घन युद्धाचे दाटुनीया आले...!

०१ मार्च २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार.

भारत-पाकिस्तानमधील वैमनस्य आता टोकाला जाऊन पोचलंय. आणि त्यामुळेच येत्या दोन दिवसांत जर काही चमत्कार घडला नाही, तर या दोन शत्रू देशांमधे लढाई होणं आता काळ्या दगडावरील रेघ असल्यासारखं दिसत आहे. गेल्या मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पहाटेच्या अंधारात जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून तीनशेहून अधिक दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांचा खातमा केला. आणि अर्ध्या तासाची ही नियोजित कारवाई २१ मिनिटांतच यशस्वी करून आपलं चातुर्य आणि लष्करी तयारी यांचं दर्शनही जगाला घडवलं.

भारतीय हवाई दलाचं अभिनंदन

दुसऱ्याच दिवशी भारताने आपल्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या विमानाला भुई दाखवली आणि आपल्या जागरुकतेचंही दर्शन घडवलं. स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतीय हवाई दलाच्या विमानांनी १९७१ मधे पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्तानने अनेकदा आगळीक केली. परंतु पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करण्याचं धैर्य भारताने दाखवलं नव्हतं. तो इतिहास या आठवड्यात घडला. या जिगरबाज कारवाईबद्दल भारतीय सशस्त्र दलांचं, विशेषत: हवाई दलाचं अभिनंदन.

दोन देशांमधे लष्करी हालचाली सुरु झाल्या की पहिला बळी सत्याचा जातो. कारण प्रतिपक्ष, विशेषत: पाकिस्तानसारख्या देशातली सरकारी यंत्रणा आणि माध्यमं खोटा प्रचार करून आपल्या आणि जगातल्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात या प्रयत्नांत ते स्वत:लाच फसवत असतात, हे ते विसरतात आणि मग त्यांचं जगात हसं होतं.

१९६५, १९७१ आणि अलीकडे कारगिल कारवाईच्या काळात पाकिस्तानने असंच स्वत:चं हसं करून घेतलं होतं. पण त्यापासून काहीही धडा न शिकता पाकिस्तानी यंत्रणा त्याच्या त्या जुन्या आणि कालबाह्य ठरलेल्या खेळींचा आधार घेत आहे. लवकरच सत्य जगासमोर येईलच.

भारताकडून पाकिस्तानचं बारावं

पुलवामामधे भारताच्या सशस्त्र दलाच्या बसेसवर हल्ला करून पाकिस्तानने आगळीक केली. तेव्हाच त्याची किंमत मोजावी लागणार, हे स्पष्ट झालं होतं. पाकिस्तानच्या या कारवाईबाबत जागतिक पातळीवर मत बनवल्यानंतर आणि अमेरिकेला आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळाल्यानंतर १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवाई हद्द ओलांडली आणि बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या छावण्यांवर हल्ला केला आणि तब्बल ३०० प्रशिक्षीत अतिरेक्यांना पहाटेच कंठस्नान घातलं. पुलवामातल्या नीच हल्ल्यानंतर बाराव्या दिवशी ही कारवाई झाली. म्हणजेच वाच्यार्थाने भारताने पाकिस्तानचं बारावंच घातलं.

भारत-पाकिस्तानमधले संबंध गेले काही महिने बिघडतच चाललेत. पाकिस्तान प्रशिक्षीत अतिरेक्यांनी गेल्या काही वर्षांत शेकडो निष्पाप भारतीयांचे बळी घेतले. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरचा हल्ला तर सर्वश्रुतच आहे. २०१४ पर्यंत भारतात काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर होतं. अफझल गुरू आणि कसाब यांच्यासारख्या अतिरेक्यांना फाशी देण्यापलिकडे या सरकारने काहीच केलं नाही. 

त्यामुळे पाकिस्तान प्रशिक्षीत अतिरेक्यांची हिंमत वाढतच गेली. मात्र २०१४ मधे नरेंद्र मोदी यांचं भाजप सरकार दिल्लीतल्या गादीवर बसलं आणि चक्रं उलटी फिरू लागली. २०१६ ला भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात चढाई करून तिथल्या अतिरेकी छावण्या उध्वस्त केल्या. तेव्हा तो पाकिस्तानला मोठा धक्का होता. पण त्यानंतर दोन वर्षांत गाडी पुन्हा मूळ पदावर आली आणि पाकिस्तान शिरजोर बनला.

पाकचा दावा फोल

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने त्याचा प्रतिशोध घेतला नसता, तर तो भारताचा कमकुवतपणा ठरला असता. आणि कदाचित येत्या लोकसभा निवडणुकांत तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभवाचं कारण ठरला असता. पण मोदींनी लष्कराला सर्वाधिकार देऊन त्यांच्यातला आत्मविश्वास जागवलाच. शिवाय बारा दिवसांतच सर्वशक्तीनिशी हल्ला करून पाकिस्तानचे स्वसामर्थ्याविषयीचे दावेही सपशेल फोल ठरवले.

युद्धात मैदानातल्या शक्तीइतकीच मानसिक सबलता महत्त्वाची असते. मोदींनी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवतानाच पाकिस्तानचं मानसिक खच्चीकरण केलं. आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडलं. जर फलंदाजाचा पवित्राच आक्रमक न होता, बचावात्मक असेल, तर गोलंदाजासाठी ती सुखकारक बाब असते. आताही तसंच झालं. त्यामुळेच भारत आता अधिक सबल बनलाय.

सत्तासंघर्षाचा इतिहास

मुख्य प्रश्न आणि औत्सुक्याचा विषय हा आहे की, भारत-पाकिस्तान युद्ध खरंच होणार का? आणि केव्हा? भारताविरुद्ध युद्ध छेडणं पाकिस्तानसाठी आवश्यक आहे. त्याला लष्करी नाही, तर राजकीय कारणं आहेत. पाकिस्तानात गेल्यावर्षी इम्रान खान यांची सत्ता आली खरी, पण त्यांना पूर्ण बहुमत सहजासहजी मिळालं नाही. काठावरच्या बहुमतावर इम्रान खान पंतप्रधान झाले. केवळ लष्कराच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. यामुळेच आज इम्रान खान यांचं सत्तेतेतलं अस्तित्त्व केवळ आणि केवळ लष्कराच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे.

या स्थितीत लष्कराची इच्छा अव्हेरणं त्यांना शक्य नाही. यापूर्वी जेव्हा जेव्हा पाकिस्तानी लष्कर विरुद्ध राजसत्ता यांच्यात सत्तासंघर्ष झाले, त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानात लष्करी क्रांती झाल्या आणि लोकनियुक्त सरकारं लष्कराने पदच्यूत केली. जनरल परवेझ मुशर्रफ हे तर पूर्वीचे लष्करशहाच. पण त्यांचीही तेव्हाच्या लष्कराने गय केली नाही.

हा पूर्वेतिहास ठाऊक असल्यानेच इम्रान खान लष्कराच्या इच्छेशिवाय आणि सल्ल्याशिवाय एक पाऊलही पुढे वा मागे टाकणार नाहीत, हे नक्की. पाकिस्तानी लष्कराला युद्ध वा युद्धजन्य स्थिती हवी आहे. कारण अशा स्थितीतच `तातडीची बाब' म्हणून शस्त्रसामग्री खरेदी करता येते. त्यातील वारेमाप दलाली आपसूकच लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात जाते. त्यामुळेच लष्कराला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार.

जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी युद्ध

शिवाय सध्या पाकिस्तान कमालीच्या आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि कमालीची महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. अशा वेळी जनतेचा पाठिंबा राज्यकर्त्यांपेक्षा लष्करालाच असणार. त्या स्थितीत भारताविरुद्ध युद्ध पुकारलं, तर जनतेचं लक्ष विचलीत करता येईल, असा इम्रान खान यांच्या सल्लागारांचा होरा आहे. याचाच अर्थ इच्छा असो वा नसो इम्रान खान यांना युद्धाच्या दिशेनंच पावलं टाकावी लागतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४७, १९६५, १९७१ अशी तीन खणखणीत युद्धं झाली. या तीनही युद्धांत पाकिस्तानला भारताने चारी मुंड्या चित केलं. १९९९ चं कारगील युद्ध हे `युद्ध' या सदरात मोडणारं नव्हतं, तरीही त्याचे परिणाम तितकेच भयानक होते. ते `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान जर आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे.

तरी छोटं मोठं युद्ध अपरिहार्य

युद्ध झालंच, तर भारताचं सैन्य पश्चिम सीमेवर केंद्रीत होईल. तशा वेळी पूर्वांचलात, विशेषत: अरुणाचल, मिझोरममधे आपले तळ निर्माण करण्याचा चीनचा मनोदय याहे. शिवाय पाकिस्तानला मदत करण्याच्या नावाखाली चीन बलुचिस्तान, पेशावर अशा पाकिस्तानी प्रांतांमधे आपलं बस्तान करण्यासाठी तळ उभारण्याचा मनोदय राखून आहे. या स्थितीत फार मोठं नसलं, तरी छोटं-मोठं युद्ध अपरिहार्य दिसतं.

आणि ते होणारच असेल, तर त्यासाठी फार विलंब लागणार नाही, हे नक्की. कदाचित हा लेख आपल्या हाती येईपर्यंत युद्धाची रणशिंगे वाजूही लागली असतील. 
 

(लेखक हे ज्येष्ठ संपादक असून राज्यसभेचे माजी सदस्य आहेत.)