लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

१६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध.

आत्तापर्यंत कोरोनाच्या प्रभावाखाली १९०हून जास्त देश आलेत. त्यामुळं जगभरातल्या प्रमुख विज्ञान संशोधन संस्था आणि विद्यापीठांत यावर लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अमेरिका आणि चीन हे देश यात आघाडीवर आहेत. अमेरिकेत नुकतंच अशा एका लसीचा मनुष्यावर प्रयोग करण्यात आलाय.

भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी १७ मार्चला राज्यसभेत बोलताना सांगितलं की भारतात आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या लसीचा काही रूग्णांवरती प्रयोग करून पाहिला जातोय.

या लसीव्यतिरिक्त इतर रोगांवरच्या औषधांचा वापर कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी कशा पद्धतीनं करता येऊ शकेल, याचा अभ्यास जगभरात सुरू आहे. त्यात एचआयवी आणि मलेरिया या रोगांसह अनेक रोगांवरच्या औषधांचा समावेश आहे.

हेही वाचा : ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

लस शोधायला उशीर का होतोय?

एखाद्या रोगावर फॉर्म्युला सापडला आणि लसीच्या स्वरूपात तो लगेच बाजारात आणला असं कधीच होत नाही. कोणत्याही रोगावरती लस शोधताना संबंधित वायरसला ओळखून त्यावर संशोधकांना अभ्यासासाठी वेळ दिला जातो. नंतर त्यावर लस शोधून त्याची वैद्यकीय सुरक्षा तपासावी लागते. त्यासाठी त्या लसीचा प्रयोग पहिला उंदीर वा इतर प्राण्यांवर केला जातो आणि नंतर माणसावर केला जातो. त्याचे बरे वाईट परिणाम पाहूनच ती लस बाजारात आणायची का नाही, ते ठरवलं जातं.

कोरोनाचा हा विषाणू नवीन असल्याने शास्त्रज्ञांना त्याची चाचणी घेण्यात अडचण येतेय. कोरोनाच्या प्रसाराची गती बघता अमेरिकेनं अशा लसीचा वापर थेट मनुष्यावर करून पाहिलाय. आता त्यातून काय बाहेर येतंय, हे पाहण्यासाठी काही काळ थांबावं लागेल.

आजवर साथीच्या रोगांवर लसीचा उपाय

१४व्या शतकात ब्लॅक डेथ नावाच्या साथीनं जगभरात जवळपास सात वर्षं धुमाकुळ घातला होता. त्यात वीसेक कोटी लोक दगावले. १७९६ मधे एडवर्ड जेन्नरनं देवीच्या रोगावर लस शोधेपर्यंत त्यात कोट्यवधी लोकांचा बळी गेला. १९१८ मधे आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूनंही केवळ तीनच वर्षात पाच कोटी लोकांचा बळी घेतला. १९व्या आणि २०व्या शतकात प्लेगनंही जगभर धुमाकूळ घातला. त्यावर शोधलेल्या लसीमुळं आता तो आटोक्यात आलाय.

अलीकडचा विचार करता २००३ साली सार्स, २०१२ साली मर्स, त्यानंतर स्वाईन फ्ल्यू, इबोला, झिका वायरस असे अनेक वायरस येऊन गेले. त्यापैकी काहींच्यावर लसी सापडल्या तर काही वायरस आपोआप आटोक्यात आले. त्यांच्यावर आजही संशोधन सुरू आहे. एच१एन१ स्वाईन फ्ल्यू ही साथ आजही अधूनमधून तोंड वर काढते.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

लस लोकांपर्यंत पोचायला वेळ

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनावर लस सापडली तरी ती लोकांच्या हातात पडायला किमान अठरा महिन्यांचा कालावधी जावा लागेल. म्हणजेचं त्यासाठी २०२१ हे साल उजाडावं लागेल. अमेरिकेच्या सीडीसी अर्थात सेंटर फॉर डिसीज् कंट्रोल अँड प्रिवेन्शन या संस्थेनं केलेल्या एका अभ्यासावरून असं दिसून येतयं की, कोणताही पँडेमिक साथीचा रोग हा जगभर १२ ते ३६ महिन्यांसाठी कमीअधिक प्रमाणात टिकतो. कोरोनाच्या बाबतीतही हेच शक्य आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं गायडो वॅनहॅम या जगप्रसिद्ध वायरॉलॉजी तज्ञाचा एक वीडियो रिलीज केलाय. त्यात ते म्हणतात, कोरोनावर देवीसारखी परिणामकारक लस सापडत नाही, तोपर्यंत ही साथ टिकून राहिल. कदाचित कोरोनाच्या लसीची ही प्रक्रिया अनेक वर्षे चालण्याची शक्यता आहे. सध्या तरी या साथीचा चढता कर्व सपाट करण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

भारतातले प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. जयप्रकाश मुलीयील यांनी स्क्रोल वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलयं की कोरोनाची पहिली साथ जरी ओसरली तरी पुढच्या टप्प्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल कारण ही साथ पुन्हा पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या वर्तनात बदल करणं आणि शारीरिक अंतर ठेवणं या सवयी कायमस्वरूपी भारतीयांनी लावून ठेवल्या पाहिजेत. तसंच भारतीयांची सामूहिक प्रतिकारशक्ती वाढवल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. सामूहिक प्रतिकारशक्ती वाढून तिनं एक विशिष्ट पातळी गाठली की कोरोनाची तीव्रता कमी होऊन समाज सुरक्षित होईल.

हर्ड इम्युनिटीलाही मर्यादा

इतर देशांसोबत ब्रिटनलाही कोरोनाचा जबर फटका बसलायं. कोरोनाच्या लसीला बाजारात यायला अजून तरी खूप उशीर लागणार असल्यानं ब्रिटननं हर्ड इम्युनिटीचं धोरण स्वीकारलंय. हर्ड इम्युनिटी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर साथीच्या रोगाचा प्रसार लोकसंख्येच्या मोठ्या भागावर होऊ द्यायचा. त्यामुळं त्याची लागण अनेक लोकांना होऊन काही बळी जाऊ दिले जातात. कालांतरानं तिथल्या लोकांत आपोआप रोगप्रतिकारक शक्ती विकसित होऊन कोरोनाचा प्रभाव कमी होत जाईल. पण अशा प्रक्रियेला काही महिने किंवा काही वर्षं लागू शकतात.

आपल्याला एखादा रोग झाला आणि काही काळानंतर आपण त्यातून बरं झालो की आपल्या शरीरात त्याची एक इम्युनोलॉजिकल मेमरी तयार होते. ती भविष्यात त्या रोगाविरोधात आपल्या शरीराला लढायला तयार करते. परंतु यात एक मोठा धोका आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा २.३ टक्के इतका आहे. त्यामुळं कोरोनाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचा वापर करायला गेलं तर बळींची संख्याही त्या प्रमाणात वाढेल हे निश्चित.

कोरोनाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटी किंवा विकसित होणारी रोगप्रतिकारक शक्ती काम करेलच याची खात्री अजून तरी शास्त्रज्ञांना वाटत नाही. चीनमधे कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या २६२ रूग्णांचा एक अभ्यास करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी १५ टक्के लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यामुळं कोरोनाविरोधात शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज् त्याविरोधात काम करतीलच याची शाश्वती शास्त्रज्ञांना अजूनही वाटत नाही. कोरोनाचाच एक प्रकार असलेल्या सार्सच्या अँटीबॉडीज् शरीरात तीन वर्षं कार्यरत राहिल्याचा हा अभ्यास सांगतोय.

हेही वाचा : कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना इतर साथरोगांहून वेगळा

चीनचा हुबेइ प्रांत हा कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पण या ठिकाणी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं समोर येतंय. इथं लॉकडॉऊन आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे असेपर्यंत कोरोनाचा प्रसार थांबला. पण यात शिथिलता आली, तसं कोरोनानं परत तोंड वर काढलं.

कोरोनाच्या या वायरसचा आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात झालेला इतका जलद बदल हा आश्चर्यकारक आहे. कोरोनाचाच एक प्रकार असलेल्या सार्स आणि मर्सप्रमाणे ताप, खोकला, श्वसनाचा त्रास हीच लक्षणं कोविड १९ची आहेत. पण त्याच्या प्रसाराचा वेग आणि बळींची संख्या मात्र कित्येक पटीनं जास्त आहे.

सुरवातीला कोरोनाच्या रूग्णांव्यतिरिक्त इतरांनी मास्क वापरायची गरज नाही, असं सांगितलं जायचं. आता प्रत्येकानं मास्क वापरायलाच हवा, असं सांगितलं जातंय. शारीरिक अंतराचंही तसंच. आता जास्तीचं अंतर ठेवायला सांगितलं जातंय. त्यावरून या साथीच्या रोगाबद्दल निश्चित अशी माहिती आजही उपलब्ध झालेली दिसत नाही.

सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची चाकं थांबवणाऱ्या या साथीचा सर्व जगभरात कमी अधिक प्रमाणात प्रसार झालाय. त्यामुळं पुढच्या काळात जर यावर लस उपलब्ध झालीच तरी कोरोनाचा समूळ नाश होणं शक्य दिसत नाही, असं अनेक तज्ञांचं मत आहे. इतर काही साथीच्या रोगांप्रमाणं कोरोनादेखील अधूनमधून तोंड वर काढून जगाला आव्हान देत राहील, असंच चित्र सध्या तरी दिसतंय.

हेही वाचा : 

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट