येत्या पाच वर्षात खरंच भारत पाकिस्तान युद्ध होईल?

२३ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल या गुप्तचर संस्थेनं 'ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट' पब्लिश केलाय. यात २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमधे मोठं युद्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. याआधी २०१७ या संस्थेचा असाच एक रिपोर्ट आला होता. त्यात जागतिक साथ येईल आणि त्यातून जगभर आर्थिक संकट उभं राहिल असं म्हटलं होतं. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे हे भविष्य खरं ठरलंय.

भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावाचे राहिलेत. बालाकोट एअर स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण होत असताना अधूनमधून संवादासाठी म्हणून एक पाऊल पुढं टाकलं जातंय. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना पत्र पाठवलं होतं. शेजारी राष्ट्र म्हणून भारत पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छितं असं त्यात म्हटलं होतं. इम्रान खान यांनीही पुन्हा पत्र पाठवत मोदींचे आभार मानले होते. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं.

त्यातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही भूतकाळ विसरून भारत पाकिस्ताननं पुढं जायला हवं असं म्हटलं होतं. त्यामुळे दोन्हीकडच्या संबंधांवर पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. अशावेळी अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल अर्थात एनआयसी या गुप्तचर संस्थेचा 'ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट' आलाय. त्यात २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानमधे मोठ्या युद्धाची शक्यता असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानमधे मात्र या रिपोर्टची फार चर्चा होतेय.

हेही वाचा: तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?

एनआयसीचा रिपोर्ट विश्वासार्ह?

एनआयसीची स्थापना १९७९ ला झाली. तेव्हापासून या संस्थेनं गुप्तचर आणि समुदायाची धोरणं यावर काम करायला सुरवात केलीय. १९९७ ला पहिल्यांदा एनआयसीचा ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट आला. अमेरिकन सरकारची पुढची स्ट्रॅटेजी, धोरणं नेमकी कशी असायला हवी, त्यात काय बदल करायला हवेत हे सांगण्यासाठी हा रिपोर्ट मार्गदर्शक ठरतो. रिसर्च करून हा रिपोर्ट तयार केला जातो.

प्रत्येक चार वर्षांनी रिपोर्ट पब्लिश केला जातो. याआधी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना २०१७ ला असाच एक रिपोर्ट आला होता. पुढच्या काही वर्षांमधे जागतिक साथ येऊ शकते असं त्यावेळी रिपोर्टमधे म्हटलं गेलं. अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जे संकट ओढवलंय त्याचा विचार केला तर हा अंदाज खरा ठरल्याचं दिसतंय.

२०४० पर्यंत जगभरात काय काय घडू शकतं याच विश्लेषण सध्याच्या रिपोर्टमधे करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय संस्था, वेगवेगळ्या देशांच्या व्यवस्था, जागतिक आव्हानं, जगभरात घडत असलेल्या घडामोडी, त्यातून निर्माण होणारी स्पर्धा या सगळ्याचा विचार यात करण्यात आलाय. याच रिपोर्टमधल्या 'फाईव इयर रिजनल आऊटलूक रिपोर्ट - साऊथ आशिया' या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान संबंधांवर भाष्य करण्यात आलंय.

असं असेल युद्धाचं स्वरूप

दक्षिण आशियात भविष्यात मोठ्या प्रमाणात अस्थिरता, अशांतता निर्माण होईल असंही हा रिपोर्ट म्हणतो. तसंच पुढच्या पाच वर्षात भारत आणि पाकिस्तानमधे मोठं युद्ध होईल. दोन्हीकडचे असंख्य सैनिक मारले जातील असंही म्हटलंय. तर युद्धामागची नेमकी कारणंही या रिपोर्टमधे देण्यात आलीत.

पुढच्या पाच वर्षात भारतात मोठा दहशतवादी हल्ला होईल. या हल्ल्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानपर्यंत पोचतील. भारताकडून दबाव वाढेल. भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले करेल. युद्ध सुरू होईल. याआधी पाकिस्तानकडून पुलवामाचा हल्ला झाला. त्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने बालकोट इथं सर्जिकल स्ट्राईक केला होता.

या युद्धामुळे पुढची अनेक वर्ष दोन्ही देशांसोबत दक्षिण आशियाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. युद्ध मोठं असलं तर अणूयुद्धाची चूक दोन्ही देश करणार नाहीत असंही या रिपोर्टमधे म्हटलंय.

हेही वाचा: चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा

युद्धाचा दावा कितीपत खरा?

अफगाणिस्तामधून अमेरिका आपलं सैन्य माघारी घेईल. त्यामुळे तिथं तालिबान आपलं प्रस्थ वाढवेल. पाकिस्तानसाठी ही आयती चालून आलेली संधी असेल. त्याचा पुरेपूर वापर केला जाईल. त्यातून  काश्मीर आणि भारतात कुरापती करण्यासाठी अधिक पाठबळ मिळेल. हेच युद्धाचं कारण ठरेल असं हा रिपोर्ट म्हणतोय. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घ्यायची घोषणाही केलीय.

अफगाणिस्तान हा भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांमधला वादाचा विषय आहे. त्यामुळे तणाव निर्माण होतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्हीकडेही तालिबान ऍक्टिव आहे. अमेरिका अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेईल तेव्हा तालिबान आणि तालिबानविरोधी यांच्यात संघर्ष निर्माण होईल. तालिबानविरोधातल्या भूमिकेतून भारतावर हल्ला केला जाईल असं सूत्र यामागे असावं.

'सरसकट युद्ध केलं जाईल असं या रिपोर्टमधे गृहीत धरण्यात आलंय. भारताचं लष्कर हे एक प्रोफेशनल युनिट आहे. त्यामुळे सरसकट युद्धच केलं जाईल ही जी काही भाषा आहे त्यापलीकडे आपण गेलेलो आहोत. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे हे जे काही रिपोर्टमधून सांगितलं गेलंय ते फार चुकीचं आहे.' असं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक केदार नाईक म्हणतात.

पाणीवाटप महत्वाचा फॅक्टर?

पाकिस्तानमधल्या अंतर्गत संघर्षाचा मुद्दाही या युद्धाच्या कारणाशी जोडला जातोय. पुढच्या पाच वर्षात पाकिस्तानच्या मोठ्या लोकसंख्येला पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्रामनेही त्याबद्दलचं सूतोवाच केलं होतं. या पाण्याच्या संघर्षामुळे लोकांमधे असंतोष निर्माण होईल. लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे या संघर्षाला रोखण्यासाठी म्हणून युद्ध केलं जाईल. असं रिपोर्टमधे म्हटलं गेलंय.

हा मुद्दाही भारताशी जोडला जातोय. उरी आणि पठाणकोट हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानचं पाणी तोडावं अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. इतके वाद होत असतानाही १९६० मधे झालेला सिंधू पाणीवाटप करार आपण अद्यापही तोडलेला नाही. म्हणजे आपल्या प्रकल्पांना पाकिस्तान विरोध करत असताना आपण मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन न्यायिक पद्धतीने हा प्रश्न सोडवला.

गेली ६० वर्ष आपण हा मुद्दा उत्तमप्रकारे हाताळलाय. त्यामुळे सध्या हा युद्धाचा विषय होईल वाटत नाही. आपल्यावर जागतिक तापमानवाढीचं संकट आहे. ते तसंच कायम राहिलं आणि आपण काही बदल करू शकलो नाही. पावलं उचलली नाहीत तर पाण्याचा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर होईल. त्याचा परिणाम पाणीवाटपावर होऊ शकेल. त्यातून भारत - पाकिस्तान संघर्ष वाढू शकेल.

हेही वाचा: सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?

भांडण आपलं फायदा तिसऱ्याचा 

केदार नाईक म्हणतात की, 'युद्ध कधीच अपरिहार्य नसतं. पण लोक तसा विचार करत असतील तर युद्ध अपरिहार्य आहे. तर युद्ध अपरिहार्य होतं.' हे युद्धासाठी वातावरण तयार केलं जातं. मुळात भारत आणि पाकिस्तानचे प्रश्नही फार वेगळे आहेत. दोन्ही देशांनी गरिबी, दारिद्र्य, दहशतवाद, आणि लोकांच्या मूलभूत सोईसुविधांवर काम करायला हवं. तसं केलं नाही तर त्याचा फायदा चीन, अमेरिकेला होईल.

भारताला पाकिस्तानपेक्षाही मोठे शत्रू आहेत. आपली अर्थव्यवस्था आधीच डबगाईला आलीय. आपण युद्धात गुंतलो १० वर्ष तरी मागे जाऊ. अमेरिकेच्या लष्कराला अशी युद्ध चालू ठेवण्यात, सतत पेटती ठेवण्यात जास्त रस आहे. त्यामुळे जागतिक महासत्ता म्हणून त्यांनाही महत्व मिळतं. आपण भांडत राहणं हे अमेरिका आणि चीन या दोघांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. त्यामुळे असा रिपोर्ट येणं साहजिक आहे असंही म्हटलं जातंय.

हेही वाचा: 

 ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

त्यांच्या वर्णद्वेषाचा धिक्कार, आपल्या वर्णद्वेषाचा उदो उदो

इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?