जगाला अचंबित करणारी भारताची अवकाशझेप

२४ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोचं पहिल्यांदाच एका खासगी कंपनीचं रॉकेट लॉन्च केलंय. 'विक्रम एस' असं या रॉकेटचं नाव आहे. हैदराबादस्थित स्कायरूट या कंपनीने हे रॉकेट बनवलंय. १९६०ला सुरू झालेल्या भारताच्या वाटचालीतला हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय. भारताच्या अवकाश क्षेत्राला मोठी चालना देणारं हे ऐतिहासिक पाऊल आहे.

पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका हे आयआयटीचे विद्यार्थी. दोन्हीही तिशीतले तरुण. २०१२ला आयआयटीतलं शिक्षण पूर्ण करून दोघांनीही इस्रो जॉईन केलं. पवन हा शास्त्रज्ञ तर नागा हा इंजिनिअर म्हणून काम करू लागला. त्यांची पहिली भेट झाली ती इस्रोच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रात. रॉकेटबद्दची उत्सुकता हा दोघांनाही जोडणारा दुवा ठरला.

पुढे दोघांनीही रॉकेट बनवायचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी इस्रोतली नोकरी सोडली. २०१८ला स्कायरूट एरोस्पेस या नावाने स्वतःची खासगी कंपनी काढली. अवकाश तंत्रज्ञानात इतर देशांच्या खासगी कंपन्यांचा बोलबाला आहे. त्या तुलनेत आपण पिछाडीवर होतो. पण स्कायरूटमुळे आता याही क्षेत्रात भारताची दमदार एण्ट्री झालीय.

स्कायरूट कंपनीनं बनवलेलं भारताचं पहिलं 'विक्रम एस' हे खासगी रॉकेट १८ नोव्हेंबरला अवकाशात झेपावलं. इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई हे पवन आणि नागा यांचा आदर्श. त्यांचं नाव या रॉकेटला दिलं गेलंय. आपल्या आजपर्यंतच्या अवकाश क्षेत्रातल्या वाटचालीतला हा एक महत्वाचा टप्पा आहे.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

नेहरू-साराभाईंची दूरदृष्टी

१९५७ला रशियानं स्फुटनिक हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. या घटनेनं जगाचं लक्ष वेधलं. इकडे भारतातही वेगवेगळ्या पातळ्यांवर अवकाश संशोधनासंदर्भात घडामोडी घडत होत्या. विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांचं यात मोलाचं योगदान होतं. त्याला जोड मिळाली ती भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विज्ञानप्रेमाची. नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत अवकाश संशोधनाला बळ दिलं.

भारताच्या अवकाश मोहिमांची चर्चा होत असताना हमखास नाव येतं ते इस्रोचं. इस्रो ही भारताची अंतराळ संशोधन संस्था. ५० वर्षांचा भरभक्कम इतिहास असलेल्या या संस्थेची पायाभरणी केली ती विक्रम साराभाई यांनी. तेच इस्रोचे संस्थापक. या इस्रोचं मूळ होतं ते नेहरूंनी १९६२ला स्थापन केलेल्या 'भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समिती'मधे. त्यातूनच पुढं १५ ऑगस्ट १९६९ला इस्रोची स्थापना झाली. नेहरूंच्या दूरदृष्टीचीच ही रुजवात होती.

१९६२ला नेहरूंचा मृत्यू झाला. चारेक वर्षानं सारभाईंची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमी भाभांचाही रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही धक्क्यांमधून सावरत इस्रोच्या माध्यमातून विक्रम साराभाईंनी भारताच्या अवकाश संशोधनाला आधुनिक रूप दिलं. अवकाश कार्यक्रमांसाठी भारताला सज्ज केलं.

अवकाश विज्ञानातली वाटचाल

भारताच्या अवकाशयुगाचा उदय हा १९६३मधे झाला. याच वर्षी केरळच्या थुंबा इथून एक छोटं रॉकेट अवकाशात झेपावलं. भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेलं आणि अगदीच खेळण्यासारखं दिसणारं हे भारताचं पहिलं रॉकेट होतं. ही आपली सुरवात होती. पुढे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह १९७५ला रशियाच्या मदतीने लॉन्च करण्यात आला. तेव्हा केवळ एक प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं.

१९६०-१९७०चं दशक भारतातल्या अवकाश संशोधन आणि आपल्या एकूण पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. १९८०ला भारताने रोहिणी हा स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशात लॉन्च केला. पुढच्या काळात आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातली स्वदेशी उपग्रह यंत्रणा आपण उभारली. यामधे ९ उपग्रह होते. दूरसंचार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, शोध आणि बचाव मोहिमेसाठी म्हणून १९८३ला हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवले गेले. हा प्रयोग संचार क्षेत्रातली क्रांती ठरला.

ऑक्टोबर २००८च्या चांद्रयान १ या भारताच्या मोहिमेनं तर अंतराळ प्रक्षेपणाचं पूर्ण रूप पालटवलं. भूशास्त्र विज्ञान, चंद्रावरची खनिज साठ्याची माहितीच या चांद्र मोहिमेनं भारताला करून दिली. २०१७ला इस्रोने रॉकेट पीएसएलवीच्या मदतीने एकाचवेळी १०४ उपग्रह लॉन्च करून विश्वविक्रम केला. तेव्हा भारताने रशियाचा ३७ उपग्रह लॉंचिंगचा विक्रम मोडीत काढला होता. यातून भारताने 'हम भीं कुछ कम नहीं' हे जगाला दाखवून दिलं होतं.

हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

भारताचा स्वतःचा मार्ग

मागच्या काही काळात अवकाश मोहिमा करण्यासाठी जगभरातल्या देशांमधे स्पर्धा लागलीय. शक्तिशाली देश म्हटलं की, त्यांच्याकडचं तंत्रज्ञानही त्याच प्रकारचं असतं. त्यांना त्याचा फायदा होतो. बाकीचे देश ते तंत्रज्ञान आयात करतात किंवा या बड्या देशांची मदत घेतात. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर यात अमेरिका, रशिया, चीनसारखे देश आघाडीवर आहेत. इतर देश हळूहळू आपली पावलं टाकतायत. भारत यातल्या बड्या देशांना तगडी टक्कर देतोय.

भारताने केवळ अवकाश संशोधन केलं नाही तर उपग्रह आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. त्यामुळेच आज इस्रो जगातल्या प्रमुख ६ अंतराळ संस्थांमधे नावाजली जाते. आपण मंगळ, चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच्या मोहिमा यशस्वी करून दाखवल्या. ज्या काही थोड्या थोडक्या देशांना हे जमलं त्यापैकी भारत देश एक आहे. मातीतून उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता आज आपल्या इस्रोकडे आहे. इतर देशांवरचं अवलंबित्व कमी करून आपला एक स्वतःचा मार्ग आपण शोधून काढलाय.

भूतकाळानं दिलेली संधी

स्वतःचं खासगी रॉकेट अवकाशात पाठवणारे फार कमी देश आहेत. 'विक्रम-एस'मुळे भारत त्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसलाय. केंद्र सरकारची 'इन स्पेस ई' ही संस्था इस्रो आणि अवकाश कंपन्यांमधे दुवा ठरलीय. या संस्थेच्या माध्यमातून अवकाश क्षेत्रात खासगी कंपन्यांना येण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलंय. त्यादृष्टीने स्कायरूट ही या क्षेत्रातली पहिली खासगी कंपनी ठरली.

भारताचं मंगळयान २००८ला अगदी पहिल्याच फटक्यात मंगळावर पोचलं होतं. अमेरिकेला त्यासाठी पाचवेळा प्रयत्न करावे लागले होते. केवळ ४५० कोटींमधे ही मंगळ मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली होती. तर चांद्रयान १ ही मोहीम ३९० कोटींमधे झाली. त्या तुलनेत अमेरिका आणि रशियाला मात्र मोठा खर्च करावा लागला होता. आताची स्कायरूटचं विक्रम एस रॉकेट कमी खर्चात अवकाशात पाठवलं गेलंय.

आजचा भारत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका, चीन, इंग्लंड, रशिया यांच्या तोडीची कामगिरी करतोय. त्यामुळे आज भारताला या क्षेत्रात मोठी संधी आहे. भूतकाळात अवकाश विज्ञान क्षेत्रातला पाया भक्कम केल्यामुळेच आज आपली वाटचाल स्वतःचं खासगी रॉकेट अवकाशात झेपावण्यापर्यंत झालीय. या आपल्या यशस्वी वाटचालीकडे अधिक डोळसपणे बघायला हवं.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ