वूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात

०३ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.

शहरातल्या धकाधकीतून चार विसाव्याचे क्षण मिळावेत म्हणून आपण शांत ठिकाणं निवडतो. विशेषतः निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणांकडे आपला कल असतो. तिथली झाडी, डोंगर आपल्याला मोहात पाडतात. अशी भटकंती आपला रोजचा ताणही हलका करते.

पावसाळ्यातली भटकंती तर वेगळ्याच आनंदाचं कारण ठरते. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे प्रेमात पाडणारी हिरवळ. त्याच हिरवळीमुळे झाडांचं एकाएकी समृद्ध होणं भारी वाटतं. कल्पनेपलीकडचा व्हीव आपल्याला पाहता येतो. पण त्याच्या मुळाशी दडलेलं जग या झाडांना अधिकच समृद्ध करतंय.

झाडांच्या मुळाशी असलेलं हे जग 'वूड वाईड वेब' या नावाने ओळखलं जातं. खरंतर मातीत असलेलं बुरशीचं हे विस्तीर्ण जाळं आहे. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करत असतं. त्यामुळे झाडांनाही पाणी, नायट्रोजन आणि पोषक तत्व अव्याहतपणे मिळत असतात.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

जमिनीखालचं सोशल नेटवर्क

१९९७मधे पहिल्यांदा 'वूड वाईड वेब' या तंत्राचा शोध लागला. त्याला कॅनडाचे संशोधक सुझान सिमार्ड यांचं पीएचडीचं संशोधन कारण ठरलं. त्यांच्या संशोधनामुळे जमिनीखाली पर्यावरणविषयक माहितीचं भांडार असल्याचं समजलं. त्याचं कुतूहल निर्माण झालं. त्यातूनच झाडांखाली मुळांसोबतच बुरशी आणि जिवाणूंचं एक जटिल आणि भलं मोठं नेटवर्क असल्याची माहिती पुढे आली.

झाडं आणि वनस्पती यांचं परस्परांशी घट्ट नातं असतं. मुळं आणि बुरशी तयार होण्याला मायकोरिझा असं म्हणतात. या दोन्हींमधून पोषक तत्वांची देवाणघेवाण होते. वनस्पतीचं पोषण, मातीचं जीवशास्त्र अशा सगळ्यात ही बुरशी महत्वाची भूमिका बजावते. ती झाडांच्या मुळांमधे अगदी खोलवर गुंतलेली असते. ही बुरशी झाडांकडून घेतलेल्या कार्बनच्या बदल्यात त्यांना फॉस्फरस आणि नायट्रोजन देते.

आपलं शरीर ठीकठाक राहावं म्हणून आपण कित्येक प्रयत्न करत असतो. जेवण वेळेवर घेणं, आवश्यक तो व्यायाम असं बरंच काही आपल्या रुटीनमधे असतं. झाडांचंही तसंच असतं. त्यांनाही पोषक तत्वांसाठी झगडावं लागतं. जमिनीखाली काम करत असलेलं हे नेटवर्क झाडांना वेगवेगळ्या सूचनांसोबत आवश्यक ती पोषक तत्व, पाणी अशा गोष्टी देतं.

बुरशी म्हणजे जंगलांचा मेंदू

आपल्या आजूबाजूच्या झाडांच्या मुळाशी मोठ्या प्रमाणात लहान बुरशीचं जाळं असतंच! दरम्यान बुरशी आणि वनस्पतीचंही एक वेगळं नातं तयार होतं. याच बुरशीने वनस्पतींना पहिल्यांदा खडकाळ जमिनीवर पाय ठेवायला मदत केलीय. मागच्या ४० कोटी वर्षांपासून बुरशीचं हे जाळं पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचं पर्यावरण शास्त्रज्ञ थॉमस क्रॉथर यांचं म्हणणं आहे. ३६ वर्षांचे क्रॉथर हे संयुक्त राष्ट्राच्या परिसंस्थाविषयक सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या मते, हे बुरशीचं जाळं म्हणजे 'जंगलांचा मेंदू' आहे.

क्रॉथर हे हवामान बदल आणि त्याचा जैवविविधतेवर होणारा परिणाम यावर अभ्यास करतायत. ते स्वतः स्विझरलँडमधली रिसर्च युनिवर्सिटी असलेल्या ईटीएच झुरिच इथं पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक आहेत. वूड वाइड वेबचा एक नकाशा बनवण्याचं काम सध्या जगभरातले शास्त्रज्ञ करतायत. क्रॉथर हे त्या शास्त्रज्ञांच्या ग्रुपमधले एक सदस्य आहेत.

आपल्या पर्यावरणाला हेल्दी ठेवण्याचं काम झाडांच्या मुळाशी असलेलं हे बुरशीचं जाळं करतं. त्यामुळे दुष्काळ आणि मातीतल्या छोट्या कीटकांपासूनही झाडांचं संरक्षण होतं. झाडांच्या उत्क्रांतीमधे या बुरशीचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळेच आपलं मानवी जीवनही सुखकर झालंय. जगभरातल्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाडांना जिवंत राहण्यासाठी हेच बुरशीचं जाळं परिणामकारक ठरत असल्याचं क्रॉथर म्हणतात.

हेही वाचा: पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

संवाद घडवणारी मुळं

'वूड वाईड वेब' ही झाडांमधे परस्पर संवाद घडवणारी एक महत्त्वाची व्यवस्था आहे. 'वर्ल्ड वाईड वेब'कडे आपण बघतो तसंच याही व्यवस्थेकडे आपल्याला बघायला हवं. झाडं एकमेकांशी बोलत असतात. त्यांचाही एकमेकांना संवाद होतो. झाडांच्या मुळांचं पसरलेलं जाळं हा संवाद घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. याच माध्यमातून एखादा मॅसेजही परस्पर पोचवला जातो.

२०१९ला थॉमस क्रॉथर आणि त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांनी बुरशी आणि जिवाणूंच्या नेटवर्कची तपशीलवार माहिती गोळा केलीय. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार असलेल्या मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. त्यातून क्रॉथर यांच्या टीमने ७०हुन अधिक देशांमधल्या २८ हजार झाडांच्या प्रजातींचा एक डाटा गोळा केल्याची आकडेवारी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलीय.

या संशोधकांच्या मते, पृथ्वीवरची ६० टक्के झाडं बुरशीजन्य जाळ्याने जोडली गेलीत. त्यामुळे या झाडांमधे परस्पर संवाद घडण्याची प्रक्रियाही सहजपणे होते. माणसं जसा एकमेकांशी संवाद करतात, बोलतात, एकमेकांची मदत करतात तसंच सगळं या जाळ्यांच्या नेटवर्कमुळे या झाडांमधे होतं.

जमिनीखालचं जगही धोक्यात?

जगातली प्रतिष्ठित संस्था असलेल्या येल युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक रिसर्च केलाय. त्यांच्या मते, जगात आजघडीला वेगवेगळ्या ६० हजार प्रजातींची ३ लाख कोटी इतकी झाडं आहेत. मानव जातीच्या उत्क्रांतीवेळी असलेल्या झाडांच्या तुलनेत यातली ४६ टक्के झाडं नामशेष झाल्याचं येल युनिवर्सिटीच्या संशोधकांचं म्हणणं आहे. या सगळ्याला पर्यावरणात दिवसेंदिवस वाढत असलेला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे.

झाडांनी मानवी जीवन समृद्ध केलंय. निसर्गाचं नयनरम्य दृश्य आपला स्ट्रेस घालवतो. आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. पण त्याच्याच मुळाशी आपण उठतोय. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, मागच्या तीन दशकांमधे १७.८ कोटी हेक्टरवरचं जंगल नष्ट करण्यात आलंय. ही झाडं तोडल्यावर त्यांना तग धरून रहायला बळ देणारी जमिनीखालची बुरशीही नष्ट होतेय. कारण वनस्पती आणि बुरशी ही जोडी तितकीच महत्वाची आहे.

मायकोरायझल बुरशीला धोका वाढल्यामुळे सूक्ष्मजीवांचं जाळंही संकटात आलंय. या बुरशीनं आपली परिसंस्था आणि जंगलं जिवंत ठेवलीत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतलं जातं. पण हवामान बदल, जंगलतोड, वाढणाऱ्या उष्णतेमुळे धोका वाढतोय. त्यामुळे प्राणी, पक्षी, झाडं यांचं पृथ्वीवरचं जीवन नष्ट होईल हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं.

हेही वाचा: 

वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?