुखासीन जगण्याच्या कल्पना तपासाव्या

मान्य आहे की हे जगणं तुमच्या माझ्या वाट्याला आलं नाही पण अशा प्रकारच्या जगण्याचं वर्णन असलेल्या पुस्तकांच्या वाचनाने आपण या जगाशी जोडले जाऊ शकतो. सुदैवाने मराठीत अशाप्रकारचं खूप साहित्य उपलब्ध आहे. अनिल अवचट यांनी मराठी मध्यमवर्गाच्या सुखासीन जगण्याला या भयावह वास्तवाची दाहकता लक्षात आणून दिली हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे सर्व दलित आदिवासी आणि भटके विमुक्त लेखकांची आत्मकथनं ही मुळातून वाचली तरीसुद्धा त्या विश्वाशी आपला परिचय होतो.

शाळाबाह्य मुलांचं भावविश्व, महिलांची वेदना रेखाटणारी पुस्तकं वाचायला हवी. पी साईनाथ यांच्या‘दुष्काळ आवडे सर्वांना’या पुस्तकाने माझ्यासारख्या लाखो लोकांच्या जाणिवा तीव्र केल्या. जगण्यात एक कायमचा अपराधीपणा निर्माण केला. आपल्या सुखासीन जगण्याच्या कल्पना या माणसांच्या शोषित जगण्याच्या पार्श्वभूमीवर आपण तपासून घ्यायला लागलो, या पुस्तकात इतकी दाहक वर्णनं आहेत की, या माणसांविषयी आपण काहीच करू शकत नाही एवढ्या एकाच जाणिवेनं आपण खचून जातो.

नारळाच्या झाडावर हजारो फुटांची चढउतार करणारे नारळ काढणारे लोक, सायकलवर दगडी कोळसा विकणारे बिहारमधले मजूर, लाकडी मोळ्या विकण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करणार्‍या मध्यप्रदेशाच्या बायका हे सारं आपण आपल्या सुखासीन जीवनाशी ताडून बघताना लाज वाटू लागते. अशा जाणिवा विकसित झालेला अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात या संवेदनेतून काम करू शकतो.

वंचितांच्या बांधिलकीशी जोडलेलं मूल्य

स्पर्धा परीक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता केवळ पोपटपंची करून चालत नाही तर लेखी पेपर आणि मुलाखतीत आकलन तपासलं जातं. तुम्ही ज्या परिसरात राहता त्यावर प्रश्न विचारले जातात. अशावेळी आपल्या परिसरात जाऊन गरिबी प्रत्यक्ष वाचायला हवी. गरिबी पुस्तकात वाचण्यापेक्षा आपण ती गरिबाच्या नजरेत वाचली पाहिजे. आपल्या परिसरात येणारे ऊसतोडणी कामगार वीट भट्टी मजूर कसे जगतात हे प्रत्यक्ष जावून बघायला हवं.

गरिबांच्या वस्तीला भेट देणं आणि एखाद्या धबधब्याला भेट देणं सारखंच असतं. धबधब्याखाली ओलं होण्यापासून तुमचा बचाव करू शकत नाही तसं या वस्तीला भेट दिल्यावर तुमच्या मध्यमवर्गीय जाणिवांचा तुम्ही बचाव नाही करू शकत. भावविश्वावर खोलवर परिणाम होतात आणि तुमच्या सर्व कृतीतून ते पाझरतात. गांधी जेव्हा असं म्हणतात की, कोणताही निर्णय घेताना तुम्ही आजपर्यंत बघितलेल्या सर्वात दीन माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि माझ्या या निर्णयाचा यांना काही फायदा होणार आहे का, या निकषावर काम करणं यात गांधींना हेच अभिप्रेत आहे.

अधिकारी झाल्यावर साधेपणाने राहणं हेसुद्धा पुन्हा या वंचित वर्गाच्या बांधिलकीशीच जोडलेलं मूल्य आहे. गांधींचा एकदा रुमाल हरवल्यावर ते दूसरा रुमाल घ्यायला तयार नव्हते. याचं कारण तो पैसा गरीब जनतेचा आहे. त्याचा कसाही वापर मी नाही करू शकत नाही ही त्यांची भावना होती. साधेपणा हे मूल्य केवळ उपदेशातून येत नाही तर हा 'नाही रे'चा परीघ त्याला असावा लागतो.

हेही वाचा: लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

आत्मसन्मान जपायला हवा

मला दिल्लीत परदेशी पाहुणे आल्यावर किंवा सर्वच समारंभात जी उधळपट्टी चालते ती बघितल्यावर त्या खर्चापेक्षा त्या अधिकार्‍यात आपण हे सारे कोणत्या माणसांचे प्रतिनिधी म्हणून करतो आहोत ही जाणीव त्यात नसते हे जास्त अस्वस्थ करतं. मुशर्रफ भारतात आले तेव्हा जेवणासाठी केलेल्या ११० पदार्थांची वर्णनं मला अजूनही आठवतात. हे सारं तुम्ही भुकेकंगाल देशात करता याची कोणतीही अपराधीभावना नसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांच्या शपथविधीचा खर्च ९९ लाख असतो. त्यावर रेष सुद्धा उमटत नाही हे मला जास्त अस्वस्थ करतं.

सरकारी अधिकारी आणि राजकीय दडपण यावर ही एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आहे. मला वाटतं आपला आत्मसन्मान जपणं सर्वात महत्त्वाचं आहे. सिकंदराने पुरू राजाला युद्धात हरवल्यावर त्याला बांधून सिकंदरापुढे आणलं. तेव्हा सिकंदर त्याला विचारतो की मी तुला कसं वागवू सांग? तेव्हा तो म्हणतो की एक राजा दुसर्‍या राजाला जसं वागवेल तसंच मला वागव. हा आत्मसन्मान आपण जपायला हवा. तुम्ही एकदा झुकायला सुरवात केली की मग त्या झुकण्याला शेवटचं असं काही राहत नाही.

राजकीय दडपणात काम करावं लागतं हे मान्यच आहे पण दडपण सुरू होण्याच्या मर्यादेपर्यंत तरी काम करायला काय हरकत आहे? गायीच्या गळ्यात ५० फूट दोरी बांधून तिला चरायला सोडलं आहे. ती ५१व्या फुटापर्यंत चरायला गेली की, तिच्या गळ्याला हिसका बसणार पण मग ४९ फूट चालायला काय हरकत आहे? त्या मर्यादेतही करण्यासारखं खूप असतं पण ५० फुटावर हिसका बसेल म्हणून एक फूटही न चालणारेच अधिकारी जास्त आहेत. उलट जास्त आत्मसन्मान ठेवणार्‍यांवर राजकीय दडपण येत नाही असेच अनुभव जास्त आहेत.

नेताजींच्या नावाने चालणार्‍या या अकादमीत आमच्यासारख्या अनेकांची व्याख्यानं स्पर्धा परीक्षेतल्या मुलांसाठी ठेवली जातात. या सर्वांचा शेवटी हेतू काय? मला माझे शिक्षक ‘दो आखे बारह हाथ’ या जुन्या चित्रपटातली एक गोष्ट सांगायचे. एक जेलर सहा कैद्यांना सुधारतो. ते कैदी सुधारतात. हिंसा सोडून शेती करतात. दरम्यान तो जेलर मरून जातो. कैदी बाजारात भाजी विकायला बसतात. गावकरी त्यांना चोर समजून मारायला लागतात. ते खूप मार खातात. शांत राहतात पण एकाक्षणी ते बिथरतात.

ते प्रतिकार करणार तितक्यात त्यांना आकाशात आपल्या त्या जेलरचे त्यांच्याकडे बघत असलेले डोळे दिसतात आणि ते थबकतात. माझे शिक्षक विचारायचे की समजा त्या कैद्यांना ते दोन डोळे दिसले नसते तर सगळा बाजार त्या कैद्यांनी रक्ताने माखला असता. थोडं थांबून माझे शिक्षक म्हणायचे की, असं आपल्या आयुष्यात कोणते तरी दोन डोळे असले पाहिजेत की मोहाच्या क्षणी आपल्यावर रोखले जातील. या अकादमीत अशी वेगवेगळी होणारी व्याख्यानं तुम्ही अधिकारी झाल्यावर मोहाच्या क्षणी तुमच्यासाठी 'बाबाजी की दो आँखे' म्हणून काम करो हीच सदिच्छा देऊन थांबतो.

हेही वाचा: 

मीम्सवादाचा भावनिक जांगडगुत्ता!

समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

विराट कोहलीच्या माथ्यावर ‘३६’चा शिक्का लावणारी टेस्ट सिरीज

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन

आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'

(हेरंब कुलकर्णी यांच्या फेसबुक पोस्टमधून साभार)