पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

०५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


एक एप्रिलच्या रात्री एक बातमी पसरली. विराट कोहलीने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची कॅप्टनशिप सोडली. ही बातमी आरसीबी आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी धक्का होती. मात्र काही वेळातच ही बातमी म्हणजेच एप्रिल फुल ठरली. मात्र ही बातमी का आली? विराटने आरसीबीची कॅप्टनशिप सोडावी असा सूर का उमटतोय?

कागदावर तगडी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीच्या आरसीबी टीमला दक्षिण आफ्रिकन संघाप्रमाणे चोकर्स हा टॅग देण्यात आला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सीजनमधील मॅचमधे हातातोंडाशी आलेला विजय आरसीबीने गमावला आहे. 

आरसीबी यंदा तरी आयपीलएल जिंकेल?

आयपीएलच्या बाराव्या सीजनमधे अगदी चोकर्सप्रमाणे मॅच गमावण्याची कोहलीच्या आरसीबीची परंपरा कायम आहे. पहिल्या चारही मॅचमधे आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागलाय. गेल्या अनेक वर्षांत आरसीबी टीमला एकाहून एक सरस क्रिकेटर मिळाले. स्वतः कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, मिचेल स्टार्क, ब्रँडन मॅक्युलम हे दिग्गज आरसीबीकडून खेळलेत. मात्र आरसीबीची कामगिरी अगदी सुमार असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

या सीजनच्या सुरूवातीपासून त्याच कामगिरीची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आरसीबीची पहिल्या ११ क्रिकेटर्सची निवड चुकतेय का?, कोहली टीमचं नेतृत्व करण्यात अपयशी ठरतो आहे का?, इतकी तगडी टीम असूनही आरसीबी का अडखळते किंवा ती टीम आयपीएल का जिंकू शकली नाही? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

गंभीरची गंभीर कमेंट

भारताचा माजी क्रिकेटर आणि कोहलीचा दिल्लीकर सहकारी गौतम गंभीरने तर आरसीबीच्या या सुमार कामगिरीसाठी विराटलाच जबाबदार धरलं आहे. आरसीबीची टीम इतकी तगडी आहे मग एकही आयपीएल का जिंकू शकली नाही असा सवाल गंभीरने उपस्थित केला आहे. आयपीएलमधे क्रिकेटर्सची निवड, बोली या सगळ्या प्रक्रियेत कॅप्टन सहभागी असतो. त्यामुळे मनासारखी टीम नाही असे बोलण्याची संधी विराटकडे नाही. आरसीबीच्या खराब कामगिरीला सर्वस्वी कोहली जबाबदार आहे. त्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कॅप्टनशिप आयपीएल सुरू होण्याआधी सोडायला हवी होती.

कोहलीने आरसीबीचा कॅप्टन म्हणून पहिली मॅच २०११ साली खेळली होती. मात्र २०१३ साली टीमचा कॅप्टन म्हणून त्याची अधिकृत निवड करण्यात आली. या ६ वर्षांत कोहलीने जवळपास १०० मॅचमधे टीमचा कॅप्टन म्हणून नेतृत्व केलं आहे. मात्र यापैकी ४४ मॅचमधे विजयी तर ५१ मॅचमधे पराभवाचा सामना करावा लागलाय. कोहलीचा कॅप्टन म्हणून टीमला विजय मिळवून देण्याची टक्केवारी ५० टक्क्यांहूनही कमी आहे. 

कॅप्टनशिपवर सवाल सुरु

मॅचमधे त्याच्या रणनीतीवरही अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. यंदाच्या सीजनमधे पहिल्या चारही मॅचमधे ओपनर पार्थिव पटेलचा जोडीदार बदलण्यात आला आहे. कोहलीचे चक्रावून टाकणारे निर्णय, मोक्याच्या क्षणी गोंधळून जाणे, मैदानात रागावर नियंत्रण नसणे, चुकीचे डीआरएस घेणे अशा विविध गोष्टींमुळे आता आरसीबीने कोहलीला कॅप्टनशिपच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी होऊ लागलीय. 

कॅप्टन म्हणून कामगिरीचा त्याच्या बॅटिंगवरही परिणाम होऊ शकतो. हे ना आरसीबीला परवडणारं आहे ना भारतीय क्रिकेट संघाला. त्यामुळे कोहलीकडून आरसीबीच्या कॅप्टनपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यानं फक्त बॅट्समन म्हणून खेळावं तसंच दुसऱ्या क्रिकेटरकडे आरसीबीचं नेतृत्व देण्याची मागणी होत आहे. 
आरसीबीचा कॅप्टन म्हणून कोहलीच्या खराब कामगिरीमुळे फॅन्सनी विनोदी मीम्सचा आधार घेत त्याला टीकेचं लक्ष्य केले आहे. 

कोहली बनला मिम्सचा गिऱ्हाईक

दिल्ली ते गल्ली कोणताही मुद्दा चर्चेत असेल तर त्यावर हमखास मिम्स बनतात. मग त्यात विराट कोहली एक हॉट क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची फिमेल फॉलोईंग तुफान आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीवरील मिम्स वायरल होतात.

कोहलीचे लुक्स, गेम, विरुष्काचं प्रेम इत्यादी मिम्स प्रचंड वायरल झाले होते. ही मिम्सना मिळणारी लोकप्रियता पाहून त्याच्या नावाचे अॅट कोहली मिम्स असे ट्विटर हॅंडल सुद्धा सुरु केलेलं आहे.

कॅप्टन कोहलीची अग्निपरीक्षा सुरु

एकीकडे आयपीएल कॅप्टन म्हणून टीका झेलत असलेल्या कोहलीसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. कोहलीची आरसीबीचा कॅप्टन म्हणून कामगिरी पाहता त्याला भारतीय क्रिकेट टीमच्या वर्ल्डकप मोहिमेच्या कॅप्टनपदावरूनही हटवण्यात यावं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. 

वर्ल्डकपसाठी भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून धोनीकडे पुन्हा जबाबदारी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. वनडे क्रिकेटमधे कोहली भारताचा कॅप्टन असला तरी धोनी निम्मा कॅप्टन आहे असं खुद्द माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी म्हटलं होतं. 

वर्ल्डकपसाठी पुन्हा धोनी?

कॅप्टन नसतानाही डावपेच आखणं, रणनीती ठरवणं, बॉलर्सला कानमंत्र देणं, अचूक क्षणी डीआरएस घेणं, सयमी आणि गरज पडल्यास आक्रमक बॅटिंग करणं अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारा धोनी अनेकदा कोहलीसाठी आणि भारतीय टीमसाठी संकटमोचक ठरला आहे.

२०११ वर्ल्डकप विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा एकदा धोनीकडे कॅप्टनपद देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यातच धोनीचा हा अखेरचा वर्ल्डकप असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या वर्ल्डकप विजयी कॅप्टनकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा देऊन सन्मानाने त्याला निवृत्ती दिली जावी असा सूरही उमटतोय. 

कोहली आरसीबीचं कॅप्टनपद सोडणार का?, आरसीबी फ्रॅन्चाईजी मालक कोहलीला कॅप्टनपदावरून हटवून दुसऱ्याला देणार का? आरसीबी विजयी ट्रॅकवर कधी परतणार? आणि कोहलीला भारतीय टीमचंही कॅप्टनपद सोडावं लागणार का? याची उत्तरं आगामी दिवसांत मिळतील.