नेटफ्लिक्स घेणार का भारताचा निरोप?

१० फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय.

भारतात कोरोनामुळे थिएटर बंद झाल्यावर ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांनी आपला मोर्चा वळवला. अनेक देशी-विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्मनी गेल्या दोन वर्षांत प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी आपल्या दर्जेदार कंटेंटच्या जोरावर लीलया पेलली. शहरी सुखवस्तू आणि उच्चमध्यमवर्गीयांपुरता मर्यादित असलेले ओटीटी प्लॅटफॉर्म गेल्या दोन वर्षांत आपलं जाळं भारतभर पसरवण्यात यशस्वी ठरले.

भारतासारख्या बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी कायमच चढाओढ सुरु असते. मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद नाहीच. सध्या कोरोनाचा जोर ओसरत असल्याने थिएटर पुन्हा सुरू होतायत. त्यामुळे आपला प्रेक्षकवर्ग टिकवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म नवनवीन फंडे अजमावू पाहतायत. अशात एक ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र आपलं सर्वस्व पणाला लावून बसलाय. जगभरातल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या स्पर्धेत वर्चस्व गाजवणाऱ्या नेटफ्लिक्सला भारतात मात्र अपयशाला सामोरं जावं लागतंय.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

ओटीटी प्लॅटफॉर्मची पायाभरणी

सध्या जगभरात शेकडो ओटीटी प्लॅटफॉर्म असले तरी, या उद्योगजगताची पायाभरणी करण्याचा मान नेटफ्लिक्सकडे जातो. अमेरिकेतल्या एका डीवीडी कंपनीपासून जगभरातल्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक बनण्यापर्यंत झालेला नेटफ्लिक्सचा प्रवास बराच संघर्षमय आणि रंजक आहे. २००८च्या जागतिक मंदीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या बऱ्याच मीडिया हाऊसच्या मदतीला नेटफ्लिक्स धावून आलं. त्यामुळे त्यांना पैसा मिळाला आणि नेटफ्लिक्सला कंटेंट!

नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना फक्त सिनेमेच नाही तर जुने गाजलेले टीवी शोही बघता येत होते. हा टीवी शोचा कंटेंट नेटफ्लिक्ससाठी वरदान ठरला. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांची एंगेजमेंट वाढू लागली. त्यामुळे सुरवातीच्या काळात नकार दिलेले मीडिया हाऊसनंतर स्वतःहून आपला कंटेंट घेऊन नेटफ्लिक्सच्या दारात आले. नंतर भविष्यातला फायदा ओळखून त्यातल्या काही मीडिया हाऊसनी स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केला. त्यामुळे नेटफ्लिक्सला पुन्हा एकदा कंटेंट मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार होती.

अशा वेळी नेटफ्लिक्सने ‘नेटफ्लिक्स ओरिजनल्स’चा नारळ फोडला. ‘नेटफ्लिक्स ओरिजनल्स’ म्हणजे नेटफ्लिक्सचा स्वतःचा, हक्काचा कंटेंट. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ही त्यांची पहिली ओरीजनल सिरीज होती. ठराविक अंतराने एकेक एपिसोड रिलीज करण्यापेक्षा एकाचवेळी पूर्ण सिझन रिलीज करण्याचा पायंडा नेटफ्लिक्सने पाडला. एकेका एपिसोडसाठी वाट बघणारा प्रेक्षकवर्ग रात्रभर जागून ‘बिंज वॉच’ करू लागला. नेटफ्लिक्सचे संचालक रीड हेस्टिंग्ज यांच्या मते, ‘झोप’ हाच नेटफ्लिक्सचा एकमेव स्पर्धक होता.

भारतीय प्रेक्षकांसाठी चढाओढ

२०१६मधे नेटफ्लिक्सने भारतासह आणखी १९० देशांमधे प्रवेश केला. हे तेच वर्ष होतं, ज्यावेळी जियोमुळे टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीचं वारं वाहू लागलं होतं. या डिजिटल क्रांतीमुळे एरवी फक्त सुखवस्तू प्रेक्षकांपुरती मर्यादित असलेली ओटीटी प्लॅटफॉर्मची दारं सगळ्यांसाठी खुली झाली. नेटफ्लिक्स ज्यावर्षी भारतात आलं त्याचवर्षी अॅमेझॉन प्राईम वीडियोसारखा मोठा स्पर्धकही भारतात आला. पण या दोघांच्या स्वागताला एक देशी ओटीटी प्लॅटफॉर्म आधीच बाजारात पाय घट्ट रोवून उभा होता, तो म्हणजे हॉटस्टार!

हॉटस्टार हा ‘स्टार इंडिया’ आणि ‘डिज्नी’चा ओटीटी प्लॅटफॉर्म होता. तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या भाषा आणि प्रांतांवर आधारित वाहिन्यांमुळे स्टार इंडियाचं जाळं भारतभर पसरलं होतं. फक्त सिनेमे, शो आणि मालिकाच नाही तर भारतात धर्माचा दर्जा दिला जाणारा क्रिकेटचा खेळही हॉटस्टार आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवत होता. आयपीएल असो किंवा वर्ल्डकप, हॉटस्टारवर सगळंच मिळत होतं. त्यामुळे डिजिटल कंटेंटच्या या बाजारपेठेत हॉटस्टारने एकहाती वर्चस्व कमावलं होतं.

नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमकडे बहुतांश कंटेंट हॉलीवूडचा होता. फक्त शंभरेक हिंदी सिनेमांच्या जोरावर भारतात टिकणं कठीण होतं. त्यामुळे इथेही ओरिजनल्सचा फंडा वापरण्यात आला. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ ही पहिली वेबसिरीज भारतात तुफान हिट झाली. बहुतांश भारतीय प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवण्यात ‘सॅक्रेड गेम्स’चा मोलाचा वाटा आहे. हिंसाचार, रक्तपात, शिवीगाळ, लैंगिकता तसेच समाजात टॅबू मानल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचं उघडपणे समर्थन आणि प्रदर्शन करणारा हा कंटेंट भारतीयांसाठी मनोरंजनाची नवी व्याख्या बनला.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

एक ना धड, भाराभर चिंध्या

नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’पाठोपाठ अॅमेझॉन प्राईमची ‘मिर्झापूर’ आली. माफिया आणि गुन्हेगारीसंबंधित कथानकांना हाताशी धरून वेगवेगळ्या सिरीज येऊ लागल्या. हा एकसुरीपणा टाळण्यासाठी सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित करण्यासाठी नवे फंडे शोधू लागले. हॉटस्टारला तशी याची काही भीतीच नव्हती. नव्या-जुन्या मालिकांचे सगळे एपिसोड्स आणि क्रिकेट सामन्यांच्या जोरावर हॉटस्टारने बाकीच्यांना कधीच मागे टाकलं होतं.

या स्पर्धेत ‘झी’चा झीफाईव, ‘सोनी’चा सोनीलिव, ‘कलर्स’चा ‘वूट’ असेही ओटीटी प्लॅटफॉर्म होतेच. सॉफ्ट पॉर्नला बढावा देणारे ‘आल्ट बालाजी’, ‘एमएक्स प्लेयर’सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मही बाजारपेठेत आपापला हिस्सा बळकावत होते. अशा भाऊगर्दीत टिकायचं असेल तर काहीतरी ठोस ओळख हवी. हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईमने हे वेळीच ओळखून हिंदीऐवजी इतर भाषिक आणि प्रांतीय सिनेसृष्टींकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळेच ते भारतभर आपला जम बसवू शकले.

नेटफ्लिक्स मात्र या शर्यतीत आजतागायत टिकू शकलेला नाही. रिजनल कंटेंट भारतीयांना आवडतोय हे नेटफ्लिक्सला कळलेलं असलं तरी त्यात अॅमेझॉन प्राईम आणि हॉटस्टारची मक्तेदारी मोडून काढणं त्यांना जड जातंय. ‘पावं कदैगल’, ‘नवरसा’सारख्या अँथॉलजी असो किंवा ‘द डिसायपल’, ‘जगमे तंदीरम’सारखे सिनेमे फारशी चमक दाखवू शकले नाहीत. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मिन्नल मुरली’ या मल्याळम सिनेमाने मात्र आता नेटफ्लिक्सकडून रिजनल कंटेंटबाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

‘सॅक्रेड गेम्स’चा अपवाद वगळता दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा वेबसिरीज आणि सिनेमे बनवण्यात नेटफ्लिक्सला अपयश आलंय. मध्यंतरी नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट’ ही स्पॅनिश, ‘डार्क’ ही जर्मन आणि ‘स्क्विड गेम’ ही कोरियन सिरीज भारतात आणली. या विदेशी कंटेंटला प्रचंड लोकप्रियताही मिळाली. पण तरीही नेटफ्लिक्सची क्रेझ मर्यादितच राहिली. बुरारी हत्याकांडावरची डॉक्युसिरीज असो किंवा थोर दिग्दर्शक सत्यजित रेंना वाहिलेली आदरांजली, एवढं सगळं करूनही नेटफ्लिक्स भारतीय प्रेक्षकांची नस शोधू शकला नाही.

आर्थिक गणितांचा मेळ साधेना

केवळ क्रिकेट बघण्यासाठी हॉटस्टार घेणाऱ्या प्रेक्षकांना हॉटस्टारचा इतरही कंटेंट बघता येतो. इतकंच नाही, हॉटस्टारचा ऐंशी टक्क्यांहून अधिक कंटेंट हा फुकट उपलब्ध आहे, फक्त त्यासाठी जाहिरातींचा व्यत्यय सहन करता यायला हवा. अॅमेझॉन प्राईमच्या सेवेत मनोरंजन तर आहेच त्याचबरोबर अॅमेझॉनवरून मागवलेल्या कुठल्याही वस्तूला डिलीवरी चार्ज आकारला जात नाही. आता ‘झी’ आणि ‘सोनी’ने हातमिळवणी केल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची भूक भागवणं आणखी स्वस्त होणार आहे.

नेटफ्लिक्स मात्र यातलं काहीही देऊ शकत नाही. त्याची सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे त्याची किंमत. साधारणतः ३०० रुपयांची केबल सेवा घेऊन टीवी बघणारा भारतीय तिप्पट पैसे का खर्च करेल हा प्रश्न गेली सहा वर्षं नेटफ्लिक्सच्या डोक्यात आलाच नाही. एकीकडे इतर ओटीटी प्लॅटफॉर्म नाममात्र दरात दर्जेदार कंटेंट देत असताना नेटफ्लिक्स मात्र तडजोड करायला कुठेही तयारच नव्हता. एक जुडी पालेभाजीसोबत भांडून कोथिंबीरीच्या काड्या फुकट घेणाऱ्या भारतीयांना परवडेल अशा किंमतीचा नेटफ्लिक्सने कधीही विचार केला नाही.

सहा वर्षानंतर आता नेटफ्लिक्सला जाग आलीय. त्यांनी भारतीय प्रेक्षकांना परवडेल इतपत किंमत कमी केली असली, तरी अजूनही इतर ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्यापुढेच आहेत हे कटू सत्य ते नाकारू शकणार नाहीत. ग्लोबल शर्यतीत कायम पुढे राहणाऱ्या नेटफ्लिक्सला भारतातल्या लोकल शर्यतीत मात्र सपशेल अपयश आलंय. आता इथं टिकायचं असेल तर आणखी स्वस्तात आणखी दर्जेदार कंटेंट देणं नेटफ्लिक्ससाठी बंधनकारक ठरणार आहे.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

कैफी आझमींचं कवितेतलं स्वप्न साकारणारी शबाना

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती