विप्रो कंपनीनं ३०० कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी काम करत असल्याचं कारण देत कंपनीतून काढून टाकलंय. तांत्रिकदृष्ट्या या प्रकाराला 'मूनलायटिंग' असं म्हणतात. म्हणजे आपल्या मूळ कामाव्यतिरिक्त रात्रीच्या उजेडी इतरत्र जॉब करणं. अगदीच चोरी-छुपे हा प्रकार चालू असतो. कोरोनातल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या काळात मूनलायटिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत. सध्या आयटी क्षेत्रात याची जोरदार चर्चा होतेय.
आपण एखाद्या कंपनीत जॉब करत असू आणि अचानक कोणतीही कल्पना न देता आपल्याला काढून टाकलं गेलं तर? आपण दचकूच की नाही? असंच काहीसं सध्या विप्रो कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं झालंय. एकाचवेळी तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय विप्रोनं घेतल्यामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडालीय.. आपल्याला तसा अनोळखी असलेला मूनलायटिंगचा प्रकार याला कारण ठरलाय.
हेही वाचा: आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा
साधारणपणे आपण कुठंही नोकरी करत असू तर त्याचा टायमिंग सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशा ठराविक वेळेत असतो. त्याव्यतिरिक्त असलेल्या शिफ्टचा भाग वेगळा. पण कामाच्या टायमिंगचं साधारण शेड्युल हे असंच असतं. समजा या कामाच्या पलीकडे आपल्याला एखादा जॉब करायचा असेल तर तो जुगाड करूनच करता येणं शक्य आहे.
रात्रीच्या याच चोरी-छुपे जॉब करण्याच्या प्रकाराला तांत्रिकदृष्ट्या मूनलायटिंग म्हणतात. या कामाचा थेट रात्रीच्या चंद्राशी संबंध जोडला जातो. मराठीत मूनलायटिंगचा सरळ साधा अर्थ होतो चंद्रप्रकाश. थोडक्यात रात्रीच्या उजेडी अगदी आपल्या मूळ कंपनीला कोणताही थांगपत्ता लागू न देता एखादा जॉब करणं. अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे अशाप्रकारचा जॉब करावा लागतो.
इतरत्र जॉब करणाऱ्यांना आपल्या तुटपुंज्या पगारातून आर्थिक अडचणी येणं समजून घेता येईल. पण आयटी सारख्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असलेल्या क्षेत्रातही मूनलायटिंगचे प्रकार आढळून आलेत. कोरोनात वर्क फ्रॉम होमची संधी हेरून आयटी कर्मचाऱ्यांनी आपलं उत्पन्न दुप्पट करायचा सपाटा लावला.
अमेरिकेत ६०च्या दशकात पहिल्यांदा मूनलायटिंग पॉलिसी लागू करण्यात आली. इंग्लंडनंही तांत्रिकदृष्ट्या या गोष्टीला स्वीकारलं होतं. भारतात मात्र अशाप्रकारे दोन जॉब करणं 'इंडिविज्यूअल एम्प्लॉयमेंट ऍग्रिमेंट' आणि इथल्या आयटी कंपनीच्या नियमांमधेही बसणारं नाही. पण गेल्यावर्षी भारतातला फूड डिलिवरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्वीगीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मूनलायटिंग पॉलिसी लागू केली. इथूनच एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं.
भारतात मूनलायटिंगचा पहिला प्रकार जुलैच्या आसपास बंगळुरूतून समोर आला. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत काम करणारी व्यक्ती एकाच वेळी ७ ठिकाणी काम करत असल्याचं आढळून आलं होतं. जुलैमधेच 'कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज' नावाचा आयटी क्षेत्रातल्या ४०० व्यक्तींवर केलेला एक सर्वेही आलाय. त्यात तर ६५ टक्के कर्मचारी कोरोनात 'वर्क फ्रॉम होम' करताना अर्धवेळ जॉब करत असल्याचं समोर आलं होतं.
काही लोक केवळ लोकप्रियतेसाठी जॉब करतात. ना त्यांच्याकडे धड क्षमता असते ना काही वेगळं स्किल असतं. कुशल मनुष्यबळाचा दिवसेंदिवस वाढत असलेला अभाव हेसुद्धा ज्यांच्याकडे क्षमता आहे अशांना जॉब मिळत असल्याचं एक कारण असू शकतं. कारण इंडिया वर्कफोर्स होप्स अँड फियर्स सर्वेक्षण २०२२ नुसार, आयटीतल्या ५१ टक्के कर्मचाऱ्यांकडे तांत्रिक आणि डिजिटल कौशल्याचा अभाव आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे.
हेही वाचा: मृत्यूनंतर म्युच्युअल फंडमधल्या पैशांचं काय होतं?
भारतातली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी मूनलायटिंगच्या प्रकाराला स्पष्टपणे विरोध केलाय. यावर पहिल्यांदा चर्चा सुरू झाली त्यावेळी त्यांनी हा फसवणूकीचा प्रकार असल्याचं म्हटलं होतं. भारतातली व्यवस्थापन क्षेत्रातली सर्वोच्च संस्था असलेल्या 'ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन'च्या एका कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडलं होतं. मूनलायटिंगचा प्रकार कंपनीबद्दलच्या निष्ठेलाच आव्हान देत असल्याचं त्यांना वाटतंय.
हा प्रकार समोर आल्यामुळे आयटी कंपन्या सतर्क झाल्यात. त्यांना गोपनीय माहिती आणि डेटा लीक होण्याचा धोका सतावतोय. त्यामुळेच प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करत असल्याचा ठपका ठेवत विप्रोनं आपल्या ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. याचं समर्थन करत अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आलेल्या आयबीएम आणि भारतातल्या टाटा कन्सल्टन्सी सर्विस अर्थात टीसीएसनंही याला विरोध केलाय.
इन्फोसिसच्या एचआर विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने मेल केलेत. 'असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही कंपनीची फसवणूक ठरेल' असं म्हणत कर्मचाऱ्यांना सज्जड दमही देण्यात आलाय. तसंच असा काही प्रकार आढळून आलाच तर थेट कामावरून काढून टाकण्याचा इशाराच कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलाय. इथं कर्मचा-यांच्या नैतिक-अनैतिकतेचा मुद्दाही उपस्थित केला जातोय.
आयटी कंपन्यांमधे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो. त्यामुळे त्यांनी इतरत्र जॉब करणं कदाचित कंपनीच्या धोरणविरोधी ठरू शकतं. शिवाय तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्पर्धा हेसुद्धा त्यामागचं एक कारण आहे. पण आजही अशी अनेक क्षेत्र आहेत जिथं अगदी कमी पगारात महिना काढताना तिथल्या कर्मचाऱ्यांना अनेक कसरती कराव्या लागतात.
काही क्षेत्रांना तरी मूनलायटिंगमधून मोकळीक मिळावी असा एक मतप्रवाह आजूबाजूला आहे. फूड कंपनी असलेल्या स्वीगीसारखा प्लॅटफॉर्म हा पार्ट टाईम काम करू शकणाऱ्यांसाठी असाच एक उत्तम पर्याय असतो. याच स्वीगीने आता कर्मचाऱ्यांना आपलं काम सांभाळून इतर ठिकाणी काम करण्याची मुभा दिलीय. त्यामुळे इतर क्षेत्रातले कर्मचारीही या निर्णयाचं स्वागत करतायत.
'रिज्युम डॉट कॉम' या वेबसाईटनं केलेल्या सर्वेनुसार, ४८ टक्के लोकांना आपला अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी दुसरी नोकरी करावी लागतेय. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातल्याच महिंद्रा कंपनीनं आपलं वेगळं मत मांडलंय. कंपनीचे सीईओ असलेल्या सीपी गुरणानी यांनी एक ट्विट करत कर्मचाऱ्यांना समर्थन आणि सहकार्याची भूमिका घेतलीय. मूनलायटिंगचं स्वागतच असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यादृष्टीने पावलं टाकली जातील असंही सूतोवाच त्यांनी आपल्या ट्विटमधून केलंय.
हेही वाचा:
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?
पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?
श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्याची सूचना अभिजीत बॅनर्जी का करतात?