भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिंकावं लागणार, कारण

१६ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


झारखंडमधे आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. आजच्या मतदानाने भाजपचा अब की बार 65 पारचा नारा खरा होणार की नाही हे ठरणार आहे. एवढंच नाही तर भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी चौथा टप्पा मतदान निर्णायक आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या पट्ट्यात यंदा विरोधी पक्षांनी चांगलंच आव्हान निर्माण केलंय.

झारखंड विधानसभेची निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोचलीय. सत्ताधारी आणि विरोधक आपापले फायनल प्लॅन बाहेर काढून मैदानात उतरलेत. भाजपसाठी तर हा टप्पा म्हणजे करो किंवा मरो सारखा आहे. त्यामुळे भाजपनेही विरोधकांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आपल्याकडचं मोदीअस्त्र बाहेर काढलंय.

हेही वाचा :  महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!

कोण, किती जागांवर लढतंय

गेल्यावेळी आजसूसोबत आघाडी करून निवडणुकीत उतरलेली भाजप यंदा स्वबळावर मैदानात आहे. सर्व १५ जागांवर भाजपने आपले उमेदवार उतरवलेत. महागठबंधनच्या वाटाघाटीनुसार, झामुमो ८, काँग्रेस ६ तर एका जागेवर आरजेडीने उमेदवार दिलाय. आजसू, झाविमो यासारख्या पक्षांनीही उमेदवार उभे केलेत.

कोयलांचल भाजपचा गड

आज चौथ्या टप्प्यात १५ जागांवर मतदान होतंय. यापैकी १३ जागा कोयलांचल तर उरलेल्या दोन जागा संथाल परगण्यातल्या आहेत. कोयलांचलमधे भाजपचा चांगला प्रभाव आहे. मावळत्या विधानसभेत १५ पैकी १२ जागांवर भाजपचे आमदार आहेत. 

झारखंड हे खनिज संपत्तीने समृद्ध राज्य आहे. झारखंड गरीब नाही पण इथली जनता गरीब आहे. आता जनतेलाही या गरीबीपासून दूर करण्यासाठी आम्हाला मत द्या, असं आव्हान सत्ताधारी भाजपपासून ते विरोधी पक्षांकडून केलंय जातंय.

खनिज संपत्तीने समृद्ध झारखंडमधल्या कोयलांचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यातच चौथ्या टप्प्यातलं मतदान होतंय. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने या भागातल्या १५ पैकी १० जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. एक जागा भाजपचा मित्रपक्ष आजसूने जिंकली. झारखंड विकास मोर्चाच्या एका आमदाराने भाजपमधे प्रवेश केला. त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढून १२ झालं.

हेही वाचा :  झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना

डाव्या पक्षांचा प्रभाव

कोयलांचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात चहुबाजुंनी कोळशाच्या खाणी आहेत. इथे अवैध खाण काम आणि व्यापाराचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. कामगारांच्या जोरावर आपलं संघटन उभारणाऱ्या डाव्या पक्षांचा इथे चांगला प्रभाव आहे. देशात आता जे काही थोडेफार डाव्या पक्षांचे गढ उरलेत त्यामधे कोयलांचलचं नाव घेतलं जातं, असं स्थानिक पत्रकार अशोक वर्मा यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं.

धनबादमधे फिरताना चौकाचोकात स्थानिक नेत्यांचे पुतळे उभारलेले दिसतात. कोळसा खाणीतल्या कामगारांचे पुतळे दिसतात. धनबादचं, कोयलांचलचं हे वैशिष्ट्य स्थानिक लोकांशी बोलताना नजरेत येतं.

हेही वाचा : झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

धनबाद जिल्ह्यात भाजपला तगड आव्हान

दैनिक भास्करचे पत्रकार लोकेश यांच्या मते, चौथ्या टप्प्यातल्या सहा जागांवर थेट लढत होतेय. तसंच नऊ जागांवर त्रिशंकू मुकाबला होतोय. टुंडी सीटवर तर चौरंगी सामना रंगलाय. धनबाद, झरिया, बाघमारा, बोकारो, चंदनकियारी आणि बगोदर मतदारसंघात दुहेरी लढत होतेय. स्वबळावर लढत असलेले ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन अर्थात आजसू आणि झारखंड विकास मोर्चा हे मुकाबला त्रिकोणी करण्यासाठी कामाला लागलेत.

लोकेश यांच्या मते, धनबाद जिल्ह्यातल्या पाच जागांवर गेल्यावेळी भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष आजसूचे आमदार निवडून आले होते. भाकप माले गटालाही एक जागा मिळाली होती. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो आणि काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यंदा झामुमो आणि काँग्रेस आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

यंदा झामुमोने जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात आपलं चांगलं बस्तान बसवलंय. टुंडी मतदारसंघ झामुमोने याआधीही जिंकलाय. यंदाही ते लढतीत आहेत. तसंच सिंदरी आणि निरसा जागेवरही झामुमोने भाजपपुढे आव्हान उभं केलंय. सिंदरीमधे भाजप आमदार फुलचंद मंडल यावेळी झामुमोच्या तिकीटावर मैदानात उतरल्याने निवडणूक खूप चुरशीची झालीय.

हेही वाचा : आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

भाजपसाठी अवघड पेपर

 गेल्यावेळी एकहाती वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपसाठी यंदा विरोधकांनी मोठं आव्हान निर्माण केलंय. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधकही स्थानिक मुद्यांच्या जोरावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताहेत. गेल्यावेळचा मित्रपक्ष आजसूही सोबत नसल्याने हे आव्हान भाजपच्या अडचणीत वाढ करणारं ठरतंय. त्यामुळे भाजपने स्टार प्रचारकांच्या मदतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीेचे प्रदेशाध्यक्ष आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी यासारखे नेते कोयलांचलच्या मैदानात उतरले. 

दुसरीकडे विरोधी पक्षांनीही भाजपला बालेकिल्ल्यातच मात देण्यासाठी ताकद झोकून दिलीय. कांँग्रेस नेते राहुल गांधी, झामुमोचे सुप्रीमो शिबू सोरेन, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबतच ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राज बब्बर यांनी प्रचार केला.

स्थानिक पत्रकारांच्या मते, शहरी भागातल्या जागांबद्दल भाजपला खात्री आहे. धनबाद, बोकारो, गिरिडीह, देवघर यासारख्या शहरी जागांवर भाजपचं पारडं जड आहे. याउलट ग्रामीण, अर्ध नागरी भागातल्या जागा टिकवणं हे भाजपपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.

हेही वाचा : 

झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?