लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

०९ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात.

२०२१ कोरोनाच्या मुक्तीची चाहूल घेऊन येईल असं भाकीत वर्तवलं जात होतं. होतंय ही तसंच! कोरोना वायरसविरोधातलं लसीकरण अनेक देशांत चालू झालंय. ब्रिटन आणि अमेरिकेत अनेकांना ही लस मिळू लागलीय. भारतातही ड्राय रन म्हणजे लसीकरणाची रंगीत तालीम झालीय. आता लवकरच प्रत्यक्षात लस द्यायला सुरवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय.

या घोषणेनं देशभरात आनंदाचं वातावरण तर आहेच. पण त्याचबरोबर लसीविरोधात भीतीही लोकांच्या मनात दिसते. आपत्कालीन परिस्थितीत तयार झाली म्हणून आधीच लसीच्या संशोधनाला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यात लसीचे साईड इफेक्ट होत असल्याच्या अनेक उलट्यासुलट्या बातम्या पसरतायत. कोरोनाच्या लसीमुळे एचआयवीची लागण होते, किंवा अगदी लसीमुळे नपुंसकत्व येतं असंही बोललं जातंय.

त्यामुळेच लस घ्यायची की नाही, असंही अनेकांना वाटू लागलंय. पण खरंतर, कोरोनाच्या लसीमुळे असे कोणतेही भयंकर साईड इफेक्ट होत नाहीत. याउलट साथरोगापासून वाचण्यासाठी लसीशिवाय दुसरा चांगला पर्याय आपल्याकडे नाही. म्हणूनच या साईड इफेक्टचे सगळे रागरंग पहायला हवेत.

साईड इफेक्ट म्हणजे शरीराची प्रतिक्रिया

कोणत्याही वायरसच्या अंगावर काट्याकाट्यासारखा भाग असतो. त्याला स्पाईक प्रोटीन असं म्हटलं जातं. या भागामुळेच वायरस शरीरातल्या पेशींवर हल्ला करू शकतो. म्हणूनच अनेकदा वायरसचं हे स्पाईक प्रोटीन किंवा त्या स्पाईक प्रोटीनचा एक अंश वायरसपासून वेगळा करून लसीत वापरला जातो. अनेकदा संपूर्ण वायरस अर्धमेल्या स्वरूपात लसीत वापरलेला असतो.

हे स्पाईक प्रोटीन किंवा अर्धमेले वायरस शरीरात गेले की प्रत्यक्ष वायरस आल्याप्रमाणेच शरीरात युद्ध सुरू होतं. स्पाईक प्रोटीनवरून या वायरसला मारायला कोणत्या अँटीबॉडी लागतील ते शरीर शोधून काढतं. स्पाईक प्रोटीन किंवा वायरस सक्रीय असतो. त्याच्यामुळे शरीराला काहीच होत नाही. पण तो शरीरात गेल्याने रोगप्रतिकारशक्ती मिळते.

असं लसीचं काम चालतं. लस टोचली म्हणजे शरीरात बाहेरून एखादी गोष्ट आत घातली. अशी कोणतीही बाहेरची गोष्ट शरीरात गेली की शरीर त्यावर प्रतिक्रिया देतंच. म्हणूनच आपल्याला लसीचे साईड इफेक्ट दिसतात, असं डब्लूएचओच्या सायन्स इन ५ या युट्यूब वीडियोत डॉक्टर कॅथरीन ओब्रिन यांनी सांगितलंय.

हेही वाचा : कोरोना काळात मानसिक ताणतणावाचं नियोजन कसं करायचं?

लसीमुळे जीव जाऊ शकतो?

जगातल्या कुठल्याही लसीनं सहसा खूप गंभीर साईड इफेक्ट होत नाही. लस घेतलेल्या जागी सूज येते. तो भाग लाल होतो. अनेकदा वेदनाही होतात. शरीराच्या इतर ठिकाणीही रॅश येते. लस घेतल्यामुळे ताप आल्याचंही खूप वेळा दिसतं. घसा खवखवणं, अंग दुखणं हे सुद्धा लसीचे सौम्य साईड इफेक्टच आहेत. लस घेतल्यानंतर दोन ते तीन तासांतच ही सौम्य लक्षणं दिसू लागतात. आणि २ ते ४ दिवसांत आपल्याला बरंही वाटू लागतं.

खरंतर, लसीमुळे काही गंभीर आणि असह्य लक्षणंही दिसू शकतात. फेफरे येणं किंवा जीवघेणी, आयुष्यभर राहिल असे रॅशेसही येऊ शकतात. किंवा अगदी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. पण ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना मानली जाते. १० लाख लोकांना लस दिली जात असेल तर त्यातल्या एखाद्यालाच असं होण्याची फक्त शक्यता असते, होतंच असं नाही. आणि असं होण्यामागे त्या माणसाचं स्वतःचं आरोग्य आणि शरीराची रचनाही कारणीभूत असते.

लसीच्या कामात अडथळा येतोय?

जगात कोणतीही लस दिली तरी त्याचे थोडे साईड इफेक्ट होतातच. लस देताना त्याचे साईड इफेक्ट कोणते असतात याची माहिती देणं बंधनकारक असतं. ही माहिती मिळाली की मग एवढे साईड इफेक्ट असतील तर लस कशाला घ्यायची असं अनेकांना वाटतं. अनेक पालक तर आपल्या बाळाला लस द्यायची नाही, असं ठरवतात. पण लस दिल्यामुळे दिसणारी लक्षणं आणि प्रत्यक्ष रोग झाल्यावर होणारी लक्षणं यांची तुलना केली तर लस बरी असं वाटू लागेल.

कोणत्याही लसीला मान्यता देण्याआधी अनेक चाचण्या होतात. आधी प्राण्यांवर आणि त्यांना त्रास झाला नाही तर माणसांवर या चाचण्या होतात. माणसांनाही त्रास झाला नाही तरच त्या लसीला सुरक्षितेतंचं सर्टिफिकेट मिळतं. यासाठी खूप मोठ्या समित्या, सरकारी संस्था काम करत असतात. भारतात 'ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया' ही सरकारी संस्था हे काम करते. साहजिकच, फार गंभीर साईड इफेक्ट होणाऱ्या लसीला कधीही मान्यता दिली जात नाही.

वैद्यकीय भाषेत लसीला प्रतिकूल घटना असं म्हणतात. लसीला शरीरात काम करताना अडथळा आणणाऱ्या या घटना आहेत असं मानलं जातं. पण म्हणजेच, साईड इफेक्ट हे लस शरीरात काम करतेय याचं लक्षणं असतं. त्यामुळेच साईड इफेक्ट दिसत असले तरी लस घेणं खूप महत्त्वाचंय हे आपण लक्षात ठेवायला हवं.

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

तीन वेळा चाचण्या झालेली लस

२० व्या शतकात लहान मुलांमधले बहुतेक रोग काढून टाकायला लसीनं मोठी मदत केलीय. गोवर, देवी, रूबेला या आजारांच्या लसीनं अनेक मुलांना जीवनदान दिलंय. पण याही लसींमुळे ऑटिझम होतो, मोठेपणी डायबेटीसची सुरवात होते अशा अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण ऑटिझम किंवा डायबेटीस आणि साथरोगांच्या लसीचा कोणताही संबंध असल्याचं कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासातून समोर आलेलं नाही.

आता कोरोना वायरसच्या लसीविषयी गैरसमज तयार होऊ लागलेत. पण लसींच्या तुलनेत ही लस थोडी घाईत तयार करण्यात आली असली तरी अनेक तज्ञांच्या नजरेखालून गेल्यानंतर, माणसांवर तीन चार वेळा चाचण्या झाल्यानंतरच लस बाजारात आलीय. त्यामुळे एचआयवीची लागण किंवा नपुंसकत्व असे कोणतेही परिणाम लसीमुळे होत नाहीत.

लक्षणं दिसली तर काय करायचं?

कोरोनाच्या लसीमुळे काही सौम्य साईड इफेक्ट नक्कीच होतील. भारत बायोटेकची कोविशिल्ड ही लस घेतली तर लस घेतलेल्या जागी सूज येणं, वेदना होणं त्याचबरोबर थंडी ताप भरून येणं, थकवा येणं, डोकं दुखणं अशी काही लक्षणं दिसलीत, असं कंपनीचे संचालक क्रृष्णा इला यांनी स्पष्ट केलंय. तर, सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या कोवॅक्सिन या लसीमुळेही साधारण अशीच लक्षणं दिसतायत. अमेरिकेत आणि युरोपात मॉडर्ना आणि फायझरकडून बनवलेल्या लसीमुळेही अशीच लक्षणं दिसून आलीयत.

अशी लक्षणं दिसून आली तर काही सोपे उपाय करून आराम मिळू शकेल असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय. लस घेतली त्या जागी लाल झालं असेल, सूज आली असेल तर एक स्वच्छ रूमाल गार पाण्यात भिजवून त्या जागी लावावा. हात दुखतोय म्हणून त्याची हालचाल बंद करू नये. ताप येत असेल तर ढगळे कपडे घालावेत आणि भरपूर पाणी प्यावं, असं त्यांनी सांगितलंय.

फारच त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांना विचारून पॅरासिटेमॉलसारखी गोळी घेता येईल. ही लक्षणं दोन ते तीन दिवसांत जायला हवीत. गेली नाहीत तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, असं सीडीसीनं स्पष्ट केलंय.

साथरोग पूर्णपणे घालवायला लसीचे दोन डोस आपल्याला घ्यावे लागणार आहेत. पहिल्या डोसनंतर असे साईड इफेक्ट दिसले म्हणून दुसरा डोस सोडून द्यायचा नाहीय, असं सीडीसीनं आवर्जून सांगितलंय.

हेही वाचा : 

थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात