बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?

१५ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. 

मागचं वर्ष कोरोनाच्या काळजीत गेलं. लस प्रत्यक्षात आल्यानं थोडाफार दिलासा मिळाला. ही आनंदाची बातमी येत असताना बर्ड फ्लूमुळे चिंतेत भर पडली. केंद्र सरकारनं राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. केरळ राज्यानं बर्ड फ्लू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित केलीय. तर महाराष्ट्र सरकारनंही विशेष खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा स्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स पथकं' स्थापन करायचे आदेश दिलेत.

जंगलातल्या, स्थलांतरित झालेल्या आणि प्राणी संग्रहालयातल्या पक्ष्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. विशेषतः स्थलांतरित पक्षांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यानं आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोना वायरसमुळे आधीच सगळीकडे भीती निर्माण झालीय. बर्ड फ्लूमुळे ही भीती वाढेल की काय अशी शंका लोक व्यक्त करतायत. आधीच अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना आता नवी संकटं उभी राहतायत.

हेही वाचा: नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

एच५ एन१, बर्ड फ्लू वेगवान

बर्ड फ्लूला एवियन इन्फ्लूएंजा असंही म्हटलं जातं. २००९ आणि २०१० मधेही हा फ्लू आला होता. कोंबडी, कबुतर आणि तत्सम प्रकारच्या पक्षांमधे तो आढळतो. त्याचे वेगवेगळे स्ट्रेन आहेत. प्रत्येक वायरसची काही लक्षणं असतात. तशीच बर्ड फ्लूचीही आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला होतो. माणसांमधल्या संसर्गाची शक्यता खूपच कमी असल्याचं म्हटलं जातंय. या वायरसबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन' आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर वाचायला मिळेल.

म्युटेशन हा शब्द कोरोना वायरसमुळे बऱ्याचदा आपल्या कानावर पडलाय. एखाद्या वायरसनं स्वतःमधे जनुकीय बदल करणं म्हणजेच म्युटेशन. हे बदल करून वायरसचं एक नवं रूप आपल्यासमोर येतं. कधी एक तर काहीवेळा वायरस अनेक रूपं बदलतो. या बदललेल्या रूपालाच स्ट्रेन असं म्हटलं जातं. एखादा वायरस किती घातक आहे हे त्याच्या या स्ट्रेनवरून ठरतं. एच५ एन१ हा बर्ड फ्लू वायरसचा स्ट्रेन फार धोकादायक आहे. शिवाय, त्याचा संसर्ग कोरोनापेक्षाही अधिक झपाट्याने होत असल्याचं सध्या म्हटलं जातंय.

टेंशन वाढवणारी गोष्ट

इन्फ्लूएंजाचे एकूण ११ प्रकार आहेत. या सगळ्यांचा संसर्ग माणसांमधे होऊ शकतो. एच५ एन१, एच७ एन३, एच७ एन७, एच७ एन९, एच९ एन२ हे ५ प्रकार माणसांसाठी जास्त घातक असल्याचं म्हटलं जातं. या सगळ्यात जास्त धोकादायक ठरतो तो एच५ एन१ म्हणजेच बर्ड फ्लू वायरस. त्याचा संसर्ग हवेतून होतो. चीनमधे १९९७ ला पहिल्यांदा माणसांमधे त्याचा संसर्ग आढळला. जगभरात एकूण चार वेळा हा वायरस मोठ्या ताकदीनं उसळी मारून आलाय. तर ६० पेक्षा अधिक देशांमधे त्यानं कोरोनासारखं साथीच्या आजाराचं रूप घेतलंय.

कोरोनामुळे भारतात आजच्याघडीला दीड लाख लोकं दगावलीत. एकट्या महाराष्ट्रात मृत्यूनं ५० हजारचा आकडा पार केलाय. जगभरची आकडेवारीही काळजीत भर टाकणारीच आहे. पण व्यवहार सुरळीत चाललेत. मागच्या वर्षी सुरवातीचे काही महिने जितकं टेंशन होतं तितकं आता राहीलं नाहीय. माणसंही बाहेर हिंडता फिरतायत. काळजीही घेतली जातेय. पण बर्ड फ्लूमुळे माणसांचं टेंशन पुन्हा वाढलंय. कोरोना वायरमुळे सुरवातीला जसं तर्क वितर्कांना उधाण आलं होतं तसंच आताही आलंय.

हेही वाचा: कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते तरी कोण?

चिकन, अंडी खायची की नाहीत?

गोंधळलेल्या स्थितीत आपण सरकार, आरोग्य क्षेत्रातले तज्ञ यांच्या म्हणण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांमधे होतो का हा महत्वाचा मुद्दा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. 'माणसांमधे याचा संसर्ग होणं अतिशय दुर्मीळ आहे. त्यासाठी वायरसमधे जनुकीय बदल व्हावे लागतात. त्यामुळे काळजीच कारण नाही.' असं मुंबईतल्या पशुवैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे म्हणतात. बीबीसी मराठीला त्यांनी एक छोटेखानी मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी बर्ड फ्लू संदर्भातल्या अनेक प्रश्नांची सरळसोपी उत्तर दिलीयत.

माणसांमधे या वायरसनं प्रवेश केला तर त्याची लक्षण काही वेगळी नसतील. हा फ्लू असल्यामुळे त्याची जी लक्षणं आहेत ती तेवढीच दिसतील. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन'च्या एका आकडेवारीचा संदर्भ त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिलाय. २००६ ते २०२० या दरम्यान जगभरात फक्त ४० ते ४५ लोकांनाच बर्ड फ्लू झाल्याचं ही आकडेवारी सांगते. यात एकाही भारतीयाचा समावेश नाही हे विशेष. बर्ड फ्लू झाला तरी घाबरायचं कारण नाही शिवाय चिकन, अंडी खायलाही काही हरकत नसल्याचं डॉ. अजित रानडे यांनी बीबीसी मराठीवरच्या मुलाखतीत म्हटलंय.

बर्ड फ्लूची लक्षणं ही तापासारखीच आहेत. जसं की, ताप येणं, घशात खवखव होणं किंवा इन्फेक्शन, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणं, पित्त किंवा कफचा त्रास आणि निमोनिया अशी ही सर्वसाधारण लक्षणं आहेत. कोरोना वायरसच्या लक्षणांशी बरीच जुळणारी आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्या बर्ड फ्लूवरचं औषध आहे. त्याशिवाय रेलेझा, रॅपीवॅप या गोळ्याही डॉक्टरांकडून दिल्या जातात.

केंद्र सरकार वेळीच जागं झालंय

राजस्थान, केरळ, हरियाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधे एकेक करून पक्षी मरायच्या घटना समोर यायला लागल्या. कबुतरं, बदकं, कावळे, कोंबड्या अशा वेगवेगळ्या पक्षांमधे बर्ड फ्लू आढळून आलाय. भारतात पोल्ट्री फार्ममधे एच५ एन१ तर कावळ्यांमधे म्यूटेट झालेला एच५ एन८ वायरस सापडलाय. या सगळ्या राज्यांमधे संसर्ग झालेल्या पक्षांची योग्य विल्हेवाट लावायचे आदेश देण्यात आलेत. प्राणीसंग्रहालयांना आपला दैनंदिन रिपोर्ट आता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला द्यावा लागेल.

भारतात २००६ मधे पहिल्यांदा बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूरमधे बर्ड फ्लूची नोंद झाली होती. सध्या हा वायरस केवळ भारत नाही तर १० युरोपियन देशांमधे पसरलाय. केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यात बर्ड फ्लू संदर्भात अधिकृत माहिती दिली. हा वायरस पक्षांपासून पसरत असल्याचंही म्हटलं होतं.

कोरोनाचं सावट जगभर असताना आपण केलेला हलगर्जीपणा आपल्याला नडला होता. त्याचे गंभीर परिणाम आपण अनुभवलेत. पण बर्ड फ्लूच्या वेळी मात्र केंद्र सरकारनं वेळीच पावलं उचलल्याचं दिसतंय. योग्य ती खबरदारी घेतलीय.

जगभरातल्या बर्ड फ्लूच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक कंट्रोल रुमही बनवलीय. राज्य सरकारांशी समन्वय ठेवण्याचा हेतू त्यामागे आहे. संसदीय समितीची बैठक सोमवारी बोलवण्यात आली होती. बर्ड फ्लूचा सामना कसा करायचा उपाययोजनेसंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर या समितीचं लक्ष असेल. मंगळवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवलीत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्य स्तरावर देखरेख समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत.

हेही वाचा: बुद्धांच्या मार्गाने जाणारे विवेकानंद आपल्याला माहीत आहेत का?

महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शन सूचना

महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचं लोण पसरलंय. परभणी, मुंबई, ठाणे आणि दापोली या भागांमधे 'बर्ड फ्लू' चा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र सरकारही ऍक्शन मोडमधे आलंय. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागानं काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. तसंच जिल्हा स्तरावर 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' तयार करण्याचे आदेश दिलेत. शेतकरी आणि पशुपालकांना स्थानिक पातळीवर बर्ड फ्लू रोगाची माहिती दिली जाईल. बर्ड फ्लूची लक्षणं दिसल्यास पशुवैद्यकीय हॉस्पिटलला संपर्क साधायला सांगितलाय.

आठवडी बाजारात सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येईल. कत्तलखान्यांनामधे निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्याचेही आदेश दिलेत. २०१५ च्या सर्वलन्स प्लॅननुसार बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येईल. या सर्वेक्षणात रोग अन्वेषण विभागासोबत संपर्कात रहावं असं सांगितलंय. याबद्दलची माहिती शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आलीय. शिवाय जिथं जिथं पोल्ट्री फार्म आहेत तिथं आवश्यक ती कार्यवाही करायच्या अनेक मार्गदर्शक सूचना सरकारने केल्यात.

बर्ड फ्लूमुळे आर्थिक संकट?

कोरोना वायरसने जगभरातचे छोटे मोठे उद्योगधंदे बंद पाडले. छोट्या उद्योगांना तर याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर अनेकांची रोजी रोटी चालते. अंडी, चिकनमुळे एक नवा उद्योग उभा राहिलाय. बर्ड फ्लूमुळे हे सगळे व्यावसायिक काळजीत आहेत. नवा व्यवसाय उभा करावा म्हणून ज्यांनी यात आधीच आर्थिक गुंतवणूक केलीय त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो. शिवाय ज्या अपेक्षेने उद्योग उभा केला त्याचं कवडीमोल होणं परवडणारं नाही. थेट कृषी व्यवसायाला या सगळ्याचा फटका बसेल.

केरळ राज्यानं नुकसान झालेल्या व्यावसायिकांना मदत देण्याचं जाहीर केलंय. सध्याच्या स्थितीत असा दिलासा इतर राज्यांनीही देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू होत असल्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरण यावरचं संकट वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. 'ग्लोबल वार्मिंग'ची संकटं आधीच आपल्या समोर असताना आता त्यात नव्यानं आणखी एका संकटाची भर पडतेय. एच५ एन१ हा वायरस हवेतून पसरतो. अनेक पक्ष्यांना संसर्ग करत तो त्याच वेगानं पसरेल.

हेही वाचा: 

लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

समाजाच्या अंधारात विज्ञानाचा दिवा तेवत ठेवायलाच हवा

लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

ट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील?

भंडाऱ्याच्या आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला?