मुंबईतल्या सँडविचवाल्सांसाठी विब्स ब्रेड म्हणजे संजीवनीच

०१ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आपल्याला घरच्या सँडविचपेक्षा रस्त्यातल्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवरचं सँडविचच आवडतं. आणि ते कधीही खायला आवडतं. या सँडविचसाठी विब्स ब्रेड वापरत असल्याचं आपण वर्षानुवर्षं बघत आलोय. पण अचानक काही दिवस विब्स ब्रेड दिसेनासा झाला. आणि ब्रेक घेऊन पुन्हा बाजारात आला. खरंतर याच विब्स ब्रेडमुळे सँडविचचे स्टॉल्स टिकून आहेत आणि वाढलेतही.

कोणे एकेकाळी ब्रेड, पाव यांना बाटवण्याचं साधन म्हणून बघितलं गेलं. पण आता हे पदार्थ अगदी आपल्या रोजच्या जेवणातलेच झालेत. अगदी ऑफिसमधे किंवा ऑफिसमधून निघाल्यावर भूक लागली की आपली पावलं आपोआप सँडविचच्या स्टॉलजवळ येऊन थांबतात. या स्टॉलवर ब्रेडची मोठमोठी पाकीटं आपण बघतो. बऱ्याचदा हे पाकीट विब्स कंपनीचं असतं. मुंबईत तर सँडविच म्हणजे विब्स ब्रेड असं समीकरणच एवढ्या वर्षात बनलंय.

विब्स ब्रेड हा वेस्टर्न इंडिया बेकर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचा ब्रँड किंवा प्रोडक्ट. अचानक १९ सप्टेंबरपासून विब्स ब्रेड स्टॉलवरून गायब झाला. यामागचं कारण आर्थिक मंदीमुळे उत्पादनावर परिणाम किंवा कंपनी तोट्यात असल्याचं सुरवातीला वाटलं. पण विब्स कंपनीची मालकी असलेल्या इराणी कुटुंबातल्या वादामुळे ब्रेड बाजारात येत नव्हता हे सगळ्यांना समजलंय. आता मात्र हळूहळू विब्स ब्रेड बाजारात येऊ लागलाय.

खोदादाद इराणींना वाईट वागणूक मिळाली

विब्स ब्रेडची ही बातमी सगळ्यात आधी 'मुंबई मिरर' या इंग्रजी वर्तमानपत्राने समोर आणली. या कंपनीत तीन भावांची भागीदारी आहे. याच महिन्यात होशँग इराणी यांचं निधन झालं. त्यानंतरचे सगळ्यात मोठे भाऊ खोदादाद इराणी हेच विब्सचे व्यवहार बघत होते. त्यांनीच ही भागीदारी रद्द करावी यासाठी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली.

या सर्व प्रकरणाची माहिती बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी वर्तमानपत्रात आलीय. त्यानुसार खोदादाद इराणी यांचं सगळ्यात लहान भाऊ शेरियार इराणी यांच्याबरोबर भांडण झालं. आणि त्यानंतरच ही याचिका दाखल केली. ब्रेडचं उत्पादन बंद होण्यामागे घरगुती भांडण असल्याचंही सांगितलंय. याचिका करणारे खोदादाद यांना इतर भागीदारांकडून चुकीची वागणूक मिळाली.

सध्या आर्बीट्रेशन क्लॉज अंतर्गत खोदादाद यांनी भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यावर हाय कोर्टाने मध्यस्थ समिती स्थापन केलीय. आणि म्हणूनच ब्रेडचं उत्पादन पुन्हा सुरू झालं. समितीच्या मदतीने या वादावर तोडगा निघू शकेल अशा विश्वास इराणी कुटुंबाने व्यक्त केला.

विब्स बंद झाल्यामुळे नुकसान झालं

देशातल्या ब्रेडच्या बाजारपेठेवर विब्सचं साधारण ४६ टक्के वर्चस्व आहे. तर त्यांच्य़ा स्लाईस ब्रेडच्या उत्पन्नापैकी ९० टक्के ब्रेड मुंबईत विकले जातात. विशेषत: सँडविच वेंडरना. कारखाना बंद केल्यामुळे इतर ब्रेड कंपन्यांना काही दिवसांचा फायदा झाला यात काही शंका नाही.

मुंबई आणि नवी मुंबईतल्या कारखान्यात जवळपास तीन हजार कर्मचारी काम करतात. तसंच मुंबईत ६८ वितरकांचं जाळं पसरलंय. आणि वितरकांच्या हाताखाली असलेला कामगार वर्ग. या सगळ्या लोकांना इराणी कुटुंबाच्या वादामुळे काही दिवस मोठं नुकसान सहन करावं लागलं.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

पूर्वी ब्रेडला ट्रेन्चर म्हणायचे

काही दिवसांपूर्वी सँडविच खाताना, त्यात वापरला जाणारा ब्रेड वेगळा होता. कारण तो विब्स ब्रेड नव्हता. मुळात ब्रेड हा पदार्थ आला कुठून माहितीय का? इजिप्त म्हणजेच मिडल ईस्टमधून. पहिल्यांदा इजिप्तने ब्रेड बनवल्याचं क्रेडिट जगाने इजिप्तला दिलंय. साधारण इसवीसनपूर्व ८ हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेड बनवला गेला. त्यानंतर रोम आणि मग युरोपात ब्रेड पोचला.

युरोपात इंग्लंडमधे साधारण इसवीसनपूर्व ४५० मधे बनवला गेला. मध्ययुगात इंग्लंडमधे ब्रेड बेक करणं हे स्टेटस सिम्बॉल बनलं. तिकडचे श्रीमंत लोक पांढराशुभ्र ब्रेड खात. जो मैद्यापासून बनवला जातो. तर मध्यम वर्गीय आणि गरीब लोक कोंड्याचा किंवा रे या खालच्या स्तरातल्या गव्हाचा ब्रेड खात. त्यावेळी ब्रेडचा लोफ बनवला जात नव्हता. आपल्या भाकरीसारखा पण जाड ब्रेड असे. आणि ब्रेडला ट्रेन्चर असं म्हणत, अशी माहिती आऊटलुक इंडिया मासिकाच्या डिसेंबर २०१८ च्या अंकात आली होती.

मुघलांच्या काळात ब्रेडचा प्रसार झाला

२० व्या शतकात ब्रेडमधे भरपूर बदल झाले. आणि आधुनिक बेकिंगची पद्धत आली. मशिन आल्या. ब्रेडमधे यीस्ट, केमिकल वापरलं जाऊ लागलं. ज्यासध्याच्या काळात मुळे ब्रेड मऊ, लुसलुशीत, हलका आणि जाळीदार झाला. गेल्या १० ते १५ वर्षांमधे डार्क ब्रेडची डिमांड वाढली. डार्क ब्रेड म्हणजे रे, बार्ली, गहू, अनपॉलिश्ड तांदूळ, ओट्स इत्यादींपासून बनवलेला ब्रेड. फोफावणाऱ्या लाईफस्टाईल डिसीजमुळे हेल्दी ऑप्शन म्हणून डार्क ब्रेड खाल्ला जातो.

भारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा. यामुळे चवीतही फरक पडतो. आजही मुंबई, गोव्यातला जुन्या लोकल बेकरीमधे जुन्या पद्धतीत ब्रेड बेक केला जातो., ही माहिती लॉस्ट रेसिपीज या पुस्तकातून आपल्याला मिळते. हे पुस्तक आर्किटेक्चरल हिस्टॉरियन आणि फूड एक्सप्लोरर पॉल फ्रेडीनन यांनी लिहिलंय. हे पुस्तक आपल्याला वर्ल्ड स्वॅगन वेबसाईटवर विकत घेता येईल. 

हेही वाचा: आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

सँडविच हॉटेलातून स्टॉलवर आला

ब्रेड खऱ्या अर्थाने रोजच्या जेवणात आला तो सँडविचमुळे. फ्रान्समधून सँडविच हा प्रकार पहिल्यांदा आला. हा प्रकार साधारण १५६ वर्षं जुना आहे. पाश्चात्य देशांमधे हाताने खाणं हे दळभद्री समजलं जातं. पण फ्रेंच राजाने पहिल्यांदा एका पार्टीत दोन ब्रेडमधे मीट आणि चीज घालून द्यायला सांगितलं. आणि हा पदार्थ त्याने चक्क हाताने खाल्ला. इथूनच सँडविच हा पदार्थ फेमस झाला, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्ट या इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रातल्या २०१३ मधल्या लेखात आली होती.

भारतात हा पदार्थ इथिओपायातून आला. साधारण १९१० पासून हा पदार्थ मुंबईतल्या इटरीजमधे दिसू लागले. स्वातंत्र्यानंतर मुंबईतलं औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. कामगार वर्गासाठी वडा पाव आणि पाव भाजी हे प्रकार तयार झाले. पण पुढे त्याच्याबरोबरीने सँडविचही १९६५ नंतर आलं. आणि सँडविच हॉटेलातून मुंबईतल्या कोपऱ्या कोपऱ्यावर दिसू लागलं. मग सँडविच वेंडरचा सगळ्यात आवडता विब्स ब्रेड १९७३ला सुरू झाला. याच ब्रेडने सँडविच स्टॉल्सना एकप्रकारे संजीवनीच दिली.

इराणी कुटुंबाचं भांडण लवकर मिटावं

सँडविच बनवायला सॉफ्ट ब्रेड चालत नाही. आणि हार्ड ब्रेड लोकांना आवडत नाही. त्यामुळे ब्रिटानियाने आणलेलं ब्रेडचं मॉडेल फेल गेलं. अशात सँडविच वेंडरना काय करावं हा प्रश्न पडला होता. पण विब्सने एक उत्तम टेक्श्चर आणि चवीचा ब्रेड आणला. हा ब्रेड सँडविचसाठी परफेक्ट होता. आणि सँडविच वेंडरकडून विब्स ब्रेडला पसंती मिळाली. कित्येक वेंडर हे २० ते ३० वर्षांपासून हाच ब्रेड वापरतायत, ही माहिती फूड डिझायनर रुपेक्षा राठोड यांनी कोलाजला दिली.

बाजारातून विब्स ब्रेडची आवक बंद झाली त्यावेळी सँडविच ब्रेडची परंपराच खंडीत झाली असं वाटू लागलं. त्यामुळे मॉडर्न आणि ब्रिटानियाचे ब्रेड वापरले. पण विब्स ब्रेड तो विब्सच. त्याची मजा इतर ब्रेडमधे नाही. त्यामुळे आता पुन्हा ब्रेड येऊ लागल्याचा आनंद आहे. पण अजूनही हव्या तेवढ्या प्रमाणात आणि सगळीकडे ब्रेड मिळत नाही. लवकरच इराणी परिवाराचं भांडण मिटून ब्रेडचं उत्पादन पूर्वीसारखं सुरू व्हावं अशा भावना, सोनू चंदेलवाल या विलेपार्ले पूर्वेकडच्या सँडविच वेंडरने कोलाजकडे व्यक्त केल्या.

हेही वाचा: 

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?