जेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा

०५ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज जगाला भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉण्डच्या जन्माचा दिवस. म्हणजेच ५७ वर्षांपूर्वी पहिला बॉण्डपट जगासमोर आला. भारतातही बॉण्डपटाच्या धर्तीवर सिनेमे बनवायचे प्रयत्न झालेत. आता बॉण्डला निवृत्तीचे वेध लागलेत. बॉण्डपटाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.

५ ऑक्टोबर जेम्स बॉण्ड दिन मानला जातो. येत्या वीसेक दिवसांनी जेम्स बॉण्डपटाचं चित्रीकरण संपुष्टात येतंय. डायरेक्टर कॅरी कुकुनागा आणि जेम्स बॉण्ड साकारणारा डॅनियल क्रेंग यांनी आपला एक फोटो रिलिज करत ‘नो टाईम टू डाय’ या सिनेमाची घोषणा केली. ३ एप्रिल २०२० ला हा सिनेमा रिलिज होईल. हा चक्क २५ वा बॉण्डपट आहे. यात जेम्स बॉण्ड निवृत्त झालेला दाखवलाय.

निवृत्तीच्या उंबरठ्यावरचा बॉण्ड

जमैकात असताना त्याचा खास दोस्त एका रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी मदत मागतो तेव्हा जेम्स बॉण्ड तत्काळ तयार होतो. ००७ हा त्याचा सर्वश्रुत क्रमांक घेऊन तो मिशनवर निघतो. त्याची गाठ आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने संपन्न अशा खलनायकाशी पडणार आहे.

डॅनियल क्रेंगने याआधी २००६ मधे कॅसिनो रॉयल, २००८ मधे क्वांटम ऑफ सोलेस, २०१२ मधे स्काय फॉल, २०१५ मधे स्पेक्टर नंतरचा हा पाचवा बॉण्डपट केलाय. त्याने आधीच यापुढे आपण जेम्स बॉण्डची भूमिका करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेवर निघणारा ‘नो टाईम टू डाय’ हा २५ वा सिनेमा असणार आहे.

आणि गंमत म्हणजे यानंतर जेम्स बॉण्ड म्हणून महिलेला पेश करायची चर्चा होत आहे. काहींना ही कल्पना अजिबात आवडली नाहीय. पण काहींना ती अशक्यही वाटत नाही. काय असेल ते असो जेम्स बॉण्ड सिनेमा कलेच्या आणि धंद्याच्या दृष्टीने नेहमीच फलदायी ठरलाय. ईयान फ्लेमिंगचं हे काल्पनिक पात्र आहे.

हेही वाचाः अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स

तब्बल ५७ वर्षांचा करिश्मा

गेली ५७ वर्ष जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा आपलं गारुड कायम ठेऊन आहे. ५ ऑक्टोबर १९६२ ला जेम्स बॉण्डवरचा पहिला सिनेमा रिलिज झाला. त्याचं नाव होतं, ‘डॉक्टर नो’. त्यानंतर सहा अभिनेत्यांनी बॉण्डपट सादर केले. एकाच व्यक्तिरेखेवर एवढे सिनेमे निघाल्याचं दुसरं उदाहरण नाही. क्रेझी बॉईज आणि अलिकडे हॅरी पॉटर आणि स्पायडर मॅन, बॅटमॅन, सूपरमॅन या एकाच व्यक्तिरेखेवरची मालिका जरूर आली. पण त्यांनी जेम्स बॉण्डसारखा करिष्मा दाखवला, असं म्हणता येणार नाही.

या सिनेमांनी चांगला धंदा जरूर केला असेल, पण निव्वळ धंद्याचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांची बॉण्डपटांशी तुलना करता येणार नाही. जेम्स बॉण्ड हा जगातल्या निम्म्या तरी जनतेला ठाऊक आहे. आणि त्याचा एकतरी सिनेमा त्यांनी पाहिलाय. असं हॅरी पॉटर किंवा स्पायडरमॅनबद्दल आपल्याला सांगता येत नाही.

ईयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉण्डवरचा सिनेमा काढायला सुरवात केली. जेम्स बॉण्डवरची कार्टून वर्तमानपत्रात यायची. या कार्टूनला त्यांनी सिनेमाद्वारे जिवंत केलं. या सिनेमांची पटकथा तेच लिहायचे. अगदी सुरवातीला तेच निर्मितीबरोबर लेखनाचीही बाजू सांभाळून घ्यायचे. ‘डॉक्टर नो’ या पहिल्याच सिनेमासाठी त्यांनी सीन कॉनेरी या अभिनेत्याची जेम्स बॉण्डसाठी निवड केली. त्याच्या गालांना चांगली खळी पडायची. तो खरोखर देखणा, रुबाबदार आणि गुप्तहेर शोभावा अशी देहयष्टी राखून होता.

पहिलावहिला बॉण्ड कोण?

पहिलाच बॉण्डपट दणक्यात यशस्वी ठरला आणि मग बॉण्डपटांची जो तो उत्सुकतेने वाट बघू लागला. कॉनेरीने एकूण सात सिनेमांत जेम्स बॉण्ड निभावला. १९६२ मधे डॉक्टर नो, १९६३ मधे फ्रॉम रशिया विथ लवर, १९६४ मधे गोल्डफिंगर, १९६५ मधे थंडरबॉल, १९६७ मधे यू ओन्ली लिव ट्वाईस, १९७१ मधे डायमंड्स आर फॉर एवर, १९८३ मधे नेवर से अगेन. कॉनरीने १९७१ मधे स्वताहून बॉण्डपट स्वीकारायचं थांबवलं होतं. पण १९८३ मधे त्याने पुनरागमन करून दाखवलं.

ऑस्ट्रेलियाचा जॉन लेझेंबी हा दुसरा जेम्स बॉण्ड ठरला. गाड्या विकून गुजराण करणारा जॉर्ज फक्त एकाच बॉण्डपटात चमकला. तो होता, ऑन हर मॅजेस्टिक सिक्रेट सर्विस. त्याला स्वतःला हा सिनेमा स्वीकारून चूक केल्याचं वाटलं. काय असेल ते असो. पण सगळ्या बॉण्ड पटातला हा सर्वोत्कृष्ट सिनेमा असं सिनेपंडितांचं मत आहे.

हेही वाचाः सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

सध्या जेम्स बॉण्डला कोण साकारतंय?

रॉजर मूरने कॉनेरीसारखा दीर्घकाळ जेम्स बॉण्ड रंगवला. त्यानेही एकूण सात बॉण्डपट केले. १९७३ मधे लिव अँड लेट डाय, १९७४ मधे द मॅन विथ द गोल्डन जन, १९७७ मधे द स्पाय हु लव्ड मी, १९७९ मधे मूनरेकर, १९८१ मधे फॉर युवर आईज ओन्ली, १९८३ मधे ऑक्टोपसी, १९८५ मधे एव्ह्यू टू किल.

मूर हा खरा पोलिसाचा मुलगा म्हणून असेल तो आंतरराष्ट्रीय गुप्तहेर वाटायचा. रीमोशी डाल्टन याने १९८७ मधे द लिविंग डेलाईटस, १९८९ मधे लायसन्स टू फील या दोन बॉण्डपटात जेम्स बॉण्ड साकारला. त्याच्या सिनेमातली अस्टेन मार्टिन ही अजब गाडी आधी चर्चेची ठरली.

आयरिश पिअर्स ब्रॉसनन याने चांगले चार बॉण्डपट केले. १९९५ मधे गोल्डन आय, १९९७ मधे टुमारो नेवर डाईज, १९९९ मधे द वर्ल्ड इज नॉट इनफ, २००२ मधे जय अनदर डे असे चार बॉण्डपट आले. तर आताचा जेम्स बॉण्ड आहे डॅनियल क्रेग. इंग्लिश नाट्यसृष्टीतून तो पुढे आलाय, हे विशेष. २००६ मधे कॅसिनो रॉयल, २००८ मधे क्वांटम ऑफ सोलेस आणि येऊ घातलेला स्कायफॉल असे बॉण्डपट त्याच्या नावावर आहेत. बॉण्डचं आताचं वय लक्षात घेऊन तो भूमिका साकारतो. त्यामुळे तो योग्य वाटतो.

बॉण्डपट का चालतात?

बॉण्डपट चालण्याबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत. त्यात रहस्य चांगलं असतं. एक्शन भरपूर पण हिंसक नसते. छायाचित्रण सुखद असतं. अनेक कसरती आणि करामती कल्पकतेने सादर केलेल्या असतात. बॉण्ड आणि त्याच्या आयुष्यात आलेली पोरगी सेक्सी असल्याने त्यांची प्रणयदृश्ये मस्तच असतात. एकंदरीत सर्वसामान्यांना बॉण्डपट या शेवटच्या कारणामुळे आवडतो. अलीकडे रहस्यमय कथा आणि एक्शन पट यांचा सुकाळ आहे. असं असलं तरी बॉण्डची प्रणयलीला खुमारी वाढवते.

पहिल्यावहिल्या बॉण्डपटात अर्सुला अँड्रेस हिने ‘बॉण्ड गर्ल’ साकारली होती. ती एका दृश्यात बिकिनीमधे होती. त्यामुळे या सिनेमाला भलतीच लोकप्रियता लाभली. काहींनी तिचं अर्सुला अनड्रेस असं नामकरण केलं होतं. यानंतर अनेक सुंदरींनी बॉण्ड गर्ल होण्याचा मन मिळवला. पण जो करिश्मा अर्सुलाने केला तोच मापदंड मानला जातो. पुढच्या सगळ्या अभिनेत्रींनी कमी अधिक प्रमाणात तिच्यासारखंच बॉण्ड गर्ल होण्याचा प्रयत्न केला.

जेम्स बॉण्डच्या सिनेमातले खलनायक नेहमीच खतरनाक ठरलेत. बॉण्डने पन्नाशी गाठण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे.

हेही वाचाः अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

भारतालाही लागलेत बॉण्डपटाचे वेध

भारताचा फक्त कबीर बेदी ‘ऑक्टोपसी’ या बॉण्ड पटात खलनायक गोविंदा म्हणून चमकला होता. या सिनेमात महान भारतीय टेनिसपटू विजय अमृतराजनेही एक छोटी, चांगली भूमिका केली होती. या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण उदयपूरला झालं होतं. आजही उदयपूरला चित्रीकरणावेळी कलाकार, तंत्रज्ञ उतरले होते, त्या हॉटेलात ऑक्टोपसी दाखवला जातो. ठळकपणे हॉटेलच्या आजूबाजूला जाहिरातींचे बोर्ड लावलेले आढळतात. काही स्थानिकांना या सिनेमात चमकायला मिळाले त्यांची माहितीही दिली जाते.

भारतीय अभिनेत्री बॉण्ड गर्ल होणार अशी बातमी नेहमीच नव्या बॉण्डपटाच्या जुळवाजुळवीच्या वेळी झळकत असते. पण आतापर्यंत हे भाग्य कुठल्याच भारतीय अभिनेत्रीला लाभलं नाही. ऐश्वर्या रॉयची निवड कॅसिनो रॉयल्सच्या वेळी निश्चित मानली गेली होती. पण त्यातली भलतीच मोकळी प्रणयदृश्यं ऐश्वर्याला अवघड वाटली आणि तिने तो नाकारला अशी कुजबुज होती.

आता मात्र अनेक भारतीय अभिनेत्री बॉण्ड गर्ल व्हायला उत्सुक आहेत. त्यात करीना, कॅटरीना, बिपाशा, प्रियांका, दीपिका, मल्लिका सगळ्याच शोभतील अशा आहेत. पण आज न उद्या भारतीय अभिनेत्री बॉण्ड गर्ल होणार हे नक्की आहे, असं निर्माते मंडळी म्हणतात.

पण जेम्स बॉण्डला पर्याय नाही!

भारतातही जेम्स बॉण्डच्या धर्तीचा सिनेमा बनवण्याचे प्रयत्न आणि विचार झाले. मूळच्या महेंद्र संधूच्या एजंट विनोदवर आधारलेला ‘एजंट विनोद’ हा अलिकडे आलेला सैफ अलीचा सिनेमा जेम्स बॉण्ड डोळ्यासमोर ठेऊनच काढलेला होता. पण हॉलीवूडची सफाई बॉलीवूडवाल्यांना अद्याप तेवढी जमलेली नाही.

उद्या कदाचित चांगला बॉण्डपट हिंदीत निघेलही. जेम्स बॉण्ड म्हणून कुणा भारतीय अभिनेत्याला संधीही मिळेल. अर्थात ही शक्यता खूपच कमी आहे. तरीसुद्धा असं होणारच नाही असं नाही. निदान हिंदीतला जेम्स बॉण्ड तरी चांगल्या तऱ्हेने निघायला हरकत नसावी. अर्थात असा सिनेमा निघेल तेव्हा निघेल.

५ ऑक्टोबरला लंडनमधे जेम्स बॉण्डविषयी मोठा सोहळा होतो आणि ही तारीख जेम्स बॉण्ड दिन म्हणून ओळखली जाते. जेम्स बॉण्डला खरंच पर्याय नाही.

हेही वाचाः 

भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

सरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार?

अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?