क्रिकेट म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. इथे पुरुषांच्या टीमला जितकं महत्व दिलं जात तितकं महिलांच्या टीमला नाही. शिवाय दोघांमधल्या मानधनातही भारी तफावत. पण या सगळ्या नकारात्मकतेला झिडकारत काही जणी उभ्या ठाकल्यात. इतकंच नाही तर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. अशा काहीजणींची ही ओळख.
बायकांना क्रिकेट समजत नाही असं पूर्वी सर्रास म्हटलं जायचं. ह्यावरचे अनेक विनोदही सोशल मिडियासारखा प्रकार नसताना प्रसिद्ध होते. अकरा जण एकाच चेंडूच्या मागे का धावतात? हा महिलांचा प्रश्न असायचा. पण आता दिवस पालटलेत. महिलांचं क्रिकेटही जोरात आहे. आणि अगदी पुरुषांची या क्रिकेटमधे जी मक्तेदारी होती ती महिलांनी मोडीत काढलीय. कॉमेंट्री, अंपायर, आकडेवारी, प्रशिक्षण, फिजिकल ट्रेनिंग, थेरपी सगळ्यात आज महिला आघाडीवर आहेत.
भारतातसुद्धा हे चित्र आहे. आठवत असेल २००३ मधे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेवेळी सोनी चॅनेलने पहिल्यांदाच एका महिलेला एंकरींग करायला लावलं. मंदिरा बेदी हे तिचं नाव. आपलं आकर्षक व्यक्तिमत्व आणि फॅशनमुळे ती लोकांच्या मनावर ठसली होती. पण ती घाबरलेली असायची. तिचं क्रिकेटचं ज्ञान तोकडं होतं.
समोर मैदान गाजवलेले भलेभले माजी क्रिकेटपटू असायचे. पण तिनं आपल्या परीने ती जबाबदारी छानरित्या पार पाडली. मंदिराच्या या यशस्वी झळकण्यानंतर आयपीएलसारख्या क्रिकेट तमाशासाठी अशा महिला एंकर गरजेच्याच वाटायला लागल्या. पण आता क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडूही एंकरींगसाठी यायला लागल्यात.
हेही वाचा: मराठमोळी पूजा सावंत बॉलीवूडमधे एंट्रीसाठी रेडी
सर्वात जास्त लक्ष कुणी वेधून घेतलं असेल तर ती मायांती लॅंगर-बिन्नी. मायांतीचं आकर्षक रुपं, तिचं ओघवतं इंग्रजी आणि खेळाची जाण ह्यामुळे ती प्रत्येक वेळेस आपली छाप पाडू लागलीय.
समोर दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट पंडित असले तरी ती बुजत नाही. ती या सर्वांशी मिळून मिसळून गप्पा मारते. चर्चा करते. नेमके प्रश्न विचारते. खरं तर तिचंसुद्धा क्रिकेटचं ज्ञान अगाधचं होतं. तिची एका पार्टीत स्टुअर्ट रॉजर बिन्नी या युवकाशी ओळख झाली. तेव्हा तिला सांगितलं गेलं होतं स्टुअर्ट रॉजर बिन्नीचा मुलगा आहे. यावर तिचा प्रश्न होता रॉजर बिन्नी कोण?
नंतर तिला समजलं की १९८३ चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताच्या टीममधे रॉजर होता. आणि त्याने सर्वाधिक विकेट घेऊन आपल्या यशात मोठा वाटा उचलला होता. शिवाय स्टुअर्टसुद्धा चांगला क्रिकेटपटू आहे. मायांतीचं पहिलं प्रेम होतं फुटबॉलवर. ती स्वत: फुटबॉल खेळायची. लहान वयातच तिला एकदा फुटबॉल सामन्याचं एंकरींग करण्याची संधी मिळाली. तिने ते छानप्रकारे केलंही.
मग फिफा स्पर्धेच्या वेळीही तिनं ते केलं. झी कॅफेनं तिला संधी दिली आणि अशा तऱ्हेनं ती एंकरींकडे वळली. मॉडेलिंगमधे तर ती बऱ्यापैकी प्रगती करून होतीच. पण विविध खेळांबद्दल ओढ असल्याने तिला एंकरींगच क्षेत्र खुणावू लागलं. तिला भारतीय क्रिकेट संघाच्या मालिकांसाठी २०१३ मधे एंकरींग करायला मिळालं.
हेही वाचा: वडिलांमुळे युवीला स्केटींगऐवजी क्रिकेटमधे यावं लागलं
ती जवळपास दहा वर्ष आपला जम बसवून आहे. २०१५ च्या विश्वचषकाच्या वेळीही ती एंकर होती. आणि आता २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठीही ती जबाबदारी निभावून आहे. स्टुअर्ट बिनीच्याही ती प्रेमात पडली. त्यांनी लग्नही केलं. ती रॉजर बिन्नीची सून झाली. रॉजर हा भारताकडून खेळलेला पहिला एंग्लो इंडियन. स्टुअर्टसुद्धा २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळला. मुलगा आणि बापाला दोघांनाही खेळायला मिळालंच शिवाय मायांती क्रिकेटच्या कॉमेट्री आणि एंकरींगमधेही झळकली. असं उदाहरण हे विरळाच.
मायांती स्टुअर्टपेक्षा वयाने मोठी आहे आणि सध्या अधिक लोकप्रियही आहे. स्टुअर्ट हा आयपीएल आणि इतरही महत्वाच्या सामन्यांमधे विशेष न चमकल्याने सोशल मिडियावर त्याच्या विरुद्ध बरंच काही येतं. ह्यावर मायांती जशास तसं उत्तर देत असते.
मायांती ही लष्करी अधिकाऱ्याची मुलगी आहे. संजीव लॅंगर हे भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. पण त्यांची नेमणूक अमेरिकेत झाली. मायांतीचं लहाणपण अमेरिकेतच गेलं. तिची आई प्रेमिंदा ही उत्कृष्ट शिक्षिका होती. मायांतीला आई वडलांनी नेहमीचं तिची आवड जोपासायला प्रोत्साहन दिलं. तिला विविध खेळ आवडतात हे पाहून तिला त्यांनी खेळायला वाव दिला. तिला मॉडेलिंगही करु दिलं. दिल्ली आणि बेंगलोरमधे तिचं शिक्षण झालं.
आतापर्यंत पाहिलेल्या मॅचमधे गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत एडलेड इथे झालेली भारत-पाकिस्तान मॅच तिला संस्मरणीय वाटते. तिचं वार्षिक उत्पन्न सहज पन्नास लाखात असेल.
हेही वाचा: अँजेलिना जोलीला बड्डे विश करण्यापूर्वी हे वाचा
यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एक भारतीय नाव कॉमेंट्रीसाठी झळकतंय. ते आहे इसा गुहाचं. तिचं मूळ हे बंगालमधे आहे. मात्र लहान असताना तिचे आईवडील इंग्लंडमधे आले. इसा इंग्लंडकडून खेळली. ती तेज गोलंदाज होती. काही काळ ती वनडे प्रकारात अव्वल क्रमांकावर होती. इसा आता क्रिकेटची कॉमेंट्री करते. तिला लिंगभेदाचे काही वाईट अनुभव आले. भेदभाव तिला जाणवला. आश्चर्य म्हणजे ऑस्ट्रेलियात तिला उलटा अनुभव आला. तिथं ज्याला जे हवं ते करु दिलं जातं.
तिनं कॉमेंट्री करायला घेतल्यावर इंग्लंडपेक्षा ऑस्ट्रेलियात चांगला अनुभव आला. इसा स्वत: न्यूरोलॉजिस्ट आहे. तिची क्रिकेटची आवड जबर होती. म्हणून ती क्रिकेट प्लेअर आणि कॉमेंटेटर झाली. खेळताना घेतलेला प्रत्येक निर्णय ती न्यूरोलॉजिस्टच्या दृष्टीने घेत असते हा तिचा एक वेगळा छंद आहे. इसाला लॉर्डसवर नेटमधे सचिनला गोलंदाजी करायची संधी मिळाली होती. आता तिची इच्छा आहे ब्रायन लाराला गोलंदाजी करायची. इंग्लंडची सोफी ही तिची आवडती महिला क्रिकेटपटू आहे.
हेही वाचा: विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
प्रत्येक चेंडू पहायला हवा हा तिच्या जीवनाचा मंत्र झालाय. म्हणजे नेहमी सतर्क रहा असं तिचं म्हणणं आहे. महिलांच्या क्रिकेटकडे आता सर्वांच लक्ष वेधलं गेलंय हे तिला महत्त्वाचं वाटतंय. महिलांचीही एक आयपीएल असायला हवी असं ती म्हणते. इसाची तक्रार आहे की कॉमेंट्री करणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी मानधन दिलं जातं. जर महिला सारखंच कौशल्य वापरत असतील तर हा भेदभाव का? असा तिचा प्रश्न आहे.
मायांती, इसा यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुरुषांच्या एका क्षेत्राला टक्कर दिलीय यात वाद नाही. महिलांना क्रिकेटच कळत नाही असं त्यांच्याकडे बघून कुणाची आता बोलायची बिशाद होणार नाही. या दोघींच नाही आणखी काही महिला कॉमेंट्रेटर आपला प्रभाव पाडत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून खेळलेली मूळची पुणेकर लिसा रथलेकर हीसुद्धा चांगली कॉमेंट्रेटर आहे.
हेही वाचा: अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून