बाई, बुब्स आणि ब्रा मागचं गुप्त राजकारण

२४ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?

गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर 'नो ब्रा' आणि 'फ्री द निपल'  हे दोन्ही ट्रेन्ड फिरत होते. पण मराठी भाषिकांमधे या चर्चेची सुरवात झाली ती १२ जुलैला हेमांगी कवी या अभिनेत्रीनं केलेल्या फेसबुक पोस्टमुळे. ‘बाईचे बुब्स म्हणजे स्तन, त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रं आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो!’ असं हेमांगीने म्हटलंय.

एखाद्या पुरुषाच्या शर्टमधून त्याची स्तनाग्र दिसत असतील तर आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. पण हेच एखाद्या बाईनं ब्रा न घातल्यामुळे ड्रेसवरून तिच्या स्तनाग्रांचा आकार दिसत असेल तर त्याची कितीतरी अघळपघळ चर्चा होते. ही चर्चा करण्याची काहीही गरज नाही, असं हेमांगीनं तिच्या पोस्टमधून मांडलं होतं. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान वायरल झाली. तिच्या पोस्टला समर्थन देणाऱ्या नव्या पोस्टही लिहिल्या गेल्या. हेमांगीचा हा बोल्डनेस मीडियावरही झळकला. अनेक टीवी चॅनेलने तिला चर्चेसाठी बोलावलं.

तर तुमचा फेमिनिसम फक्त बायकांच्या मुलभूत प्रश्नांविषयी बोलणारा नाही तर बायकांच्या ब्राविषयी, दारूविषयी बोलणारा आहे असे आरोपही झाले. हेमांगीच्या पहिल्याच वाक्यात बायकांच्या अतिशय संवेदनशील अवयवाविषयी उघडपणे बोलल्यामुळे वाचताना थोडं अघडल्यासारखं वाटतं. आश्चर्याने आपल्या भुवया उंचावतात. पण हा ट्रेण्ड नेमका आहे काय हे नीटपणे समजून घ्यायलाच हवं.

हेही वाचा: चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

‘ब्रा’च्या बंधनात

मुलगी वयात आली की तिच्यात शारीरिक बदल होतात. मुलींचं सगळं राहणीमान, त्यांची कपडे घालायची पद्धतच बदलते. फ्रॉक जाऊन ड्रेस येतो. ओढणी येते. आणि ओढणीच्या, ड्रेसच्या आत ब्रा घातली पाहिजे, असंही बंधन येतं. तुझ्या शरीराकडे कोण कुठल्याही नजरेने बघेल हे सांगता येणार नाही म्हणून तू आपली स्वत:ला पूर्ण झाकून ठेव हे  आईसोबतच घरातल्या, आसपासच्या सगळ्या स्त्रिया मुलींवर बिंबवत असतात. 

महिलांच्या अंतर्वस्त्रांकडे पाहून लोकांच्या लैंगिक भावना जागृत होत असतात. म्हणूनच ब्रा महत्त्वाची असली तरी ती झाकूनच ठेवलेली असते. इतर कपड्यांखाली ब्रा लपवून ठेवली जाते. कुणाचीही नजर पडणार नाही अशी ठिकाणी आतल्या खोल्यांमधे कुठेतरी वाळत घातली जाते. एखाद्या मुलीच्या ‘ब्रा’चे पट्टे बघून लोक अस्वस्थ होतात. पोरी एकमेकींना इशारे करून बाहेर आलेला पट्टा आत ढकलायला सांगतात. इतर कपड्यांप्रमाणेच असणाऱ्या ‘ब्रा’विषयी समाजात इतका संकुचित दृष्टिकोन कशासाठी?

ब्राचं खरं काम काय?

‘ब्रेसियर’ या फ्रेंच शब्दाचं ‘ब्रा’ हे संक्षिप्त रुप. ब्रेसियर याचा अर्थ शरीराचा वरचा भाग. पहिली मॉडर्न ब्रा फ्रान्समधेच बनवण्यात आली. हर्मिनी कॅडोल यांनी १८६९ मधे कॉर्सेटला दोन तुकड्यांमधे तोडून एक अंतर्वस्त्र बनवलं. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात आला. आणि नंतर तसा विकण्यातही आला. नंतर तर ब्रा हा बायकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला.

पण ‘ब्रा’चं खरं काम स्तन झाकणं हे नाही तर स्तनांना उठाव देणं हे आहे. पुरुषी वर्चस्व असणाऱ्या समाजात एखाद्या बाईच्या सौंदर्याची व्याख्या ठरलेली आहे. सुडौल शरीर, बारीक कंबर, मोठे गोलाकार नितंब आणि एका विशिष्ट आकाराचे गोलाकार स्तन असलेली बाईच आपल्याकडे सुंदर मानली जाते. असे उभारदार स्तन पॉर्नमधेच नाही तर जहिरातींमधेही दाखवले जातात.

पुरुषांना आकर्षित करणं, त्यांचं मन रिझवणं हेच बाईचं आद्यकर्तव्य आहे, असं मानणाऱ्या समाजात ब्रा म्हणूनच महत्त्वाची असते. पुरुषांना आवडावं असं बाईचं शरीर सुंदर करण्याची जबाबदारी ब्राची असते.

हेही वाचा: जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

आंदोलनातली ऐतिहासिक ब्रा

ब्रा मागे असणाऱ्या या लैंगिक राजकाराणालाच हेमांगीनं सोशल मीडियाच्या पोस्टमधून हात घातलाय. तिच्यानंतर मीना हॅरिस आणि गिलीअन अँडरसन या हॉलिवुड अभिनेत्रीही याविषयी बोलू लागल्या. ‘पोटापर्यंत स्तन ओघळले तरी चालतील पण मी ब्रा घालणार नाही,’ असं अँडरसनने म्हटलं.

अँडरसन नेमकं काय म्हणतेय हे तर कुणी समजून घेतलं नाहीच. वर तिच्या बोलण्याचं हसच उडवलं गेलं. 'अटेन्शन सिकर' म्हणजेच 'प्रसिद्धीसाठी लक्ष वेधून घेणारी' म्हणत जाणीवपूर्वक पुरुषांना आकर्षित करण्यासाठी ती असं करतेय असंही आरोप केले गेले.

अमेरिका देशात महिलांच्या अंतवस्त्रांसंदर्भात ५० वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. न्यू जर्सीमधे असंख्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. बाई कशी दिसावी हे ठरवणाऱ्या या सौंदर्य स्पर्धांना त्यांचा विरोध होता. निषेध म्हणून सौंदर्य प्रसाधनं म्हणजेच लिपस्टिक्स, उंच टाचेच्या हिल्स, गोरं बनवणाऱ्या क्रिम्स कचरा कुंडीत फेकून दिल्या जात होत्या.

या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या एम. एस. मॉर्गन सांगतात, 'आंदोलन सुरू असताना एका तरुणींनं शर्टच्या आतून सहज ‘ब्रा’ काढली आणि सगळ्यांसमोर मोठ्या आनंदाने ती भिरकावून दिली. तिच्या कृतीने या आंदोलनाला इतिहासात स्थान दिलं.'

आरोग्याचं काय?

पुरुषांना रिझवण्यासाठी घालायची ब्रा बायकांना स्तनांच्या कॅन्सरकडे घेऊन जाते ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. सतत ब्रा घातल्याने वेदना होणं साहजिक आहे. जसं खूप तास टाइट कपडे घातल्यावर शरीराला अस्वस्थता वाटते. वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. रक्तवाहिन्या आवळल्या जातात. मग त्वचारोग होण्याची शक्यता वाढते. 

तसंच आपल्या स्तनांच्या स्नायूंना नुकसान होऊ शकतं. नाजूक त्वचेवर रॅशेस म्हणजेच लाल चट्टे येणं, त्या भागात खाज येणं, जळजळ होणं. सतत ब्रा घातल्याने खांदेदुखीला सामोरं जावं लागतं. याव्यतिरिक्त त्वचेवर डाग येणं किंवा जखम होण्यासारख्या समस्याही होतात. त्यामुळे खरचं ब्रा अत्यंत गरजेची आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

हेही वाचा: ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

पुरुषांचाही सहभाग महत्त्वाचा

दरवर्षी १३ ऑक्टोबरला साजरा केला जाणाऱ्या 'नो ब्रा डे' या दिवशी जगभरात स्तनांच्या कर्करोगाची जनजागृती केली जाते. एक दिवसासाठी का होईना महिलांनी ब्रा मुक्त आणि आपल्या शरीराला म्हणजेच स्तनाला पूर्ण जाणून घ्यावं असा उद्देश #NoBraDay ही मोहिमे राबवली जाते.

२०१४ च्या डिसेंबरमधे नेटफ्लिक्सने 'फ्री द निपल' नावाची ड्रामा डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली. न्यूयॉर्कमधल्या तरूणींच्या ग्रुपनं महिलांच्या स्तनांवरच्या सेन्सॉरशिपविरूद्ध मोहीम सुरू केली होती. त्यावर ही डॉक्युमेंट्री आधारलेली होती. या डॉक्युमेंट्रीमुळे 'फ्री द निपल' मोहीम जगभरात पोचली. 'समानता, सशक्तीकरण आणि स्वतंत्रता' असा या मोहिमेचा उद्देश होता. 

या उद्देशला अनुसरूनच बर्लिन इथं मागच्या आठवड्यात महिलांनी टॉपलेस होत रॅली काढली होती. हे दोन्ही ट्रेंड परदेशात सुरू झाले. तिथे या दोन्ही ट्रेंडकडे समानतेच्या हक्काने पाहिलं गेलं याचा साक्षात्कार झाला तेव्हा या रॅलीत पुरूषांनी सहभाग घेतला. 

मात्र, आधुनिक मानल्या जाणाऱ्या भारतात स्त्रीला अद्याप इतकं स्वातंत्र्य नाही. भारतातला समाज हा अजुनही 'पुरूष हा स्त्रीचा धनी झाला की तिचं आयुष्य तेच' या अस्मितेतून बाहेर पडलेला नाही. खरंतर या दोन्ही ट्रेंडकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. खासकरून महिलांनी. कारण पुरूष आणि स्त्रीचं शरीर हे निसर्गाने घडवलंय.

 

हेही वाचा: 

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच