जगातल्या ब्रँड कंपन्यांचं नेतृत्व करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला

१७ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नेमणूक झाली आणि ब्रँड कंपन्यांमधल्या भारतीयांचा शोध सुरू झाला तो केवळ पुरुषांचाच. त्यामुळे कोल्हापूरच्या लीना नायर यांची फॅशन क्षेत्रातली ब्रँड कंपनी 'शेनेल'च्या सीईओ पदावरची नेमणूक महिला कुठंच कमी नसल्याचं सांगणारी आहे. आज जगातल्या मोठ्या कंपन्यांच्या सीईओ पदावर बसून भारतीय वंशाच्या महिला उत्तम काम करतायत.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक, ऍपल अशा बड्या कंपन्यांचं नेतृत्व पुरुष मंडळी करतायत. पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांचं फार कौतुक झालं. त्यानंतर अशाच काही कंपन्यांमधल्या इतर भारतीय व्यक्तींचा शोध सुरू झाला. पण त्यात पुरुष मंडळींचा भरणा अधिक होता. त्याचीच चर्चा, बातम्या सगळीकडे झाल्या.

कोल्हापूरच्या लीना नायर नुकत्याच फॅशन क्षेत्रातला ब्रँड असलेल्या 'शेनेल' कंपनीच्या सीईओ बनल्यात. त्यांच्या या नेमणुकीनं महिला कुठंही कमी नसल्याचं दाखवून दिलंय. अनेक बड्या कंपन्यांमधे मोक्याच्या जागी आज भारतीय वंशाच्या महिला काम करतायत. कंपनीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात या महिलांचं योगदान मोठं आहे.

कोल्हापूरशी नातं सांगणाऱ्या सीईओ

'शेनेल' हा फॅशन, ज्वेलरी, परफ्यूम, मेकअपसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड आहे. याच ब्रँडच्या सीईओपदी लीना नायर यांची नेमणूक झालीय. याआधी इंग्लंडच्या युनिलीवर या कंपनीतून 'चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर' म्हणून त्यांच्या कामाला सुरवात झाली होती. २०१६ला या पदावर नेमणूक होणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या पहिल्या महिला होत्या. 'शेनेल' सारख्या एखाद्या मोठ्या जागतिक ब्रँडच्या सीईओपदावर पोचणाऱ्या लीना नायर भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला ठरल्यात.

लीना यांचा जन्म महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्वेंट स्कूलमधे झालं. पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. तर झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली. पुढे १९९२ला हिंदुस्तान लीवर या कंपनीतून मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांच्या कामाला सुरवात झाली. ३० वर्ष त्यांनी युनिलीवरमधे वेगवेगळ्या पदांवर काम केलं.

यावर्षी फोर्च्युन इंडियानं भारतातल्या सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. तर 'रोल मॉडेल ऑफ द एयर' 'द ग्रेट ब्रिटिश बिझनेसवुमन' अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलाय. द इकॉनॉमिक टाईम्सनं २०२०ला 'प्राईम वुमन लीडरशिप अवॉर्ड' देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. तर प्रतिष्ठित अशा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरून बोलत त्यांनी एक रॉडमॅप जगासमोर ठेवला होता.

हेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

ब्रँड कंपनीचा भारतीय चेहरा

फोर्ब मॅगझीननं जगातल्या प्रभावशाली महिला म्हणून गौरव केलेल्या इंद्रा नुई या पेप्सीको कंपनीच्या सीईओ होत्या. सेवन अप, मिरींडासारखी पेय, खाद्यपदार्थांची ब्रँड कंपनी म्हणून पेप्सीकोचं नाव आज आघाडीवर आहे. जागतिक स्तरावरच्या एका ब्रँड कंपनीच्या सीईओ पदावर पोचणाऱ्या नुई भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या. सध्या त्या अमेरिका-इंडिया व्यवसाय परिषदेच्या अध्यक्ष म्हणून काम करतायत.

६६ वर्षांच्या नुई यांचा जन्म तमिळनाडूत झाला. सुरवातीचं शिक्षण त्यांनी 'एंजलस अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूल' मद्रास इथून घेतलं. पुढे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. तर कोलकताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी मॅनेजमेंटमधे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीतून सार्वजनिक आणि खाजगी व्यवस्थापन विषयाचा अभ्यास केला.

इथल्याच बोस्टन कन्सल्टेशन या कंपनीतून त्यांच्या कामाला सुरवात झाली होती. पुढे १९९४ला त्यांची पेप्सीको कंपनीत एण्ट्री झाली. वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना २००१ला त्या कंपनीच्या सीईओ बनल्या. अमेरिकेच्या दुसऱ्या मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या कामाचा सन्मान म्हणून २००७ला भारताने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.

यंग ग्लोबर लीडर

भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक अंजली सूद या 'वीमियो' या ऑनलाइन वीडियो प्लॅटफॉर्मच्या सीईओ आहेत. २०१७ला त्यांची या पदावर नेमणूक झाली होती. त्यापूर्वी त्यांनी वीमियोत मार्केटिंग विभागाच्या प्रमुख आणि जनरल मॅनेजर या पदांवर काम केलं होतं. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं 'यंग ग्लोबर लीडर' म्हणून त्यांना गौरवलंय.

त्यांचे वडील भारतातून अमेरिकेच्या मिशिगन शहरात स्थायिक झाले. अंजली यांचा जन्म १९८३ला याच मिशिगन राज्यातलं प्रसिध्द शहर असलेल्या डेट्रॉईट इथं झाला. पुढे २००५ला पेनसिल्वेनिया युनिवर्सिटीतून त्यांनी पदवीचं तर २०११ला हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचं शिक्षण घेतलं. त्या दरम्यान त्यांनी अमेझॉन, टाइम वॉर्नर या ऑनलाईन व्यापार आणि माध्यम कंपन्यांमधे महत्वाच्या पदांवर काम करत नवी सुरवात केली.

२०१४ला वीमियोत काम करायला सुरवात केल्यावर त्यांना वेगवेगळ्या संधी मिळत गेल्या. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत त्यांनी सदस्यत्व योजना, वीडियो होस्टिंगला प्रोत्साहन देत वेगवेगळे प्रयोग केले. त्याचा कंपनीला फायदा झाला. कंपनीचं उत्पन्न वाढलं आणि वीमियोचं सीईओपद त्यांच्याकडे आलं.

हेही वाचा: गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

भारतीय वंशाच्या श्रीमंत अधिकारी

अरिस्टा ही एक अमेरिकन कम्प्युटर नेटवर्किंग कंपनी आहे. या कंपनीचं नेतृत्व करणाऱ्या जयश्री उल्लाल अमेरिकेतल्या महत्वाच्या उद्योगपती म्हणून ओळखल्या जातात. सध्या अरिस्टा नेटवर्कच्या सीईओ पदाची धुरा त्या समर्थपणे सांभाळतायत. लंडनमधे जन्मलेल्या आणि भारतात वाढलेल्या जयश्री उल्लाल या अमेरिकेतल्या सगळ्यात श्रीमंत महिला अधिकारी असल्याचं फोर्ब मॅगझीननं त्यांच्या बायोडाटामधे म्हटलंय.

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिवर्सिटीतून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पुढे सांता क्लारा युनिवर्सिटीत इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमधे मास्टर्स केलं. सांता क्लारा इथल्याचं 'ऍडवान्स मायक्रो डिवाईस' या कंपनीतून त्यांनी आपल्या कामाची सुरवात केली. पुढे १९९३ला सॉफ्टवेअर, हार्डवेअर बनवणाऱ्या सिस्को कंपनीत त्यांनी १५ वर्ष काम केलं. २००० वर्ष उजाडेपर्यंत त्यांनी या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं. त्यामुळेच कंपनीचं वरिष्ठ उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे आलं.

२००८ला अरिस्टा नेटवर्किंग कंपनीच्या अध्यक्षपदावर त्या रुजू झाल्या. फोर्ब मॅगझीनच्या नेटवर्किंग क्षेत्रातल्या सगळ्यात ५ प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत जयश्री उल्लाल यांचं नाव आहे. तर २०१८ला अमेरिकेतलं प्रसिद्ध मॅगझीन बॅरननं जगातल्या सर्वश्रेष्ठ सीईओ' म्हणून त्यांना गौरवलंय. पुढच्याच वर्षी २०१९ला फोर्च्युन मॅगझीननं 'टॉप २० उद्योजक व्यक्तीं'च्या यादीत त्यांचा समावेश केला.

कंपनीला ओळख देणारी भारतीय

फ्लेक्स ही इलेक्ट्रॉनिक कंपनी जगातल्या जवळपास ३० देशांमधे पसरलीय. या कंपनीचे जगभर २ लाख कर्मचारी आहेत. 'इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विस' देणारी फ्लेक्स ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळ्खली जाते. रेवती अद्वैती या भारतीय-अमेरिकन वंशाच्या महिलेकडे २०१९ला या कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी आली.

रेवती अद्वैती यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६७मधे भारतात झाला. त्यांचे वडील केमिकल इंजिनिअर होते. कामाच्या निमित्ताने ते बिहार, गुजरात, आसाममधे राहिले. त्यांना एकूण ५ मुली. त्यापैकी रेवती यांनी १९९०ला राजस्थानच्या 'बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी'मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधे शिक्षण घेतलं. पुढे २००५ला त्यांनी अमेरिकेतून एमबीए केलं. त्याआधी २००२ला इटन कॉर्पोरेशन या इलेक्ट्रॉनिक कंपनीतून त्यांच्या करियरची सुरवात झाली होती.

२०१९ला फ्लेक्स कंपनीत आल्यावर त्यांनी कंपनीला आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेलं. कोरोनाच्या अडचणीच्या काळातही आर्थिक फटका बसत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना आधार दिला. त्यांना सोबत घेत कंपनीनं मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्याचं उत्पादन घेतलं. २०१९, २०२० अशी सलग दोन वर्ष त्यांना फोर्च्युनच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळालंय. त्याचवेळी रेवती यांच्या नेतृत्वात कंपनीचा फोर्च्युननं जगातली सगळ्यात कौतुकास्पद कंपनी असा गौरव केलाय.

हेही वाचा: 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार