लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

०८ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं.

आज म्हणजे ८ डिसेंबरपासून ब्रिटनने कोरोना वायरसची लस लोकांना द्यायला सुरवात केलीय. पिफझर आणि बायो-एन-टेक या कंपनीनं बनवलेली कोरोनाची लस सरकारी दवाखान्यात मिळतेय. याचा अर्थ आता ब्रिटनमधला कोरोना वायरस संपणार, लोकांना शारीरिक अंतर पाळायची, मास्क घालायची गरज नाही असा होतो का? तर नाही!

कोरोना वायरस आपल्यातून जावा यासाठी जगातले सगळेच देश झटतायत. म्हणूनच जगात लसीच्या संशोधनावर भरपूर भर देण्यात आलाय. पण फक्त लस टोचल्याने कोरोना वायरस संपणार नाही, असं डब्लूएचओचे संचालक टेड्रोस अधानोम यांनीही म्हटलंय. म्हणूनच लसीसोबत आपल्याला कोरोना वायरसवर एखादं औषध किंवा उपाचपद्धतीही शोधावी लागणार आहे. 

कुणी म्हणेल लस हे औषधी उत्पादनच असतं की! मग लस आणि औषध यात फरक तो काय? आता हा फरक समजून घेण्याआधी आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती नेमकी कशी काम करते ते समजून घ्यायला हवं.

कुलूप-किल्लीची पद्धत

आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे २४ तास काम करणारं एक यंत्रच असतं. या यंत्राकडे बाहेरच्या घटकांना शरीरात संसर्ग किंवा इन्फेक्शन आणण्यापासून थांबवण्यासाठी काही शस्त्रं असतात. यात काही अवयव, स्नायू आणि पेशींचा समावेश होतो. हे तिघं एकत्र मिळून शरीराचं संरक्षण करत असतात.

या पेशींना शरीरातला घटक कोणता आणि बाहेरचा घटक कोणता हे ओळखता येतं. बाहेरून शरीरात येणाऱ्या या बॅक्टेरिया आणि वायरसकडे अँटीजन नावाचा एक घटक असतो. हा अँटीजन रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करायला सुरू करतो. प्रत्येक वायरसच्या अँटीजनचा आकार वेगळा असतो. ही कुलूप-किल्ली सारखी पद्धत असते. अँटीजन म्हणजे कुलूप.

या कुलपाची किल्ली असते ती आपल्या शरीरातल्या पेशींकडे. हा बाहेरचा वायरस शरीरात आला की लिम्फोसाइट्स नावाच्या शरीरातल्या पेशी सक्रिय होतात. या अँटीजनला आणि ते अँटीजन सोडणाऱ्या वायरसला मारून टाकण्यासाठी त्या स्वतः हल्ला चढवतात नाहीतर या अँटीजनच्या कुलपाला बरोबर फिट होणारी किल्ली म्हणजेच अँटीबॉडी तयार करतात. प्रत्येक वायरसचा अँटीजन वेगळा त्यामुळेच त्याला लागणारा अँटीबॉडीही वेगवेगळा तयार केला जातो. म्हणूनच एका वायरसचा अँटीबॉडी दुसऱ्या वायरसवर काम करत नाही.

हेही वाचा : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

लस म्हणजे काय?

आता अँटीबॉडीकडून संसर्ग बरा झाला, सगळे वायरस आणि त्याचे अँटीजन निष्क्रिय झाले तरी काही अँटीबॉडी रक्तात राहतात. पुन्हा तसा वायरस शरीरात आला आणि त्याचं कुलूप उघडणारी किल्ली आपल्याकडे असते. ती पुन्हा सक्रिय होते आणि वायरसला लगेचच निष्क्रिय करायला सुरू करते. अशी ही आपली रोगप्रतिकारक शक्ती काम करत असते.

या सगळ्यात लस काय काम करते? तर प्रत्यक्ष वायरसचा हल्ला होण्याआधीच शरीरातल्या त्या लिम्फोसाइट्स पेशींना कुलपाचा अनुभव देणं. वायरसला मारणाऱ्या अँटीबॉडी बनून त्या शरीरात रक्तात साठवल्या जाव्यात यासाठी लसीमधे त्या आजाराचेच काही वायरस असतात. म्हणजे, कोरोनाच्या लसीमधून कोरोनाचेच काही वायरस शरीरात सोडले जातात. 

हे वायरस अर्धमेले किंवा अगदी निष्क्रिय असतात. त्यामुळे शरीरात गेले तरी ते फार काही धुमाकूळ घालू शकत नाहीत. पण त्यांच्या अँटीजनचा आकार पेशींना लक्षात येतो आणि त्याप्रमाणे अँटीबॉडी तयार होतात. पुढे खरोखरच वायरसचा संसर्ग झाला तरी शरीराला त्यांच्याशी लढण्याची शक्ती लसीमुळे आधीच मिळालेली असते.

अँटीजनवरून ठरतो लसीचा प्रकार

वायरसच्या अँटीजन सोबतच एखाद्या लसीत आणखी काही घटक असतात. अँडज्युवेंट म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद वाढवण्यासाठीची सहाय्यकं, वायरसची वाढ होऊ नये यासाठी अँटीबायोटीक्स आणि लस दिर्घकाळ टिकून रहावी, त्यातली व्यवस्था आहे तशीच रहावी यासाठी काही प्रिझरवेटिव आणि स्टॅबिलायझर अशा सगळ्या घटकांची मिळून एक लस बनते.

फक्त त्यात कोणता अँटीजन वापरलाय यावरून लसीचे प्रकार बदलतात. काही लसींमधे जिवंत असणारे पण शक्ती कमी झालेले वायरसचे अँटीजन वापरतात. तर काहींमधे संपूर्ण निष्क्रिय झालेले वायरस वापरले जातात. यासोबतच लॅबमधे कृत्रीमरित्या तयार केलेल्या वायरससारख्या एखाद्या गोष्टीचाही अँटीजन म्हणून लसीत उपयोग होतो. कॉन्जुगेट लसींमधे वायरसना साखरेसारखा एक थर देतात. यामुळे पेशींना वायरस आणि त्याचा अँटीजन ओळखायला उपयोग होतो.

वायरसपासून शरीराला पुर्णपणे प्रतिबंधित करण्यासाठी शक्यतो लसीचे एका पेक्षा जास्त डोस घेणं आवश्यक असतं. हे डोस इंजेक्शनमधून थेट रक्तात किंवा तोंडातून, नाकातून शरीरात सोडले जातात. कोरोनाची लस ही नाकातून घ्यायची असेल आणि तिचे किमान दोन डोस घ्यावे लागतील, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा : या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय

औषधाचा उपयोग काय?

लस ही सहसा इंजेक्शनमधून दिली जाते. तसं कोणत्याही आजारावरचं औषधं आपण शक्यतो तोंडातून घेतो. गोळ्या, कॅप्सुल खातो. किंवा सिरप पितो. पण कधीकधी तोंडावाटे औषध घेणं शक्य नसतं तेव्हा इतरही मार्गांचा वापर केला जातो. नाकातून किंवा सलाईनमधूनही थेट रक्तात औषध पुरवलं जातं. कधी कधी डोळ्यांचे ड्रॉप, कानांचे ड्रॉप हेही आपल्याला वापरावे लागतात. त्वचेवरचा संसर्ग घालवण्यासाठी मलम लावलं जातं. हीसुद्धा आजार किंवा संसर्ग बरा करणारी औषधंच असतात.

खरंतर, फक्त आजार बरा करण्यासाठी नाही तर आजारावर उपचार करण्यासाठी किंवा तात्पुरता आराम मिळावा म्हणूनही औषधांचा वापर होतो. पाय दुखत असेल तर पेन किलर घेऊन ते दुखणं तात्पुरतं थांबवता येऊ शकतं. अनेकदा काही केमिकल कमी पडत असतील तर ते भरून काढण्याचं कामही औषधं करू शकतात. उदाहणार्थ, आपल्याला डायबेटिस आणि रक्तात साखर कमी पडत असेल तर आपण गोळी घेतो आणि इन्शुलिन नावाची ही साखर ही गोळी भरून काढते. 

म्हणून प्रत्येक आजाराला लागतं वेगळं औषध

लसीप्रमाणेच कुलूप किल्लीची पद्धत औषधांमधेही चालते. वायरस आपल्या शरीरात असेल तर तो स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. आपल्या पेशी त्या वायरसला हरवण्यासाठी लढत असतात. पण कधीतरी लढताना ही शक्ती कमी पडते. अशा प्रकारची शक्ती भरून काढण्याचं काम औषधं करतात. 

आपण गोळी घेतो किंवा सिरप घेतो तेव्हा ते तोंडातून आपल्या पोटात, छोट्या आतड्यात आणि लिवरमधे जातं. तिथं त्या गोळीचे तुकडे होतात आणि रक्तात मिसळले जातात. हे रक्त शरीरातल्या सगळ्या अवयवांकडे जातं.  

आता हे औषध म्हणजे किल्ली. आणि कुलूप असतं रिसेप्टर नावाचं प्रोटिन मॉलेक्यूल. ही औषधं रिसेप्टरच्या शोधात जातात. अर्थात, प्रत्येक आजाराचा रिसेप्टर वेगळा. त्यामुळेच प्रत्येक आजारवर दुसरं औषध, दुसरी किल्ली लागत असते. समजा, आपल्या पायावर सूज आलीय आणि त्यामुळे दुखतंय. तर सूज आलेल्या जागी एक प्रकारचे रिसेप्टर्स असतील. त्या रिसेप्टरची चावी आपल्या शास्त्रज्ञांनी औषधात बसवली असते. त्यामुळेच आपल्याला आराम मिळतो.

हेही वाचा : कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

लसीकरणाने वाचतात लाखो जीव

वरवर पाहता या दोन्ही प्रक्रिया सारख्याच दिसतात. पण लसीची प्रक्रिया वायरस शरीरात येण्याआधी होत असते तर औषधं ही वायरसची लागण होऊन माणूस आजारी पडल्यावर घेतात.

जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोकांचे जीव लसीकरण केल्यामुळे वाचतात. लसीकरण हे एक वरदान आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त गरज आपल्याला औषधांची लागते. औषधं घेतल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती तयार होत नाही. पुन्हा वायरसने ऍटॅक केला तर पुन्हा माणूस आजारी पडून त्याला औषधं घ्यावी लागतात. लस मात्र एकदा घेतली की पुढे माणूस जिवंत असेपर्यंत टिकू शकते.

असं असलं तरी कोरोनासारख्या जागतिक साथरोगात लसीचा उपयोग दिसायला काही वर्ष, काही दशकं जाऊ शकतात. भारतातल्या गेल्या दोन ते तीन पिढ्या सहा सहा वर्ष पोलिओचा डोस घेतायत. तेव्हा कुठे आपण आत्ता पोलिओ मुक्त झालो आहोत. एखादा साथरोग पूर्णपणे काढून टाकायला असा अनेक वर्षांचा काळ जातो. मात्र कोरोनाच्या लसीनं काही महिन्यातच ही कामगिरी फत्ते करावी अशी अपेक्षा आपण करत आहेत. आपली ही अपेक्षा फोल ठरणार आहे. लस आली तरी कोरोना संपूर्णपणे जाण्यासाठी ती प्रभावी ठरणार नाहीय. त्यामुळे औषधं शोधण्याचीही गरज आहे.

हेही वाचा : 

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

आदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल?

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात