शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?

०६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. कुणाला तिकीट मिळालं, कुणाचं कापलं गेलं हे स्पष्ट झालंय. भाजपने मेगाभरतीत सामील झालेल्या आयारामांना संधी दिलीय. ज्येष्ठांना वेटिंगवर ठेऊन त्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास तिथे कुणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतला महत्वाचा टप्पा पार पडला. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वच प्रमुख पक्षांसोबतच हौशे, नवशे आणि गवशांनीही आपली उमेदवारी दाखल केली.

सत्ताधारी भाजपमधे दोन महत्वाच्या गोष्टींनी निवडणुकीला गालबोट लागलं असं म्हणावं लागेल. एक म्हणजे, घाटकोपरमधे माजी मंत्री प्रकाश मेहता यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यांचं मंत्रीपद खूपच गाजलं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले. तसंच पावसामुळे रत्नागिरीचा पूल पडल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी दुर्लक्ष केल्याने रोष व्यक्त झाला.

हेही वाचाः भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?

भाजपमधली दोन प्रातिनिधीक उदाहरण

आज त्यांना तिकीट नाकारून पराग शहा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानिमित्ताने शहा उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मेहता यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी शहा यांची गाडी फोडून प्रचंड राग व्यक्त केला. शहांना शिवीगाळही करण्यात आली. स्वतः मेहतांना येऊन पराग शहा यांना संरक्षण द्यावं लागलं.

प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून शांत होण्याचं आवाहन केलं. मात्र ते काही केल्या शांत होण्यास तयार नव्हते. कसंबसं शहा यांना मेहतांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर काढण्यात आलं. भाजपमधे अंतर्विरोध किती मोठा आहे, याचं हे प्रातिनिधीक उदाहरण म्हणावं लागेल.

विनोद तावडेंचं काय चुकलं?

दुसरी महत्वाची घटना म्हणजे विनोद तावडे यांची अगतिकता. संघ विचारसरणी, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व ही तावडेंची ओळख. त्यांच्या पदवीवरुन तर विरोधकांनी खूपच रान पेटवलं. त्यांची मंत्रिपदाची कारकीर्दही वादग्रस्त ठरली. केंद्रात स्मृती इराणी तर राज्यात विनोद तावडे यांची जणु चुरसच सुरू होती अशीची परिस्थिती दिसून आली.

'शिक्षणाचा खेळखंडोबा' आणि 'शिक्षणाचा विनोद' सर्वच पातळ्यांवर गाजत असताना तावडेंचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. मात्र त्यांचं तिकीट कापलं जाईल असं त्यांनाही वाटलं नसेल. म्हणूनच तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझं काय चुकलं, असा प्रश्न पक्षाला विचारला. वास्तविक केडरबेस पक्ष असल्याने कितीही विरोधी भूमिका घेतली तरी पक्ष सोडायचा नाही हे खडसे यांनी जसं तत्व पाळलं. तेच तत्व तावडेंनीही अंगिकारल्याचं दिसतं.

इथे तावडेंचं अवसान मात्र वाढलेलं दिसून आलं. तावडे फक्त माझं काय चुकलं असं विचारुन थांबले नाहीत. तर पक्षाचंही काही चुकलं असेल तर पक्षानेही आत्मपरिक्षण करावं अशी पुस्ती जोडली.

हेही वाचाः किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळली, तुम्हाला तिसरा हप्ता मिळाला?

मेगाभरतीच्या हाती सत्तेची दोरी

भारतीय जनता पक्षाच्या केडरबेस कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांची ही अवस्था आहे. मग विविध पक्षांतून आयात केलेल्या उमेदवारांची संख्या पाहता, पुढे भाजपची सत्ता आली तरी मंत्री आणि महत्वाच्या पदावरील व्यक्ती या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आलेल्या असतील असंच म्हणावं लागेल.

भाजपमधे किंवा शिवसेनेमधे प्रवेश करताना बिनशर्त तसंच कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गेलेले हे नेतेच निवडणुकीत आघाडीवर असल्याचं दिसतं. उद्या तेच राज्य हाती घेतील. सत्ताधारी महायुतीचा हा ट्रोजन हॉर्स महाराष्ट्रावर सत्ता गाजवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं आजतरी म्हणावंच लागेल.

हेही वाचाः 

साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?

माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?

भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?