रामायण, महाभारताचं स्वागत करायला काय हरकत?

०५ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही.

कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी देशात २४ मार्च २०२० पासून संपूर्ण टाळेबंदी केलीय. देशात सगळ्यांना १४ एप्रिलपर्यंत घरातच थांबायला सांगितलं गेलंय. या काळात भारत सरकारने दूरदर्शनवर पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिका दाखवण्यास सुरवात केलीय.

अंधश्रद्धेचा आरोप कितपत योग्य?

पण त्यावर अनेकांनी टीका करायला सुरवात केलीय. सरकार रामायण - महाभारत पुन्हा दाखवून धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप सामाजिक आणि राजकीय भुमिकेतून केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला रामायण - महाभारत अंधश्रद्धेचा आणि दैववादाचा प्रचार, प्रसार करते असाही आरोप काही जण करत आहेत.

दूरदर्शन या निमसरकारी टीवी चॅनलवर रामानंद सागर यांच्या रामायण आणि बीआर चोप्रा यांच्या महाभारत या धार्मिक विषयांवरच्या मालिकांसोबत रामनंद सागर यांचीच 'कृष्णा', येशू ख्रिस्त यांच्या जीवनावरची 'दयासागर', त्याबरोबरच गौतम बुद्ध, महावीर, महादेव अशा अनेक मालिका येऊन गेल्या. यामधेही असे अनेक प्रसंग होते जे वैज्ञानिक कसोटीवर टिकू शकत नव्हते. या मालिकांची लोकप्रियता, पर्यायाने प्रभाव रामायण - महाभारत यांच्याइतका नव्हता, हेही वास्तव आहे.

धार्मिक मालिकांमधला नायक हा प्रत्यक्ष दैवत असल्यामुळे दैवी आणि चमत्कारिक प्रसंग कथानकात असणं स्वाभाविकच आहे. असे प्रसंग मग ते कोणत्याही धार्मिक व्यक्तिरेखेवरच्या मालिकांतले असोत, ते वैज्ञानिक कसोटीवर टिकणारच नाहीत. पण धार्मिक ग्रंथांतल्या, कथेतल्या अशा अवैज्ञानिक गोष्टी रंजकता या प्रमुख हेतूनेच समाविष्ट असतात. म्हणून त्यावरची टीका अयोग्य ठरते. अंधश्रद्धा, दैववाद, अतार्किक प्रसंग विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाहीत, म्हणून त्यांना विरोध करायचा असेल तर जगात सर्वच धर्मग्रंथावर आणि धर्मस्थळांवर बंदी आणावी लागेल. मग धर्मस्वातंत्र्य हा विषयच असणार नाही.

हेही वाचा : जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांना संधी नको

धर्मशरणता किंवा धर्मांधता याचा विरोध अनेक वैचारिक आधारावर होतो. त्यात उदारमतवाद, विज्ञानवाद, निरीश्वरवाद अशा अनेक विचारधारा आहेत. मात्र धर्मशरणतेचा विरोध करताना काही बाबतीत निरीश्वरवादी पद्धतीने आणि काही ठिकाणी विज्ञानवादाच्या आधारावर तर काही ठिकाणी उदारमतवादी होऊन प्रतिक्रिया दिल्या जातात. अशा विविध प्रसंगी विविध आधारांमुळे आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात त्या विरोधाचं आकलन चुकीचं केलं जातं.

परंतु धर्मग्रंथात विज्ञान असल्याचा मूर्ख दावा विविध धर्माचे अधिकारी करू लागतात, तेव्हा त्यांची पोलखोल गरजेची ठरते. परंतु  धर्मग्रंथांतल्या अवैज्ञानिक बाबी निव्वळ श्रद्धा या शुद्ध स्वरूपात केवळ आत्मिक समाधान आणि शांती एवढ्याच स्वरूपात मान्य असतील, त्याचा समावेश धर्मस्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य यात करावा लागतो. मग अवैज्ञानिक बाबीही व्यवहारात मान्य कराव्या लागतात, हे समाजशास्त्रीय सत्य आहे.

त्यामुळे धार्मिक कथांमधल्या आधिकाधिक सकारात्मक बाबी लोकांसमोर आणायला हव्यात. रामायणातील राम, जनक आणि बिभिषणाच्या तसेच महाभारतातील भीष्म, विदुर, कृष्ण यांच्या संवादातून अनेक आधुनिक नीतिमूल्यांचे प्राचीन संदर्भ सापडतात. म्हणून रामायणावर टीका करून परधर्मद्वेषावर आधारित धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांना संधी देता कामा नये!

कोर्टाच्या निकालानंतरची पहिली रामनवमी

राम मंदिर प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून दिल्यानंतरची पहिलीच रामनवमी साजरी करायचे ठरले होते. कारण या वर्षीच्या राम जन्मोत्सवाला एक वेगळंच महत्व होतं. कोर्टाच्या आदेशानुसार न्यास स्थापन करून मंदिर निर्माण करण्यास सुरूवात झाली होती. त्यानुसार या वर्षीचा रामजन्मोत्सव अयोध्येत दिमाखात साजरा करावा म्हणून तयारी झाली होती.

रामायण या मालिकेत रामाची भूमिका करणारे कलाकार अरूण गोविल यांनी रामायण मालिकेतले अनुभव आणि एकूणच रामभक्ती यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्याचं प्रकाशन लवकरच होत आहे. त्यानिमित्ताने एका खासगी न्यूजचॅनलनं त्यांची आणि त्या मालिकेत काम करणाऱ्या इतर कलाकरांची मुलाखत घेतली होती. परंतु कोरोनाच्या साथीमुळे अयोध्येतील रामजन्मोत्सवासह सर्वच कार्यक्रम रद्द केले गेले.

हेही वाचा : प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

`रामा`ने काँग्रेसचा प्रचार केला होता

चित्रपट निर्माते रामानंद सागर यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच रामायणावरील मालिका निर्माण करत असल्याचं जाहीर केलं होतं, असं मत ब्रिजभूषण चर्तुर्वेदी यांनी व्यक्त केलं आहे. रामायण मालिकेमुळे रामकथा लोकप्रिय होऊन त्याचा फायदा भाजप या राजकीय पक्षाला मिळाला, असं सतत सांगितलं जातं.

परंतु दूरदर्शनवरचं रामायण १९८८ साली संपलं आणि भाजपाच्या राम मंदिर निर्माण आंदोलनाची अधिकृत सुरवात १९९० साली रथयात्रेने झाली. त्यासाठी रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आणि हनुमानाची भूमिका करणारे दारासिंग यांना भाजपचे खासदार बनवल्याचा आधार सांगितला जातो. पण त्यापूर्वी रामाची भूमिका करणाऱ्या अरूण गोविल यांनी १९८९च्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता, हे कुणाला आठवत नाही.  

रामकथेची मोहिनी हजारो वर्षं

रामकथा आणि रामकथेची मोहिनी जनमानसावर शेकडो वर्षांपासून आहे. या मालिकेमुळेच रामकथा सर्वत्र लोकप्रिय झाली, असं म्हणणं धाडसाचं आहे. गावोगावी, यात्रा, मेळे, जत्रामधे भारतभर रामकथा आयोजित केली जात असे. गावात वर्षभर रामायण, महाभारत, भागवत या पोथ्या मठमंदिरांतून वाचल्या जायच्या. त्यावर प्रवचनही होत असत.

राम मंदिर आंदोलनाने पारंपरिक रामभक्तीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला हा दोष त्यांचा आहेच. पण रामायणाची वा महाभारताची आवड, रुची, भक्ती आणि श्रद्धा ही भारतीय जनमानसांत हजारो वर्षापासून आहे.

राम आणि कृष्ण यांच्याबद्दलच्या भक्तीरसाच्या गोडीपासून मुघल सम्राटही मुक्त नव्हते. राम आणि कृष्ण यांच्या भक्तीत तल्लीन होऊन अनेक मुस्लिम सुफी संतांनीही रचना केल्या आहेत. कृष्णभक्त रसखान आणि रामभक्त कबीर यांच्या संतवाणीने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची मोहिनी केवळ भारतीय जनमानस नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंड आणि समस्त पूर्व आशियाई देशांतही दिसून येतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

म्यानमारचा राजा रामाचा वंशज

तिबेट मधील रामायणाची कथा लंकेपासून सुरु होते. मंगोलियातल्या रामायणाचा नायक हा हनुमान आहे. म्यानमारमधील इसवीसन १०८४ ते १११२ या काळातला राजा क्यांथिथी हा स्वतःला रामाचा वंशज समजत असे. रामवथ्ठू, महारामा, राम्थोक्यो, थाईराम, पोटयाव रामा एँड लछ़्ना अशा रामकथेवर आधारित अनेक साहित्यकृती म्यानमारमधे आहेत.

श्रीलंकेतलं रामायण अगदी आपल्यासारखं आहे. मात्र लंकन रामायणात सीतेला तीन मुलं आहेत आणि त्यात रामाचा जन्म लंकेतच झालेला आहे. फिलिपिन्स या देशातसुद्धा रामायणाची कथा लोकप्रिय असून या देशातला नायक रादियामंगदिवी हाच प्रत्यक्ष राम असून त्याची पत्नी मालानोतिहाईचा ही प्रत्यक्ष सीता आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. फिलिपिन्समधे लक्ष्मणाचा उल्लेख लछ्मन असा असून रावणाला महादियालवना म्हणून ओळखतात.

थायलंडमधे बुद्धाचा शिष्य, तर मलेशियात आदमचा मुलगा

थायलंड मधली राजांची नावं रामा म्हणूनच असतात. रामा पहिला,  रामा दुसरा अशी येथे क्रमांकानुसार राजाची नावं आहेत. थायलंडमधे रामाची राजधानी अयोध्या असून तिथेच रामाचा जन्म झाला अशी थाई लोकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे थायलंडमधला राम हा गौतम बुद्ध यांचा शिष्य आहे.

मलेशियासारख्या इस्लामिक देशात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्याविषयी अपार श्रद्धा दिसून येते. मलेशियातील रामायण इस्लामिक आहे. इसवीसन १६०७ ते १६३५ या कालखंडात राज्य करणारा इथला सुलतान इस्कंदर मुल्ला हा स्वतःला राम म्हणवून घेत असे. आजही इथे वीर पुरुषाला लक्ष्मण या नावाने संबोधतात.

हिकायत-ए-सिरीराम हा पर्शियन भाषेतील ग्रंथ म्हणजेच इथलं रामायण. मलेशियन लोकांच्या श्रद्धेनुसार रामाचा जन्म मलेशियात झाला आणि राम हा पहिले पैगंबर हजरत आदम यांचा मुलगा आहे. म्हणूनच त्याला सर्वांच्या हृदयात आदराचे स्थान आणि श्रद्धा आहे, अशी माहिती संजीवनी खेर यांनी त्यांच्या संचित या पुस्तकात दिली आहे.

हेही वाचा : अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

भारत रशिया मैत्रीचा सांस्कृतिक आधार

रामायण १९व्या शतकात मंगोलियामधे आणि तिथून रशियातही पोचलं होतं. अलेक्झांडर बार्निकोव या भारतीय संस्कृतीच्या रशियन अभ्यासकाने १९४८ साली रामायणाचं रशियन भाषांतर केलं. हाच तो कालखंड होता, ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारत रशिया मैत्रीची सुरवात होत होती. या मैत्रीचा प्रमुख आधार सांस्कृतिक संबंध हाच होता. त्याला राजकीय परिमाणं निश्चित झालेली नव्हती.

निकिता क्रुश्चेव यांच्या काळात १९५२ पासून रशिया भारत राजकीय मैत्रीपर्व सुरु झालं. त्याआधी भारतीय परंपरेतल्या रामायणातल्या रामकथेने रशियन जनतेला आपलंसं  केलं होतं. त्याचा समावेश बालसाहित्य आणि भारताच्या अभ्यासाचं प्रमुख साधन म्हणून अभ्यासक्रमात केला जाऊ लागला होता.

रशियात गाजली रशियन रामलीला

रशियातील भारत विषयाच्या अभ्यासक नतालिया गुसेवा यांनी रामकथेवर आधारित नाटकाची संहिता रशियन नाट्यकलावंत गैनेडी पेचनिकोव यांना दिली. त्यांनी मास्कोमधील बालनाट्य संस्थेत या रशियन रामकथेचा म्हणजेच रामलीलेचा प्रयोग केला. तो खूप लोकप्रिय झाला.

तो केवळ बालनाट्य रंगभूमीपुरता मर्यादित न राहता सर्व स्तरातल्या नाट्यरसिकांचा सर्वात आवडता नाट्यप्रयोग ठरू लागला. त्यानंतरच्या काळात या रामकथेची लोकप्रियता पाहून रशियातल्या भारतीय वकिलातीत १९५७ मधे या नाटकाचा पहिला प्रयोग आयोजित केला.

त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर १९६० साली गैनेडी पेचनिकोव यांनीच  प्रभू रामाची प्रमुख भूमिका करून मोठा इतिहास घडवला. गैनेडी पेचनिकोव यांची रामाची भूमिका त्यावेळी रशियन आणि युरोपियन रंगभूमीवर कौतुकाचा विषय ठरली. 

रामायणाचा आदर्शवाद, महाभारतातली सर्वसमावेशकता

राम आणि रामकथा हा भारतीय संस्कृतीचा विश्वव्यापक अविष्कार आहे. रामकथेची, रामायणाची अनेक संस्करणं आहेत. वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, लोकरामायण शिवाय प्रत्येक जातीजमातींच्या स्वतंत्र आवृत्त्या आहेत. त्यात काही वादाची स्थळंही आहेत. काही संस्करणात तर चातुर्वर्ण्याची भलामाण करणारा पुरुषवर्चस्ववादही आहे. पण या मूल्यांना आधुनिक समाजात काही स्थान नाही कारण या मानवद्रोहीच आहेत.

रामायण तत्कालीन आदर्शवाद मांडतं, मात्र महाभारत प्रत्येक व्यक्तीची भूमिका समजून घेण्याची वृत्ती शिकवतं. कर्ण, दुर्योधन, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांनाही एक भूमिका आहे, हे सांगते.

कुंतीची नि भीष्माची विवशता सांगतं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला एक भूमिका असते, ही भावनाच संपुष्टात आली असताना, महाभारतातली व्यवहारिकता, मानवी सुहृदयता आणि सर्वसमावेशकता तसंच रामकथेची विश्वव्यापकता याची आजच्या राम मंदिर बांधायला निघालेल्या भारतीयांना नेहमीच गरजेची आहे. म्हणून रामायण आणि महाभारत पुन्हा विवेकी होऊन अभ्यासायला काय हरकत आहे.

हेही वाचा : 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

दिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा

बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर

(लेखक उस्मानाबाद येथील आघाडीचे वकील आणि राज्यातले महत्त्वाचे ब्लॉगर आहेत.)