मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?

२३ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


१९ सेकंदांच्या क्लिपने साऱ्या राज्याचं लक्ष परळीतल्या मुंडे बहीण भावांच्या लढतीकडे वेधलं गेलंय. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही वादग्रस्त क्लिप वायरल झाल्याने कोण निवडून येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. १९ सेकंदांची क्लिप २०१९ मधे कुणाला निवडून देणार?

विधानसभा निवडणुकीसाठीचा औपचारिक प्रचार शनिवारी संध्याकाळी सहाला संपला. पण त्या क्षणालाच परळीत औपचारिक, अनौपचारिक प्रचार सुरू झाला. हे सारं परळी किंवा बीडमधे घडत असलं तरी हा प्रचार निव्वळ परळीपुरता मर्यादित नव्हता. साऱ्या महाराष्ट्रात या प्रचाराची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत ग्रामविकास, महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला गेला. पंकजा यांच्या समर्थकांनी धनंजय यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला. दुसरीकडे धनंजय यांच्या भाषणाची ही क्लिप सोशल मीडियावर वायरल केली जातेय.

साऱ्या राज्याचं लक्ष

या हायवोल्टेज ड्रामामुळे साऱ्या राज्याचं लक्ष परळी मतदारसंघातल्या या भाऊबंदकीकडे गेलं. प्रचाराची सांगता झाल्या क्षणालाच हे नाट्य सुरू झाली. पंकजा मुंडे प्रचार सभा संपल्यावर स्टेजवरच चक्कर येऊन पडल्या. चक्कर येण्यामागं वेगवेगळी कारणं सांगितली जाऊ लागली. याआधीच्या एका सभेत पंकजा यांनी या क्लिपचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

त्या म्हणाल्या, ‘काय शब्द वापरलेत तुम्ही स्वतःच्या बहिणीसाठी? २९ वर्ष मी तुम्हाला राखी बांधली. अजूनही मी तुम्हाला माझा भाऊ म्हणते. आणि तुम्ही काय म्हणता बहिणबाई? कुठल्याही पक्षाची असली तरी आपण ताईच म्हणतो की. जसं तुम्ही सुप्रियाताई म्हणता. बहिणबाई म्हणून किती खाली जाता? असं वाटतंय की राजकारण सोडून द्यावं.’

टीवीवर उलटसुलट चर्चांना ऊत आला. त्यातच एबीपी माझावर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले. त्यामुळे एखादा सिनेमा, टीवी सिरिअलमधला ड्रामा वाटावा असं वळण या प्रकरणाला मिळालं.

हेही वाचाः येत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल?

सुरेश धस यांनी केले खळबळजनक आरोप

धस यांच्या मते, ‘आताच मी तो विडिओ पाहिला. तो विडिओ संवेदनशील, भावनिक असून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेलीय. त्यामुळे पंकजा मुंडे दिवसभर नाराज होत्या. राजकारण कोणत्या स्तराला चाललंय. वायरल विडिओतले काही शब्द सांगूही शकत नाही. असंस्कृतपणाचं लक्षण आहे. २९ वर्ष राखी बांधणाऱ्या बहिणीबद्दल काय बोलावं हे राष्ट्रवादीच्या लोकांनी ठरवलं पाहिजे.’

राज्य महिला आयोगानेही धनंजय यांच्या कथित आक्षेपार्ह भाषणाची स्वतःहून दखल घेतली. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मुंडेंना नोटीस बजावली. आयोगाने आपल्या ट्विटमधे म्हटलं, ‘मंत्री आणि परळीमधील उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांचं विधान धक्कादायक आणि अशोभनीय आहे. महिला आयोग या विधानाची स्वतःहून दखल घेणार आहे. मुंडे यांचं हे विधान महिलांनाच लज्जा उत्पन्न निर्माण करणारं आहे, असं आयोगाचे सकृतदर्शनी मत बनलंय.’

एवढंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही पंकजा यांना पाठिंबा देत धनंजय यांचा निषेध केला. अख्खी भाजप पंकजा यांच्या पाठिशी उभी राहिली. दुसऱ्या बाजूला धनंजय यांच्याकडून या साऱ्या प्रकरणावर भूमिका मांडायला कुणीच समोर येत नसल्याचं चित्र होतं. खुद्द धनंजय यांनीच रात्री उशिरा आपल्या फेसबूक अकाऊंटवर आपली भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळून लावले. 

निवडणूक भावनिकतेवर नकोः धनंजय

धनंजय मुंडे म्हणाले, ‘शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर वायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमधे तपासावी. क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा. आपली निवडणूक विकास कार्यावर आहे. ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे.’

दुसऱ्या दिवशी धनंजय यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ‘कालपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे मी जगावं की नाही असा प्रश्न मला पडतोय. आजपर्यंत मी १५०० बहिणींचं कन्यादान केले. पंकजाताई, प्रितमताई माझ्या रक्ताच्या बहिणी आहेत. त्यांच्याबाबत मी असं कसं बोलू शकतो? ज्याने हे कृत्य केलंय त्यांच्याही बहिणी असतील त्याने एकदा तरी विचार करायला हवा होता. मातीची शपथ घेतो, मी काहीच वाईट बोललो नाही. मायबाप जनताच न्यायनिवाडा करेल.’

या साऱ्या प्रकरणावर पंकजा यांनी तिसऱ्या दिवशी आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या दिवशी त्या चक्कर आल्यामुळे दवाखान्यात होत्या. दुसऱ्या दिवशी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी भूमिका मांडली. मतदानाच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी मीडियाला सविस्तर प्रतिक्रिया दिली.

खूप हर्ट झालंः पंकजा

पंकजा म्हणाल्या, ‘माझ्याविषयी इतकं घाणेरडं बोललं गेलं, हे थांबवलं पाहिजे कुणीतरी. मी खोटं बोलत नाही म्हणून मला राजकारणात त्रास झाला. विरोधकांशीही मोठ्या मनाने वागलं पाहिजे असं मला वाटतं, मी तसंच करते. पण माझ्या बाबतीत कुणी तसं करेल की नाही मला माहीत नाही. मी तो विडिओ पाहिला. ते फुटेज माझ्या डोळ्यासमोरून दोन-तीनदा गेलं. त्यातला राग, तिरस्कार, ते एक्स्प्रेशन्स पाहून मला खूप हर्ट झालं. मला दोन दिवस लागले यातून बाहेर पडायला. माझा आत्मविश्वास कमी झाला.’

या क्लिप प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मौन पाळणंच पसंद केल्याचं दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मतदानादिवशी मीडियाशी बोलताना दिली. या प्रकरणावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

बहिणाबाई म्हणण्यात गैर कायः पवार

पवार म्हणाले, ‘मला बहिणाबाई या शब्दामधे आदर वाटतो. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मी लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाई या नावातच आदर आहे. बहिणाबाई असा उल्लेख केल्यानंतर यातना का होतात आणि चक्कर काय येते हे मला माहिती नाही. तीसचाळीस मिनीटं भाषण करताना काही होत नाही आणि शेवटी अशी चक्कर येते. याच्यामागे काय कारण आहे की मतदानात काही वेगळं चित्र दिसू शकेल अशी अस्वस्थता आहे हे मला माहीत नाही. पण यात आक्षेप घेण्यासारखं गंभीर काही आहे असं मला वाटत नाही.’ 

महिला आयोगाच्या कृतीवर उपरोधिक वक्तव्य केलं.  ते म्हणाले ‘धनंजय मुंडेंच्या क्लिपमधे मोडतोड केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महिला आयोगानं त्याची दखल घेतली. त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. हे स्वतंत्र आयोग आहे, तिथं बसून आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत, असं दाखवलंच पाहिजे असं नाही,’ असंही ते पुढे म्हणाले. रहाटकर आयोगाच्या अध्यक्ष असून भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षही आहेत.

दहा वर्षांपूर्वी पडली ठिणगी

२००९ मधे गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुंडे यांचं जिल्ह्यातलं राजकारण बघणारे धनंजय नाराज झाले. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. पण इथूनच मुंडे कुटुंबातल्या सुप्त संघर्षाला सुरवात झाली.

२०१२ मधे या सुप्त संघर्षाचा लावा वर आला. जानेवारी २०१२ मधे धनंजय यांनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. २०१३ मधे धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत धनंजय विजयी झाले. 

मे २०१४ मधे गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष बहिण विरुद्ध भाऊ असा झाला. २०१४ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा विरुद्ध धनंजय अशी लढत झाली. त्यामधे पंकजांनी बाजी मारली.

हेही वाचाः डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

स्थानिक संस्थांवर धनंजय यांचं वर्चस्व

डिसेंबर २०१६ मधे परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय अशी लढत झाली. धनंजय यांनी ३३ पैकी तब्बल २७ उमेदवार निवडून आणत नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

२०१७च्या सुरवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामधे भाजपला मोठा फटका बसला. मे २०१७ मधे परळी बाजार समितीची निवडणूक लागली. १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते.

अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर आले. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केलं. पंकजा यांच्या पॅनलला पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला.

गेल्या निवडणुकीत काय झालं?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना ९६,९०४ तर धनंजय मुंडे यांना ७१,,००९ मतं पडली. अटीतटीच्या या लढतीत २५ हजार ८९५ च्या मताधिक्याने पंकजा विजयी झाल्या.

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे एखाद्या निवडणुकीला सामोरं जात होत्या. मुंडे साहेबांशी आपले चांगले संबंध असल्याचं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंकजा यांना पाठिंबा देत तिथे आपला उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं होतं. दुसरीकडे मुंडे साहेबांविषयीच्या सहानुभुतीचाही पंकजा यांना लाभ झाला.

पण गेल्या लोकसभा निवडणुकीतली बीड मतदारसंघातली मतदानाची आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. परळीतून भाजपच्या प्रीतम मुंडे यांना सर्वाधिक ९६,०४९ मतं, तर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना ७७,२६९ मतं पडली. गेली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची तुलना केल्यास परळीत भाजपचं मताधिक्य साडेआठशे मतांनी घटलंय. याउलट राष्ट्रवादीच्या मताधिक्यात जवळपास सहा हजारांनी वाढ झालीय.

हेही वाचाः भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?

आता काय होईल

पंकजा यांना वंजारी समाजात मोठा करिश्मा असलेल्या गोपीनाथ मुंडे घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडेंबद्दल आस्था असणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाला मुंडे साहेब मुख्यमंत्री बनू शकले नाहीत याची आजही खंत वाटते. त्यामुळे पंकजाला संधी मिळायला हवी, असं या लोकांना वाटतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सावरगाव घाट इथल्या सभेतही पंकजांच्या समर्थकांना पंकजा मुंडे सीएम सीएम असे नारे दिले.

दुसरीकडे धनंजय मुंडेही तरुण, तडफदार नेते आहेत. काकांचं स्थानिक राजकारण सांभाळणाऱ्या धनंजय यांना जिल्ह्यातल्या राजकारणातले छक्केपंजे माहीत आहे. या बेरीज वजाबाकीच्या जोरावरच त्यांनी परळी तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलं एकहाती वर्चस्व ठेवलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे त्यांचं मतदारसंघात दांडग नेटवर्किंग आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागलेली असताना ते पक्षाचा राज्यातला आवाज म्हणून समोर आलेत. 

सहानुभुतीचा दुहेरी फॅक्टर

पंकजा आणि धनंजय दोघंही एकमेकावर भावनिक राजकारणाचा आरोप करतात. दोघंही गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेऊन राजकारण करतात. पण खुद्द गोपीनथ मुंडे भावनेच्या जोरावर राजकारण करच नव्हते. भावनिक राजकारणावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळेच ते संघर्षयात्रा वगैरे काढून जनमत तयार करण्यावर भर द्यायचे.

पंकजा मुंडे यांना धनंजय यांच्या कथित भाषणामुळे चक्कर आल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. यामुळे पंकजा यांच्या बाजूने सहानुभुती निर्माण झालीय. दुसरीकडे धनंजय यांनीही पत्रकार परिषदेत रडतरडत आपली भूमिका मांडली. साऱ्या टीकेमुळे मनात स्वतःला संपवून टाकण्याचा विचार आल्याचं धनंजय म्हणाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे आपल्या प्रचारात निवडणूक शेवटच्या दिवसांत भावनेवर नेली जाईल, असं आपल्या भाषणात बोलून दाखवत होते.

बहीण भावांच्या या भुमिकांमुळे परळीत दुहेरी सहानुभुती तयार झालीय. त्याचा दोघांनाही कमीजास्त फायदा, तोटा होईल. पण शेवटी ग्राऊंडवर जो जास्त ताकदवान त्यालाच जनता कौल देईल, असं चित्र आहे.

हेही वाचाः 

एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १

नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल