न्यायव्यवस्थेसोबतच आपला समाजही दिवसेंदिवस सुस्त होत चाललाय

१० फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं

वर्धा जिल्हातल्या हिंगणघाटमधे एका तरुणीला पेट्रोल ओतून जाळण्यात आलं. आज पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातला आरोपी विवाहित आहे. जिला जाळलं ती एक शिक्षिका होती. एकतर्फी प्रेमातून, शारीरिक आकर्षणातून अ‍ॅसिड हल्ला करून चेहरा विद्रूप करण्याच्या प्रकारापेक्षाही हा अधिक भयंकर आणि निर्घृण प्रकार आहे. त्यात तिची जीभ भाजून वाचा गेली होती, दृष्टीही गेली होती. घटना जितकी गंभीर तितकीच चिंताजनक आहे.

मानवतेचा मुखवटा पांघरलेली माणसं

दिल्लीत झालेल्या निर्भया हत्याकांडातल्या आरोपींच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली. तिच्या आईचा आक्रोश न्यायालयाच्या कानापर्यंत पोचला नाही. आरोपींच्या वकिलांचा आवाज मात्र पोचला. आता तर निर्भया हत्याकांडातल्या आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत. एका निर्भयासाठी तिघांचा खून व्हायला नको, असं हा कायदेतज्ञ माणूस निर्लज्जपणे म्हणतो.

त्याआधी, इंदिरा जयसिंग नावाच्या ज्येष्ठ वकीलबाईंनी त्यांचं ज्ञान पाजळून देशाला दिङ्मूढ केलं होतं. सोनिया गांधींनी राजीव गांधी यांच्या खुन्यांना माफ केलं, तसं निर्भयाच्या आईने आता तिच्या खुन्यांना क्षमा करावी, असं त्या म्हणाल्या. 'हे लोक असं बोलूच कसं शकतात?' हा समाजाला पडलेला प्रश्न आहे. एक तर गोठलेल्या संवेदना किंवा मानवतावादाचा नकली मुखवटा असंच या बाबतीत म्हणता येईल.

हेही वाचा: सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

रिंकू पाटील, अमृता देशपांडे अशी एकतर्फी शारीरिक आकर्षणातून हत्या झालेल्या कितीतरी तरुणींची नावं सांगता येतील. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या मुलीला तर गुन्हेगारांनी अमानुषपणे छळलं होतं. तिचे हातपाय मुरगळून, तोडून नंतर तिला मारलं होतं. तीच कथा आसिफाची आणि डिंपल शर्माची. आसिफा आणि डिंपल या तर कोवळ्या वयातल्या मुली होत्या. प्रेम किंवा वासना कळण्याचं त्यांचं वयही नव्हतं. सर्व प्रकरणात विकृतीनं कळस गाठलेला दिसून येतो. यात कमालीचं अमानवीय क्रौर्य आहे.

निर्भयाच्या खुन्यांची फाशी लांबणीवर पडल्यानंतर हैदराबाद हत्याकांडातले आरोपी चकमकीत मारले गेले. त्याविषयावर देशभर चर्चा सुरू झाली. ती आठवण ताजीच आहे. न्यायालयीन प्रक्रिया अशी असेल, तर हैदराबादेतल्या आरोपींना ज्या पद्धतीने चकमकीत मारलं तेच बरोबर होतं, अशी भावना देशभरातून विविध समाजमाध्यमांवर व्यक्त होतेय. 

गुन्हेगारांसाठी मानवाधिकार जागा

गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा व्हायला हवी, त्यांच्यावर रीतसर आरोपपत्र दाखल व्हायला हवं. खटला चालून, साक्षीपुरावे होऊन, त्यांचा आरोप सिद्ध झाल्यानंतर कायद्यानुसार जी असेल ती शिक्षा त्यांना मिळायला हवी. हे बरोबर आहे, न्याय्य आहे. परंतु, न्यायालयानेच फाशीची शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांना, त्यांच्या फाशीचा दिवस निश्चित झालेला असतानाही, दुसरे न्यायालय शिक्षा लांबणीवर टाकून आणखी काही काळ जिवंत ठेवते.

गुन्हेगारांच्या बाबतीत मानवाधिकार जागा असतो. पण त्यांनी ज्यांच्यावर अत्याचार करून ठार मारलं, त्यांच्या बाबतीत मात्र हा मानवाधिकार का झोपलेला असतो? त्यांना जगण्याचा हक्क नव्हता का? त्यांच्या मारेकर्‍यांना जगण्याचा हक्क आहे, असं मानवाधिकार मानतो. पण त्यातल्या बळींनाही तो असतो हे मानवाधिकार मानत नाही का?

हेही वाचा: १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

अशाही भयंकर घटना घडताहेत

कोणत्याही जिवंत माणसाचं मन सुन्न करून सोडणार्‍या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतानाच, आणखी एक या सगळ्यांहून भयंकर गोष्ट वाचनात आली. आपल्याकडे गर्भलिंग चाचणी करून मुलीचा गर्भ काढून टाकण्याच्या किंवा मुलगी जन्माला आलीच, तर तिला टाकून देण्याच्या, तिचा गळा घोटण्याच्या, जिवंत पुरण्याच्या घटना तर घडतच आहेत. कायद्याला न जुमानता घडताहेत.

गर्भलिंग तपासणी करून मुलीचा गर्भ असेल, तर नीट जोपासना करून तिला जन्माला घातलं जातं. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा परप्रांतातल्या दरिद्री गर्भवती स्त्रिया शोधल्या जातात. मुंबईला आणून गर्भलिंग चाचणी केली जाते. गर्भ मुलीचा असेल, तर तो व्यवस्थित वाढवला जातो. दिवस भरले की मुलगी जन्माला येते. त्यानंतर हे बाळ दोन महिन्याचं झाल्यावर त्याला वेश्या व्यवसायासाठी कुंटणखान्यात विकलं जातं.

धंदेवाईक यंत्रणा आणि बधीर समाज

दोन महिन्याची ती पोर कितव्या वर्षी वेश्या होईल आणि नंतर तिच्या आयुष्याची कशी वाट लागेल, हे सांगणं काही कठीण नाही. हा नवा व्यवसाय आता फोफावतोय. आई म्हणवणारी स्त्रीच आपल्या पोरीचा असा सौदा करत असेल तर यावर आळा कसा आणि कुणी घालायचा हा खरा प्रश्न आहे.

एका बाजूला, निष्पाप, कोवळ्या मुलींवरचे अमानुष अत्याचार, बलात्कार वाढतायत. अत्यंत निर्घृण पद्धतीनं आजूबाजूला हत्या होतात. तशा बातम्याही दिवसेंदिवस कानावर येत असतात. गुन्हेगारांना कठोर आणि वेळच्या वेळी शिक्षा देण्यासाठी आपली न्यायव्यवस्था कमजोर पडतेय हे वास्तव स्वीकारायला हवं. तर दुसरीकडे गर्भातल्या जिवालाच वेश्या बनवण्यासाठी राबवली जात असलेली अमानवीय धंदेवाईक यंत्रणाही इथं काम करतेय. यापैकी काहीही रोखू न शकणारा सुन्नबधीर समाज मात्र वाढत जातोय. म्हणायला गेलं तर सगळं शांततेत घडतंय.

हेही वाचा: 

आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

बोडो शांतता कराराने आता तरी आसाम शांत होणार का?

दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार

'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!